सिद्धार्थ खांडेकर
पाच वेळच्या बुद्धिबळ जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने, अमेरिकन ग्रँडमास्टर हान्स नीमन चोरट्या व कृत्रिम आकलनाद्वारे बुद्धिबळाच्या चाली रचतो असा आरोप सुरुवातीला अप्रत्यक्षरीत्या आणि नंतर थेट केला नसता, तर हे प्रकरण सध्या आहे त्या वळणावर गेले असते का असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. बुद्धिबळात ज्याला ‘चीटिंग’ असे संबोधतात, त्यासाठी मराठीत फसवणूक असा शब्द वापरण्यावाचून गत्यंतर नाही. पण तसे पाहायला गेल्यास एखाद्या परीक्षेत कॉपी करण्याच्या प्रकाराशी हान्स नीमनचे कथित ‘चीटिंग’ अधिक जवळचे. अजून तरी नीमनविरुद्ध थेट पुरावे सापडलेले नसले, तरी त्याची पार्श्वभूमी पाहता नीमन सर्वस्वी संशयातीतही ठरू शकत नाही. या सगळ्या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे साक्षात कार्लसननेच त्याच्यावर केलेले आरोप. कार्लसनने आरोप केल्याच्या काळातच चेस डॉट कॉम या वेबसाइटने एक ७२ पानी अहवाल प्रसिद्ध केला. यात नीमनने जवळपास १०० वेळा अशा प्रकारे फसवणूक केल्याचे सांगण्यात आले. चेस डॉट कॉम ही ऑनलाइन प्रकारातली बुद्धिबळाची सर्वांत मोठी जत्राच असते. या ऑनलाइन व्यासपीठावर हवशा-नवशांप्रमाणेच अत्युच्च बुद्धिबळपटूही हजेरी वावतात. या ऑनलाइन पटावरील नीमनचे खाते कायमस्वरूपी गोठवण्यात आले आहे. आरोपांची राळ उठू लागली, त्यावेळी आपण केवळ १२ आणि १६व्या वर्षी फसवणूक केल्याची कबुली नीमनने दिली. ती तथ्यहीन असून, तो १७ वर्षांचा असतानाही आपल्यासमोर त्याने कबुली दिल्याचा दावा चेस डॉट कॉमने केला आहे.
हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
चेस डॉट कॉमकडे सध्या थोडे दुर्लक्ष करू. कारण कार्लसनच्या दाव्यांचा विचार अधिक गांभीर्याने करण्याची गरज आहे. ४ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील सिंकेफील्ड या प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धेत खेळताना कार्लसन नीमनसमोर पराभूत झाला. ही स्पर्धा पारंपरिक म्हणजे क्लासिकल प्रकारात खेळवली गेली. या प्रकारात त्या डावापूर्वी ५३ डावांमध्ये कार्लसन अपराजित राहिला होता. नीमनविरुद्ध त्याच्याकडे पांढरी मोहरी होती. पांढरी मोहरी असताना क्लासिकल प्रकारात कार्लसन जवळपास वर्षभराहून अधिक काळ हरलेला नाही. नीमनचा समावेश त्या स्पर्धेत अगदी अखेरच्या क्षणी झाला, कारण रोमेनियाच्या रिचर्ड रॅपोर्टने ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली होती. इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळण्याची कोणतीही पूर्वकल्पना त्यामुळे नीमनला नव्हती. त्या स्पर्धेत एकाहून एक सरस बुद्धिबळपटू उतरले होते. कार्लसनने नंतर बोलून दाखवले, की नीमन फारच सहजपणे चाली खेळत होता. पटाकडे त्याचे पुरेसे लक्षही नव्हते. इतक्या सहजपणे काळ्या मोहऱ्यांनिशी आपल्याला हरवू शकतील, असे फारच थोडे बुद्धिबळपटू आहेत. नीमन त्यांतला नाही!
समोरासमोरही फसवणूक?
