लोकसत्ता लोकांकिकाया राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या नवव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा संपादित सारांश…

एनएसडीचे समृद्ध करणारे अनुभवविश्व

एनएसडीचे अनुभव खूप कमालीचे होते. मीसुद्धा पाटण्यात हौशी रंगमंचावर काम करत होतो. स्वयंस्फूर्तीने काम करणारा कलाकार होतो. मनात जे येईल ते करायचो, अगदी गंभीर प्रसंगातही विनोदी अभिनय करत होतो. लोकांना हसू आलं तर नाटक चालेल, काहीतरी होईल, अशी माझी भाबडी समजूत होती. एनएसडीत (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) प्रवेश घेतला, तिथे गेल्यावर लक्षात आलं, अरे… इथे तर खूप अभ्यास घेणार आहेत. इतकी सगळी पुस्तकं आहेत तिथे आणि त्यातही सगळ्यात पहिलं तिथे आमचं प्रशिक्षण सुरू झालं ते सुतारकामाचं. खुर्ची, टेबल कसं असेल याचं चित्र रेखाटायचं आणि त्यानुसार ते बनवायचं. ‘मला हे नाही करायचं’ हा पहिला विचार माझ्या मनात आला होता. मी इथे अभिनेता बनण्यासाठी आलो आहे आणि हे काय यांनी माझ्या हातात पुस्तकं दिली आहेत आणि हा सुतारकामाचा लकडा लावला आहे. एनएसडीच्या तिसऱ्या वर्षाला असताना आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर एका अभिनेत्याला सुतारकामाचं ज्ञान असणंही किती गरजेचं आहे हे लक्षात आलं. सुतारकामाचं प्रशिक्षण म्हणजे खुर्ची-टेबल कसं बनवायचं याचं ज्ञान नव्हतं. तर त्या वस्तूची मिती, त्याचं आकारमान, त्याची रचना, त्यातली कलात्मकता ओळखण्याचं, समजून घेण्याचं प्रशिक्षण होतं. आणि हा अभ्यास प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलेत उतरवावा लागतो. एखाद्याचा अभिनय गहन आहे असं आपण म्हणतो तेव्हा ती गहनता ही या सगळ्या जाणीवनेणिवेतून आलेली असते.

dr manmohan singh faced challenges in congress
स्वपक्षाने पंख छाटलेला सक्षम पंतप्रधान
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
dr manmohan singh article in marathi
‘बोअरिंग’ पंतप्रधानांची कर्तबगारी
Ajit Pawar shares Memory of Manmohan Singh
“…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…

हेही वाचा >>> ‘बोअरिंग’ पंतप्रधानांची कर्तबगारी

मनापासून शिका…

एनएसडीच्या दुसऱ्या वर्षी देशातल्या कुठल्याही एका राज्यात जाऊन तिथली लोककला समजून घेण्याची संधी आम्हाला मिळाली. माझी कर्मभूमी मुंबई आहे, त्यामुळे मी मुंबईकरच आहे आणि माझं भाग्य असं की मला महाराष्ट्रात खेडोपाड्यात जाऊन लोककला समजून घेता आली. प्रसिद्ध नाट्यशिक्षक कमलाकर सोनटक्के हे तेव्हा आमचे प्रशिक्षक होते. सोनटक्के आम्हाला पहिल्यांदा कोकणात घेऊन गेले. तिथे कुडाळमध्ये वालावल नावाच्या गावात मला दशावतार शिकायचे होते. महिनाभर तिथे राहून मी दशावतार कला शिकून घेतली. त्यावर आधारित एक नाट्यप्रयोगही रचला आणि दिल्लीत एनएसडीमध्ये तो सादर केला. दोन महिने मला मिळाले होते, त्यातला एक महिना दशावताराचं ज्ञान घेतलं आणि दुसऱ्या महिन्याभरात महाराष्ट्रातल्याच गावागावात जाऊन तिथल्या भिन्न लोककलांविषयी समजून घेतलं. संगीत नाटक प्रकाराशी परिचित झालो. एका अर्थी या सगळ्या अनुभवाचा फायदा असा झाला की मुंबईत कलाकार म्हणून पाऊल ठेवण्याआधी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची जाण मला होती. एनएसडीतल्या या अनुभवांनी मला कलाकार म्हणून समृद्ध केलं आणि पुढे काम करता करता मिळालेल्या अनुभवातून आणखी शिकत गेलो. असं वाटतं की पुन्हा जर मला एनएसडीमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली तर आता मी अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकेन. त्या वेळी काय उगाच आपला वेळ या सगळ्यात वाया घालवत आहेत, हा विचार मनात घर करून होता. माझ्या या अनुभवातून मी हे निश्चित सांगेन की तुमची इच्छा नसतानाही कधी कोणत्या प्रकारचं शिक्षण कोणी देत असेल तर ते मनापासून शिका. त्या वेळी जे ज्ञान तुम्हाला कंटाळवाणं वाटत असेल त्याची उपयुक्तता, त्याचा गर्भितार्थ कदाचित त्यानंतर दहा वर्षांनी तुमच्या लक्षात येईल. ज्या वयात मी वडिलांना समजून घेऊ शकत होतो, तेव्हा मी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. स्वत: मी जेव्हा बाप झालो तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचं महत्त्व माझ्या लक्षात आलं, पण तोवर ते जिवंत राहिले नाहीत. शिक्षणाचंही असंच असतं. तुम्हाला जेव्हा कधी शिकण्याची संधी मिळेल तेव्हा मनापासून शिकून घ्या, समजून घ्या… दहा-वीस वर्षांनी का होईना, तुमच्या कामात वा कलेत त्याचा उपयोग निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही.

