संस्कृत ही जशी सर्व भारतीय भाषांची जननी नाही तसेच ती एका धर्माची किंवा उच्चवर्णीयांचीदेखील नाही. ती जनभाषा होती हे लक्षात घेऊन तिचे ज्ञानभाषा म्हणून असलेले महत्त्व आजही कायम आहे हे अधोरेखित करणारा लेख, आजच्या ‘संस्कृत भाषा दिना’च्या निमित्ताने..
भाषा हे निव्वळ अभिव्यक्तीचे साधन नसून ते मनुष्याच्या सामाजिक ओळखीचे एक महत्त्वाचे माध्यम असते. जात, धर्म, देश यांच्याबरोबरीनेच भाषा या संकल्पनेभोवतीदेखील सामूहिक अस्मिता विणली जात असते. कधी नकळतपणे हा भाषिक अस्मितेचा अंकुर इतक्या जोमाने वाढतो की त्याचं नांगीत रूपांतर होतं आणि परिणाम म्हणून दुसऱ्या समूहाची भाषिक अस्मिता दुखावली जाते. त्यानंतर सुरू होतो तो भाषिक अस्मितांमधील संघर्ष, आपापल्या भाषेचं मोठेपण ठसवण्याची चढाओढ, त्यासाठी आपापल्या भाषांचं प्रसंगी अवास्तव केलं जाणारं उदात्तीकरण. अशा अवास्तव उदात्तीकरणामुळं ती भाषा वर्तमान आणि वास्तव या दोन्हीपासून दुरावते. तामिळ, हिंदी, मराठी या भारतीय भाषा कमीअधिक प्रमाणात अडचणीत सापडलेल्या आहेतच. संस्कृत भाषा या संदर्भातही सर्व भारतीय भाषांची अग्रणी ठरावी अशी स्थिती आहे. भारताचा इतिहास आणि संस्कृती यांच्याशी संस्कृताचा घनिष्ठ संबंध असल्याने परिस्थिती अधिकच नाजूक बनली आहे. त्यात गेल्या काही वर्षांत संस्कृतच्या प्रसारासाठी झालेले प्रयत्न प्रामुख्याने भावनिक पातळीवर सीमित राहिल्याने त्यातून काही वेळा अस्मितांच्या संघर्षांचे प्रसंगही अगदी स्वाभाविकपणे निर्माण झाले. या साऱ्याचा परिणाम म्हणून संस्कृतविषयक अस्मितेच्या बाजूने आणि विरोधात असे दोन्ही बाजूंनी काही गैरसमज बळावत आहेत. यापैकी काही वरवर क्षुल्लक वाटले तरी ते ‘मास लेव्हल’ म्हणजे जनसामान्यांमध्ये पसरलेले असल्याने संस्कृत भाषेच्या भवितव्याच्या दृष्टीने गंभीर आहेत.
काही वेळा निव्वळ भाषिक अस्मिता चेतवण्यासाठी म्हणून, ‘संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे’, ‘सर्व भारतीय भाषांची जननी म्हणजे संस्कृत भाषा’, ‘सर्व युरोपीय भाषांचा उगमदेखील संस्कृतातूनच झाला आहे’ अशी ढळढळीत असत्य आणि अशास्त्रीय विधाने केली जातात. आत्ता आपण जी संस्कृत भाषा वाचतो/बोलतो (अभिजात संस्कृत) तिच्याहून प्राचीन अशी वैदिक बोली (ऋग्वेद इ.ची भाषा) खुद्द भारतीय उपखंडातच होती. भारतात वर्तमान स्थितीत चार भाषाकुले अस्तित्वात आहेत. त्यापैकी निव्वळ एका भाषाकुलाशी संस्कृत भाषा संबंधित आहे. मग इतर भाषांचा उगम तिच्यातून कसा होईल? अशा विधानांमुळे तामिळसारख्या प्राचीन भाषेच्या भाषकांची अस्मिता दुखावली गेली तर दोष कुणाचा? इंग्रजीतील ‘मदर’ आणि संस्कृतातील ‘माता’ या शब्दांमधील साधम्र्यामुळे संस्कृत इंग्रजीची आई कशी होईल? उलट संस्कृत आणि इंग्रजी ही एकाच आईची लेकरं आहेत हा निष्कर्ष अधिक तर्कसंगत ठरतो. अशा गैरसमजुतींचा प्रसार झाल्याने आणि प्रतिवाद न झाल्याने संस्कृताचं खरं महत्त्व मागेच पडतं. वास्तव हे आहे की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि महाराष्ट्रापासून पूवरेत्तर राज्यांपर्यंत कुठल्या ना कुठल्या काळात आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पोहोचलेली एकमेव भाषा म्हणजे संस्कृत! हिंदीदेखील एवढी प्रसृत नाही. यामुळेच बहुधा हिंदीला भारताची अधिकृत भाषा (राष्ट्रभाषा नव्हे) म्हणून मान्यता मिळण्यास विरोध निर्माण झाल्यावर डॉ. आंबेडकरांनी नोव्हेंबर १९४९ मध्ये संस्कृत भाषेच्या पर्यायाला अनुकूलता दर्शवली असावी.
