‘व्हाय आय किल्ड गांधी’या नावानं नथुराम गोडसेवर आलेल्या चित्रपटामुळं पुन्हा एकदा गांधी आणि गोडसे चर्चा विशेषत: महाराष्ट्रात काही काळ सुरू झाली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ घेतलाच पाहिजे. कलेकडे कला म्हणून पाहावं. पण गोडसेचं उदात्तीकरण करणारा आविष्कार ही कला आहे की प्रचार? अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊन गोडसेवर वस्तुनिष्ठपणे लिहिलं तर गोडसे हा कसा वंशाभिमानी, अहंकारी आणि मनोरुग्ण होता हेच अधोरेखित करता येईल. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गांधींची तुलना गोडसेशी कशी होऊ शकते? गांधींशी वैचारिक मतभेदांची तुलना सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, चर्चिल, ॲटली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींशी होऊ शकते. (समकालीन नसले तरी लोकमान्य टिळकांशीही ती होऊ शकते.) अगदी वि. दा. सावरकर यांच्याशी तुलना केली आणि तशी पुस्तकं, नाटकं, सिनेमे आली तरी हरकत नाही. कारण सावरकर यांनीही भारतीय स्वातंत्र्यासाठी १९१० पर्यंत निष्ठेनं सशस्त्र प्रयत्न करून पाहिले आहेत, कारावास भोगला आहे, त्याग केला आहे. (नंतर त्यांची दिशा बदलली.) अथवा गांधी आणि जीना यांची तुलना करणारा चित्रपट समजा आला (आणि भारत एकत्र ठेवण्यात गांधी कसे कमी पडले असं त्यात दाखवलं) तरी कोणी हरकत घेणार नाही. कारण हे सर्व ऐतिहासिक सत्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र नथुराम गोडसे नावाच्या य:कश्चित आणि अतिसामान्य खुनी व्यक्तीशी त्यांची तुलना कधीही होऊ शकत नाही. गोडसेचं उदात्तीकरण करण्यासाठी पुस्तकं, नाटकं लिहिली जात असतील, चित्रपट बेतले जात असतील तरी त्यांना कलाविष्कार म्हणता येणार नाही. असे आविष्कार म्हणजे केवळ अनैतिहासिक प्रचार. गोडसेला सार्वजनिक जीवनाचा गंध नव्हता, त्यानं वा त्याच्या संघटनेनं कधी स्वातंत्र्यासाठी चळवळ केल्याचं दिसत नाही, भारतीय स्वातंत्र्याविषयी त्याची अमुक एक वैचारिक धारा आहे आणि ती त्यानं वेळोवेळी जनसमुदायासमोर ठेवली असं नाही, गांधींविरोधात त्यानं दोनदा निदर्शनं केली पण तीसुद्धा खुनी हल्ला करण्यासाठी. त्यानं गांधींच्या विचारांना सार्वजनिक आव्हान दिलं नाही, गांधीची विचारधारा कशी चुकीची आहे हे त्यानं भाषणांतून, लेखांतून, पुस्तकांतून, चळवळीतून कधी सिद्ध केलं असं दिसत नाही. ही व्यक्ती सुशिक्षित होती हे खरं. (पण सुशिक्षितानं केलेला खून वा पसरवलेला दहशतवाद कोणी माफ करत नाही.) अशी सर्वसामान्य व्यक्ती खासगीत काही देशहितासंदर्भात विचार करत असेल तर त्यानं जिनाविरुद्ध पेटून उठायला हवं होतं. खुनाचाच विचार करायचा तर, जीनांच्या खुनाचा विचार करायला हवा होता. पण तसं झालं नाही. (उलट त्या काळी ही टोळी द्विराष्ट्रवादालाच खतपाणी घालून, फाळणीला पोषक वातावरण तयार करत होती असं दिसतं.

हे ही वाचा…धर्मनिरपेक्षतेला बळकटी देणारे क्षण

गांधींचा खून झाला तेव्हा देशाची फाळणी झालेली होती. ती होऊ नये म्हणून खून केला असंही नाही. गांधींचा खून करूनही फाळणी रद्द होणार नव्हती. (दिलेले पंचावन्न कोटी, एकूण ७५ कोटी भारताला परत मिळणार नव्हते. गांधींऐवजी कोणीही असता तरी हे पैसे पाकिस्तानला द्यावेच लागणार होते. एका देशाची गंगाजळी विभक्त झालेल्या दोन देशांत वाटली जाते.) मुळात या वेळी गांधी कुठल्याही सत्तेस्थानी नव्हते. भारताचे पंतप्रधान नेहरू होते. गोडसेनं अशा म्हाताऱ्या आणि कोणत्याही सत्तास्थानी नसलेल्या नि:शस्त्र माणसाचा खून का करावा? खरं तर त्यानं पाकिस्तानात जाऊन तिथं काही दहशती कृत्यं केली असती तर तेही एकवेळ समजण्याजोगं होतं.

