भूषण गगराणी, महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक

शहरे रातोरात उदयास येत नाहीत. त्यामागे अनेक वर्षांचे परिश्रम असतात, अभ्यास असतो, त्याग असतो. मुंबई हे महानगरदेखील असेच उदयास आले. दिवंगत कवी नारायण सुर्वे म्हणतात, ‘मुंबईत आला तो रमला.’ यातच मुंबईचे आणि मुंबईकरांच्या स्वभावाचे गमक दडले आहे. कोट्यवधी हातांना रोजगार देणारे असे हे महानगर आहे. जगभरातील विद्यार्थी, व्यापारी, उद्याोजक, कलाकार, गुंतवणूकदार या महानगरात येतात. अशा या महानगराच्या नागरी गरजा पूर्ण करणारी ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ म्हणजे ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ अर्थात ‘बीएमसी’.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
maharshtra electoral history
महाराष्ट्राची निर्मिती, काँग्रेसचे वर्चस्व, हिंदुत्वाचा उदय; महाराष्ट्र निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ४ सप्टेंबर १८७३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेची पहिली सभा झाली. यंदा त्यास, पर्यायाने बृहन्मुंबई महानगरपालिकेलाही १५१ वर्षे पूर्ण होत आहेत. साधारण ४८३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या शहराचे रूपांतर गेल्या दीडशे वर्षांत विश्वनगरीत झाले आहे. सध्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन १९ डिसेंबर १८८४ रोजी झाले. महानगरपालिकेबरोबरच महानगरपालिका सचिव आणि स्थायी समिती या विभागांनाही १५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. महानगरपालिकेच्या सचिव विभागाने शहरातील सर्व घडामोडींच्या परिपूर्ण नोंदी ठेवतानाच अनेक ऐतिहासिक दस्तावेज, महत्त्वाचे निर्णय, सभा इतिवृत्तांताचे जतनदेखील केले आहे.

हेही वाचा >>>आर्थिक उन्नती म्हणजे सामाजिक उन्नती नव्हे

‘इंडो सार्सानिक’ स्थापत्य शैलीत मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम २५ एप्रिल १८८९ रोजी सुरू झाले. तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या ६,६००.६५ चौरस वार जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली. त्यासाठीचे संकल्पचित्र तत्कालीन प्रख्यात वास्तुशास्त्रज्ञ एस. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी तयार केले होते. ३१ जुलै १८९३ रोजी बांधकाम पूर्ण झाले. तेव्हा थॉमस ब्लॅनी हे अध्यक्ष, हॅरि ए. अॅक्वर्थ आयुक्त, तर रावबहादूर सीताराम खंडेराव हे बांधकाम खात्याचे निवासी अभियंता होते. बांधकामाचे कंत्राट महात्मा फुले यांचे निकटवर्ती व्यंकू बाळाजी यांनी घेतले होते. अंदाजापेक्षा कमी कालावधीत व कमी खर्चात इमारतीचे बांधकाम पूर्ण करून एक उच्च आदर्श निर्माण केला गेला. या इमारतीचा २३५ फूट उंचीचा मनोरा हे भारतातील अग्रगण्य शहर (Urbs Prima In Indis) असलेल्या या महानगराचे प्रतीक आहे.

४८३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात सुमारे दीड कोटींहून अधिक लोकसंख्येला सामावून घेणाऱ्या या शहराला प्राथमिक सुविधा देणारी, नागरी गरजा पूर्ण करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील एक अग्रगण्य स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

या १५१ वर्षांत बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. अनेक आव्हानांचा सामना केला. यशाची शिखरेही पादाक्रांत केली. महानगरपालिका स्वच्छ, हरित, प्रदूषणमुक्त आणि गतिमान मुंबईकरिता कार्यरत आहे. रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, पूल, पाणीपुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, उद्याने, अग्निशमन, आरोग्य, रुग्णालये, आपत्ती व्यवस्थापन आदी विविध खात्यांच्या कामांत नव्या पायाभूत प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली आहे. महापालिकेचा यंदाचा (२०२४-२५) अर्थसंकल्प ५९ हजार ९५४ कोटी रुपयांचा आहे. पालिकेने स्व-निधीतून काही पथदर्शी प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत. दीडशे वर्षांत महानगरपालिकेने अनेक मैलाचे दगड ओलांडले. १९६४ मध्ये पालिकेच्या मध्यवर्ती प्रशासकीय पद्धतीची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार संपूर्ण मुंबईची सात प्रशासकीय परिमंडळांसह २४ विभागांत विभागणी करण्यात आली.

हेही वाचा >>>आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?

अभियांत्रिकी सेवा, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, मल:निस्सारण, आपत्ती व्यवस्थापन, उद्यान, मनोरंजन आदी विविध क्षेत्रांत महानगरपालिका प्रशासन सेवा देते. राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम रुग्णालय) व सेठ गो. सुं. वैद्याकीय महाविद्यालय, बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्याकीय महाविद्यालय, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्याकीय महाविद्यालय (शीव), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्याकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालय या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरांतील रुग्णालये, विशेष रुग्णालये, दवाखान्यांत मुंबईसह देशभरातून येणाऱ्या रुग्णांना सेवा पुरविली जाते.

महानगरपालिकेकडून रोज सुमारे ६५०० टन नागरी घनकचरा उचचला जातो. त्यापैकी ५९०० टन कचऱ्याची कांजूर एकात्मिक नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. देवनार कचराभूमीत सुमारे ६०० टन कचरा प्रतिदिन टाकण्यात येतो. त्यावर प्रक्रिया करून ऊर्जानिर्मितीच्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यान्वित होऊन त्यातून प्रति दिन सुमारे ४ मेगावॉट ऊर्जानिर्मिती होण्याचा अंदाज आहे.

मुंबईला विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा आणि भातसा या सात जलाशयांतून पाणीपुरवठा केला जातो. विहारमधून (९० दशलक्ष लिटर), तुळशीतून (१८ दशलक्ष लिटर), तानसा (५०० दशलक्ष लिटर), मोडक सागर (वैतरणा) (४५५ दशलक्ष लिटर), ऊर्ध्व वैतरणा (६३५ दशलक्ष लिटर), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा (४५५ दशलक्ष लिटर) आणि भातसा (२०२० दशलक्ष लिटर) या सात जलस्राोतांद्वारे ४१७३ दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. हे पाणी शुद्धीकरणासाठी २२३५ मिलिमीटर ते ५५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनी आणि बोगद्यातून पांजरापूर आणि भांडुप येथील शुद्धिकरण केंद्रांत नेले जाते. तिथे त्यावर प्रक्रिया केली जाते.

महानगरपालिकेने ठिकठिकाणी पूल उभारले आहेत. पूल विभागाकडून महानगरपालिकेशी संबंधित सर्व पुलांचे नियोजन, बांधकाम आणि परिरक्षण करण्यात येते. सध्या महानगरात नाला किंवा नदीवर एकूण २८७ पूल आहेत. तसेच रेल्वे, लोहमार्गावर ४३ पूल आहेत. यासह शहरात ५४ उड्डाणपूल आहेत. ९५ पादचारी पूल, २२ आकाशमार्गिका (स्कायवॉक) व २० भुयारी मार्ग आहेत.

शिक्षण विभागानेही अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत पालिकेच्या शाळांमध्ये एकूण २ लाख ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या शाळांमध्ये मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, तमीळ, तेलुगू, कन्नड अशा एकूण आठ भाषांत शिक्षण दिले जाते. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी सातासमुद्रापार पोहोचले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगीत अकादमी व क्रीडा उपविभागही कार्यरत आहे. मार्च २०२४ मध्ये पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत २४८ माध्यमिक शाळांतील १६ हजार १४० विद्यार्थ्यांमधून १४ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सरासरी निकाल ९१.५६ टक्के लागला.

कधीकाळी घोड्यांच्या ‘ट्राम’ धावणाऱ्या या मुंबईतून आज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होते. हे शहर जगभरातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मुंबईला भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेचे महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता आदींसह विविध प्रकल्प आकारास येत आहेत. शहरात सध्या २७९ उद्याने, ४८३ मनोरंजन मैदाने आणि ३४५ क्रीडांगणे आहेत. ७० ठिकाणी मियावाकी पद्धतीची नागरी वने तयार करण्यात आली आहेत. या नागरी वनांमध्ये मिळून सुमारे साडेचार लाखांपेक्षा अधिक झाडे बहरली असून, याव्यतिरिक्त सुमारे ३२ लाख झाडे मुंबईत अस्तिवात आहेत. मुंबईला २०२१, २०२२ व २०२३ अशी सलग तीन वर्षे ‘जागतिक वृक्ष नगरी’ हा बहुमान प्राप्त झाला आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सुसज्ज आहे. नागरिकांना त्वरित सहकार्य मिळावे, यासाठी १९१६ हा मदतसेवा क्रमांक अविरत कार्यरत आहे. येथे ३० हंटिंग लाइन्स असून नागरिकांना त्यावर संवाद साधता येतो. मुंबई अग्निशमन दलात सध्या सहा विभागीय परिमंडळे असून, ३५ मोठी आणि १९ लहान अग्निशमन स्थानके आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मुंबई अग्निशमन दल सज्ज आहे. मुंबईवर अनेक संकटेही आली, मात्र त्या संकटांचा मुंबईकरांनी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने धैर्याने सामना केला. कोविड-१९ विषाणू संसर्ग काळात महानगरपालिकेने खऱ्या अर्थी ‘मातृसंस्था’ हे नाते जपले. दररोज लक्षावधी नागरिकांना जेवण दिले. कोविड सेंटर उभारून लाखो रुग्णांवर उपचार केले. त्यांना औषधांची कमतरता भासू दिली नाही. मुंबईकरांचा जीव वाचवीत प्रशासनाने ४८० अधिकारी आणि कर्मचारी गमावले. मात्र तरी प्रशासन डगमगले नाही. तब्बल दीड ते दोन वर्षे लढा देऊन या संकटावरही महानगरपालिकेने मात केली. या कामगिरीमुळे निती आयोग, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर पालिकेचे कौतुक झाले व ‘मुंबई मॉडेल’चा अभ्यास करण्यासाठी जगभरातून अभ्यासक आले.

कोणतेही आव्हान पेलण्यासाठी ‘टीम बीएमसी’ सदैव सज्ज असते. यात प्रशासनातील शेवटच्या कर्मचाऱ्याचेही तेवढेच योगदान असते, जेवढ माझे. मी या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी असताना ही १५१ वी वर्षपूर्ती होत आहे, ही माझ्यासाठी व्यक्तिश: आनंदाची बाब आहे. दीड कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली आणि सातत्याने परिवर्तनशील, गतिशील, बहुरंगी वैशिष्ट्यांचे व पैलूंचे दर्शन घडविणारी मुंबई खरोखर महानगरीच आहे. या वास्तूत आयुक्त व प्रशासक या नात्याने कामकाज करण्याची संधी मला लाभली, १५१ वर्षपूर्तीचा क्षण अनुभवता आला याचे समाधान आहे.