एकीकडे असे गैरसमज पसरत असताना, दुसरीकडे इतर सामूहिक अस्मिता दुखावल्या जाण्यातूनही संस्कृत भाषेसंबंधी अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. उदाहरणादाखल- ‘संस्कृत ही प्रामुख्याने हिंदू धर्माचीच भाषा होती’, ‘ती ब्राह्मणांनी स्वत:चं श्रेष्ठत्व जपण्यासाठी वापरलेली ब्राह्मणांची भाषा आहे’, ‘संस्कृत ही कधीच बोलीभाषा नव्हती’ अशी काही विधानं सांगता येतील. अशा विधानांचा पाया शास्त्रीय कमी आणि भावनिक अधिक असतो. हिंदू संस्कृतीचे श्रुती-स्मृती-पुराण हे धार्मिक वाङ्मय संस्कृतात आहे हे खरेच आहे. पण संस्कृतातील एकूण वाङ्मयाच्या तुलनेत या वाङ्मयाचं प्रमाण फार मोठं नाही. संस्कृत ही निव्वळ धार्मिक साहित्याची भाषा नसून दक्षिण आशियात बहरलेल्या संस्कृतीची, ज्ञानपरंपरेची भाषा आहे. प्राचीन तसेच अर्वाचीन अशा सर्व शास्त्रांशी संबंधित वाङ्मय, सर्व विचारप्रणालींशी निगडित काव्यं, नाटकं, कादंबऱ्या संस्कृतात आहेत. जैन आणि बौद्ध परंपरेतील काही ग्रंथ, ‘बुद्धचरितम्’सारखे अश्वघोषाचे महाकाव्य अशी विपुल साहित्यसंपदा असलेली संस्कृत भाषा फक्त हिंदू धर्माची भाषा कशी? अभिजन वर्गात अधिक प्रसार झाला म्हणून ती फक्त ब्राह्मणांची भाषा मानून तिचा द्वेष करण्याची गरज नाही. संस्कृतातील रामायण, महाभारत या आद्य साहित्याचे निर्माते वाल्मीकी आणि व्यास किंवा महाकवी कालिदासाची जात शोधण्याचा प्रयत्न केला तर ‘ब्राह्मण’ असा निष्कर्ष नक्कीच निघणार नाही. मग तिला ब्राह्मण्याच्या पाशात आवळून वज्र्य का मानावी? संस्कृत ही बोलली जाणारी भाषा असल्याशिवाय त्यात इतकं समृद्ध काव्य, नाटय़ वाङ्मय निर्माण होईल का? भवभूतीच्या नाटकांमध्ये तर ती जत्रेत सादर केली जात असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जत्रेतला प्रेक्षक म्हणजे समाजातल्या सर्व थरांमधले लोक असतात. या लोकांच्या दैनंदिन व्यवहारात नसलेल्या भाषेतली नाटकं लोक जत्रांमधून पाहतील का?
‘संस्कृत ही मृत भाषा आहे’ हे असेच एक शास्त्रीय पण अर्धसत्य विधान आहे. ‘ज्या भाषेचा एकही मातृभाषक जिवंत नाही ती भाषा मृत मानली जाते.’ या भाषाशास्त्रीय तत्त्वापुरतीच या विधानाची सत्यता सीमित आहे. व्यवहारात आजही नकळतपणे विशिष्ट उद्देशासाठी संस्कृत भाषेचा प्रयोग होत असतो. महाराष्ट्रात म्हटला जाणारा शुभंकरोतिसारखा श्लोक असे इतर किती तरी श्लोक म्हणताना किंवा वंदे मातरम्, जनगणमन म्हणताना हे संस्कृतात आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. अगदी अर्धशिक्षित माणसंसुद्धा बोलता बोलता संस्कृतातल्या सुभाषितातील एखाद्या चरणाचा अपभ्रष्ट स्वरूपात म्हणीसारखा वापर करतात. भाषेचा हा व्यवहारातील प्रयोग भाषाशास्त्रज्ञांना मान्य नाही का? तो नैसर्गिक नाही का? की निव्वळ एका व्याख्येत बसत नाही म्हणून त्याकडे कानाडोळा करायचा? दुसरीकडे संस्कृत ही मृत भाषा ठरू नये यासाठी आपण तिचे मातृभाषक आहोत हे सांगावे म्हणून किंवा ती राष्ट्रभाषा व्हावी म्हणून मध्यंतरी चळवळी झाल्या. मातृभाषक असणे हे अशा प्रकारे सांगून सिद्ध होत नाही आणि त्यातून काही साध्यही होत नाही. अशा चळवळींनी व्यावहारिक पातळीवर फार काही साध्य होत नसते. संस्कृताबाबत आज खरे तर वेगळ्या प्रकारच्या प्रयत्नांची गरज आहे. संस्कृताचे आणखी एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ती प्राचीन दक्षिण