निशांत सरवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेश सरकारने २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राम मंदिर बांधण्याची घोषणा केली, तेव्हापासूनच अयोध्येतील मालमत्ता दरांमध्ये वाढ होऊ लागली. ही वाढ आता २५ ते ३० टक्के झाल्याचा दावा केला जात आहे.

अयोध्येच्या परिसरात राम मंदिरापासून काही अंतरावरील जागांचे प्रति चौरस फूट दर याआधी ४०० ते ७०० रुपये होते, ते आता १५०० ते ३००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अयोध्या शहराबाहेर असलेल्या मालमत्ता दरांतही लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले आहे. हजार ते दोन हजार रुपये प्रति चौरस फूट असलेले दर आता चार ते सहा हजार रुपये प्रति चौरस फुटापर्यंत वधारले आहेत.

‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ समूहाने राम मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर शरयू नदीजवळ ५१ एकरवर आलिशान प्रकल्प राबविण्याची घोषणा केली आणि दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी साडेचौदा कोटी रुपयांना दहा हजार चौरस फुटाचा भूखंड विकत घेतला. त्यासाठी प्रति चौरस फूट १४ ते १५ हजार रुपये बच्चन यांनी मोजले. यावरून राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्या विकास प्राधिकरणाने ज्या पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे केले, त्यामुळे अयोध्येतील मालमत्तांचे दर कसे वधारले याची कल्पना येते. आता अयोध्येत भूखंडही उपलब्ध नाही, अशी स्थिती असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दरांमध्ये येत्या काही काळात आणखी वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा >>> कुठे चाललो आहोत आपण?

उत्तर प्रदेश सरकारने अलीकडे जाहीर केलेल्या एका लिलावात भूखंडाचा मूळ दर प्रति चौरस मीटर ८८ हजार रुपये निश्चित करण्यात आला होता. प्रत्यक्ष लिलावात हा भूखंड दीड लाख रुपये प्रति चौरस मीटर दराने विकला गेला. अयोध्येतील मुंद्रांक आणि नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत २९ हजार ३२५ करारनामे नोंदले गेले असून यापैकी ७० ते ८० टक्के करारनामे मालमत्ता विक्रीचे होते. अयोध्येजवळच्या परिसरात यापैकी दहा हजार ४७९ करारनामे नोंदले गेले. वयोवृद्ध नागरिक आणि अनिवासी भारतीयांनीही अयोध्या परिसरात सेकंड होम म्हणून मोठया प्रमाणात गुंतवणूक करण्याचे ठरविले असल्याचे स्थानिक रियल इस्टेट एजंटचे म्हणणे आहे. ‘अ‍ॅनारॉक’ या सर्वेक्षण कंपनीचे अध्यक्ष अनुज पुरी यांच्या म्हणण्यानुसार, सध्या अयोध्या व आसपासच्या परिसरात मालमत्तांची मागणी वाढली आहे. स्थानिकच नव्हे तर देशभरातून गुंतवणूकदार इथे येण्यासाठी इच्छुक असल्याचे आढळून येत आहे. अयोध्येच्या सीमेवरील फैजाबाद शहरातही मालमत्तांच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. अयोध्या विकास प्राधिकरणामार्फतही गृहनिर्माण योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. गोरखपूर फैजाबाद महामार्ग, देवकाली, गायत्रीपुरम, अंगुरीबाग, सुभाषनगर, वझीरगंज, साहेबगंज, आंबेडकरनगर, आवास विकास कॉलनी, खुर्दाबाद या ठिकाणी विकासकांनी बंगले, व्हिला, उंच इमारती बांधण्यासाठी प्रकल्पांची घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 to 30 percent increase in property prices due to hike in demand zws
Show comments