सांगली, कोल्हापूर भागात पूर आला की कृष्णेचा किंवा पंचगंगेचा काहीच दोष नसताना मानवी चुका, हस्तक्षेपांकडे दुर्लक्ष करून कृष्णा, पंचगंगा कोपली असं म्हटलं जातं.
२००५ साली कृष्णा, पंचगंगेला पूर आल्यानंतर जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. महापुरानंतरच्या भयानक परिस्थितीची पहाणी करून वडनेरे समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला. समितीने पुराच्या पाण्याची साठवणूक करा, पुराचे पाणी अन्य ठिकाणी वळवा, नदीच्या तीव्र वळणाचे सरळीकरण करा, नैसर्गिक निचरा व्यवस्थेची पुनर्स्थापना करा, नदीकाठ उंच करा, पूरप्रवण क्षेत्रातील, नदीच्या पात्रातील, पूररेषेतील अतिक्रमणे तातडीने थांबवा आणि अतिक्रमणे काढून टाका आणि धरणांची पाणीसाठवण क्षमता वाढवा, अशा महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. प्रत्यक्षात यातील एकाही शिफारशीची अंमलबजावणी झाली नाही, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, कमी खर्चात होणारी कामेही केली गेली नाहीत आणि नदीपात्र, पूररेषेतील अतिक्रमणाकडे राजकीय स्वार्थासाठी सोयीस्कर डोळेझाक करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून २०१९ ला पुन्हा महापुराचा तडाखा बसला.
हेही वाचा…वाढत्या शहरांना पाऊस सोसवेना… : विकासाच्या भस्मासुराचा बळी…
वडनेरे समितीने आपल्या अहवालात कुठेही अलमट्टी धरणातील पाण्याच्या फुगवट्यामुळे कोल्हापूर, सांगलीत पूर येतो, असे म्हटलेले नाही. तरीही राजकर्ते आणि प्रशासन अलमट्टीकडे बोट दाखवून नामोनिराळे राहत आहेत. मूळ प्रश्न तसाच पडून असल्यामुळे आणि मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे राजकीयदृष्ट्या सोयीचे असल्यामुळे सांगली, नृसिंहवाडी, कोल्हापूर परिसराला सातत्याने महापुराचा सामना करावा लागत आहे. मुळात कृष्णा नदी संथ वाहते, नदीचे पाणी कुठे खळखून वाहत नाही. कृष्णा नदीला नृसिंहवाडीपर्यंत म्हणजे कृष्णा – पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत लहान मोठ्या बारा नद्या येऊन मिळतात. या नद्या कमी लांबीच्या आहेत. मात्र, सह्याद्रीच्या डोंगरकपारीतून वाहत असल्यामुळे वेग जास्त आहे. कराडमध्ये कोयना, सांगलीत वारणा आणि नृसिंहवाडीत पंचगंगा या मोठ्या नद्या कृष्णेला मिळतात. या नद्यांच्या पाण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे संगमाच्या ठिकाणी उपनद्यांचे पाणी वेगाने कृष्णेच्या पाण्यात घुसते. परिणामी कृष्णेचा प्रवाह संथ होऊन पाण्याचा फुगवटा वाढतो. कराड, सांगली आणि नृसिंहवाडीत, ही परिस्थिती सातत्याने होते. वडनेरे समितीने कृष्णेच्या उपनद्या साधारण ९० अंशाच्या कोनात कृष्णेला मिळतात आणि कृष्णेचे पाणी संथ होते. कृष्णेची पाणी वाहून नेण्याची क्षमता घटते, असे निरिक्षण नोंदविले आहे.
कृष्णा, वारणा, पंचगंगा या सारख्या कृष्णाच्या मोठ्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सलग चार – पाच दिवस अतिवृष्टी झाली की, कोयना, चांदोली आणि राधानगरी ही मोठी धरणे भरतात. धरणांचे दरवाजे उघडण्या वाचून काहीच पर्याय राहत नाही, एकाच वेळी धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीपात्रात विसर्ग वाढतो. कृष्णा नदीच्या पात्राची पाणी वाहून नेण्याच्या मूळ क्षमतेपेक्षा कित्येक पटीने पाणी नदीपात्रात येते. त्यामुळेच पूरस्थिती निर्माण होते. मोठ्या धरणांमुळे काहीकाळ पूर नियंत्रित ठेवण्यास मदत होते, हे विसरून चालणार नाही. धरणे नसती तर सर्व पाणी थेट नदीपात्रात येऊन हाहाकार माजला असता. त्यामुळेच वडनेरे समितीने धरणांची पाणीसाठवण क्षमता वाढविण्याची शिफारस केली आहे.
