‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आणि गुजराती रंगभूमीबरोबरच हिंदूी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांची प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली उपस्थिती असा दुग्धशर्करा योग रसिकांनी अनुभवला. एकांकिका स्पर्धेच्या त्यांच्या आठवणींपासून एनएसडीच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीपर्यंत अनेकविध मुद्दय़ांवर ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांनी त्यांना बोलते केले.

अंधेरीतील भवन्स कॉलेजमध्ये तालमीचा हॉल आहे. तिथे खाली आमच्या ‘किशन वर्सेस कन्हैय्या’ या नाटकाच्या तालमी सुरू होत्या. त्याच्यावर पुढे ‘ओह माय गॉड’ चित्रपट बनला, त्या नाटकाच्या त्या वेळी जिन्यात मला एकदा मोहन आगाशे भेटले. ते मला म्हणाले, ‘परेश, एक चांगलं नाटक मी वर करतो आहे. तू ते बघ आणि नंतर कर’. त्यांनी सांगितल्यानंतर मी एकदा वर नाटक बघायलाही गेलो होतो. मग मी शो करण्यासाठी अमेरिकेत निघून गेलो.. तिथून परत आलो तेव्हा मला त्या नाटकाविषयी पुन्हा ऐकायला मिळालं. मग मी नाटक बघायला गेलो. ते होतं, ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक. ते दुसऱ्या कोणाला देऊ नकोस, ते मीच करणार, असं मी अजित भुरेंना सांगितलं.

sharad pawar narendra modi maharashtra cidhan sabha election 2024
Sharad Pawar vs Narendra Modi: शरद पवार व नरेंद्र मोदींची लग्नरास एकच; दोघांमध्ये फरक व साम्य काय? वाचा काय म्हणतात ज्योतिषतज्ज्ञ…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Abhijeet Guru
“लेखकांना मान कमी…”, अभिजीत गुरूने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला…
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
genelia deshmukh shares her opinion on parenting
रितेशची बाबा म्हणून जबाबदारी, मातृत्व अन् मुलांचे संस्कार; जिनिलीयाने केलं पालकत्वावर भाष्य, देशमुखांची सून म्हणाली…
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Jheel Mehta Marriage on 28 december
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ दिवशी वाजणार सनई-चौघडे
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”

मराठी लोकांना नाटकाचं वरदान
जेव्हा जेव्हा मराठी लोक मला बोलावतात आणि खासकरून मराठी रंगकर्मी मला बोलावून माझा सन्मान करतात तेव्हा मला खूप छान वाटतं. मी मनापासून सांगतो, मराठी लोकांनी मला बोलावून माझा सत्कार केला, म्हणजे मी थोडाबहुत चांगला कलाकार आहे, असं मला वाटतं. आजच्या लोकांकिका स्पर्धेमध्ये मी पाहात होतो. ज्या ऊर्जेने या तरुण कलाकारांनी नाटक बसवलं होतं, इतक्या सगळय़ा कलाकारांना एकत्र घेऊन त्यांनी जे सादरीकरण केलं त्यात एक प्रगल्भता होती. खरंतर ही मंडळी नुकतीच काम करायला लागली आहेत, त्यांच्याकडे अनुभव नाही, तरीही त्यांचं संवाद-अभिनयाचं टायिमग पाहिलं की वाटतं, मराठी लोकांना नाटकाचं काहीतरी वरदान मिळालेलं असतं. त्यांना देवाने काहीतरी खास पद्धतीने घडवलेलं आहे.

