रंगभूमी आणि चित्रपट दोन्ही माध्यमांतील लेखक-दिग्दर्शक-अभिनेता असा बहुविध अनुभव गाठीशी असलेल्या सौरभ शुक्ला यांना ‘लोकांकिका’च्या मंचावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी बोलतं केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी तरुण पिढीला कुठलाही सल्ला देणार नाही. मी अजूनही त्यांच्याच वयाचा आहे असं मी मानतो. त्यामुळे माझ्या समवयस्कांना मी काय सल्ला देणार? ‘काशी का अस्सी’ हे काशीनाथ सिंह यांचं हे पुस्तक खूप लोकप्रिय आहे. त्यात बनारसमधील ‘पप्पू चाय की दुकान’ या चहाच्या दुकानाचा उल्लेख आहे. याच ‘काशी का अस्सी’ पुस्तकावर डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी ‘मोहल्ला अस्सी’ हा चित्रपट बनवला होता. तर मी बनारसमध्ये त्या दुकानात गेलो होतो. तिथे चहावर खूप मोठमोठय़ा चर्चा होतात. सरकारं कोसळतात, समस्त विश्वाच्या राजकारणाचा भार तिथे सांभाळला जातो. तिथे एक पाटी लावलेली आहे. ‘इथे कोणीही ज्ञान पाजळू नये, इथे सगळे ज्ञानी आहेत’. आणि खरोखरच मी हे तत्त्वज्ञान जगत आलो आहे. कलेतून सामाजिक संदर्भ यायला हवा..

आपण कित्येकदा म्हणतो, सिनेमा पहिल्यासारखा राहिलेला नाही. त्यात गोष्टच उरलेली नाही. हे असं प्रत्येक पिढीत घडतं असं मी मानतो. केवळ अभिव्यक्तीची पद्धत बदलते बाकी सगळं सारखंच असतं.. त्यामुळे तुम्ही ज्या समाजात राहता, त्या समाजाच्या संदर्भातून  सांगितल्या तर त्या योग्य पद्धतीने पोहोचतात.

हेही वाचा >>> अहिंसा हा महाभारतकालीन गुणच नाही…

तंत्रज्ञान हेही कथामाध्यम..

सध्या सिनेमा-नाटकात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. मात्र तंत्रज्ञान हेही कथेचं माध्यम आहे. कोणत्याही स्वरूपाची कला म्हणजे एकप्रकारचा संवाद असतो. आपण त्या कलेतून अभिव्यक्ती करतो म्हणजेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. राजकीय-सामाजिक ज्या कुठल्याही विषयावर तुम्हाला व्यक्त व्हायचं असतं तो तुम्ही कलेतून मांडण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्यातून पटकथा नावाची महत्त्वाची गोष्ट जन्माला येते. तंत्रज्ञान हासुद्धा एकप्रकारे पटकथेचाच भाग असतो. ते कसं? तर नाटक सुरू असताना अचानक एखादी लाईट बंद होते आणि दुसऱ्याच क्षणी ती एका चेहऱ्यावर स्थिरावते. तुम्ही विनाकारण लाईट इकडून तिकडे हलवलेला नसतो. त्या प्रकाशयोजनेतून समोरच्याच्या मनात एक प्रतिमा निर्माण करत त्यातून काहीतरी सांगण्याचा त्यामागचा उद्देश असतो. म्हणजे इथे प्रकाशाचा केलेला वापर हाही एक संवाद आहे, एक पटकथा आहे. प्रत्येक तंत्रज्ञान हे एक कथामाध्यम आहे अशापद्धतीनेच त्याचा विचार केला पाहिजे.

तुम्ही तुमचं काम करत राहा..

रंगभूमी किंवा चित्रपटात काम करणं ही माझी इच्छा होती, मग मी त्या क्षेत्रासाठी माझं योगदान दिलं हे बोलताना माझी जीभ अडखळते. कोणावर उपकार केले आहेत, अशा अर्थाने मी माझ्या कामाविषयी बोलू इच्छित नाही. ही गोष्ट मी स्त्री-पुरुष संबंधाच्या अनुषंगाने अधिक विस्ताराने समजावून सांगतो. ‘मी तिच्यावर बेहद प्रेम करतो’ असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात आपण इतर कोणावरही प्रेम करत नाही. आपण एखाद्यावर प्रेम करतो कारण, त्याच्यावरच्या प्रेमातून आपल्याला आनंद मिळत असतो. आपण फक्त स्वत:वर प्रेम करतो. स्वत:वर प्रेम असणं ही चुकीची गोष्ट नाही, तो मनु्ष्याचा स्थायीभाव आहे. नकारात्मक दृष्टीने त्याकडे बघता उपयोग नाही. मी स्वत:वरच प्रेम करू शकलो नाही, तर मी इतरांना काय प्रेम देणार, स्वत:ला हसवू शकलो नाही, तर समाजाला काय हसवणार? तसंच रंगभूमीवर काम करण्यातून मला आनंद मिळत होता म्हणून मी ते करत राहिलो. नाटक असो वा सिनेमा वा कोणतीही चळवळ असेल ती पुढे जातच राहणार आहे. तुम्ही काही केलं नाही म्हणून ते थांबणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा, एवढंच मी सांगेन.

