फक्त सोयी-सुविधा आणि सवलती मिळाल्याने यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येत नाही. त्याच्या जोडीला आवश्यकता असते ती दुर्दम्य इच्छाशक्ती व महत्त्वाकांक्षेची. जमैकाच्या धावपटूंचे यश पाहून नेमकी हीच गोष्ट अधोरेखित होते. युसेन बोल्ट व शेली अॅन फ्रेझर यांनी ऑलिम्पिक आणि जागतिक मैदानी स्पर्धेत मिळविलेले यश अतुलनीय आहे. बोल्टने २००८च्या ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर, २०० मीटर या वैयक्तिक शर्यतींबरोबरच ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरले, तेव्हा साऱ्या अॅथलेटिक्स क्षेत्राला वेगाचा नवा बादशाह मिळाला. आपले हे यश म्हणजे चमत्कार नव्हता, याचा प्रत्यय त्याने २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये घडविला. त्याने या स्पर्धेत पुन्हा तीन सुवर्णपदकांची कमाई केली. २००९च्या जागतिक मैदानी स्पर्धेत त्याने १०० व २०० मीटर शर्यतींत सुवर्णवेध घेतला. २०११च्या जागतिक स्पर्धेत त्याने १०० मीटर व ४ बाय १०० मीटर रिले या दोन शर्यती जिंकल्या. आता २०१३च्या ऑगस्टमध्ये त्याने १०० व २०० मीटर शर्यतींबरोबरच रिले शर्यतहीजिंकली आणि कार्ल लुईस याच्यासह अनेक अव्वल दर्जाच्या धावपटूंनी केलेले विक्रम मोडीत काढले. ‘वेगवान मानव’ ही बोल्टची ओळख यामुळे अधिकच पक्की झाली आहे. जमैकाच्याच शेली फ्रेझरने महिलांमध्ये बोल्टचा कित्ता गिरविला आहे. तिने २००८च्या ऑलिम्पिकमध्ये १०० व २०० मीटर शर्यतींत सुवर्णपदक मिळविले. नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने १०० व २०० मीटर धावणे, तसेच रिले शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. जमैका हा देश भारताइतका प्रगत अर्थातच नाही. आपल्याला जीवनात आर्थिक स्थैर्य मिळवायचे असेल तर आपल्या क्षमतेचा खेळात उपयोग केल्यास खेळात पैसा व प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी आपल्या पायाशी लोळण घेतील; हे तत्त्व त्या खेळाडूंनी डोळ्यांसमोर ठेवले आहे. सुदैवाने त्यांच्या खेळाडूंच्या कारकिर्दीत संघटकांची ढवळाढवळ होत नाही. जमैकाने जगाला अनेक अव्वल दर्जाचे धावपटू दिले आहेत. १९४८मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ऑर्थर विन्ट याने ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवून आपल्या देशाचे पहिले ऑलिम्पिक विजेतेपद नोंदविले होते, तेव्हापासून आजपर्यंत! लिनफोर्ड ख्रिस्ती व डोनोव्हान बॅली हे खेळाडूदेखील मूळचे जमैकाचे. कुटुंबीयांच्या आर्थिक स्थैर्यासाठी ख्रिस्ती इंग्लंडला, तर बॅली कॅनडामध्ये स्थायिक झाले. तसा बोल्टही देश सोडेल, पण ‘बोल्टचा देश’ ही जमैकाची ओळख राहील, इतके यश त्याने कमावले आहे. धावपटूंच्या या देशातील काही खेळाडू यापूर्वी उत्तेजक द्रव्यांच्या सेवनप्रकरणी दोषी आढळले असल्यामुळे जमैकावासीयांच्या यशावरसुद्धा टीका होते. मात्र कोणत्या वेळी ही औषधे टाळायची जेणेकरून उत्तेजक चाचणीत आपण सापडणार नाही, याची काळजी हे खेळाडू घेत असतात. अर्थात उत्तेजक हेच काही त्यांच्या यशाचे गमक नाही. खडतर परिश्रम, अतिशय निष्ठेने व एकाग्रतेने सराव करणे, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता स्पर्धामध्ये भाग घेत राहणे, प्रशिक्षकांवर विश्वास ठेवत त्यांच्या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करणे हेच जमैकाच्या खेळाडूंच्या यशाचे गमक आहे.
इच्छाशक्तीचा वेगवान आविष्कार
फक्त सोयी-सुविधा आणि सवलती मिळाल्याने यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येत नाही. त्याच्या जोडीला आवश्यकता असते ती दुर्दम्य इच्छाशक्ती व महत्त्वाकांक्षेची.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-08-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast invention of will power