आपण आयुष्यभर अभिनय करत असतो

प्रत्येक घरात, मित्रमैत्रिणींच्या कंपूत एखादा तरी हरहुन्नरी कलाकार असतो. तो हसवतो, गाणी गातो, पण तो हे सगळं तिथे सहजतेने करतो आहे. त्याच गोष्टी तुम्हाला नाटकाच्या वा चित्रपटाच्या माध्यमातून दाखवायच्या असतील तर ते प्रसंग तुम्हाला पुन्हा घडवावे लागतील, उभे करावे लागतील. आणि त्यासाठी तुम्हाला कल्पकतेबरोबरच सरावाचीही गरज असते. तसं तर आपण सगळे आयुष्यभर अभिनय करतच असतो. शाळेत गेल्यावर शिक्षक आपल्या वागण्यातून मुलांना हे जाणवून द्यायचा प्रयत्न करतात की ते त्यांच्यापेक्षा मोठे आहेत, वेगळे आहेत. अशा पद्धतीने जो तो आपली भूमिका वर्तनातून समोरच्याला स्पष्ट करत असतो. अभिनय सगळेच करत आहेत, पण कलाकार लोकांसमोर त्याच्या अभिनयकलेच्या जोरावर त्या गोष्टी पुन्हा उभ्या करत असतो आणि त्यासाठी जन्मजात कौशल्यापेक्षा तुमचं अभिनयाचं तंत्र, सराव याची अधिक गरज असते.

प्रत्येक कलाकार स्वत:ची पद्धत शोधतो

प्रत्येकाला शिकण्याची-शिकवण्याची गरज नसते, असं मला वाटतं. रशियन रंगकर्मी कोन्स्तान्तिन स्तानिस्लावस्की यांची अभिनयावरची पुस्तकं वा तत्सम कलाकारांनी सांगितलेल्या पद्धती प्रशिक्षणवर्गातून शिकवायला काहीच हरकत नाही, पण ते सगळं वाचून आणि अभ्यासून झाल्यानंतरही कलाकार स्वत:ची अशी अभिनयाची पद्धत वा शैली शोधून काढतो. जगातला कुठलाही कलाकार हा एकप्रकारे मेथड अॅक्टरच असतो. त्याची अभिनयाची पद्धत चुकीची असेल तर तो वाईट अभिनय करणार आणि एखाद्याचा अभिनय उत्तम आहे म्हणजे त्याची पद्धत योग्य आहे. आपण कित्येकदा म्हणतो अमूक एका कलाकाराचा हा खास अंदाज आहे, तो शेवटी वाचन-अभिनय शिक्षण-प्रत्यक्ष अनुभव या सगळ्याच्या विचारमंथनातून, रोजच्या रियाजातून आपसूकच घडत जातो. कलाकाराची स्वत:ची एक अभिनयशैली विकसित होते.

