पंकज फणसे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ष २०१५. स्थळ जीनिव्हा, स्वित्झर्लंड! पाश्चिमात्य राष्ट्रे आणि इराण यांच्यामधील संभाव्य अणू कृतिकार्यक्रमासाठी वाटाघाटींच्या १२ फेऱ्यांनंतर १३ वी फेरी सुरू होती. दोन्हीकडचे प्रतिनिधी आपल्या मुद्दय़ांपासून हटण्यास तयार नव्हते. हृदयाची धडधड आणि घडय़ाळाची टिकटिक यांचा समन्वय कधीच मागे पडला होता. वेगाने घोडदौड सुरू होती. एक क्षण असा आला की, दोन्ही पक्षांकडील वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच धार्मिक मतभेदांमुळे बैठकीचे कामकाज ठप्प झाले. १३व्या फेरीची वाटचाल अपयशाकडे सुरू होती. दोन्हीकडचे प्रतिनिधी टेबलावरून उठून गेले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, बोलणी सुरू कशी करायची? ठरले! इराणच्या मुत्सद्दय़ांनी एक मेजवानी आयोजित केली. अट एकच होती, राजकीय चर्चा करायची नाही. वाफाळलेला इराणी पुलाव, रसदार कबाब, सामिष खाद्यपदार्थाची रेलचेल आणि पिस्त्याने नटलेली मिठाई! साहजिकच मतभेद गळून पडले. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आणि केवळ पाच महिन्यांत संयुक्त सर्वसमावेशक कृतिकार्यक्रम अर्थात जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन (जेसीपीओए) वास्तवात आला.

पाककृती आणि पंगती यांचे मुत्सद्देगिरीतील महत्त्व अधोरेखित करणारे हे एकमेव उदाहरण नाही. पाकशास्त्रीय मुत्सद्देगिरीची (कलिनरी डिप्लोमसी) सुरुवात शोधायची तर नागरीकरणाच्या सुरुवातीच्या काळात जावे लागेल. एकत्र शिकार करण्याच्या पद्धतीमुळे एकत्र अन्नग्रहणाच्या प्रथा उदयास आल्या. मनोवैज्ञानिकांच्या मते, यामुळे मानवांमधील सामाजिक बंध दृढ होण्यास मदत झाली. हा केवळ भावनांचा खेळ नाही. जीवशास्त्रीयदृष्टय़ा, मेजवान्यांमध्ये मेंदूमधील एंडोर्फिन उत्तेजित करण्याची क्षमता आहे, जी सामाजिक बंध निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावते. तर या मूलभूत तथ्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला विस्तार म्हणजे पाकशास्त्रीय मुत्सद्देगिरी!

पाकशास्त्रीय मुत्सद्देगिरी हा पाकशास्त्र आणि सार्वजनिक राजनयाचा कल्पक संगम आहे, जिथे सॉफ्ट पॉवरच्या आधारे विशिष्ट राष्ट्रांच्या संस्कृती, नागरिक, मूल्ये यांच्याबद्दलची जवळीक दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. आंतरराष्ट्रीय निर्यात आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पाकशास्त्राचा वापर केला जातो. अन्न हे केवळ पोट भरण्याचे साधन नाही. त्याला सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिकही छटा आहेत. उदाहरणदाखल, सोवळय़ातले अन्न! २१ व्या शतकात जेव्हापासून अस्मितेच्या राजकारणाने वेग घेतला, तेव्हा खाद्यपदार्थदेखील त्यापासून दूर राहिले नाहीत. लोकांच्या उपरोक्त जाणिवा बेमालूमपणे खाद्यपदार्थात आल्या. उदाहरणार्थ, रसगुल्ल्याच्या जीटी टॅगसाठी बंगाल आणि ओदिशा या दोन्ही प्रांतांमध्ये झालेला संघर्ष. आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर कोणत्या भागातील मिसळ भारी- पुणे, कोल्हापूर की नाशिक हा कधीही न संपणारा वाद आहे. समाजमाध्यमांवर वडापावची ओळख ‘मुंबई इंडियन्स’ आणि कप्तान रोहित शर्माशी जोडली गेली आहे.