दोन वर्षही आणि दोन दिवसही..

एखाद्या भूमिकेसाठी माझी तयारी झालेली नाही म्हणून अनेक जण काम सुरू करत नाहीत. नाटक हे दोन वर्षांची मेहनत, उत्तम तालमीनंतरही चांगलं वठू शकतं आणि दीड दिवसांतही उत्तम नाटक बसवता येतं. सगळा खेळ हा मानवी मनाच्या अद्भुत क्षमतेचा आहे. याविषयी दोन किस्से सांगतो. ‘१०-१२ वर्षांपूर्वी चित्रपटात काम करत असताना एकदा ‘सर्क द सले’ या जगविख्यात थिएटर कंपनीकडून मला फोन आला होता. परदेशातील भव्यदिव्य नाटक करणारी कंपनी, त्यांचे शोज म्हणजे अर्धा किलोमीटरचा रंगमंच, २००-२५० कलाकार असा सगळा तामझाम. लास वेगासमध्ये त्यांचे बहुतांशी मोठे शोज होतात. तर त्यांनी मला गाता येतं हे लक्षात घेऊन बऱ्यापैकी मध्यवर्ती भूमिका देऊ केली होती. मी खूप खूश होतो. या नाटकासाठी मला एकूण पाच वर्ष द्यावी लागणार होती. मी त्यांना म्हणालो, ‘पाच वर्ष मी इतर काहीच करू शकत नाही. हा मोठा कालावधी आहे. तुमच्याकडे यापेक्षा कमी कालावधीचं काही काम नाही का?’ त्यांनी मला त्या वेळी हे सविस्तर समजावून सांगितलं, ‘आम्ही तुम्हाला पहिल्या दिवसापासून यासाठी सर्वाधिक मानधन देणार आहोत. सुरुवातीचं दीड वर्ष फक्त तालमी होतात. त्यानंतरचे पहिले तीन महिने केवळ कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर प्राथमिक प्रयोग केले जातात. त्यानंतरचे तीन महिने निमंत्रितांसाठी प्रयोग होतात. मग दोन वर्षांनी न्यूयॉर्कमध्ये नाटकाची सुरुवात होते, सहा महिने तिथे प्रयोग होतात. मग टोकियोत सहा महिने आणि पुढे दौरे सुरू होतात. आम्हाला खऱ्या अर्थाने दोन वर्षांनी मिळकत यायला सुरुवात होते’. ते सगळं ऐकल्यानंतर ब्रॉडवेचं एकूणच भव्य स्वरूप, अडीचशे कलाकारांना घेऊन केले जाणारे प्रयोग म्हणजे दोन महिन्यांत तयारी होऊच शकत नाही. त्यासाठी तेवढी तालीम गरजेची असते आणि वेळही द्यावाच लागतो असं माझ्या मनात पक्कं झालं.

