इंग्रजीत लिहिणारे भारतीय लेखक, ही जमात आता पुष्कळ मोठी झाली आहे. यांच्या लिखाणात संपूर्ण कथानक देशी परंतु निवेदनाची भाषा तेवढी इंग्रजी, असं जसं येतं; तसंच परदेशी वाचकाला रुचेल, समजेल अशा पद्धतीने भारतीय वातावरणाची किंवा भारतीय नातेसंबंधांची मांडणीसुद्धा येते. ‘द एडिबल गॉडेस’ ही आमोद दामले लिखित इंग्रजी कादंबरी (यूएस ऑफ) अमेरिकेत घडते, हे केवळ भौगोलिकदृष्ट्या खरं आहे. कारण जिथे ती घडते, त्या गावाचं नाव वाराणसी आहे, सर्व रहिवासी भारतीय आहेत आणि तिथली व्यवस्था ‘हिंदू’ मूल्यांच्या पालनावर भर देणारी आहे. तरी ती वर उल्लेखलेल्या दुसऱ्या प्रकारात मोडते, असं म्हणता येणार नाही. कारण या कादंबरीत पश्चिमी मूल्यं आणि भारतीय मूल्यं, अशी तुलना किंवा असा संपर्क-संघर्ष नाही. ती अमेरिकेत घडते, ही कादंबरीची सोय आहे. तसं असल्यामुळे कथानकाला महासागरातल्या एकाकी बेटावर घडणाऱ्या गोष्टीचं स्वरूप प्राप्त होतं. हे कथानक भारतात घडलं असतं, तर एका स्वायत्त आणि एक प्रकारे सार्वभौम मानववस्तीची पार्श्वभूमी मिळाली नसती. कथानक खरोखरीच्या बेटावर घडलं असतं, तर जगापासून पूर्णपणे तुटल्याची दखल टाळता आली नसती. मग ती एक वेगळी गोष्ट झाली असती.

या गोष्टीत एक ‘हिंदू’ गाव आहे. त्या गावाचं नाव आहे ‘वाराणसी’. गावातले सगळे रस्ते, चौक, वास्तू यांना हिंदू नावं आहेत. गावातले सगळे रहिवासी हिंदू आहेत. गावात अमेरिकेचा नाही, तर गावावर सत्ता गाजवणाऱ्या गुरुजींचा कायदा चालतो. वर्तन, श्रद्धा, कर्मकांडं, परस्परनातेसंबंध याचे नियम गुरुजी ठरवतात. नियमांचं पालन न करणाऱ्या गुन्हेगाराला कडक सजा फर्मावतात. गुरुजींच्या भूतकाळासंबंधी अद्भुत आख्यायिका आहेत आणि वाराणसीतले सगळे रहिवासी त्या आख्यायिकांवर यत्किंचितही अविश्वास दाखवत नाहीत.

पण बहुसंख्य रहिवाशांसाठी जरी हेच जग असलं, तरी हा देखावा वरवरचा आहे. त्याला छेद देणारं बोलणाऱ्या, वागणाऱ्या व्यक्ती तिथे आहेत. सर्वसामान्य जग आणि हे ‘अंडरवर्ल्ड’ समांतर चालत राहतात. कथानायक आनंद हा सर्वसाधारण रहिवासी आहे. गुरुजींवर पूर्ण श्रद्धा ठेवणारा आणि वाराणसीबाहेरच्या जगाविषयी काहीही माहिती नसलेला. परंतु त्याच्या वडीलभावाचा मृत्यू होतो आणि आनंद एकामागोमाग एक अशा घटनांमध्ये अडकत जातो की त्याची श्रद्धा डळमळीत होते. पण स्वतंत्र विचार करण्याची क्षमता गमावून बसलेला आनंद गोंधळून जातो. चाचपडत राहतो. त्याला पडणाऱ्या नैतिक प्रश्नांचं निराकरण होत नाही आणि जरी प्रचलित व्यवस्थेचा बेगडीपणा त्याच्या लक्षात आला तरी तरी तो व्यवस्था उलथून टाकू शकत नाही. एका बेगडी राज्यकर्त्याच्या जागी दुसरा येतो, इतकंच. राजकारण, सत्ताकारण, सत्तेसोबत असणारा भ्रष्टाचार, सत्ता आणि भ्रष्टाचार यांचं परस्परपूरक आणि परस्परांवर कुरघोडी करू बघणारं नातं आणि यामध्ये सर्वसामान्यांच्या नशिबी केवळ प्यादं होऊन राहणंच उरतं, असा एकूण या कादंबरीचा आशय आहे.