तरीही विशिष्ट लोक अशी तुलना करतात. कोत्या विचारानं गोडसेनं गांधींचा खून केला. मात्र त्याची पिलावळ त्याला जिवंत करण्याची लाजिरवाणी धडपड करताना दिसते. (या वेळपर्यंत देशाची सेक्युलर राज्यघटना तयार झालेली नव्हती. गांधी हयात नसले तर कदाचित अशी राज्यघटना तयार होणार नाही आणि देश पाकिस्तानसारखा विशिष्ट धर्मीय होऊन पारंपरिक उच्चवर्णीयांकडे सत्ता येईल अशी ही विचारधारा असावी.

हे ही वाचा…प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…

गांधींनी मुस्लीम धर्माच्या नावानं तयार झालेला देश जसा जीनांच्या ताब्यात दिला, तसा स्वातंत्र्यानंतरचा भारत हा फक्त विशिष्ट धर्मीयांचा आहे. या देशात इतर धर्मीयांना स्थान द्यायला नको, अशी यांची छुपी मागणी होती. गांधींचा खून केल्यानंतर ही खरी कारणं गोडसेला सार्वजनिकपणे सांगता येत नव्हती. मग आपली विशिष्ट विचारधारा तयार असल्याचं दाखवत तो कोठडीतच बोलू लागला, तथाकथित विचारांचं विषारी पुस्तक लिहू लागला. गांधींच्या खुनाआधी जो मुका अतिसमान्य माणूस होता तो गांधी खुनानंतर आपली विचारधारा कोपऱ्यात तयार करण्याची धडपड करू लागला. १९२० नंतर (टिळकांच्या मृत्यूनंतर) देशाची सूत्रं गांधींच्या हातात गेल्यापासूनच या विशिष्ट लोकांचा जळफळाट सुरू झाला होता. तेव्हापासून तब्बल सात वेळा गांधींच्या खुनाचा प्रयत्न फसला होता. (शेवटचे दोन अपवाद सोडले तर या आधीच्या हल्यांची कारणं काय? या वेळी पाकिस्तान निर्माण होण्याची कुठं चर्चाही होत नव्हती.

असं जर सर्व आहे तर मग करू द्यावा कोणाला खोटा प्रचार, आपल्याला काय फरक पडतो, असंही कोणी म्हणू शकेल. पण होतं काय की आजही एकविसाव्या शतकात पोटापाण्याशिवाय इतिहासाचा अभ्यास करायला अनेक लोकांना वेळ नाही. मूळ पुस्तकं वाचून अनेक लोक आपलं मत बनवत नाहीत. आयते- रेडीमेड विचार लोकांना भावतात. असे लोक विशिष्ट विचारसरणींची भाषणं ऐकून वा सार्वजनिक प्रचारातून (व्हॉटसॲप विद्यापीठातून) शिकत राहतात. जो अशा विचारांच्या भोवरीत सापडेल त्याचा ब्रेनवॉश होऊन तो ते खरं समजू लागतो.

हे ही वाचा…व्हायरल माय लॉर्डस : न्यायालयातील वर्तनाचा समाजमाध्यमी पंचनामा

मग तो प्रचार खरा की खोटा हे त्यांना ठरवता येत नाही. म्हणून व्हॉट्सॲप/ फेसबुकावर काहीबाही वाचून वा प्रचारकी पुस्तकं वाचून, नाटकं, सिनेमे पाहून लोक म्हणतात, ‘हो का, असे होते गांधी?’अशा खोट्या मजकुराला लोक खरा इतिहास समजू लागतात. म्हणून गोडसेचं उदात्तीकरण करणं म्हणजे भाबड्या जनतेत विष पेरण्याचं काम आहे. गोडसे हा कोणी विचारवंत नसून मनोरुग्ण होता. त्यातही सध्या ‘इतिहासाच्या पुनर्लेखना’चा जोरदार प्रयत्न सुरू झालेला आहेच. पण असा कितीही आटापिटा झाला, तरी गांधींचं महत्त्व कमी होणार नाही. त्यांचे विचार जगभरात पोहोचलेले आहेत. गोडसे हा जगाच्या लेखी खुनीच आहे आणि गांधी महात्मा. drsudhirdeore29@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 october gandhi jayanti nathuram godse sud 02