आता दुसरा किस्सा सांगतो. दिल्लीत त्यावेळी प्रगती मैदानात नुक्कड नाटकांची स्पर्धा होती. मी त्यावेळी एनएसडीमध्ये काम करत असल्याने नियमानुसार बाहेर काम करू शकत नव्हतो. आमच्याकडे फारसे पैसे नसायचे आणि आमच्या नाटकाच्या ग्रुपला पैशाची खूप गरज होती. त्यावेळी नुक्कड नाटक करायचं असं ठरलं. मी नुक्कड नाटक कधी केलं नव्हतं. कुठूनतरी तुम्ही २५-३० माणसं आणा, त्यांच्यात दहा-पंधराजण गाणी-बजावणी करणारे हवेत, असं सांगून मी नाटक दिग्दर्शित करण्याची तयारी दाखवली. त्यावेळी कोणी तयार झालं नाही, कुठून आणणार माणसं वगैरे वगैरे.. तो विषय संपल्यात जमा झाला होता. प्रयोग सोमवारी होता आणि शनिवारी रात्री आमच्या ग्रुपचे सेक्रेटरी माझ्याकडे आले. ‘तू नाटक बसवून देण्याचं आश्वासन दिलं होतंस, प्रत्यक्षात तू काहीच केलं नाहीस’ असं म्हणत ते माझ्यावर भडकले. मलाही राग आला होता, मी त्यांना तिरिमिरीत सांगून टाकलं, ‘तुम्ही आता ३० माणसं आणा. नाटक बसवून देण्याची गॅरंटी माझी..’ मी घरी आलो. पहाटे पाच वाजता मला मंडी हाऊसमध्ये बोलावलं, तिथे मंडी हाऊसमधले जे मिळतील ते कलाकार अशी ३० माणसं माझ्यासमोर उभी होती. त्यांना मी एवढंच सांगितलं, उद्या संध्याकाळी शो आहे. तुम्ही आज घरी जाऊ नका. आपण काहीतरी नाटक बसवूयात. त्यावेळी हरिशंकर परसाई यांच्या ‘मातादीन चाँदपर’ या कथेचं सूत्र माझ्या डोक्यात होतं. सगळय़ांना अर्धवर्तुळात रांगेत उभं केलं. एकेकाला पुढे यायला सांगितलं, प्रत्येकाला एकेक संवाद देत गेलो, कोणाला लिहायला सांगितलं, गायला सांगितलं. असं करत करत सोमवारी संध्याकाळी आम्ही १६ गाणी आणि नृत्य असलेला दीड तासाचा शो केला. प्रत्येकजण घाबरलेला होता, पण कोणीही चूक केली नाही. प्रत्येकाने चोख काम केलं आणि आम्ही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. एक-दीड दिवसांत लोकांना आवडेल, हसवेल असं चांगलं नाटक उभं राहू शकतं. एकीकडे दीड-दोन वर्षांची तालीम करून उभं राहणारं चांगलं नाटक आहे, तर दुसरीकडे कमीतकमी साधनं आणि वेळेतही चोख सादर होणारं नाटक आहे. हीच खरी रंगभूमीची किमया आहे.

कलाकाराला सगळं करता आलं पाहिजे

एखादा कलाकार खूप चांगलं नृत्य करतो, एखाद्याला हाणामारी चांगली येते, एखाद्याचा अभिनय चांगला आहे म्हणून आपण त्याची वाहवा करतो. यात काय मोठं आहे, तो कलाकार आहे तर त्याला हे सगळं चांगलं जमलंच पाहिजे. माझा मित्र अभिनेता रणवीर शौरी न्यूयॉर्कमध्ये काही दिवस वास्तव्याला होता. त्याने तिथल्या नटांची गोष्ट सांगितली. तिथे ऑडिशनसाठी रांगेत कलाकार उभे असतात. त्यातल्या प्रत्येकाला अभिनय येत असतोच, त्याच्या जोडीला त्याला एकतरी वाद्य वाजवता येत असतं, किमान दोन नृत्यप्रकार त्याला करता येतात. त्याला गाता येतं.. कारण यातली कुठलीही भूमिका त्याच्या वाटय़ाला येऊ शकते, त्यामुळे तो या सगळय़ा बाबतीत तयारीचा असला पाहिजे, हे गृहीत धरलेलं असतं. 

माध्यम आत्मसात करा..

सिनेमाचा नट, नाटकाचा नट असा फरक करण्यासारखं वेगळं काही नसतं. काम करणाऱ्याने ते माध्यम किती समजून घेतलं आहे याने फरक पडतो. नाटक आणि सिनेमा या दोन्ही माध्यमाच्या वेगळय़ा गरजा आहेत. नाटकात नट एकमेकांकडे बघत एकापाठोपाठ एक संवाद म्हणत असतात. सिनेमामध्ये असं किती वेळा होतं? बरीचशी दृश्ये ही गर्दीत किंवा बाहेर चित्रित होतात, कॅमेरा तुमच्यावर रोखलेला असतो. सिनेमाला दृश्यं हवी असतात, कमीतकमी शब्दांत सिनेमा अधिक खुलतो. सिनेमाला शब्दांचं वावडं आहे, नाटक मात्र शब्दांना धरून ठेवतं. त्यामुळे नटांनी सिनेमात काम करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक वेळी तुम्ही कॅमेऱ्यासमोर दिसणं आवश्यक नसतं, कित्येकदा तुम्ही कॅमेऱ्याकडे पाठमोरं उभं राहूनही केवळ देहबोलीतून अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकता. शब्दांकन – रेश्मा राईकवार

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor saurabh shukla interview by editor loksatta girish kuber of on lokankika stage zws
Show comments