याला जोड आहे, फँटसीची. संगमरवरी दगडाच्या मूर्तींबरोबर चॉकलेटच्या मूर्ती. अमली द्रव्यांच्या प्रभावाखाली प्रतीत होणारं चॉकलेटचं विश्व. त्या विश्वातली माणसं. त्यांचा आणि वास्तव जगातल्या माणसांचा संबंध. कल्पनेतून अवतरणाऱ्या त्या अद्भुत जगाचं अस्तित्व केवळ कुणाच्या भ्रमापुरतं आहे की त्या जगाचं वास्तवाशी नातं आहे, हा कूट प्रश्न आणि त्याची वेळोवेळी मिळणारी उलटसुलट उत्तरं. मात्र ही फँटसी आणि गावाबाहेरच्या अमेरिकन वास्तवाची दखल, यांचा सांधा जुळत नाही. कादंबरी दोन स्वायत्त प्रवाहांवरून सरकत जाते. त्या प्रवाहांना जोडलं जात नाही.

यूएस ऑफ अमेरिका या देशात एक पूर्ण हिंदू गाव असणं आणि त्या गावात अमेरिकेचे कायदेकानू लागू न होता स्वायत्त व्यवस्था असणं, ही रचना वेगळी आहे. गाव, गावाचा भूगोल, गावातलं जीवन, सार्वजनिक जगण्यातले तपशील, हे सगळं कल्पनेने उभं केलं आहे आणि हे तपशील मुबलक आहेत. म्हणजेच जगताना अनुभवास येणाऱ्या वा दृष्टीस पडणाऱ्या गोष्टींपेक्षा कल्पित, रचलेला भाग मोठा आहे.

एवढं रचलेलं असताना कादंबरीत या गावाचा आणि बाहेरच्या जगाचा संबंध येण्याचा ओझरता उल्लेख आहे, त्या संबंधांमधले तपशील नाहीत. या गावाचं अर्थकारण कसं चालतं हे नाही, गावातले लोक कधीच बाहेर जात नाहीत की बाहेरचे तिथे येत नाहीत. ‘व्हिडीओ कॅसेट्स आता म्युझियममध्येच पाहायला मिळतील’, या उल्लेखावरून कथानक आधुनिक काळात घडतं, असं म्हणता येतं. एका बाजूने अमेरिकन जीवनातल्या प्रतिमा येतात, तसेच मुंबईतले उडुपी आणि टोक्योतल्या सबवेमधली गर्दी यांचेही उल्लेख आहेत. एका ठिकाणी तर मुंबईचं नाव न घेता गिरगावमधल्या वेश्यागृहाचा उल्लेख येतो. पण कथानकात मोबाइल फोन नाही, रेडिओ नाही, देशामधल्या, जगातल्या बातम्या देणारं वृत्तपत्र नाही. यामुळे वाचकाचं लक्ष केवळ गावातलं राजकारण, समाजकारण आणि त्यातला भ्रष्टाचार, यातच अडकून पडतं. चॉकलेटची बनवलेली असल्याने खाता येण्याजोगी असलेली ‘एडिबल गॉडेस’ हे शीर्षक त्याच दिशेकडे बोट दाखवतं. कथानक या आशयाभोवती फिरत असताना भरपूर नाट्यमय प्रसंग समोर येतात. नाट्याला प्राधान्य मिळताना पात्रांच्या भूमिका सुसंगत राहत नाहीत. जणू कादंबरीसाठी पात्रं महत्त्वाची नसून घटनांवर भर आहे. भ्रष्ट आचरणाचे नमुने पात्रांच्या वर्तनातून मांडले आहेत. अर्थात, भ्रष्टाचार करणारं पात्र स्वत:च भ्रष्टाचाराचा बळी असलेलंसुद्धा दिसतं.