आशियाची ‘ज्ञानभाषा’ होती. गेल्या तीन-चार दशकांपासून इंग्रजीमध्ये ज्ञानाच्या सर्वच शाखांशी संबंधित असे विपुल वाङ्मय निर्माण झाले. परिणामी आपोआपच तिचे महत्त्व वाढले. ती ‘ज्ञानभाषा’ आहे. त्यामुळेच ती अर्थार्जनाची भाषा आहे. संस्कृत भाषेनेदेखील नेमके हेच कार्य काहीशे वर्षांपूर्वी केले. संस्कृतात जेवढी काव्यं, नाटकं आहेत, त्यापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात विविध शास्त्रांशी संबंधित ग्रंथसंपदा आहे. यासाठीच आज अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यास केला जातो. आपण नेमके इथेच मागे पडतो. याचं कारण शालेय स्तरावर संस्कृत भाषा जशी ‘प्रोजेक्ट’ केली जाते त्यात दडलंय. शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात असं बिंबवलं जातं की संस्कृत म्हणजे ‘स्कोअरिंग भाषा.’ संस्कृतचा अभ्यास म्हणजे व्याकरणाचा अभ्यास. यामुळे तिचे ‘ज्ञानभाषा’ हे स्वरूप विद्यार्थ्यांच्या लक्षातच येत नाही. ते दहावीला ‘स्कोअर’ करतात आणि संस्कृतचा अभ्यास सोडून देतात. संस्कृतचा अभ्यास करण्याची खरी गरज महाविद्यालयीन आणि संशोधन स्तरावर आहे. रूपे ओळखा, संधी सोडवा असल्या प्रश्नांपेक्षा शास्त्रीय ग्रंथ अध्ययनाच्या केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे. पण शालेय स्तरावर हे शक्य नसते. कनिष्ठ महाविद्यालयात आपण विविध मार्गानी सगळ्याच भाषांचा गळा घोटून टाकला आहे आणि एवढे झाल्यावर एखाद्या विद्यार्थ्यांला पुढे संस्कृत विषय घेण्याची इच्छा झालीच तर ती निव्वळ ‘भाषा’ आहे म्हणून विज्ञान शाखेला ती उपलब्ध नाही. भाषा हे माध्यम आहे आणि अभ्यास हा त्या भाषेत लिहिलेल्या रसायन, भौतिकशास्त्र इ. ज्ञेय विषयाचा करायचा आहे हे आपले धुरीण लक्षातच घेत नाहीत. त्यामुळे कला शाखेच्या विद्यार्थ्यांला विषय कळत नाही म्हणून आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांला पर्याय उपलब्ध नाही म्हणून या शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास मागेच पडतो. आज एकीकडे संस्कृत लोकप्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र असे केल्याने काही संस्कृत ही जनसामान्यांची भाषा होणे शक्य नाही हे वास्तव आहे, ते आपण स्वीकारले पाहिजे आणि संस्कृताचे ‘ज्ञानभाषा’ हे वैशिष्टय़ केंद्रस्थानी ठेवून प्रयत्न केले पाहिजेत.
याची सर्वाधिक जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या विद्यापीठीय स्तरावर या दृष्टीने काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. संस्कृतातील संशोधनाचा मुख्य भर वेद, वेदान्त, इतर अधिभौतिक ज्ञानशाखांवरच असतो. इतर विषयाच्या विद्वानांना विभागात बोलावून संस्कृतच्या विद्यार्थ्यांच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. साधी भाषाशास्त्राशी तोंडओळख ही अभावानेच करून दिली जाते. परदेशात अत्यंत आधुनिक दृष्टीने संस्कृताचे अध्ययन होत असताना आपले विद्वान त्यांच्याच कोशात (हर प्रकारच्या) गुरफटलेले दिसतात. हे संस्कृत भाषेचे वास्तव आहे आणि ते बदलण्याची गरज आहे.
* लेखक आय.आय.टी., मुंबई येथे संस्कृतशी संबंधित विषयाचे पीएच.डी.चे संशोधक छात्र असून रुईया महाविद्यालयात संस्कृत विषयाचे अध्यापन करतात.
* उद्याच्या अंकात शरद जोशी यांचे ‘राखेखालचे निखारे’ हे सदर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा