आसाराम लोमटे यांनी ‘धूळपेर’ या त्यांच्या सदरातील ‘दो बिघा जमीन आणि किंगफिशर’ या लेखात (२० जाने.) ग्रामीण भागातील वास्तव मांडले आहे. पीककर्ज घेणे यालाच काही भागांत ‘रोखा करणे’ असेही म्हणतात. पीककर्ज घेताना सोसायटीच्या चेअरमनची सही लागते, तिथे पुन्हा गावपातळीवरील राजकारण येते. राजकारणासाठी शेतकऱ्याची अडवणूक तरी होते नाही तर ‘निवडणुकीत मदत केली पाहिजे तरच रोखा करतो’ असे त्याच्याकडून वदवून घेतले जाते. या सर्व सोसायटय़ा बहुतांश पुढारी लोकांच्या हाती आणि त्यावरील जिल्हा सहकारी बँकाही त्यांच्याच ताब्यात; त्यामुळे कर्ज कोणाला द्यायचे हे तेच ठरवितात व खरा गरजू शेतकरी तसाच राहतो. ही कर्जवाटपाची पद्धतच बदलली पाहिजे.. नाहीतर कितीही कर्जमाफी योजना आल्या आणि गेल्या तरी शेतकरी तसाच राहील.
-विनोद हनुमंत कापसे, जवळगाव (बार्शी)

निवडणुकीसाठीच असेल, तर भेटा राहुल गांधींना..  
शिवसंग्रामचे अध्वर्यू आमदार विनायक मेटे यांनी ‘मराठा नेत्यांना समाजाशी काहीच देणे-घेणे नसून त्यांनी केवळ स्वत:च्या कुटुंबाचेच भले केले’ असा आरोप दिल्लीतील मेळाव्यात केल्याचे (लोकसत्ता, २१ जुलै) वाचले.
आमच्यासारख्यांच्या सामान्य कुवतीनुसार हा आरोप त्यांचेच नेते पवारसाहेब आणि विजयसिंह मोहित-पाटील यांच्यासारख्या वंशपरंपरेची गादी चालवणाऱ्यांवर असावा. तो खरा आहे, यात कोणाचेच दुमत असणार नाही. प्रश्न असा आहे की कुटुंबाचे भले करणे वर्षां-दोन वर्षांत होत नाही, त्यासाठी पिढय़ा जाव्या लागतात. मग मेटेंना असे साक्षात्कार फक्त निवडणुकीअगोदरच कसे होतात हे गूढच आहे. मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकणे अवघड आहे, याची जाणीव असल्यामुळेच नारायण राणेसुद्धा त्यांच्या समितीचा अहवाल आता फेब्रुवारीअखेर येईल असे सांगतात, याचाच अर्थ आचारसंहिता लागू होण्याची वाट बघताहेत. म्हणजे गरीब व यांच्यासारखे छक्के-पंजे न खेळू शकणाऱ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा मतांसाठी गुंडाळता येईल.
या पाश्र्वभूमीवर, मेटे खरोखरच मराठा आरक्षणासाठी व्याकूळ असतील तर त्यांनी राहुल गांधींना साकडे घालावे. आरक्षणच काय, मराठय़ांना अल्पसंख्याकांचा दर्जादेखील मिळेल. कारण मराठा मते जैनांच्या ५० लाखांपेक्षा कितीतरी अधिक आहेत.
-सुहास शिवलकर, पुणे

