विनय सहस्रबुद्धे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्येतील प्राण-प्रतिष्ठा, शिवराज्याभिषेकाची ३५० तर मंदिरप्रवेश व ‘गेटवे’ची १०० वर्षे ही समरसतेची संधी आहे..

वर्ष २०२४ हे अनेक कारणांमुळे खऱ्या अर्थाने देशाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे म्हणता येईल. वसाहतवादाच्या छायेतून मुक्ती मिळविण्याच्या आपल्या संघर्षांच्या संदर्भातही हे वर्ष विशेष उल्लेखनीय. अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात होणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनाचेही आहे. शिवाय केरळमध्ये मंदिर प्रवेशासाठी झालेल्या वायकोम सत्याग्रहाच्या शताब्दीचे आणि मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया उभारणीचे १००वे वर्षदेखील हेच. श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक उत्सव, पहिल्या मंदिर प्रवेश सत्याग्रहाची शताब्दी आणि ‘गेट वे’ची १०० वर्षे हे चारही प्रसंग सांस्कृतिक पुनर्जागरणाचे आहेत आणि सामाजिक न्यायकेंद्री समरसतेचा संस्कार रुजविणे व वसाहतकालीन मानसिकतेतून मुक्ती हे दोन्ही घटक याच सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अविभाज्य भाग आहेत.

सुरुवातीसच हे स्पष्ट करायला हवे की, अयोध्येतील मंदिरात होत असलेली श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा एक निखळ धार्मिक कार्यक्रम असल्याच्या मर्यादित दृष्टीने त्याकडे पाहिले जाणे निखालस चुकीचे आहे. मुख्यत्वे बहुसंख्य हिंदू श्रीरामाला दैवत मानतात हे खरेच पण रामायण, महाभारत ही काव्ये ज्या प्रमाणे आपली राष्ट्रीय महाकाव्ये आहेत, तसेच श्रीराम हे आपले राष्ट्रीय महानायक म्हणता येतील. भारतातल्या कोणत्याही प्रांतात जा, कुठे रामचंद्रन, रामनाथन, रामिलगम भेटतील तर कुठे रामाय्या अथवा रामप्पा, रामभाऊ, राम सिंह. प्रत्येक माणसात देवत्व असतेच असते या मुख्यत्वे हिंदू भारतीय तत्त्वज्ञानात्मक श्रद्धेचे प्रतिबिंब आपल्याला रामाच्या व्यक्तित्वात जसे दिसते, तसेच ते रामायणातही दिसून येते.

हेही वाचा >>>लोक आपले म्हणणे रामावर लादल्याशिवाय राहणार नाहीत!

दुर्दैवाने इतक्या मूलभूत सैद्धांतिक भूमिकेचे हिंदू समाजातील अनेकांना वारंवार होणारे विस्मरण हेच जातीभेदांचे मुख्य कारण ठरत आले आहे, सामाजिक विभाजनाला त्यातूनच गती मिळत गेली आहे, हेही वास्तवच आहे. भारताच्या आधुनिक सांस्कृतिक इतिहासात अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती हा एक वळणिबदू म्हणत येईल. कुणीही कुठल्याही परकीय देशातून इथे यावे आणि आपल्याकडून त्याचा प्रतिकार व प्रतिरोध प्रत्यक्ष त्या वेळी अथवा नंतरही होऊच नये या सद्गुण-विकृतीला आता एक समाज म्हणून आपण सोडचिठ्ठी देत आहोत, ही गोष्ट असाधारण महत्त्वाची आहे. आपण आपला आत्मसन्मान पुन्हा स्थापित करू शकतो, याबद्दलच्या भारतीय समाजाच्या सामूहिक आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणूनही अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा महत्त्वाचा ठरतो.

प्राचीन मंदिरे आणि अन्य वारसा स्थळे ही देशाचे मानिबदू असतात, त्यामुळेच अयोध्येतील राममंदिराच्या  उभारणीची तुलना सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराशीच करता येईल. त्या दृष्टीने बघितले तर अयोध्येतील राममंदिर ही केवळ एक इमारत नसून ते भारतीय संस्कृतीच्या (सिव्हिलिझेशन) अविश्रांत प्रवासाचे एक प्रतीकचिन्ह म्हणावे लागेल. अशा मंदिरातील श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे संपूर्ण भारतीय समाजाच्या मनात आपल्या आकांक्षा, आपली क्षमता आणि आपले सामथ्र्य यासंदर्भातील आत्मविश्वासाचीही प्राणप्रतिष्ठा होय, याचे विस्मरण होऊ नये. या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी सर्व भारतीयांनी दीप-प्रज्वलन करून दिवाळी साजरी करावी, हे पंतप्रधानांचे आवाहन मंदिरनिर्मितीच्या मागे असलेल्या या उदात्त भूमिकेच्या जाणिवेचा प्रकाश सर्वदूर पसरविण्यासाठी महत्त्वाचे आहे.

हेही वाचा >>>‘कशाला हवेत नगरसेवक?’ असे वाटण्याचे वेळ कोणी आणली?

एक चांगला योग असा की याच वर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनाचा ऐतिहासिक सोहळाही साजरा करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक आणि चाणाक्ष रणनीतीकार तर होतेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे समाजाचा पुरुषार्थ जागविणारे ते एक द्रष्टे राजे आणि प्लेटोच्या कल्पनेतले तत्त्वज्ञ-राज्यकर्ते होते. आपणही एक समाज म्हणून आपल्यावर होणारे परकीय  आक्रमकांचे राजकीय, भौगोलिक आणि सांस्कृतिक आक्रमण यशस्वीपणे रोखू शकतो, हा आत्मविश्वास त्याकाळच्या रयतेमध्ये आणि त्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती तेव्हाच्या राजा-महाराजांमध्ये निर्माण करण्याचे ऐतिहासिक काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि म्हणूनच त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहोळय़ाचे वेगळे महत्त्व आहे. मराठी भाषेपासून ते सामाजिक प्रथा- पद्धतींपर्यंत; त्यांनी परकीय आक्रमकांचा अनावश्यक प्रभाव नष्ट करण्यासाठी खूप जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांची स्वदेश, स्वभाषा आणि स्व-संस्कृतीबद्दलची निष्ठा वीर सावरकरांसारख्या अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी ठरली हे नाकारता येणार नाही. भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा मार्ग आपल्या समाजातील सामाजिक ऐक्य आणि अखंडता यांना वळसा घालून पुढे जाऊच शकत नाही.

अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीच्या पुन्हा होत असलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या या वर्षीच केरळमधील वायकोम सत्याग्रहाचीही शताब्दी साजरी होत आहे, हा एक उल्लेखनीय सुयोग! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने झालेल्या काळाराम सत्याग्रहापूर्वी सहा वर्षे १९२४ मध्ये केरळातील त्रावणकोर प्रांतातील सर्व जातींच्या भाविकांसाठीच्या अनिर्बंध मंदिर प्रवेशासाठी हा सत्याग्रह झाला आणि वैशिष्टय़ म्हणजे सुमारे २५ हजार तथाकथित सवर्णानी त्यात भाग घेतला होता. महात्मा गांधींनी या सत्याग्रहामागील मागणीचे पूर्णत: समर्थन केले होते. त्रावणकोर संस्थानच्या त्यावेळच्या राज्यकर्त्यां महाराणी सेथु लक्ष्मीबाई यांना अखेर ही मागणी मान्य करावी लागली.

१९८९-९० च्या कारसेवेत असो अथवा २२ जानेवारीला होऊ घातलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळय़ात असो; समाजातील उपेक्षित आणि पीडित घटकांच्या आध्यात्मिक नेत्यांचा सन्मानपूर्वक सहभाग हे सामाजिक समरसतेतील न्याय तत्त्वाचेच प्रतीक म्हणता येईल. अयोध्येतील नव्या विमानतळाला महर्षी वाल्मीकींचे नाव देणे असो वा रामनंदी पंथाच्या पद्धतीला मूर्तीच्या पूजा-अर्चना विधींमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय असो, अशा अनेक लहान-मोठय़ा बाबींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक सामिलीकरणाला आणखी गती मिळेल यात शंका नाही.

