निखिल रांजणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास महाराज यांचा जन्म १४ व्या शतकातला. आज त्यांची ६४८ वी जयंती आहे. समाजाच्या बऱ्याच मोठ्या घटकावर जातीच्या नावाखाली हजारो वर्षे अन्याय झाला. अशा सर्व समाजांच्या उद्धारासाठी संत रविदास महाराजांनी काम केले. त्यांना स्वतःलादेखील या अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा लागला. भारतीय इतिहास आणि साहित्यात संत रविदासांचे महत्वाचे स्थान आहे. त्यांनी शोषित-पीडित-वंचित-दलित जनतेच्या आकांक्षांना आपल्या रचनांमधून अभिव्यक्त केले. सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि सर्वधर्म समभाव त्यांच्या वाणीचा मूळ स्वर आहे. त्यामुळे आजच्या काळात त्यांचे महान कार्य समजून घेणे खूप महत्वाचे आहे. संत रविदासांनाच संत रैदास किंवा महाराष्ट्रात जास्त प्रचलित संत रोहिदास महाराज म्हणून संबोधले जाते.

शोषितांच्या शिक्षणासाठी कार्य

अविधा अहित कीन,

ताते विवके दीप भया मलीन ।

त्याकाळी तथाकथित उच्च जातीतील पुरुष सोडले तर बाकीच्या तथाकथित खालच्या जातींना तसेच उच्च जातींतील स्त्रियांनासुद्धा शिकण्याचा अधिकार नव्हता. या अविद्येमुळे समाजाचे मोठे अहित (नुकसान) झाले. अशा समाजाच्या शिक्षणासाठी रविदास महाराजांनी प्रयत्न केले.

सामाजिक गुलामीतून मुक्त होण्याचे आवाहन

पराधीन पाप है, जान लेवो रे मीत ।

रैदास दास पराधीन को, कौन करे परीत ।।

उच-निचतावादी समाजव्यवस्थेने लादलेल्या मानसिक गुलामीतून (पराधिनतेतून) सर्व शोषितांना मुक्त होण्याचे आवाहन महात्मा रविदासांनी केले. अंगमेहनत करून खाणाऱ्यांनी स्वतःला कसल्याही बाबतीत कमी न समजता, अभिमानाने जगावे, असा संदेश त्यांनी दिला.

जातीप्रथेवर आसूड

जाति जाति में जाति हैं, जो केतन के पात ।

रैदास मनुष ना जुड़ सके जब तक जाति न जात ॥

जात पांत के फेर मंहि, उरझि रहइ सभ लोग।

मानुषता कूं खातइह, जात कर रोग ॥

संत रविदासांनी जातीप्रथेवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी समाजातील जातीव्यवस्थेचे वर्णन करताना केळीच्या (केतन) झाडाचे उदाहरण दिले आहे. रविदास महाराज म्हणतात, की जर केळीच्या झाडाला सोलले तर त्यात पानच्या आत पानच मिळत जाते, शेवटी आत काही मिळत नाही. त्याचप्रमाणे आपल्या जातीच्या खाली जात, जातीच्या वर जात मिळत जाते, पण यामुळे माणूस मात्र मिळत नाही. जातीप्रथा माणसाला संपवून टाकते. म्हणून संत रविदास म्हणतात, जोपर्यंत जाती जाणार नाही तो पर्यंत माणूस जोडला जाणार नाही.

सर्वधर्मसमभावाची शिकवण

राघो क्रिस्न करीम हरि, राम रहीम खुदाय ।

‘रविदास’ मेरे मन बसहिं, कहुं खोजहूं बन जाय ।।

हिंदू तुरुक (मुसलमान) मंहि नहीं कुछ भेदा, सभ मंह एक रत्त अरु मासा।

दोऊ एकहू दूजा कोऊ नांहि, पेख्यो सोध ‘रविदासा’ ।।

मुसलमान सों दोसती, हिंदुअन सों कर प्रीत ।

‘रविदास’ जोति सभ राम की, सभ हैं अपने मीत ॥

महात्मा रविदासांनी त्यांच्या वाणीतून सर्व ईश्वरसमान आहेत आणि ते माणसाच्या मनातच वास करतात असा संदेश दिला. त्यासोबतच सर्व धर्मदेखील समान आहेत आणि सर्व धर्मांची माणसेसुद्धा समान आहेत, त्यांनी एकोप्याने, प्रेमाने राहिले पाहिजे असे आवाहन केले. आज तब्बल सहाशे वर्षांनंतरही महाराजांचे विचार तितकेच समर्पक आहेत.

समतेवर आधारित राज्यव्यवस्थेची अपेक्षा

ऐसा चांहू राज मैं मिलै सबन को अन्न ।

छोटे बड़े सम बसे, रैदास रहै प्रसन्न ।।

सर्वांना स्वतःचा सर्वांगिण विकास करता आला पाहिजे, त्यासाठी लागणाऱ्या संधी राज्यव्यवस्थेने पुरवल्या पाहिजेत. तसेच समाजात कसल्याही प्रकारचा उच-निच भेदभाव नसला पाहिजे. अशा राज्यव्यवस्थेची अपेक्षा संत शिरोमणी रविदास महाराज यांनी केली आहे.