कादंबरीतलं निवेदन अत्यंत दृश्यप्रधान आहे. बारीक तपशिलांमुळे वाचकाच्या डोळ्यांसमोर दृश्य उभं राहतं. त्यामुळे संपूर्ण कादंबरी ही एका टीव्हीवरच्या मालिकेची पटकथा असल्यासारखी भासते. प्रकरणं लहान लहान आहेत आणि जवळपास प्रत्येक प्रकरण ‘ओपनएण्डेड’ आहे. जे घडतं, ते पूर्णत्वास जात नाही. पुढे काय होणार, याची उत्कंठा उंचावून प्रकरण संपतं. काही वेळा अर्धवट सोडून दिलेल्या प्रसंगाचा संदर्भ पुढे येत नाही. त्या प्रसंगातून प्रक्षेपित होणारा आशय पुरेसा आहे, असं मानावं लागतं किंवा मालिकेच्या रूपात सादर करताना काही तपशील भरण्यास वाव ठेवला आहे, असं. इतकंच नाही, कादंबरीचा शेवट जरी आशय पूर्ण करत असला, तरी कथानक पुढे नेण्यासाठी वाव ठेवला आहे.

कादंबरीची ही रचना असं सुचवते की ही पटकथा आहे. एक एपिसोड हा एक कथाभाग समजावा. एकापुढे एक भाग जरी जोडलेले असले आणि त्या जोडणीतून जरी एक गंभीर आशय प्रक्षेपित होत असला; तरी प्रकरणं सुटी न ठेवता सलग मांडली तर सुसंगतीचा अभाव ठळक होईल. यातला ‘हिंदू’ हा उल्लेख कथानकाला भारताशी जोडण्यापुरता आहे; पारंपरिक हिंदू धर्माशी त्याचं नातं सैल आहे. मात्र, एका गंभीर आशयाला दर्शकप्रिय माध्यमाच्या जवळ जाणाऱ्या शैलीमधून मांडण्याचा हा प्रयत्न रोचक नक्की आहे.

हेही वाचा

सध्या जगातील आंग्ल वृत्तपत्रे २०२४मध्ये वाचलेल्या सर्वोेत्तम पुस्तकांची यादी करून छापत असताना, पुढल्या वर्षांत कोणती महत्त्वाची पुस्तके येणार आहेत, त्याचा ‘टाइम’ साप्ताहिकाने घेतलेला धांडोळा. अरुंधती रॉय यांच्यापासून नोबेल मिळविणाऱ्या हान कांग यांच्या पुस्तकांसह आणखी कुणाची नावे आहेत, हे तेथेच पाहा.

https://shorturl.at/JSsrd

एडमंड व्हाईट हे अमेरिकी कादंबरीकार आता ८४ वर्षांचे आहेत. त्यांच्या हयातीतच एडमंड व्हाईट हा पुरस्कार पहिल्या पुस्तकासाठी सुरू झाला. जानेवारीत त्यांचे नवे पुस्तक दाखल होत आहे. ‘ द लव्ह्ज ऑफ माय लाइफ’ या नावाच्या या पुस्तकाला त्यांनी आपल्या समागमाचे अथवा लैंगिक संबंधांचे आत्मचरित्र असे उपशीर्षकही दिले आहे. तूर्त पॅरिस रिव्ह्यूने यातील एक प्रकरण कुतूहलचातकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

https://shorturl.at/a5wQU

निक हॉर्नबी यांचा ‘बिलिव्हर’ मॅगझीनमधील पुस्तक वाचनाचा स्तंभ गेली दोन दशके सुरू आहे. त्यांची पुस्तकेही गाजलीत. अलीकडे त्यांचे नवे लेख मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील हा ताजा. म्हणजे अगदी परवा प्रसिद्ध झालेेला लेख…

https://shorturl.at/Uqx7 J

hemant.karnik@gmail. Com

Story img Loader