जितेंद्र जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या सांगता सोहळ्यात प्रमुख अतिथी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी केलेल्या भाषणाचा संपादित सारांश

 लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात आजवर येऊन गेलेल्या दिग्गज व्यक्तींची नावे ऐकल्यावर या व्यक्तींच्या पंक्तीत माझे नाव येणे मला सर्वार्थाने लहान वाटत आहे. सर्व संस्थांचे मनोगत ऐकल्यानंतर खुजेपणा वाटू लागला. इतिहास, झाडांचे खून, शेतकरी आत्महत्या, संघर्षाविषयी संस्थांचे प्रतिनिधी बोलत गेले. कोणाच्या वडिलांचा आवाज गेला, त्या वेळी मुलगा आवाज म्हणून पुढे आला. हे सर्व ऐकताना मनात अनेक भावनिक आंदोलने सुरू होती आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की समाजात काम करणाऱ्या व्यक्तींना आपलेसे करण्याची गरज आहे.

या संस्था इतकी वर्ष काम करत आहेत. त्यातील अनुभव सांगत असताना त्यांच्या भावना ओथंबून आल्या, वाहू लागल्या. भावनाशील व्यक्ती अधिकच बोलते. मीदेखील भावनाशील आहे. भावना ही एक अशी गोष्ट आहे, जी काम करताना, एखाद्या गोष्टीकडे भावनिकरीत्या पाहताना, मनात सहयोगाची भावना दाटून आणते. त्यातून प्रेम निर्माण होते आणि समोरची व्यक्ती अनोळखी असली, तरी आपलीशी वाटू लागते. जसे की, उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टला जी मुले रस्त्यावरची आहेत, भिक्षा मागतात ती आपली वाटली. ही भावना प्रेमातून तयार होते. मी वर्तमानपत्रातून, वृत्तवाहिनीतून कोणत्याही मुलाचा मृत्यू झाला असे वाचतो, ऐकतो तेव्हा मलाही गलबलून गेल्यासारखे होते. एखाद्या व्यक्तीचा बाप हरपून जाणे, मूल जाणे ही भावना काय असेल? ही भावना, हे दु:ख समजते, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की दुसऱ्याचे मूल हे आपले नसते का? ते आपले होऊ शकत नाही का?

विदर्भामध्ये पाणी फाऊंडेशनच्या निमित्ताने गेलो होतो. तेथे अनेक झाडे दिसत होती. मला नेहमी प्रश्न पडायचा की या झाडांना कोण पाणी घालते? पाऊस पडतो तेव्हा या झाडांना पाणी मिळते. पण सगळी झाडे कशी वाढतात? तर झाडांचा एक अलिखित नियम आहे. झाडे आपल्याला एकएकटी दिसत असतात. पण जमिनीमधून झाडांची मुळे एकमेकांना जोडली गेलेली असतात. त्यामुळे एका झाडाला पाणी मिळाले की, ते दुसऱ्या झाडाला आपसूक देते. मला असे वाटते की, संस्थारूपी झाडांनाही ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या झाडामुळे आपसूक पाणी मिळाले आहे.

हेही वाचा >>> ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण

आई आणि बाप या व्यक्ती नसून ही वृत्ती आहे. असे अनेक आई-बाप मला माझ्या आयुष्यात भेटले. त्यांनी मला भरभरून प्रेम दिले. आताही मला तुमच्यामध्ये माझे आई-बाबाच दिसत आहेत. कारण मी आता इथे जो उभा, तो अशा असंख्य लोकांच्या मदतीमुळे उभा आहे. मुंबईमध्ये म्हणा किंवा इतरत्र अनेक ठिकाणी अशा असंख्य लोकांनी त्यांच्या घरातील एक एक घास मला दिला. तो घास फक्त अन्नाचा नव्हता, तर विद्वत्ता, शिक्षण, माणुसकीचा घास त्यांनी मला भरविला. पाणी फाऊंडेशनच्या निमित्ताने काम करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या काही रचना समोर आल्या ‘‘मंदिरी बैसोनि नाक दाबावे । त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे । दु:खितासि प्रेमे पाणी पाजावे । हे श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनि’’ हे सांगणारी माणसे मला आयुष्यात भेटली.

मी सोलापूरला आलो, तर स्वामी समर्थांच्या मठात जाण्याआधी तेथील संस्थेला भेट देईन. मी विजय तेंडुलकरांचा एक फार सुंदर लेख वाचला होता. त्यामुळे माझ्या मनातून मी कोणाला तरी मदत करतोय किंवा दान देतोय ही भावनाच मी काढून टाकली. कारण दान किंवा मदत ही, संस्थेला नसून ती स्वत:ला असते.

