जयंत दिवाण
भ्रष्टाचार, महागाई या प्रश्नांविरोधात बिहारमधील युवकांनी सुरू केलेले आंदोलन देशभर पसरलेच शिवाय तेे लोकांच्या रोजच्या जगण्यातील प्रश्नांपुरते न राहता ‘संपूर्ण क्रांती’ चे आवाहन ठरले. या आंदोलनाला या बुधवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण क्रांती घोषणेला ५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १९७४ साली बिहारच्या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार, महागाईविरोधात आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थ्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना आंदोलनाचे नेतृत्व करण्याची गळ घातली. जयप्रकाशजींनी विद्यार्थ्यांना अट घातली की ते जे सांगतील तसेच विद्यार्थ्यांना वागावे लागेल. जेपींमुळे आंदोलनाचे अधिष्ठान पक्के झाले. पटना येथील गांधी मैदानात झालेल्या सभेत जेपींनी घोषणा केली की, हे आंदोलन केवळ भ्रष्टाचार, महागाईविरोधी नसून हे ‘संपूर्ण क्रांती’साठीचे आंदोलन आहे. संपूर्ण क्रांतीच्या घोषणेमुळे आंदोलन एका वेगळ्या पातळीवर गेले. संपूर्ण क्रांतीसाठी जेपींनी सहा महिन्यांतच युवकांची छात्र युवा संघर्ष वाहिनी नावाची संघटना स्थापन केली. संघटनेमुळे संपूर्ण क्रांतीसारख्या संकल्पनेला आकार आला. मोठ्या प्रमाणात तरुण संघटनेत सामील झाले. त्यानंतरचा इतिहास आपणा सर्वांना ठाऊक आहे. जेपींची अटक, आणीबाणी, जनता सरकारचे कोसळणे आणि जेपींचे निधन !

तरुणांचे आंदोलन

१९७४ च्या आंदोलनामुळे आणि जेपींच्या दूरदृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात युवक सामाजिक कार्यात समर्पित वृत्तीने उतरले. यापूर्वी विनोबांच्या भूदान आंदोलनामुळे आणि त्याही पूर्वी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली १९४२ च्या भारत छोडो आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावर तरुण देशकार्यात समर्पित भावनेने उतरले होते.

जेपींनी स्थापलेल्या छात्र युवा संघटनेची अट होती की ही संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसेल आणि संघटनेचे सदस्य केवळ ३० वर्षांपर्यंतचे तरुण असतील. जेपी म्हणायचे, ‘‘क्रांतीचे इंजिन तरुणच असतात. जगाच्या पाठीवर जेवढ्या क्रांती झाल्या, त्या तरुणांनीच केल्या आहेत.’’

हेही वाचा >>>‘मनुस्मृती’च्या निमित्ताने…

सत्तासापेक्ष संपूर्ण क्रांती

संपूर्ण क्रांतीसाठी स्थापन केलेल्या युवा संघटनेची अट होती की ती निवडणुका आणि सत्तेच्या राजकारणापासून दूर राहील. यालाच निर्दलीयता म्हटले गेले. पण ही निर्दलीयता सत्तासापेक्ष असेल. म्हणजे सत्ता कशीही वागली तरी आपण बघ्याच्या भूमिकेत राहणार नाही तर गरज भासल्यास सत्तेत हस्तक्षेपही करू. सत्ता ही ‘आहे रे’वाल्यांची असते. सत्ता क्रांती करत नसते. ती आहे ती व्यवस्था कशी चालवायची यात गुरफटलेली असते. क्रांती तेच करतात जे सत्तेच्या बाहेर राहून कार्यरत असतात. हीच गोष्ट गांधींनीही केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधींचे असे म्हणणे होते की काँग्रेसचे विसर्जन केले जावे. याचा अर्थ स्वातंत्र्याच्या आंदोलनातील लोकांनी स्वत:ला समाजसेवेत समर्पित करावे. विनोबांनी गांधींच्या म्हणण्याप्रमाणे सर्वोदयाची संघटना काढली. सर्व सेवा संघ नावाने आजही ती कार्यरत आहे. यालाच विनोबा, जेपी ‘लोकनीती’ म्हणतात. गांधींनी समतेसाठी ट्रस्टीशिपची संकल्पना मांडली. विनोबा या संकल्पनेला ग्रामदानापर्यंत घेऊन गेले. विषमता मालकी हक्कांशी संबंधित आहे. ग्रामदान म्हणजे मालकी हक्कांचे विसर्जन. हा प्रयोग सोव्हिएत रशियात झाला. पण तो फसला. कारण तेथे मालक ‘स्टेट’ झाले. समाज नव्हे! विनोबांच्या नेतृत्वाखालील सर्वोदय सत्ता निरपेक्ष होती. मात्र जेपींच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती सत्तासापेक्ष आहे.