आम्ही गुजरातीवाले मराठी नाटकं पाहायचो
आम्ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा करत होतो तेव्हा आम्ही कधीच इतके प्रगल्भ नव्हतो. मी काही हे नम्रपणे वगैरे सांगत नाही आहे, हे वास्तव आहे. इथे आता अनिल बांदिवडेकर बसले आहेत. आमच्या एन. एम. कॉलेजच्या नाटकाच्या ग्रुपचा तेही भाग होते. त्यांनाही आठवत असेल आमच्याकडेही चांगले दिग्दर्शक असायचे, पण खरंच आमच्यामध्ये या मुलांइतका प्रगल्भपणा नव्हता. आंतरमहाविद्यालयीन नाटकांच्या स्पर्धा होतात तेव्हा मुळातच सगळय़ांमध्ये कमालीचा उत्साह असतो. नाटकाचं एक वेड डोक्यात असतं. काहीसा नवखेपणा असतो, त्यांच्या अभिनयात मात्र तुम्हाला ती समज दिसत नाही. त्याचं कारण तेवढा अनुभव नसतो, नाटकाचं ज्ञान नसतं. नाटकाचा अनुभव हा आपल्याला आपल्या दिग्दर्शकांकडून मिळत असतो. मग कधी कधी चांगलं काम होतं, कधी कधी अजिबात चांगलं होत नाही. आमच्या वेळी फक्त स्पर्धेची ट्रॉफी जिंकून आणायची यापलीकडे आमच्या डोक्यात काही नसायचं. कॉलेजवाल्यांनी जो पैसा लावला आहे, जे बजेट तुम्हाला दिलं आहे त्यासाठी तुम्हाला ट्रॉफी जिंकून आणायची आहे एवढय़ावरच लक्ष केंद्रित केलेलं असायचं. मग मारामारीही व्हायची. आता होते की नाही माहीत नाही. मात्र तेव्हा एकीकडे नाटकासाठी लागणाऱ्या प्रॉपर्टीची बांधाबांध करताना सायकलची चेन आणि हॉकी स्टिक्सही गोळा केल्या जायच्या. एन. एम. कॉलेज, खालसा कॉलेज, लाला लजपतराय कॉलेज, डहाणूकर कॉलेज ही सगळीच महाविद्यालयं स्पर्धेच्या बाबतीत आक्रमक असायची.. अर्थात हे सगळं गुजराती नाटकांच्या बाबतीत होत होतं. मराठीत मात्र तेव्हाही इतकी निकोप स्पर्धा व्हायची. सगळे गुजरातीवाले मराठी नाटक पाहायला जायचे.

९० टक्के नाटकं मराठी रंगभूमीवरची
गुजरातीत ९० टक्के नाटकं मराठी रंगभूमीवरून येतात. मराठीतून आम्हाला माल मिळत जातो.. जेवढे लेखक मराठीतून येतात, कलाकार मराठीतून येतात, नाटकाचे ग्रुप जितके मराठीत आहेत तितके गुजरातीत नाहीत. त्यामुळे हे पाहताना कधी कधी दु:ख वाटतं, कधी कधी ईष्र्या वाटते, पण असंही वाटतं की कमीतकमी मराठी लोकांमध्ये तरी आहोत. त्यांच्याकडून काहीतरी शिकतो आहोत, हाच दिलासा वाटतो.

रंगभूमीवरची तालीम महत्त्वाची..
काही भूमिका चुटकीसरशी होतात, त्यांच्यासाठी फार मेहनत करावी लागत नाही. मी केलेल्या चित्रपटांपैकी ९२ टक्के चित्रपट टुकार आहेत, पैशासाठी केलेले आहेत. पण या चित्रपटांचे मी आभार मानतो, कारण या चित्रपटांमुळेच मी ‘सरदार पटेल’, ‘रोड टु संगम’, ‘मुंबई मेरी जान’ असे वेगळे चित्रपट करू शकतो. या चित्रपटांमधून तुम्हाला पैसा मिळू शकत नाही. घर चालवण्यासाठी आम्ही जे टुकार चित्रपट करतो त्यासाठीही आम्ही स्वत:ची एक वेगळी तयारी केलेली आहे. तद्दन मूर्खपणाने भरलेला आशय आमच्याकडे येतो, त्याला अधिक रंजक बनवायचं आहे, त्या भूमिका पुढे कशा घेऊन जायच्या, एक कलाकार म्हणून त्या करताना त्याचा आनंदही घेता यायला हवा आणि थोडं अधिक चांगलं कसं करायचं म्हणजे निर्माता पुन्हा आपल्याला चित्रपटात घेईल, हा सगळा सराव एकत्र सुरूच असतो. हा सगळा ताणतणाव सहन करणं हे फक्त रंगभूमीवर केलेल्या तालमींमुळेच शक्य होतं. नाटकासाठी घेतलेलं प्रशिक्षण, तिथल्या संवेदनाच चित्रपट करताना कामी येतात.