अनेक वेळा मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो की, प्रांतवाद, जातीवाद, रंगभेद, आर्थिक विषमता आणि कुठले कपडे घातले यावरूनही आपल्याला लेखणारी माणसे आहेत. सतत स्पृश्य – अस्पृश्यतेची एक धडधडीत दिसणारी किंवा न दिसणारी अशी गोष्ट सुरू असते. हे सगळे गळून पडण्यासाठी कोणतेही काम करत असलेला कर्मचारी आपला माणूस आहे, असे वाटत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये ते प्रेम निर्माण होणार नाही.

‘लोकसत्ता’ ज्या पद्धतीने काम करत आहे, ते फक्त माणसांसाठी, जाणत्या जणांसाठी नाही. तर ज्यांचा जाणता होण्याचा प्रवास ‘लोकसत्ता’मुळे सुरू आहे, अशा ते अजाणत्या लोकांसाठीसुद्धा आहे. ज्ञानोबा माऊली म्हणाले होते, हे विश्वचि माझे घर… तर तुम्ही तुमचे घरच नाही, तुमच्या घराचे अंगण विस्तारत आहात. तुम्ही अधिकाधिक लोकांना आपल्या कवेत घेत आहात. त्या लोकांना कवेत घेण्यामुळे बंधू आणि भगिनी या शब्दाचा अर्थ तुमच्या कामातून खऱ्या अर्थाने प्रतीत होतो. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ‘‘मी विश्व पाहू शकत नाही पृथ्वीशिवाय, मी पृथ्वी पाहू शकत नाही देशाशिवाय, मी देश पाहू शकत नाही शहराशिवाय, मी शहर पाहू शकत नाही गावाशिवाय, मी गाव पाहू शकत नाही घराशिवाय, मी घर पाहू शकत नाही माझ्याशिवाय, तस्मात शिवाय नम:’’ ही एकात्मतेची भावना आहे. ‘लोकसत्ता’ने संस्थांचे देते हात आपले हात म्हणून घेतले आहेत. त्या हातांना तुम्ही अधिकाधिक बळ देत आहात. या हातांच्या स्पर्शांमध्ये मलासुद्धा त्यातील दोन हात होता व्हावे, यासाठी मी निष्ठेने प्रयत्न करीन.

दान ही एक सुंदर गोष्ट

‘लोकसत्ता’ हे माझ्यासाठी फक्त वर्तमानपत्र नाही तर, माझ्या दररोजच्या आयुष्यात मला अधिकाधिक शिक्षित करणारी, सजग करणारी, भानावर आणून सारासार विचार करायला लावणारी एक संस्था आहे. ‘लोकसत्ता’ जो उपक्रम राबवत आहे, तो फक्त उपक्रम नाही तर ती एक चळवळ आहे. कारण यात प्रत्येक संस्थेचा वैयक्तिकरीत्या सन्मान केला जातो. त्या संस्थेला समाजातील दाते जे दान किंवा मदत करतात ते त्यांच्यापर्यंत थेट पोहोचवणे ही एक सुंदर गोष्ट आहे.

शब्दांकन – वेदिका कंटे

वाचनालयाचे संवर्धन

महाराष्ट्राची वाचन संस्कृती जपणाऱ्या आपटे वाचन मंदिराची देखभाल, संवर्धन करून हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी ‘सर्वकार्येषु’सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून स्फूर्ती मिळाली आहे

उदय कुलकर्णीआपटे वाचन मंदिर, इचलकरंजी

मोफत शाळा उभारण्याचे ध्येय

सोलापूरमधील मोहोळ येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी ‘प्रार्थना बालग्राम’ हा निवासी प्रकल्प चालवणाऱ्या प्रार्थना फाऊंडेशनला ‘सर्वकार्येषु’ या उपक्रमामुळे अनाथ, निराधार, गोरगरीब आणि शेतकऱ्याच्या मुलांसाठी मोफत शिक्षण देणारी शाळा उभी करण्याचा मानस पूर्ण करता येईल.

प्रसाद मोहितेप्रार्थना फाऊंडेशन, सोलापूर

गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी…

संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेने बीड, लातूर जिल्ह्यातील १७० गावांतील वडिलांचे छत्र हरवलेल्या ५०० वंचित कुटुंबांतील ७५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. ‘सर्वकार्येषु’ उपक्रम संस्थेचे भविष्यातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोलाचा ठरला आहे.