शैली आणि प्रयोगात्मकता

एखाद्या कलाकाराची अमूक एक अभिनयशैली लोकप्रिय झाल्यावर त्याने त्याच पद्धतीचे काम करत राहावं, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा असते. तर अनेकदा एकाच पद्धतीचे काम करतो, अशीही टीका कलाकाराला सहन करावी लागते. आपली शैली बदलायची तर आपल्याशी जोडला गेलेला प्रेक्षक तो प्रयोग नाकारेल हीसुद्धा भीती असते. माझ्यासारखा नाटकातून आलेला कलाकार नेहमी यातला सुवर्णमध्य गाठून काम करतो. कुठे किती प्रयोग करायचा आणि माझ्या ज्या शैलीमुळे प्रेक्षक माझ्याशी जोडला गेला आहे तो घटक माझ्या अभिनयात कसा आणायचा याची मला पुरेपूर जाणीव असते. माझी विनोदबुद्धी लोकांना आवडते, त्यामुळे माझ्या प्रत्येक भूमिकेतून ती जाणवेल याची काळजी मी घेतो. एखादी व्यक्तिरेखा गंभीर असेल तर त्याचे गांभीर्य कमी न करता त्यात चाणाक्षपणा आणण्याचा प्रयत्न करतो. शेवटी प्रेक्षक तुमच्याशी जोडला गेला पाहिजे, एकदा त्याला जे हवं आहे ते तुमच्या कामातून मिळालं आणि तो भूमिकेत गुंतला की तो पुढची प्रत्येक गोष्ट प्रेमाने पाहातो.

हिंदी रंगभूमी व्यावसायिकदृष्ट्या अविकसित

आम्ही हिंदी भागातून येतो. महाराष्ट्र किंवा गुजरातमध्ये ज्या पद्धतीने व्यावसायिक रंगभूमीचा विकास झालेला आहे तसा विकास हिंदी रंगभूमीचा झालेला नाही. त्यामुळे मराठी आणि गुजराती रंगभूमीवर काम करून किमान चरितार्थ चालवता येतो, ते हिंदी नाटकांच्या बाबतीत मात्र शक्य नाही. हिंदी रंगभूमीवरील कलाकार हे बऱ्याचदा कला-सांस्कृतिक विभागाशी जोडलेले असतात, पण पूर्णत: नाटकात काम करून त्यांना पैसे मिळत नाहीत. हिंदी रंगभूमीच्या पूर्वसुरींनी कधी तिकीट लावून नाटकाचे प्रयोगच केले नाहीत, त्यामुळे त्याचा म्हणावा तसा व्यवसाय या दृष्टीने विकास झालेला नाही.

सिनेमात रमलेला लोककलाकार

मला लोककला अधिक आवडतात. हिंदी आणि उर्दू नाटककार हबीब तन्वर यांच्या शैलीतील नाटक किंवा ब्रेख्तियन नाटकांची शैली अधिक आवडते. या पद्धतीच्या नाटकांमध्ये प्रेक्षक थेट जोडलेले असतात. लोककलांचा प्रभाव माझ्यावर अधिक असल्याने लोककला आणि आधुनिक नाट्यकला दोन्हींचा संगम असलेलं नाटक मला करायचं आहे. आमचे एक नाट्यशिक्षक म्हणायचे, अभिजात नाटक हे मुघल गार्डनमधील फुलासारखं आहे. तिथे खूप माळी आहेत, जे त्याची मशागत करतात. तर लोककला ही जंगलात कुठेही फुलणाऱ्या फुलासारखी आहे. ते फूल पाहण्यासाठी जंगलातच जावं लागतं. त्या फुलझाडाची कोणी छाटणी, मशागत केलेली नाही. ते त्याच्या मूळ स्वरूपात आहे. त्याचा जो सुगंध आहे, आकर्षित करणारा रंग आहे ते पाहून आपण त्याकडे ओढले जातो. नैसर्गिक आणि मूळ रूपातील गोष्ट पाहण्याचा हा आनंद अभिजात नाटक पाहताना मिळत नाही. मी स्वत:ला लोकनाट्याचा कलाकार मानतो, जो सध्या सिनेमात काम करतो आहे. मला सिनेमाची गणितं कैकदा कळत नाहीत. तिथला झगमगाट फारसा रुचत नाही. माझं काम संपलं की शांतपणे मी घरी जातो, बाकी चित्रपटसृष्टीचं वलयांकित जगणं मला अजिबात आवडत नाही, कारण माझा आत्मा हा लोककलाकाराचाच आहे.