लाइव्ह एन्टरटेन्मेंटला मरण नाही
पूर्वी दूरदर्शनवर छायागीत यायचं तेव्हा संध्याकाळी गुजरातीत प्रयोगच नसायचे. मराठीत मात्र सकाळी ११ पासूनच प्रयोग सुरू असायचे, कारण तुमच्या प्रेक्षकांचा दर्जाच काहीतरी वेगळा आहे. तेव्हा कधीतरी मी अभिनेते अमजद खान यांच्याबरोबर चित्रीकरण करत होतो. अमजद खान यांनी मला विचारलं, परेश काय झालं? मी त्यांना म्हणालो, ‘नाटकाचे प्रयोग होत नाहीत, प्रेक्षक येत नाहीत, अशाने रंगभूमीचं अस्तित्व संपून जाईल’. तेव्हा ते मला म्हणाले, ‘एक गोष्ट लक्षात ठेव लाइव्ह एन्टरटेन्मेट (जिवंत कलाप्रकार) कधीही मरत नाही’. त्यांनी मला खूप सुंदर उदाहरणही दिलं. महेश-नरेश ही १५ वेगवेगळय़ा आवाजात गाणारी लोकप्रिय जोडी. ते लता मंगेशकर यांच्यापेक्षा सुंदर आवाजात गातात असं नाही, पण ते तुमच्यासमोर गातात. त्यांची सर्जनाची जी काही प्रक्रिया आहे ती तुमच्यासमोर उत्कटतेने घडते. आणि जे समोर घडतं त्याची नशा ही एखाद्या औषधासारखी तुमच्यावर काम करते. त्यामुळे रंगभूमी कधीही मरणार नाही. रंगभूमीवर तुम्हाला नवनव्या कल्पना, विषय आणावे लागतील आणि ज्या काळाबरोबर आपण चाललो आहोत त्याच्याही गोष्टी त्यात आणाव्या लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या नाटय़गृहात बसून आपण नाटक पाहतो तेही उच्च गुणवत्तेचं असलं पाहिजे. तिथली प्रकाशयोजना, ध्वनियोजनाही चांगली असली पाहिजे.

मराठी रंगभूमीचा प्रेक्षक विलक्षण
रंगभूमी टिकवण्यासाठी अद्ययावत नाटय़गृह आणि इतर सोयीच्या गोष्टींबरोबरच चांगलं लेखनम्ही आवश्यक आहे आणि नाटय़लेखनाच्या बाबतीत मराठी रंगभूमी खूप आघाडीवर आहे. मराठी नाटकात प्रयोग होत राहतात, तुम्हाला त्याअनुषंगाने काम करणारे कलाकारही मिळतात. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट तुमच्याकडे आहे ती म्हणजे प्रेक्षक. मराठी नाटकात होणारे प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षक येतात. तुमच्यासारखा कमाल प्रेक्षक असेपर्यंत मराठी रंगभूमीला काहीही होणार नाही.