अस्मितेचा उपयुक्त वापर म्हणजे पाकशास्त्रीय मुत्सद्देगिरी. समाधानाची बाब म्हणजे या खाद्य अस्मितांनी अजून तरी विखारी स्वरूप घेतलेले नाही. म्हणजे मुघल कुठून आले किंवा ‘औरंगजेबाच्या औलादी’ कोण आणि कशा यांवर सामाजिक घुसळण होत राहील, मात्र मुघल खाद्यपदार्थाना अजून तरी कोणी निष्कासित केलेले नाही. त्यातच कोविडोत्तर काळात समाजमाध्यमांवरील रील्समुळे लोकांची पिझ्झा, बर्गरपुढे जाऊन खाद्यशास्त्रीय जाणीव वाढली. या सगळय़ाचा परिपाक म्हणजे पाकशास्त्रीय मुत्सद्देगिरीचे पद्धतशीर नियोजन. आग्नेय आशियातील थायलंडचा ‘ग्लोबल थाई’ तसेच दक्षिण कोरियाचा ‘हान्सिक ग्लोबलायझेशन’ हे कार्यक्रम या बदलाचे साक्षीदार आहेत.

या लेखाचे प्रयोजन म्हणजे, नुकतीच पार पडलेली जी-२० परिषद आणि समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झालेला मेजवानीचा मेन्यू. भारतातील प्रचंड विविधतेचे एकाच ठिकाणी दर्शन घडविण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे त्या वैविध्यांचा मेन्यूमधील समावेश! वास्तविकत: पारंपरिक मेजवान्यांमध्ये व्यावसायिक खाद्यपदार्थाचा समावेश केला जातो, मात्र शासकीय मेजवानीच्या मेन्यूला धोरणात्मक पदर असतात. त्यांची सुरुवात सांस्कृतिक धाग्यांचा गोफ विणून होते, तर नंतर त्यांचा प्रवास आध्यात्मिक मूल्ये, ऐतिहासिक निवेदने परावर्तित करणाऱ्या खाद्यपदार्थाकडे होतो. जी-२०च्या मेन्यूमधील भरड धान्यांवरील भर, विविध डाळींचा मुबलक वापर भारताच्या एतद्देशीय अस्मितेचा हुंकार दाखवतो. या स्वदेशी अस्मिता सध्याच्या सरकारसाठी केवळ प्रतीकात्मक नाहीत तर खाद्यसंस्कृती, अन्नप्रक्रिया आणि उत्पादनांना भिडलेल्या आहेत. भरड धान्ये म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळं, हुलगे इत्यादी. हरितक्रांतीनंतर गव्हाच्या प्रभावामुळे या सर्व धान्यांचा वापर घटला. मात्र पाण्याची कमी मागणी, जास्त पोषणमूल्ये, हवामान बदल सहन करण्याची क्षमता इत्यादी कारणांमुळे भरड धान्ये लागवडीकडे सरकारचे पुन्हा लक्ष गेले.. असो!