हेही वाचा…विकासाचा सोस; शहराच्या गळ्याशी
आता राहिला प्रश्न अलमट्टीचा. गेली कित्येक वर्षे अलमट्टीच्या नावाखाली नदीपात्रातील, पूररेषेतील अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकामांना संरक्षण दिले जात आहे. कृष्णा नदीत अनेक बंधारे, पूल बांधून पाणी वाहण्याचा वेग कमी केला जात आहे. अलमट्टी जलाशयाची पाणी संचय पातळी (बॅक वॉटर ) धरणाच्या भिंतीपासून माघारी मागे सुमारे २०० किलोमीटर आहे. तर अलमट्टी धरणाच्या भिंतीपासून सांगली २९६ किलोमीटर अंतरावर आहे. अलमट्टी पाणी संचय पातळीपासून सांगली ९६ किलोमीटर दूर आहे. तसेच अलमट्टीच्या पाणी संचय पातळीपासून सांगली २६ मीटर उंचीवर आहे. त्यामुळे अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग केला नाही म्हणून कृष्णेच्या पाण्याचा फुगवटा वाढतो आणि सांगली, कोल्हापुरात पूर येतो, या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
दिवंगत तत्कालीन विधान परिषदेचे आमदार प्रा. शरद पाटील आणि दिवंगत काँग्रेस नेते मदन पाटील यांनी २००५ मध्ये सांगली, कोल्हापूरला महापुराचा तडाका बसल्यानंतर, पूरस्थिती का निर्माण झाली याचा शोध घेण्यासाठी सांगलीतून अलमट्टीपर्यंत कृष्णा नदीची पाहणी केली होती. त्यावेळी सांगलीत पूर असतानाही म्हैसाळ नजीकच्या राजापूर बंधाऱ्यावरून कृष्णेचे पाणी वेगाने खाली पडत होते. त्यामुळे सांगलीतील पुराशी अलमट्टीचा काहीही संबंध नाही. तसे असते तर कृष्णा नदीकाठावरील लहान – मोठी शेकडो गावे नदीत बुडाली असती आणि राजापूर बंधाऱ्यावरून पाणी खाली कृष्णेत पडले नसते. या बाबत विधान परिषदेत चर्चा करताना तत्कालीन जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगलीच्या पुराशी अलमट्टीचा काहीही संबंध नाही. जलसंपदा विभागातील समन्वयाचा अभाव, अतिवृष्टी आणि नदीच्या पूररेषेत झालेल्या अतिक्रमनामुळे सांगलीत पूर येत असल्याचे मान्य केले होते.
अलमट्टी धरणाचे बांधकाम १९७७ मध्ये झाले आहे, तर सांगलीला आत्तापर्यंत १८५३, १८५६, १८६१, २००५ आणि २०१४, अशा पाच महापुरांचा फटका बसला आहे. म्हणजे अलमट्टीचे बांधकाम होण्यापूर्वीही सांगलीने पुराचा सामना केला आहे. सध्या सांगलीपासून अलमट्टीपर्यंत ४०० लहान मोठे पूल, बंधारे, रेल्वे पूल आहेत. नदीपात्रात झालेले हे बांधकामही कृष्णेच्या पाण्याचा वेग कमी करतात, असे वडनेरे समितीने म्हटले आहे. अलमट्टीकडे बोट दाखवून राजकर्ते आणि प्रशासनाने मूळ समस्येकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा सांगली, कोल्हापूरला सातत्याने पूरस्थितीचा सामना करावा लागेल.
हेही वाचा…अनियंत्रित विकासामुळे ‘महापूर’
महापूर टाळण्यासाठी हे करता येईल…
(१) कृष्णा, पंचगंगा नदीपात्रात, नद्यांच्या पूररेषेत प्रामुख्याने सांगली, कोल्हापुरात झालेली बांधकामे, अतिक्रमणे तातडीने हटवावीत. (२) कृष्णेला मिळणाऱ्या उपनद्या सध्या साधारणपणे ९० अंशात मिळतात, त्या ४५ अंशांत मिळतील, अशी व्यवस्था निर्माण करा. जेणेकरून कृष्णेच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही. ( ३) धरणांची पाणी साठवण वाढविण्यासाठी धरणांच्या भितींची उंची वाढवावी, शक्य नसल्यास किमान धरणांतील गाळ प्राधान्याने काढावा. (४) क्लाउड सीडिंग करून पर्जन्यवृष्टी नियंत्रित करावी. धरणे भरलेल्या अवस्थेत अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याच्या काळात अरबी समुद्रावर क्लाउड सिडिंग करून समुद्रातच पाऊस पाडावा, जेणेकरून घाटमाथ्यावर दाणादाण होणार नाही. ( ५) वडनेरे समितीने पुराच्या पाण्याची साठवणूक करण्याचा आणि पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याची केलेली शिफारस आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य वाटत नाही.
dattatray.jadhav@expressindia.com