हेही वाचा >>>गरिबी कोणी कमी केली? ‘यूपीए’ने की भाजपने?

आपल्या स्वातंत्र्यलढय़ात ज्या मुंबई शहरामधून  ब्रिटिशांना उद्देशून ‘चले जाव’ ची घोषणा दिली गेली आणि त्याच मुंबईत दिमाखात उभ्या राहिलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या बांधकामाला १०० वर्षे पूर्ण होताहेत, तीही २०२४ मध्येच. हे भारत-द्वार उभे केले गेले ते ब्रिटनच्या राजाच्या स्वागतासाठी. वसाहतवादी कालखंडाच्या या वास्तुचिन्हांना आता नव्या काळात नवे संदर्भ जोडून आपण बघितले तर ही शताब्दी वसाहतवादी शक्तींनी भारतावर अधिराज्य गाजविण्याची नव्हे तर भारतीय सांस्कृतिक चिंतनाचा संपूर्ण जगभर प्रभाव निर्माण करण्यासाठी कृतसंकल्प होण्याची आठवणही ठरू शकेल.

जगात आज, ज्याला मल्टी-कल्चरलिझम म्हटले जाते तो प्रत्यक्षात कसा राबवायचा याबद्दल गोंधळल्यासारखे वातावरण आहे. भारताने ‘एकं सत विप्रा बहुधा वदन्ति’ या सूत्रानुसार आध्यात्मिक क्षेत्रात एकेश्वरवाद पूर्णपणे नाकारून याच मल्टी-कल्चरलिझमचे उदाहरण घालून दिले आहे. शिवाय आज जे जे पाश्चिमात्य ते ते आधुनिक अशा भ्रमापोटी अनेक लहान आणि

अविकसित देशांमधील पारंपरिक सांस्कृतिक अभिधारणा अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहेत. भारताने दक्षिण गोलार्धातील देशांसाठी एक मंच तयार करण्याबाबत जे प्रारंभिक प्रयत्न केले आहेत, त्यांचे सर्वदूर जे स्वागत झाले त्यामागे या देशांना जाणवत असलेला- अमेरिकन वा पाश्चात्त्य संस्कृतीच्या अतिरेकी प्रभावामुळे निर्माण झालेला- सांस्कृतिक सपाटीकरणाचा धोका हाही एक मुद्दा आहेच.

मध्यंतरी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी  जगाच्या ‘सांस्कृतिक पुर्नसतुलनाची’ गरज प्रतिपादित केली होतीच. या पार्श्वभूमीवर गेट वे ऑफ इंडिया हे वसाहतवादाच्या प्रवेशाचे नव्हे तर भारतीय चिंतनातून साकारलेल्या विश्व कल्याणाच्या मानवीय मूल्यांच्या जगभरातील प्रक्षेपणाचे द्वार ठरू शकते, याची जाणीव-जागृती यानिमित्ताने  होऊ शकते.

‘श्रीराम हे केवळ हिंदूंचेच (आराध्य) नाहीत. ते सर्वाचे आहेत’, अशा आशयाचे एक विधान फारुख अब्दुल्ला यांनी अलीकडेच केले आहे, त्याचे स्वागतच केले पाहिजे. काही शतकांपूर्वी बाबर चालून आला त्यावेळी त्याला या चिरंतन सत्याचा साक्षात्कार झाला असता, ‘एकं सत विप्रा बहुधा वदन्ति’ हे या भारत भूमीचे चिंतन त्याला उमगले असते; तर ‘श्रीरामाच्याच घरात श्रीरामाची पुन्हा प्राणप्रतिष्ठा’ हा प्रसंग कोटय़वधी भारतीयांवर आलाच नसता!

vinays57@gmail. com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A year of cultural renaissance pranapratistha in ayodhya shiva coronation temple entrance 100 years of gateway amy