केदारनाथला देवदर्शनासाठी गेलेल्या हजारो भारतीयांना ज्या आपत्तीला तोंड द्यावे लागले आणि लागते आहे, त्याचे वर्णन भयानक या शब्दानेही होणार नाही. परंतु अशा संकटातही धर्माच्या नावाखाली सुरू असलेली लूट लक्षात येते, अडकलेल्या प्रवाशांना लुबाडण्याची प्रवृत्ती दिसून येते, तेव्हा माणुसकीही वाहून गेली की काय असे वाटू लागते. ज्या बाबांकडे लाखो रुपयांची रोकड आणि दागदागिने सापडले, त्यांनी केवढा अधर्म केला आहे, याची जाणीव चीड आणणारी आहे. असे करण्यासाठी मृतांचे अवयव तोडण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ शकते, हे किळसवाणे आहे. अडकलेल्या सर्वाना सुरक्षित परत आणण्याचा विडा उचललेल्या भारतीय सेनादलाचे कौतुक करतानाच, या आपत्तीमध्ये राज्याच्या प्रशासकीय अपयशाचीही चर्चा सुरू होणे स्वाभाविक आहे. त्या परिसरातील प्रत्येक चौरस इंच तपासला जाईल आणि जिवंत असलेल्या प्रत्येकाला सुरक्षित ठिकाणापर्यंत नेण्यात येईल, अशी ग्वाही लष्कराने दिल्यामुळे काही अंशी का होईना, देशवासीयांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेला या धोक्याची कल्पना नव्हती, ते खरे असले तरीही असे काही घडले तर काय करायला हवे, याची कोणतीही योजना कागदावरही न उतरवणाऱ्या सरकारी बाबूंना जाब विचारायलाच हवा. पर्यावरणाशी केलेल्या राजकीय खेळामुळे हे संकट ओढवले, असा निष्कर्ष अनेक चर्चामधून व्यक्त केला जात आहे. राजकीय हितसंबंध जपण्यासाठी देशात सर्वत्र असेच घडते आहे, याचे अनेक पुरावे उपलब्ध असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करण्याएवढा कोडगेपणा राजकारण्यांनी कमावलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील पर्यावरण टिकवण्यासाठी माधव गाडगीळ समितीने केलेल्या सूचनांना ज्या प्रकारे राजकीय विरोध झाला, तसाच देशात सर्वत्र होत आलेला आहे. केदारनाथच्या परिसरात गेल्या काही दशकांत जे नवे प्रकल्प उभारण्यात येत आहेत, त्यामुळे पर्यावरणाचे कोणते प्रश्न निर्माण होतील याच्या अनेक बातम्या आता प्रकाशात येऊ लागल्या आहेत. मात्र, या साऱ्या घटनांचे राजकीय भांडवल करून आपली पोळी भाजून घेण्याची स्पर्धा निंदनीय म्हटली पाहिजे. अशा घटनांमध्ये भेट देण्याची जी स्पर्धा राजकीय नेत्यांमध्ये लागते, ती अनाकलनीय नाही. अशा वेळी प्रसिद्धी मिळणे अधिक सुकर असते, याचा अनुभव असल्याने, प्रत्येकालाच असा मोह होतो. सोनिया गांधी यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सगळेच या मोहाला बळी पडले. मोदी यांच्या एकाच भेटीत पंधरा हजार गुजराती बांधवांची सुटका झाल्याची फुशारकी सेनादलाच्या निव्र्याज कष्टांवर पाणी फिरवणारी आहे. औषधी वनस्पती आणून देण्यासाठी अख्खा डोंगरच उचलून आणणाऱ्या हनुमानाप्रमाणे या नरेंद्र मोदी यांनी अशाच कोणत्या तरी जादूटोण्याने आपल्या बांधवांची सुटका केल्याचे सांगणे म्हणजे सेनादलाच्या सगळ्या प्रयत्नांची टिंगल करण्यासारखे आहे. हेही कमी म्हणून की काय, मोदी यांनी केदारनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे काम करून देण्याचीही तयारी दाखवली. एरवी अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केदारनाथमधील अनुपस्थिती जाणवू लागल्यावर आठ दिवसांनी संघाचे स्वयंसेवक तेथे कार्यरत असल्याचा डांगोरा पिटला जाऊ लागला आहे. अशा घटनांमध्ये जी परिपक्वता दाखवायला हवी, ती दाखवण्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सगळेच जण अपयशी ठरले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा