सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम (सी. एस. एस. एस) च्या अहवाला अनुसार गेल्या सव्वा वर्षांत महाराष्ट्रात जास्त द्वेषजनक भाषणे देण्यात आली आहेत. या भाषणांमध्ये टी. राजा सिंग, नितेश राणे, काजल हिंदुस्थानी इत्यादी उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी लोकांचा मोठा वाटा असल्याचे दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सी. एस.एस.एस. च्या अहवालानुसार जानेवारी २०२४ मध्ये भारतात दिल्या गेलेल्या सात द्वेषजनक भाषणांपैकी पाच भाषणे फेब्रुवारी २०२४ मध्ये महाराष्ट्रात दिली गेली. तसेच सी. एस. एस. च्या २०२३ च्या अहवालानुसार भारतात दिल्या गेलेल्या एकूण ३३ द्वेषजनक भाषणांपैकी पैकी १० अशी द्वेषजनक भाषणे महाराष्ट्रात देण्यात आली तर कर्नाटक (४), राजस्थान (४), दिल्ली (३), हरयाणा (३), आसाम (२), जम्मू आणि काश्मीर (१), छत्तीसगढ (२), गुजरात (१), मध्य प्रदेश (१), राजस्थान (१), उत्तराखंड (१) अशी देण्यात आली. (Engineer & Dabhade, 2024)

तसेच इंडिया हेट लॅब नावाच्या वॉशिंग्टन स्थित संस्थेच्या अहवालाअनुसार २०२३ मध्ये मुस्लीम समुदायाच्या विरुद्ध भारतात एकूण ६६८ द्वेष जनक भाषणे देण्यात आली. त्यापैकी महाराष्ट्रात ११८ अशी सगळ्यात जास्त द्वेषजनक भाषणे देण्यात आली होती. ज्यात नितेश राणे, टी. राजा सिंग यांच्यासारख्या हिंदुत्ववादी, उजव्या विचारसरणीच्या लोकांचा मोठा वाटा आहे.  (India Hate Lab, २०२३)

खरेतर द्वेषजनक भाषणाची कायदेशीर व्याख्या नाही. परंतु भारतीय दंड संहितेचे कलम १५३ अ अनुसार वेगवेगळ्या गटांमध्ये शब्दांद्वारे, एकतर बोलून किंवा लिखित, किंवा चिन्हांद्वारे किंवा दृश्याद्वारे धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा, जात किंवा समुदाय किंवा इतर कोणत्याही कारणास्तव भिन्न धर्म, वंश, भाषा किंवा प्रादेशिक गट किंवा जाती किंवा समुदाय यांच्यात वैरभाव, शत्रुत्वाची भावना किंवा द्वेष निर्माण केल्यास तीन वर्षांपर्यंतचा कारावास, किंवा दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

हेही वाचा >>>मोदींना वस्तुस्थिती माहीत आहे, पण…

इथे आपण एखाद्या धार्मिक समुदायाला लक्ष्य करणारे आक्षेपार्ह भाषण, वापरलेली हीन भाषा ज्यामुळे सामाजिक सलोख्यास बाधा निर्माण होतो, अशा भाषणांसंदर्भात बोलत आहोत.

महाराष्ट्रात दिल्या गेलेल्या द्वेषजनक भाषणांमध्ये मुख्यत्वे मुस्लीम समुदायातील लोकांवर कोणत्याही डेटा किंवा पुराव्याशिवाय प्रामुख्याने ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ करत असल्याचा आरोप केला गेला आहे. जिहाद हा शब्द हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक मुस्लीम समाजास उद्देशून वापरतात. लव्ह जिहाद म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांच्या मते  हिंदू स्त्रियांना मुस्लीम पुरुष आमिष दाखवून, फूस लाऊन आपल्या प्रेमात पाडतात आणि मग त्यांचे धर्मांतर करतात. तसेच त्यांच्या मते जमीन जिहाद म्हणजे मुस्लीम समुदायातील लोक अनधिकृतरित्या जमीन बळकावतात.

परंतु इतर धर्मातील लोकांनीदेखील अनधिकृत बांधकाम केल्याचे आपण पाहतो. पण त्यास हिंदुत्ववादी लोक जमीन जिहाद संबोधत नाहीत.  

तसेच लव्ह जिहादच्या संदर्भात ‘महाराष्ट्रात लव्ह जिहादची एक लाखांपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत,’ असं राज्याचे महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  सांगितले होते. याउलट भाजप सरकारच्या महाराष्ट्र महिला आणि बाल विकास (WCD) विभागाने डिसेंबर २०२२ मध्ये स्थापन केलेल्या आंतरधर्मीय विवाह कुटुंब समन्वय समितीकडे एका वर्षात केवळ ४०२ आंतरधर्मीय विवाहांच्या तक्रारी आल्या असल्याचे समोर आले आहे. हा डेटा फक्त हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाहापुरताच सीमित नाही  (Marpakwar, 2023). लोढा यांनी एक लाखपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणे कोणत्या कालावधीत झाली, तसेच डेटाचा स्त्रोत  काय आहे ते नमूद केलेले नाही.