एनएसडीची जबाबदारी
एनएसडीची जबाबदारी मिळेपर्यंत मी तिथे कधीही गेलो नव्हतो. वामन केंद्रे तिथले अध्यक्ष असतानाच्या काळात एखाद-दोनदा ‘डिअर फादर’ या नाटकाचे काही शो करण्यासाठी तिथे जायचा योग आला होता. मी तिथे प्रशिक्षणही घेतलेलं नाही. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे एनएसडीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली तेव्हा आपण काहीतरी चांगलं करायचं असं मी ठरवलं. आता अशा मोठमोठय़ा संस्थांमध्ये जो काही कचरा असतो तसाच तो तिथेही आणि जरा इतरांपेक्षा अधिक आहे. तिथे गेल्यानंतर मी पहिल्याच बैठकीत त्यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या खात्याचं लेखा परीक्षण होतं का? त्या प्रश्नाबरोबर तिथे दीर्घ शांतता पसरली. तेव्हा मी तिथे नेमकी काय अडचण आहे हे समजून चुकलो. पण याच संस्थेत खूप हुशार माणसं आहेत त्यांना पुढे कसं घेऊन जायचं हा विचार केला. तिथे रोजची पाच ते सहा नाटकं होतात. पण नाटय़लेखनाची कार्यशाळाही नाही तिथे.. तेव्हा तिथे जास्तीत जास्त मराठी रंगकर्मीचा सहभाग वाढवायचा हा मी प्राधान्याने विचार केला. त्यानुसार सतीश आळेकर, विजय केंकरे, अभिराम भडकमकर तिथे आले. अशा जाणकार लोकांचे विचार तिथे पोहोचावेत याचबरोबरीने तिथल्या दस्तावेजाचं डिजिटायझेशन करण्यावर माझा भर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, त्यांच्याकडे ५० हजार तासांचं साहित्य उपलब्ध आहे. त्याचं डिजिटायझेशन करण्यामागे हाच एक विचार आहे की उद्या पुढे मागे फक्त नाटकाचं म्हणून एक ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित करता येईल जिथे भारताबरोबरच अमेरिका, इंग्लंड अशा विविध देशांतील जागतिक दर्जाच्या नाटय़कृतींचा अनुभव घेता येईल. एनएसडीमध्ये कायम जागतिक दर्जाची नाटकं होत आली आहेत ती सगळय़ांना या ओटीटीच्या माध्यमातून पाहता येतील, तर ते करण्याची माझी इच्छा आहे.

दिग्दर्शकाचे निमूट ऐकणारा कलाकार
माझ्या नाटकांची निर्मिती मी स्वत:च करतो. सुरुवातीला तुम्ही प्रयोग करता तेव्हा तुमच्याकडे पैसे कमी असतात. त्यामुळे नाटक सुरू होण्याआधी जेव्हा पडदा उघडतो तेव्हा तुमच्यातला अभिनेता समोरच्या खुच्र्या मोजायला लागतो. त्या किती भरल्यात, मग याला पैसे द्यायचे आहेत त्याला द्यायचे आहेत, या भानगडी सुरू असतात. पण एखाद्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायचं असेल तर मी कायम तयार असतो. एक कलाकार म्हणून स्वत:त सुधारणा घडवून आणायची असेल तर दिग्दर्शकाच्या हाताखाली काम केलं पाहिजे, त्याने सांगितलेलं ऐकलं पाहिजे. मी स्वत:च निर्माता आहे किंवा मी परेश रावल आहे म्हणून दिग्दर्शकाचं ऐकायचं नाही असं ठरवलं तर माझा विकास होणार नाही. त्यामुळे ज्या दिग्दर्शकाला मी नियुक्त केलं आहे त्याचं मी ऐकलंच पाहिजे. तिथे मी माझी हुशारी दाखवत बसत नाही, मी दिग्दर्शकाचं ऐकून काम करणारा आज्ञाधारी कलाकार आहे.