जि.प. शाळांची वीज महागच
सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमधील वीजपुरवठा तोडलेला आहे. याचे कारण या शाळांना व्यापारी दराने वीजपुरवठा करण्यात येतो. या दराने येणारी वीज बिले भरणे मुख्याध्यापकांच्या आवाक्याबाहेरील काम आहे. मिळणाऱ्या अनुदानातून वीज बिले भागवली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेक शाळांनी वीज बिले भरली नाहीत. म्हणून त्यांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे.
खरे तर सरकारी शाळा म्हणजे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याची व्यवस्था. तो काही शासनाचा पसा कमावण्याचा धंदा नाही. असे असताना सरकारी शाळांना व्यापारी दराने वीज बिले देणे मुळातच चुकीचे आहे. खेडय़ापाडय़ांतील अनेक जि. प. शाळांनी संगणक शिक्षणाची सोय सुरू केली होती. पण वीजमंडळाच्या चुकीच्या दर आकारणीचा फटका खेडय़ापाडय़ांतील संगणक शिक्षणाला बसत आहे. इतरही अनेक शैक्षणिक कामांचे नुकसान होते आहे. म्हणून याबाबत वीजमंडळ आणि शासनाने लवकरात लवकर तोडगा काढून शाळांमधील वीजपुरवठा सुरळीत करावा.
-वाघेश अशोक साळुंखे

नैतिकता पाळल्यास मंदिराचेही स्वागत!
‘बाळासाहेबांचे ‘बाबामहाराज’’ हा अग्रलेख (२१ जाने.) राजकीय पुढाऱ्यांच्या दैवतीकरणावर उचित भाष्य करणारा आहे, पण आपल्या समाजाची एकूण मानसिकता पाहता आणि अनेकांशी बोलल्यानंतर बहुसंख्य समाजाला यात काही वावगे वाटत नाही, असे माझ्या लक्षात आले.
बाळासाहेबांचे मंदिर असो नाही तर शिवसनिक बांधणार असणारा गंडा असो.. आपण त्यांच्या भावनांची कदर करू या! पण या दोन्ही कृतींमुळे शिवसैनिकांची नतिक जबाबदारीही वाढते, याचे भान सर्व पदाधिकारी आणि कार्यकत्रे ठेवतील याची हमी उद्धव ठाकरे घेणार का, हा खरा प्रश्न आहे. बाळासाहेबांच्या मंदिरात प्रवेश करताना कोणतेही अनुचित, असभ्य, दादागिरीचे कृत्य न करता आम्ही जाऊ अशी शपथ ते घेतील का?
किंवा ‘शिवबंधा’चा गंडा बांधताना भ्रष्टाचार, खंडणी, माफियागिरी यापासून आम्ही दूर राहू अशी ‘आण’ ते भवानीमातेसमोर घेऊन प्रामाणिकपणे पाळतील का?
..असे ते करणार असतील तर या मंदिराचे स्वागतच करायला हवे.  
शिरीष धारवाडकर, औरंगाबाद</strong>

परिवर्तनशील  शिवसेना!
‘बाळासाहेबांचे ‘बाबामहाराज’’ हा अग्रलेख वाचला (२१ जाने.) अंगभर भगवी वस्त्रे आणि रुद्राक्षांच्या माळा धारण करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या देवळाला विरोध न करण्याचा उद्धव ठाकरे यांचा मनोदय हा रस्त्यावर महाआरत्या आयोजित करून धार्मिक तेढ वाढवणाऱ्या आणि जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेशी सुसंगत असाच आहे.
आगरकर, सावरकर यांचा विज्ञाननिष्ठ आणि पुरोगामी वारसा जपणाऱ्या प्रबोधनकारांच्या प्रेरणेतून उदयाला आलेली शिवसेना आता (कम्युनिस्टांप्रमाणे) पोथीनिष्ठ राहिलेली नाही. खरे तर त्यांनी स्वत:मध्ये केलेल्या या परिवर्तनाबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे.  
खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना एका कार्यक्रमात व्यासपीठावर जाहीरपणे वाकून नमस्कार केला.. परंपरेनुसार ज्येष्ठांच्या पाया पडणे योग्यच असते; पण वयाने खूपच लहान असलेले आदित्य यांचे पाय धरू जाण्यातून त्यांची पक्षावरील आणि पक्षनेतृत्वावरील जाज्वल्य निष्ठा दिसून आली. स्वत:चा अहंकार बाजूला ठेवून त्यांनी दाखवलेली ही स्वामिभक्ती पाहून इतर अनेक नेत्यांनाही लाज वाटली असेल.(त्यांत प्रिन्सिपॉल जोशी आलेच)  चंद्रकांत खैरे यांना मते देऊन निवडून देणाऱ्या मतदारांचा ऊर भरून आला असेल आणि त्यांची मान आपल्या योग्य निवडीच्या अभिमानाने ताठ झाली असेल!
प्रमोद तावडे, डोंबिवली