तसेच विश्व हिंदू परिषद (विहिंप), बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था इत्यादी हिंदुत्ववादी संगटनांची उपशाखा असणाऱ्या ‘सकल हिंदू समाज’ने आयोजित केलेल्या जन आक्रोश मोर्च्यांमध्ये दिली गेलेली भाषणे ही हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये वैमनस्य निर्माण करणारी होती. ज्यात “हे दुर्गे तू लक्षी बन, तू काली बन, लेकिन कभी न बुरखेवाली बन”, “धर्म छोडकर जायेगी, तुकडो में काटी जाओगी “, “अब्दुल हो या आफताब, सबने पढी है एक किताब” अशी पोस्टर्स दिसत होते. तसेच लव्ह जिहादचा बळी न पडण्यासाठी, मुस्लीम दुकानदारांकडून काहीच खरेदी करू नये, हिंदू मुलींना नृत्य शिकवणारे हिंदूच शिक्षक असतील याची खात्री करावी, इत्यादी अशा आशयाची भाषणे देण्यात आली होती.

 भाजप सत्तेत असतानाच फक्त चार महिन्यांत नोव्हेंबर २०२२ ते  मार्च २०२३ हिंदू सकल समाज या हिंदुत्ववादी संस्थेचे ५० पेक्षा जास्त जन आक्रोश मोर्चे महाराष्ट्रात ठिकठिकाणी निघाले होते. किंबहुना २०२४ मध्ये अजूनही ते सुरूच असल्याचे दिसते.

हेही वाचा >>>पक्षांतराच्या रोगावरील इलाज मतदारांकडेच

लव्ह जिहादच्या विरोधातील द्वेषजनक भाषणे देणारे जन आक्रोश मोर्चे महाराष्ट्रभर निघाले तेव्हा भाजपचीच सत्ता होती. गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला तर ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आणि ३० जून २०२२ पासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, जे भाजपसोबत आहेत.

राहिला मधला कालावधी. २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ मध्ये दोन वर्ष सहा महिने उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीसोबत होते. त्यात देखील २४ मार्च २०२० पासून टाळेबंदी झाली.  ती २० महिन्यांनी, नव्हेंबर २०२१ मध्ये उठवली गेली. या २० महिन्यांच्या काळात लोक घराबाहेर पडू शकत नव्हते.

म्हणजे मागच्या दहा वर्षांचा विचार केला तर जास्त कालावधीत भाजपचेच सरकार महाराष्ट्रात होते आणि आताही त्यांचेच सरकार आहे. यावरून एक प्रश्न निर्माण होतो, महाराष्ट्रात भाजप जास्त कालावधीत सत्तेत राहिली आहे, आणि मागच्या दीड वर्षांत हिंदूंना, विशेषतः हिंदू महिलांना मुस्लीम समुदायापासून धोका असल्याचे वारंवार सांगत आहेत. याचा अर्थ होतो की, भाजप सत्तेत आल्यापासूनच हिंदूंना विशेषतः हिंदू महिलांना जास्त असुरक्षितता निर्माण झाली आहे. लव्ह जिहादचा लोढा यांनी दिलेला आकडा दहा वर्षांपूर्वीचा होता तर भाजपने या संदर्भात तेव्हाच आवाज का नाही उठवला?

द्वेषजनक भाषणे करण्याची कारणे काय असावीत?

महाराष्ट्रातील राजकारणाचे चित्र तर आपणा सर्वांसमोर आहेच. महाराष्ट्रातील दोन मोठ्या राजकीय पक्षांमध्ये झालेल्या फुटीमुळे महाराष्ट्रातील मते दुभागली जातील यात शंका नाही.

तसेच २०२४ ची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी खूप महत्वाची निवडणूक असल्याचे, पंतप्रधान मोदींचा ४०० पारच्या नाऱ्यावरून समजते. तो नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जास्तीत जास्त मते स्वत:कडे खेचण्यासाठी भाजप हिंदू – मुस्लीम  ध्रुवीकरण करताना दिसतंय.