सकारात्मक अपयशाचा विचार
एखादी गोष्ट चालली किंवा चालली नाही तर ते मला अपयश वाटत नाही. त्या गोष्टी होतच असतात, पण एखादी गोष्ट एक अभिनेता म्हणून मला करता नाही आली तर ते मला माझं अपयश वाटतं. अरे मग मी माझं कुठे चुकलं, मी तयारी नाही केली, पटकथा नीट वाचली नाही की दिग्दर्शकाला जे अपेक्षित होतं ते मी समजून घेऊ शकलो नाही, हे मला माझं अपयश सकारात्मक वाटतं. जेणेकरून मला माझ्या चुका लक्षात येतात. बाकीच्या अपयशाचं काही वाटत नाही..एक चाललं नाही तर दुसरं करू.. हा सातत्याने सुरू राहणारा प्रवास आहे.

अभिनेता त्याच्या आवडीनिवडीवरून ओळखला जातो
समकालिनांमध्ये नसीरुद्दीन शाह माझे आवडते कलाकार आहेत. ओम पुरी आता नाहीत. नव्या कलाकारांमध्ये इरफान खान माझे आवडते कलाकार होते. नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव.. आयुषमान खुराणा तर ज्या पद्धतीने चित्रपट निवडतो ते मला आवडतं.
एक अभिनेता त्याच्या आवडीनिवडीवरून ओळखला जातो. ते अपयशी झाले तरी चालतील, पण ज्या पद्धतीच्या चित्रपटाची निवड ते करतात ती त्यांची ओळख बनते. नाना पाटेकर, जितेंद्र जोशी हे कलाकार मला खूप आवडतात. ‘डिअर फादर’ या नाटकात खरंतर मुलाची भूमिका जितेंद्र जोशीने करावी अशी माझी इच्छा होती, पण त्या वेळी त्याचं काही वेगळं काम सुरू होतं. त्याने भूमिका नाही केली, पण मला कविता ऐकवून निघून गेला. तो कमालीचा अभिनेता आहे.

सतत अभिनय करत राहा
एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला वेगळं काय सांगणार? सतत काम करत राहा. हा कधीही न संपणारा असा प्रवास आहे. टाळय़ा तुम्हाला मिळतीलच.. पण नसीरभाईंनी मला एक गोष्ट सांगितली होती, मी अभिनय नाही केला तर मरून जाईन, अशी भावना तुमच्या मनात आली तर तुम्ही अभिनय करत राहा. रंगभूमीची मजा काही वेगळीच आहे, ते तर सातत्याने करत राहिलंच पाहिजे. साहित्याशी तुम्ही नाळ जोडली पाहिजे. विविध प्रकारच्या पुस्तक वाचनातून तुम्ही स्वत:ला घडवू शकता. त्यातही तुम्ही मराठी असाल तर तुम्ही नशीबवान आहात. तुमच्याकडे विपुल साहित्यसंपदा आहे. एखादा क्रिकेटपटू मैदानात जाऊन सराव करू शकतो. एखादा अभिनेता सराव कसा करणार? मी थोडंफार माझ्या पद्धतीने करायचो. एखादी कादंबरी वाचली की त्यातल्या व्यक्तिरेखा करून पाहण्याचा मी प्रयत्न करायचो. आता तर तुमच्याकडे मोबाइल आहे, तो समोर ठेवून करत राहा. तुमच्यात काय कमी आहे, काय क्षमता आहेत, काय कौशल्य आहेत हे तुम्हाला सहज लक्षात येईल. आणि एक उत्तम टीकाकार शोधून त्याला जवळ करा. एक उत्तम समीक्षा करणारी व्यक्ती जी तुम्हाला तुमच्या तोंडावर तुमचे गुण-दोष सांगू शकेल, तिला घट्ट पकडून ठेवा.