तुमच्या भूमिकेत त्यांचा माणूस

सिनेमा हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत माध्यम असलं तरी प्रेक्षकांचा संबंध हा पडद्यावर दिसणाऱ्या कलाकाराच्या भूमिकेशी असतो. समोर कॅमेरा आहे, लेन्स आहेत, नवनवीन कपडे आहेत, हे सगळं आहे, पण त्यापलीकडे मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचा आत्मा तर देशी आहे. प्रेक्षक त्या भूमिकेत आपला माणूस शोधत असतात, त्यामुळे मी त्या व्यक्तिरेखेचा आत्मा पकडायचा प्रयत्न करतो. या व्यक्तिरेखा कुठेतरी आपल्या आजूबाजूला पाहिलेल्या असतात, त्यामुळे आपसूकच त्यांचा सूर लक्षात येतो. मी काही वांद्र्यात पॉश बंगल्यात राहणारा, या देशाच्या मातीशी कुठलाही संबंध नसलेला असा माणूस नाही. मी जे आजूबाजूला बघतो, अनुभवतो, ते माझ्या अभिनयात उतरवतो. तुम्ही पाहिलं असेल हल्ली अनेक कलाकार कुठल्याही माध्यम कार्यक्रमांना साधं दिसणं, साध्या कपड्यात वावरणं यावर भर देतात. कुठून तरी लोक आपल्याशी जोडले जावेत, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. प्रेक्षक तुमच्याशी कधी जोडले जातात? तर जेव्हा त्यांना त्यांच्या गल्लीतले, महाविद्यालयातले किंवा नात्यातल्या माणसांसारखे साधर्म्य तुमच्या भूमिकेत किंवा व्यक्तिमत्त्वात दिसते. कुठला तरी ओळखीचा आवाज, कुठेतरी परिचयाचं असलेलं वागणं, व्यक्त होण्याच्या पद्धती त्यांना आपल्याशा वाटतात तेव्हाच ते तुम्ही साकारत असलेल्या भूमिकेशी वा तुमच्या व्यक्तित्वाशी एकरूप होतात.

थोडा कालिनभय्या असला पाहिजे…

मी ज्या व्यक्तिरेखा साकारतो, त्यांचा पगडा किंवा प्रभाव वास्तव आयुष्यावर पडू देत नाही. तसा मी नेहमी माझ्या मूळ स्वभावाने वावरतो. माझा स्वभाव फार विनयशील आहे. कधीकधी मनात असा विचार येतो, तशा प्रकारच्या भूमिका करता करता मी इतका विनम्र झालो आहे का? मग असंही वाटतं की नाही. मी चित्रपटात काम करणारा कलाकार आहे, तर मलाही तशा पद्धतीने राहिलं पाहिजे. आणि म्हणून पडद्यावरच्या व्यक्तिरेखांसारखं कधीतरी वास्तव आयुष्यातही थोडे दिवस वागण्याचा प्रयत्न मी करणार आहे. थोडं कालिनभय्यासारखंही आयुष्य असलं पाहिजे, अभिनेत्याचा सूर बदलत राहिला पाहिजे. त्याच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धती, स्वभावाच्या तऱ्हा यातही मुद्दाम वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्थात, लोकांसाठी तो बदल खरा असला तरी वास्तवातही मी हे नाटक करतो आहे याचं भान बाळगायला हवं, पूर्णत: कालिनभय्याच होऊन गेलो तर गडबड व्हायची…

●‘तिसरी कसमकरायला आवडेल…

जुन्या चित्रपटांपैकी ‘तिसरी कसम’ हा गीतकार शैलेंद्र यांची निर्मिती असलेला चित्रपट पुन्हा बनवण्यात आला तर त्यात काम करायला आवडेल. एकतर या चित्रपटाची कथा बिहारचेच प्रसिद्ध हिंदी लेखक फणीश्वर नाथ रेणू यांची आहे. त्यांचं लेखन मला खूप आवडतं. या चित्रपटाचा एक किस्सा मध्यंतरी त्यांच्याच पुस्तकात वाचला होता. हा चित्रपट म्हणजे शोकांतिका आहे, यात नायक-नायिका एकत्र येत नाहीत. तर या चित्रपटाचा शेवट बदलावा, असा चित्रपटाशी संबंधित लोकांचा आग्रह होता. शैलेंद्र यांनी लेखक म्हणून फणीश्वर रेणू याबाबतचा निर्णय घेतील, असं सांगितलं. फणीश्वरांनी माझ्या कथेचा शेवट बदलणार नाही, असं ठामपणे सांगितलं. त्यामुळे त्यांनी जशी कथा लिहिली होती, तसाच त्याचा शेवट चित्रपटात दाखवण्यात आला. हा चित्रपट मला करायला आवडेल.

●शब्दांकन : रेश्मा राईकवार

Story img Loader