तर मेन्यूबद्दल विचार करताना स्टार्टरमध्ये समावेश होता ‘पात्रम’ या पाककृतीचा! राळय़ाच्या पानांपासून केलेली ही पाककृती एतद्देशीय आणि अपरिचित भरड धान्याला प्रतिनिधित्व देते. राळं हे कधी काळी महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील महत्त्वाचे धान्य होते. आज ते रोजच्या वापरातून जवळपास लुप्त झाले आहे. त्याचे प्रतिनिधित्व आर्थिक महत्त्व तसेच राळय़ाच्या निर्यातीची संभाव्यता दर्शवते. राळय़ाची वैशिष्टय़पूर्ण निवड ही शाश्वतता आणि पारंपरिक स्थानिक वाणांना टिकवून ठेवण्याची धडपड आहे. मुख्य जेवणात ब्रेड्समध्ये ‘मुंबई पाव’ ज्यावर पोर्तुगीज प्रभाव दिसतो आणि बकरखानी या मुघल नाव असलेल्या पदार्थाचा अंतर्भाव भारताच्या सांस्कृतिक समावेशकतेचे प्रतीक आहे. मिठाईमधील ‘मधुरिमा’ ही वरीच्या तांदळाची खीर आध्यात्मिक पदर दर्शविते. उपवासामध्ये सेवन केले जाणारे हे एकमेव भरड धान्य आहे. पेयांमध्ये समावेश असलेले काहवा, फिल्टर कॉफी आणि दार्जिलिंग चहा जिभेवर अनुक्रमे काश्मीर, निलगिरी आणि बंगालच्या स्वादांचा मिलाफ घडवितात ज्याद्वारे प्रादेशिक विविधता दर्शविली आहे. चॉकलेट आणि पानांचा संगम भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहे.

तर ही आहे मेन्यू निवडीची रंजक कहाणी! वरवर साध्या दिसणाऱ्या गोष्टींत किती खोलवर विचार केलेला असतो, हे यातून जाणवते. हे झाले जागतिक नेत्यांच्या मेन्यूविषयी. बाकी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्यासाठी काश्मीरपासून ईशान्य भारतापर्यंत विविधरंगी खाद्यपदार्थ होतेच. मात्र कधी कधी खाद्यपदार्थाची ही निवड चुकीचीदेखील ठरू शकते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी २०२० मध्ये भारत दौऱ्यावर आले असता साबरमती आश्रमात गेले होते. जेवण होतं शुद्ध शाकाहारी. ट्रम्पना त्याचा तिटकारा! त्यात प्रसिद्ध शेफ सुरेश खन्ना यांनी ट्रम्प यांची आवड लक्षात घेऊन समोशामध्ये बटाटय़ाऐवजी ब्रोकोलीचे सारण भरले. मात्र गणित काही जमले नाही. तेव्हापासून ट्रम्प जोडप्याला भारतीय पदार्थाचा तिटकारा आहे तो आजतागायत!

अन्न हे केवळ पोट भरण्याची साधन राहिलेले नाही. एकीकडे काळय़ा मातीची सेवा करणाऱ्या भारतीय शेतकऱ्याच्या लक्षात आले नाही की बायर, एडीएम आणि कारगिल या कंपन्यांनी जागतिक बाजारपेठेत मक्तेदारी कशी प्रस्थापित केली तर दुसरीकडे खाद्यजाणिवा राजकारणातदेखील उपयोगी येऊ लागल्या. ‘मॅक्डॉनल्ड्स’ वगैरे मंडळींनी दोन ट्रिलियन डॉलर्सच्या उद्योगांत जम बसविलेला असताना भारत मात्र आजही शाकाहारी विरुद्ध इतर, बीफ मान्यता अशा वादांत गुरफटलेला दिसतो. भावनांचे व्यावसायिकीकरण आणि त्याचा वापर ही आजच्या विपणनाची कळीची गोष्ट झाली आहे. भारताने केवळ समृद्ध खाद्य परंपरेला तगवणेच नव्हे, तर तिचा ‘सॉफ्ट पॉवर’वृद्धीसाठी प्रभावी वापर करून घेणे ही काळाची गरज आहे. जी-२० व्यासपीठ आणि मेजवानीचे भारतीयीकरण हे त्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये असे म्हटले जाते की, जर व्यापारी आपली सीमारेषा ओलांडू शकले नाहीत, तर सैनिक त्या ओलांडतात. वाढत्या व्यापारासाठी, विश्वगुरू होण्यासाठी राष्ट्रांची हृदये जिंकणे गरजेचे आहे. मनुष्याच्या हृदयाचा मार्ग पोटातूनच जातो. बाकी ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’ हेच खरे!

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A food tradition effective banquet at the g 20 summit ysh