अॅड. संतोष पवारअध्यक्ष

संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, अंबाजोगाई

बेघर, निराधारांचा आधार

मराठा लाइफ फाऊंडेशन बेघर, निराधार, गतिमंद, मतिमंद, दिव्यांग आणि वृद्ध अनाथांचे जीवन सावरण्यासाठी प्रयत्न करते ‘सर्वकार्येषु’ या उपक्रमामुळे आमच्या कार्याशी जोडल्या गेलेल्या दानशूर व्यक्तींमुळे भविष्यातील स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल.

डॉ. किसन लोखंडेमराठा लाइफ फाऊंडेशन, वसई

धनेश पक्ष्यांचे संवर्धन

धनेश पक्ष्यांसाठीचे अनेक खाद्यावृक्ष कमी झाल्याने त्यांच्या नवीन पिढ्या जन्माला येण्यात अडथळे निर्माण होत आहेत. सह्याद्री संकल्प सोसायटी या खाद्यावृक्ष प्रजातींची रोपवाटिका, अधिवास आणि पुराण वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन, देवराई संवर्धन, धनेश अधिवासाचे पुनर्निर्माण असे प्रकल्प राबवतेे.

प्रतीक मोरेकार्यकारी संचालक,

सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख

भिक्षेकरी मुलांना शिक्षण

उड्डाणपुलाखाली भिक्षा मागणाऱ्या, जन्माची नोंद नसलेल्या, कोणतीही कागदपत्रे नसलेल्या मुलांना सन्मानाने जगता यावे यासाठी उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट काम करत आहे. ‘सर्वकार्येषु’च्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक साहाय्यातून प्रकल्पातील बरीच कामे मार्गी लागतील.

मंगेशी मुनउमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट, वर्धा

विज्ञानाचा प्रचार प्रसार

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी काम करणाऱ्या नवनिर्माण विज्ञान प्रबोधन केंद्राला स्वत:चे कार्यालय उभे करायचे असून दुर्गम भागात फिरती प्रयोगशाळा, फिरते वाचनालय, विज्ञान संशोधन केंद्र उभारायचे आहे. त्यासाठी ‘सर्वकार्येषु’च्या माध्यमातून साहाय्य झाले.

डॉ. भूषण जाधवनवनिर्माण विज्ञान प्रबोधन, मुंबई</p>

विद्यादानाचे ज्ञानयज्ञ

विद्यादान साहाय्यक मंडळ गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळासोबतच करिअर मार्गदर्शन तसेच मानसिक आधार देतेे. ‘सर्वकार्येषु’ च्या माध्यमातून सहकार्य करणारे अनेक हात आता आम्हाला लाभले आहेत.

गीता शहाविद्यादान साहाय्यक मंडळ, ठाणे.

कागदपत्रांचे संगणकीकरण

वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळे पुरस्कार, गरीब विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य, देवदासींच्या वस्तीत वैद्याकीय शिबिरे इत्यादी उपक्रम राबवणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेला आपल्याकडच्या अत्यंत जुन्या, महत्त्वाच्या कागदपत्रांचे संगणकीकरण करायचे आहे. यासाठी ‘सर्वकार्येषु’तून मिळालेले साहाय्य महत्त्वाचे आहे.

विद्याधर नारगोलकरअध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा, पुणे

साने गुरुजींचे विचार

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला साने गुरुजींच्या साहित्याचे दस्तावेजीकरण आणि त्यांच्या साहित्याचा अनुवाद विविध भाषांमध्ये करायचा आहे. ‘सर्वकार्येषु’मुळे आमचे काम संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.

कवयित्री नीरजासाने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, वडघर

कौशल्य विकास केंद्राचा मानस

दुर्लक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थचा गरजू मुलांसाठी १०० शाळा उभारण्याचा मानस आहे. विश्वकर्मा कौशल्य विकास केंद्र विकसित करायचे आहे. त्यासाठी ‘सर्वकार्येषु’ उपक्रमाच्या माध्यमातून मोठे साहाय्य्य झाले आहे.

डॉ. अभय शहापूरकरउपाध्यक्ष, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, धाराशिवसंकलन : पूर्वा भालेकर

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor jitendra joshi s speech at closing ceremony of sarva karyeshu sarvada initiative zws