हेही वाचा >>>नवे सरकार, नव्याने अपेक्षा!

लोकांची सत्ता

सामाजिक कार्य हे पूर्ण वेळ करायचे काम आहे. हे आपल्या स्वातंत्र्यलढ्यातून आलेले तत्त्व आहे. महात्मा गांधींआधीचे काँग्रेसचे नेतृत्व पोटापाण्याचे काम करून फावला वेळ मिळाल्यास काँग्रेसचे काम करीत. गांधींनी ही पद्धत बदलली. गांधी स्वत: आश्रमीय जीवन जगले. पूर्ण वेळ समाजासाठी दिला. गांधींनंतर विनोबा व त्यानंतर जेपी यांनी तरुणांना पूर्ण वेळ सामाजिक कार्य करण्यास भाग पाडले. संपूर्ण क्रांती आंदोलनातून हजारो तरुण पूर्णवेळ सामाजिक कार्यात समर्पित वृत्तीने कार्यरत झाले आणि आजही कार्यरत आहेत.

संपूर्ण क्रांती सत्ताविहीन (स्टेटलेस) समाज निर्माण करू पाहत आहे. राजनीतीला पर्याय आहे लोकनीती. सत्ता दिल्ली, मुंबईत एकवटली आहे. तिचा क्षय व्हायला पाहिजे. सत्ता लोकांमध्ये असली पाहिजे. जेपींनी त्याकाळी लोकसमिती, सिटिझन फॉर डेमोक्रेसी, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्था उभ्या केल्या. लोकनीतीच्या दिशेने वाटचाल केली. पण जेपींना आंदोलन काळापासून केवळ चार वर्षे मिळाली. १९७९ मध्ये त्यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या निधनानंतरही संपूर्ण क्रांती जमिनीवर उतरवण्याचे कार्य जेपींची संघटना संघर्ष वाहिनीने केली. आणि त्या संघटनेसाठी समर्पित त्या काळातील तरुण आज साठी ओलांडली असली तरी ते आजही कार्यरत आहेत.

समतेची बैठक

स्वातंत्र्य आंदोलनातून आलेला वारसा आजही जपला जात आहे. हा वारसा आजपर्यंत अबाधित राहिला तो गांधी, विनोबा, जेपींमुळे. जगाच्या इतिहासात हा वारसा अलौकिक आहे. आज हा वारसा हतबल करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी सांस्कृतिक क्रांती महत्त्वाची. समता, स्वातंत्र्य महत्त्वाचे! समतेविना स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्याविना समता कूचकामाची ! १९७४चे बिहार आंदोलन भ्रष्टाचार, महागाईविरोधात होते. पण जेपींनी त्या आंदोलनादरम्यान जानवे तोडण्याचे आवाहन केले आणि आंदोलनाला समतेची बैठक दिली. गांधींनीही स्वातंत्र्य आंदोलनाला समता, न्यायाचे अधिष्ठान दिले होते. त्यासाठी खादी, गोसेवा, कुष्ठरोग निवारण, हिंदू-मुस्लीम एकता वगैरे वगैरे १८ रचनात्मक कार्यक्रम त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाला दिले होते. हा वारसा जेपींनी पुढे चालविला. त्याचा विस्तार केला. तरुणांना गांधींच्या पाठी उभे केले. ५ जून रोजी त्या ‘संपूर्ण क्रांती’ घोषणेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी गांधींच्या कर्मभूमीत सेवाग्राम येथे संमेलन होत आहे. या संमेलनात देशाची पुढील वाटचाल ठरविली जाईल.

jayantdiwan56@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A movement started by the youth of bihar against the issues of corruption and inflation amy
Show comments