कार्लसनच्या आरोपांमुळे काहीशी गुंतागुंत निर्माण झाली. कारण नीमनवरील आजवरचे फसवणुकीचे आरोप हे केवळ ऑनलाइन बुद्धिबळ प्रकारात झाले होते. कार्लसनचा आरोप नीमन ऑफलाइन म्हणजेच समक्ष पटावरही असे प्रकार करत असावासे सुचवतो. परंतु सिंकेफील्ड स्पर्धा भरवणारा सेंट लुई चेस क्लब, अमेरिकन बुद्धिबळ संघटना किंवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (फिडे) यांच्याकडे सबळ पुरावा येत नाही तोवर नीमनवर बंदी घातली जाण्याची शक्यता शून्य. कार्लसनच्या संशयाला पुष्टी देणारी वर्तणूक नीमनकडूनही काही वेळा घडली. कार्लसनच्या विजयाचे सामनोत्तर विश्लेषण करताना तो चाचपडत होता. कार्लसनच्या ज्या डावाचा संदर्भ नीमनने दिला, तो डाव कार्लसन कधी खेळलेलाच नव्हता!
हेही वाचा… विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या
पण मग नीमन फसवणूक करतोय की करत नाहीये? एकीकडे कार्लसन कुणावरही निष्कारण हेत्वारोप करणार नाही हे वास्तव, दुसरीकडे नीमनविरुद्ध आजतागायत ठोस पुरावा सापडलेला नाही हे वास्तव. १९ वर्षांच्या नीमनच्या कामगिरीत किती सुधारणा झाली, याचे पटावरील किंवा ऑनलाइन डावांमध्ये पुरावे कमी आढळतील. पण त्याचे रेटिंग किंवा मानांकन गेल्या तीन वर्षांत थक्क करणाऱ्या वेगाने वधारले हे मात्र खणखणीत दिसून येते. सध्या तो २७००च्या आसपास आला आहे. म्हणजे बुद्धिबळाच्या परिभाषेत सुपर ग्रँडमास्टर. आपल्याकडे गेल्या काही महिन्यांत बी. गुकेश आणि अर्जुन एरिगेसी अशाच प्रकारे प्रगती करत २७०० रेटिंगच्या पलीकडे पोहोचले. त्यांच्याविरुद्ध कधीच संशय व्यक्त झाला नाही. भारताचा बहुचर्चित युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद हाही विस्मयजनक प्रगती करतो आहे, तोही संशयातीत आहे. नीमनच्या बाबतीत संशय उद्भवतो, कारण त्याच्या अनेक चाली ‘संगणकीय’ असतात.
माणूस आणि ‘इंजिन्स’मधला फरक
हे काय प्रकरण आहे, ते समजून घ्यावे लागेल. बुद्धिबळपटू हे सैद्धान्तिक अभ्यास (थिअरी), गणनक्षमता (कॅल्क्युलेशन) आणि मानवी अंतःप्रेरणा (इंट्युशन) या त्रिसूत्रीवर प्रगती करतात. मानवी भावनांची सरमिसळ या सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा घटक ठरते. याउलट गेल्या काही वर्षांमध्ये गणनक्षमतेत राक्षसी ठरलेली सॉफ्टवेअर्स किंवा इंजिन्स केवळ सैद्धान्तिक माहिती (अभ्यास नव्हे) आणि गणनक्षमता या दोनच घटकांवर बुद्धिबळ खेळतात. कार्लसन एखादी खेळी पटावर खेळतो, तेव्हा पटावर त्याच्या प्रतिस्पर्ध्याची काहीएक भावना उमटते. भीती, दडपण, हुरहूर किंवा यांपैकी काहीही नाही, तर किमान बिनधास्त बेफिकिरी तरी. एखादा बुद्धिबळपटू तोडीस तोड खेळू लागल्यावर कार्लसनच्या मानसिकतेत, तो कितीही बलाढ्य बुद्धिबळपटू असला तरी, बदल होताना दिसतीलच. भावनांचे हे पदर पटावरील चालींमध्ये प्रतिबिंबित होत असतात. इंजिन्सना अशी कोणती भावनाच नसते. त्यामुळे मानवी गणनपरिघाच्या पूर्णपणे बाहेरची चालही खेळून ही इंजिन्स कुरघोडी करण्याचाा प्रयत्न करतात. अशा चाली किंवा खेळी इंजिन्सपुरत्या ठीक. पण हाडामांसाचे बुद्धिबळपटू अशा संगणकीय चाली खेळू लागतात तेव्हा संशय बळावतो. बुद्धिबळ खेळणाऱ्यांना किंवा हा खेळ आस्वादणाऱ्यांच्या वाचनात कित्येकदा ‘ही खेळी चांगली, पण ती मानवी मनात येण्याची शक्यता दुर्मीळ’ असे शेरे येतात. याचे कारण बुद्धिबळ हा केवळ निर्जीव गणनाचा खेळ नाही. तो आकलनाचा, अंतःप्रेरणेचा, भावनांचा विलक्षण व्यामिश्र आणि रंजक खेळ आहे. त्यामुळेच त्याची लोकप्रियता वैश्विक आहे.
फसवणूक करणारे क्षणैक स्वार्थासाठी इंजिन्सची चोरून मदत घेतात नि फसतात. या खेळाच्या आकलनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे, अमूक क्षमतेचा बुद्धिबळपटू कोणत्या सहजतेने आणि प्राविण्याने पटावर चाली खेळतो हे सहसा समजण्यासारखे असते. नीमनबाबत एका ब्राझिलियन ट्विचर आणि यू्ट्युबरने लावलेला शोध म्हणजे, त्याच्या नैसर्गिक चाली त्याच्या रेटिंगमधील प्रगतीशी विपरीत अशा अत्यंत सदोष असतात. चालींमधील हे सदोषत्व रेटिंग सुधारते तसे कमी व्हायला हवे ना? नीमनच्या बाबतीत हे घडलेले नाही. तरीही त्याचे रेटिंग सुधारले कसे, तर महत्त्वाच्या डावांमध्ये त्याने अवैध मार्गांचा अवलंब केला म्हणून. याचा फायदा कसा होतो, हे समजणे अवघड नाही. कार्लसनला हरवण्यासाठी तुमचे किमान रेटिंग २६५०च्या वरचे हवे. आता इतके रेटिंग असलेल्या व्यक्तीला बुद्धिबळातील बारकावे नीटच समजतात. तसेच, मोजक्याच पूर्णपणे बिनचूक चाली खेळून कार्लसनवर वर्चस्व मिळवणे अवघड नाही. खुद्द कार्लसनच्या भाषेत सांगायचे झाल्यास, डावात केवळ एकदा किंवा दोनदा चीटिंग करणे माझ्या दृष्टीने पुरेसे ठरू शकते. २६००हून अधिक रेटिंग असलेल्या बुद्धिबळपटूची प्राथमिक प्रतिभाही उच्च असल्यामुळे, फसवणूक त्याच्यासाठी गुणवर्धक (मल्टिप्लायर) ठरत जाते.
नीमनवर संशय आहे, पण…
पण नीमन समक्ष पटावर फसवणूक कशी करत असेल? ‘न्यूजवीक’च्या बातमीनुसार, गुदद्वारात सेक्स टॉय दडवून हे करणे अवघड नाही. अशी सेक्स टॉइज् संपर्कक्षम असतात. या टॉयच्या थरथरण्यातून, कोणती चाल करावी याच्या अंदाजाचा निरोप मिळू शकतो. नीमनची त्या दृष्टीनेही अलीकडे तपासणी झाली, पण सापडले काही नाही. तरीदेखील त्याच्या बाबतीत संशय कमी होऊन सहानुभूती वाढली असे काहीच दिसत नाही. तो संशयातीत नाही, तोवर अमेरिका वगळता इतरत्र त्याला मोठ्या स्पर्धांचे निमंत्रण मिळणार नाही. दुसरीकडे, त्याच्यावर एकही आरोप सिद्ध झाला नाही किंवा तो फसवणूक करत नव्हताच असे सिद्ध झाल्यास कार्लसन बुद्धिबळातून संन्यास घेईल का?
siddhart.khandekar@expressindia.com