त्यातच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले आंबेडकर आणि संतांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील लोक तसे अजूनही धर्माच्या आहारी गेलेले फारसे दिसत नाहीत. आणि त्यामुळेच सतत मुसलमानांपासून हिंदुंना, विशेषत: हिंदू स्त्रियांना धोका आहे, आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे सरकारच तुमची सुरक्षा करू शकते हे लोकांच्या मनात बिंबवून त्यांच्या विचारांची धार बोथट करण्याचा प्रयत्न भाजप आणि हिंदुत्ववादी पक्ष करत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील हिंदूंची मते आपल्याच पदरात पडतील याची भाजपला खात्री नसावी. त्यामुळेच मुस्लीम समाजाविषयी हिंदू समुदायातील लोकांच्या मनात द्वेष निर्माण करून जास्तीत जास्त मते आपल्याकडे खेचण्याचा हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न दिसत आहे.

द्वेषजनक भाषणांमुळे मुख्य प्रश्नांकडून लक्ष विचलित

खरेतर बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, आरोग्य सुविधांची वानवा, स्वच्छतेचा प्रश्न इत्यादी मुलभूत प्रश्नांनी सध्या लोक त्रस्त झालेले आहेत.  हिंदू – मुस्लीम वैमनस्य वाढवून, या मुलभूत प्रश्नांकडून भाजप लोकांचे लक्ष विचलित करत असल्याचे दिसत आहे.

‘सकल हिंदू समाज’च्या मोर्च्यांमध्ये दिली गेलेली भाषणे ही हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये वैमनस्य निर्माण करणारी होती. दंगल भडकावणारी होती. किंबहुना हा मोर्चा ६ जून २०२३ रोजी अहमदनगरमधील संगमनेरमध्ये दंगल होण्यास कारणीभूत ठरला होता, ज्यात २ जखमी झाले तर पाच गाड्यांची तोडफोड केली गेली (Engineer & Dabhade, 2024). मुंबईतील मीरा रोडमध्ये झालेल्या दंगलीमध्येही जन आक्रोश मोर्चांचा मोठा वाटा असल्याचे तेथील स्थानिकांनी   सी.एस.एस.एस च्या तथ्य शोधन टीमला माहिती दिली होती.

शासन आणि न्यायव्यवस्थेची निष्क्रियता

इतका दखलपात्र गुन्हा हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून होत असला तरी शासनाकडून किंबहुना न्यायव्यवस्थेकडून परिणामकारक कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास “सकल हिंदू समाज मोर्च्यांमध्ये द्वेषजनक भाषणे दिली जाणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले, अन्यथा मोर्चास परवानगी देऊ नये असे सांगितले होते. तरीही अजूनही जन आक्रोश मोर्चे होत असल्याचे आणि त्यात द्वेषजनक भाषणे दिली जात असल्याचे दिसत आहे.

उदाहरणार्थ मालाड मालवणी येथे रविवार ३ मार्च २०२४  रोजी सकल हिंदू समाज द्वारे आयोजित केलेल्या जनक्रोश मोर्चामध्ये वर नमूद केलेल्या ‘लव्ह जिहाद’ आणि लँड जिहाद, आशयाचे आरोप नितेश राणेंकडून पुन्हा करण्यात आले. “हनुमान जयंती, रामनवमीच्या मोर्चांवर दगडफेक, चप्पल फेकल्याचे आपण पाहिले आहे. या गोष्टी आणि लँड जिहाद आणि लव्ह जिहाद यासारख्या गोष्टी थांबवल्या नाहीत तर आम्ही त्यांना पाहू. ‘हे लोक’ किती ‘शौर्य’ दाखवतात हेही बघू. जर कोणी हिंदूंना हाकलून देण्याचा किंवा हिंदू लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते पाहू.” असे ते म्हणाले. बांगलादेशींना आश्रय दिल्याच्या आरोपाला उत्तर देताना, “कारवाई केली जाईल. हा फक्त ट्रेलर आहे.” (CJP Team, 2024) असेही ते म्हणाले.  

१० मार्च २०२४ रोजी मुंबईतील घाटकोपर येथे सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या मोर्च्यामध्येही सारख्याच आशयाचे द्वेष जनक भाषण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.

निष्कर्ष:

द्वेषजनक भाषण हीच एक हिंसा आहे. हा द्वेष असाच समाजात पसरत राहिला तर लोकशाहीला त्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्वेष पसरवणारी भाषणे करणाऱ्यांवर शासनाने, न्यायव्यवस्थेने परिणामकारक कार्यवाही केली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या मनात कायद्याविषयी देखील भीती राहील.

तसेच एक नागरिक म्हणून आपण कोणत्याही द्वेषजनक भाषणांना बळी न पडता, ऐकलेल्या गोष्टींची शहनिशा करणे गरजेचे आहे. तसेच नीट विचार करून, सजग राहून प्रत्येक नागरिकाने मतदान केले पाहिजे.

लेखिका मुंबईस्थित सेंटर फॉर स्टडीज ऑफ सोसायटी अँड सेक्युलारिझम येथे साहाय्यक संशोधक आहेत.
mithilaraut1@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to a report by the center for study of society and secularism more hate speech was given in maharashtra amy
Show comments