‘बॅरिस्टर’ करायला आवडेल
मला नाटक करायचं आहे, पण योग्य संहिता सापडत नाही. तुमचं वय हळूहळू जसं वाढत जातं, तसं जितकं तुम्हाला माहिती आहे, आयुष्याचा जो तुमचा अनुभव आहे तो एखाद्या भूमिकेत घालून करता येईल असं काही करायला मिळायला हवं. किंवा मग ‘डिअर फादर’सारखं एखादं नाटक जे करताना खूप मजा येते. मी दिवसाला त्या नाटकाचे चार प्रयोगही करू शकतो, थकवाच जाणवत नाही. अशा पद्धतीचं प्रेरणादायी नाटक मिळायला हवं. मिळेल तेही मिळेल. शोधत राहिलो की सापडेल. विजयाबाईंचं प्रत्येक नाटक मला खूप आवडतं, काहीतरी पावित्र्य असतं त्यात. मला मराठीतलं ‘बॅरिस्टर’ हे नाटक करायला आवडेल.

..म्हणे माझी राजकीय नियुक्ती आहे
नाटकाच्या क्षेत्रात डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही विचारसरणीचे लोक असतात. मी एनएसडीमध्ये गेलो, तेव्हा त्यांच्यापैकी कोणीतरी आक्षेप घेतला की माझी नियुक्ती ही राजकीय हस्तक्षेपातून झाली आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी १९७२ पासून व्यावसायिक नाटक करतो आहे. मी ५० रुपयांत नाटक करू शकतो, पाच लाखांतही नाटक करू शकतो. उपाशीपोटीही नाटक करू शकतो आणि पुरणपोळी खाऊनही नाटक करू शकतो. मी नाटक करत आलो आहे आणि तुम्ही म्हणता माझी राजकीय नियुक्ती आहे..

कलेत राजकीय फायद्याची गोष्ट नको
मला कोणाचं काम आवडलं असेल तर मी जे चागलं-वाईट आहे ते तोंडावर सांगून मोकळा होतो. कारण शेवटी ही नाटकाची गोष्ट आहे, त्यात राजकीय फायद्याचा विचार करणे योग्य नाही. मी एनएसडीत आल्यानंतर दिवाळी असो, ईद असो, नाताळ असो आम्ही प्रत्येकाला शुभेच्छा देत होतो. तेव्हाही कोणी एकाने नाही तर २०० जणांनी पत्र लिहून तक्रार केली की याने इथे येऊन धर्माच्या गोष्टी सुरू केल्या.. आता कोणाला शुभेच्छा देण्यात धर्माच्या गोष्टी कुठून आल्या? ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ आहे हे.. आणि धर्माच्याच गोष्टी काढून टाकायच्या असतील तर ‘तुघलक’मधून अजान काढून टाका, ‘हयवदन’मधून गणेशवंदना काढून टाका. सगळय़ात मोठी गोष्ट म्हणजे नटराज जो आहे तो शंकराचं प्रतीक आहे ते काढून टाका. तसं काही शक्य होणार नाही.

काही लोकांच्या विचारातच फ्रॅक्चर असतं
कलेवर डाव्या-उजव्या विचारसरणीचा फरक पडतो का? याचं उत्तर हे व्यक्तिसापेक्ष आहे. एक उदाहरण देतो. एक व्यक्ती डॉक्टरांकडे गेली, त्याला सांगायला लागली की की मला इथं दुखतंय, तिथे दुखतंय, आणखी कुठे दुखतंय.. डॉक्टरांनी सगळय़ा प्रकारच्या चाचण्या केल्या. एमआरआय केलं, एक्सरे काढला, सगळं केलं पण कुठे काहीच सापडलं नाही. डॉक्टर म्हणाले, तुम्ही तर अगदी ठणठणीत आहात. त्या माणसाला काही ते पटल नाही. तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या बोटाचा एक्सरे काढला, तेव्हा त्यात फ्रॅक्चर आढळून आलं. थोडक्यात, काही लोकांच्या विचारातच फ्रॅक्चर असतं. नाटक ही खूप पवित्र आणि या अशा राजकारणापेक्षा कितीतरी वरच्या दर्जाची गोष्ट आहे.

शब्दांकन रेश्मा राईकवार