लोकहिताचे काम हेच स्मारक
‘बाळासाहेबांचे ‘बाबामहाराज’’ हा अग्रलेख (२१ जाने.) वाचला. मात्र प्रबोधनकारांनी जसा बुद्धिप्रामाण्यवाद जपला व कर्मकांडाला विरोध केला तसा आणि तेवढा बाळासाहेबांनी केला नव्हता, असे त्यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून म्हणावे असे वाटते. किंबहुना भगवी वस्त्रे नेसून, रुद्राक्षांच्या माळा घालून, कपाळी तिलक लावून त्यांनी उलटाच संदेश जणू दिला.
अर्थात, म्हणून त्यांचे मंदिर बनवण्याचे समर्थन होऊच शकत नाही. या मूर्ती, मंदिर आणि सर्व कार्यक्रमाला जो खर्च येईल त्यातून लोकहिताचे एखादे ठोस काम नक्कीच करता आले असते व तेच त्यांचे योग्य स्मारक झाले असते.
राम ना. गोगटे, वांद्रे पूर्व.

बाळासाहेब सर्व धर्माचे
‘बाळासाहेबांचे बाबा महाराज’ हा अग्रलेख वाचला. बाळासाहेबांबाबत माझा १९६९ सालचा अनुभव असा की, तेव्हा कुर्ला येथील मूळचे कॅथलिक व शिवसनिक यांच्यात क्रुसाच्या प्रार्थनेवरून वाद झाला. एका कॅथलिक कामगाराने मला सांगताच माझ्या ऑफिसात (व्होल्टास) काम करणारे व गिरगावातील शिवसेनेचे त्यावेळचे नेते काशिनाथ निगुडकर यांना मी तो प्रकार सांगितला. त्याच संध्याकाळी आम्ही बाळासाहेबांना त्यांच्या घरी भेटलो. बाळासाहेबांच्या एका फोनने तो वाद कायमचा मिटला. यात ठाकरे यांचे सर्वधर्मप्रेम दिसते, तीच त्यांची ताकद होती.
मात्र िहदू देवालये सर्वत्र उभारली जाताहेत, अशा अर्थाचा अग्रलेखातील उल्लेख अपुरा वाटला. वसई-विरार हिरवागार प्रदेश. या परिसरात मूळचे मराठीभाषक कॅथलिक केवळ ७० हजार असावेत. मात्र अनेक विलायती संतांच्या नावाने येथे चच्रेस उभी आहेत. जागोजागी क्रूस उभे आहेत. एवढे क्रूस मी युरोप-अमेरिकेतही पाहिले नाहीत. पोप जॉन पॉल दुसरे यांचा पुतळा रोम शहरात उभा केला असता तो तेथील कॅथलिकांनी पाडला. मात्र येथे वसईत तो रुबाबात उभा आहे. धार्मिक स्थळे पसा कमावण्याचे हुकमी एक्के झाले आहेत. शिवाय मतेही मिळतात.
अर्थात, ठाकरे यांना देव्हाऱ्यात बसविणे म्हणजे त्यांचे आदर्श पायदळी तुडविण्यासारखे आहे. बाळासाहेब कधीही केवळ हिंदू धर्माचे असे नव्हते. म्हणूनच त्यांच्या हयातीत आणि आजही विविध धर्मीय त्यांना मानतात.
– मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

Story img Loader