समतेचा संदेश देणाऱ्या पवित्र ग्रंथ ‘गुरू ग्रंथ साहिब’ मध्ये महात्मा रविदासांच्या ४१ रचनांचा समावेश आहे.

महाराजांचे कल्याणकारी राज्य – ‘बेगमपुरा’

बेगम पुरा शहर कौ नांउ, दुखू अंदोह नहीं तिहिं ठांउ।

नां तसवीस खिराजु न मालु, खउफु न खता न तरसु जवालु॥

अब मोहि खूद वतन गह पाई, ऊंहा खैरि सदा मेरे भाई।

काइमु दाइमु सदा पातसाही, दोम न सेम एक सो आही॥

आबादानु सदा मसहूर, ऊँहा गनी बसहि मामूर।

तिउ तिउ सैल करहि जिउ भावै, महरम महल न कौ अटकावै।

कहि रैदास खलास चमारा, जो हम सहरी सु मीत हमारा॥

मराठी भाषेतील रचना

राजसी राज्य, जे दुःखहीन (बे – गम (दुःख)) नावाने ओळखले जाते:

त्याला बेगमपुरा म्हणतात, एक ठिकाण जिथे कोणतेही दुःख नाही,

कोणतेही कर किंवा काळजी नाही, तिथे मालमत्ता नाही,

कोणतेही पाप, चिंता, भिती किंवा छळ नाही.

अरे भाऊ, मी ते माझं म्हणून घेण्यासाठी आलो आहे,

माझं दूरचं घर, जिथे सर्व काही योग्य आहे.

ते राज्य श्रीमंत आणि सुरक्षित आहे,

जिथे कुणी तिसरा किंवा दुसरा नाही—सर्व एकच आहेत;

त्याचं अन्न आणि पाणी प्रसिद्ध आहे,

आणि जे तिथे राहतात

ते समाधान आणि श्रीमंतीत राहतात.

ते हे किंवा ते करतात (व्यवसायनिवडीचे स्वातंत्र्य), जिथे हवं तिथे चालतात,

ते ऐतिहासिक राजमहलांत निर्बंधपणे फिरतात.

अरे, रैदास म्हणतो, एक चर्मकार जो आता मुक्त (जातीच्या बंधन तुटली) झाला आहे,

जे माझ्याबरोबर चालतात तेच माझे खरे मित्र आहेत.

बेगमपूरा – बे – गम – गम म्हणजे दुःख, बेगमपूरा म्हणजे जिथे दुःख नाही, असे शहर! ज्याठिकाणी गरिबांवर कर नाही. जिथे कुणी दुसरा किंवा तिसरा नाही, सर्व एकच आहेत. जिथे सर्व समाधानी आहेत. अशा आदर्श कल्याणकारी राज्याची संकल्पना रविदास महाराजांनी मांडली आहे.इतर संतांप्रमाणे रविदास महाराजांच्याही विचारांची क्रांतिकारी ताकद संपवण्यासाठी त्यांच्या वैचारिक विरोधकांनी बरेच प्रयत्न केले. प्रस्थापितांनी त्यांच्याबद्दल चमत्कार व इतर भाकड कथा रचल्या, त्यांचा प्रसार केला आणि समाजाची दिशाभूल केली आहे.

महाराजांची शिकवण भारतीय संविधानात

संविधानाच्या निर्मितीपासूनच त्याबद्दल एक अपप्रचार करण्यात येत आहे, की यात भारतीय काहीच नाही. पण, खरंतर सामान्य-गरिब-बहुजन समाजाच्या उद्धारासाठी झटलेल्या सर्व थोर महामानवांच्या प्रेरणेतूनच भारताचे संविधान बनवले गेले आहे. संत रविदासदेखील त्याच महान परंपरेचे प्रतिनिधी आहेत. महाराजांना अपेक्षित स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्मसमभाव आपल्या संविधानात समाविष्ट केले आहे. महाराजांच्या ‘बेगमपूरा’वर आधारित कल्याणकारी राज्याची संकल्पनाच आपल्या संविधानाचा मुख्य गाभा आहे. 

आज शोषित-पीडित-वंचित-दलितांना मतदान करण्याचा, शिक्षण घेण्याचा, कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार इ. हे सर्व अधिकार मिळालेले आहेत. आपली थोर संत परंपरा, शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्याप्रेरणेतून बनलेल्या संविधानामुळेच हे अधिकार आपल्याला मिळाले आहेत. संविधान नसतं, तर हे सर्व मिळालं नसतं. संविधानामुळेच आपला विकास झाला आहे. आणि म्हणून संत रविदास महराजांच्या शिकवणीचा आणि त्यावर आधारित संविधानाचा जागर करत राहणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. 

जय रविदास! जय संविधान!  nikhilranjankar@gmail.com