प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

अमेरिकेचे प्रसिद्ध तत्त्ववेत्ते डॉ. ॲन्ड्रयू जॅक्सन यांनी म्हटले होते, मी अशा एका अग्नीला पाहतोय, जी सर्वत्र व्यापलेली असून प्रेमाग्नीला अभिव्यक्त करणारी आहे व सर्व प्रकारच्या द्वेषभावनांना भस्मसात करण्यासाठी प्रज्वलित झालेली आहे…! मानवतेवर आधारित प्राचीन वैदिक धर्माला त्याच्या पूर्वीच्या शुद्धावस्थेस पोहोचविण्यासाठी ‘आर्य समाज’ नावाच्या अग्निकुंडात या अग्नीचे आधान झाले आणि तो अग्नी भारतात ‘महर्षी दयानंद सरस्वतीं’च्या हृदयात प्रादुर्भूत व प्रज्वलित झाला. डॉ. जॅक्सन यांचे हे विचार स्वामीजींचे महत्त्व अधोरेखित करणारे असून त्यांची शिकवण भारतासोबतच जगाच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरणारी आहे, याची प्रचीती करून देणारे आहेत. एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनकाळात जगभरात परिवर्तनाचे वारे वाहत असतानाच भारतात सामाजिक व धार्मिक सुधारणा घडविणारे अनेक समाजसुधारक होऊन गेले. मानवतेचे पुरस्कर्ते महर्षी दयानंद सरस्वती हे त्यांपैकी एक होत.

स्वामीजींच्या वैचारिक तत्त्वज्ञानाचा मूलाधार प्राचीन वेदग्रंथ होते. वैदिक सिद्धांताच्या विशुद्ध प्रतिपादनाने साऱ्या जगातील मानव समूहाला शाश्वत सुखी व आनंदी बनविणे आणि सर्वत्र शांतता व सुव्यवस्था स्थापन करणे हे त्यांच्या क्रांतदर्शी जीवनाचे ध्येय होते.

स्वामी दयानंदांचा जन्म १८२४ साली गुजरातच्या मोरवी संस्थानातील टंकारा या गावी आई अमृताबेन व वडील करसणजी तिवारी यांच्या घरी झाला. बालपणीचे नाव मूलशंकर होते. एक प्रतिष्ठित जमीनदार म्हणून त्यांच्या वडिलांची परिसरात ख्याती होती. या बालकाची डोळस वृत्ती भविष्यातील अनेक जिज्ञासू भावना जागृत करण्यास पूरक ठरली. या बालकाच्या १४ व्या वर्षातील शिवरात्र ही मात्र खऱ्या अर्थाने युगपरिवर्तनाची जणू काही नांदीच ठरली. शिवलिंगावर मूषकाने मांडलेला उच्छाद पाहून हा विवेकशील बालक जागा झाला व त्याच्या मनात मूर्तिपूजेविषयी अनास्था निर्माण झाली. पुढे हीच शिवरात्र इतिहासात ‘बोधरात्र’ म्हणून ओळखली जाते.

पुढे बहीण व काकांच्या आकस्मिक निधनाचे दुःखद प्रसंग पाहून मूलशंकराच्या मनात ‘मृत्यू म्हणजे काय?’ हे जाणून घेण्याची इच्छा जागृत झाली. खऱ्या ईश्वराचा शोध आणि मृत्यू म्हणजे काय, या दोन गोष्टींच्या जिज्ञासेपोटी वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी घरदार सोडले. योग्य गुरूंच्या शोधात ठिकठिकाणी भटकंती केली. शेवटी १५ वर्षांच्या कठोर साधनेनंतर इ.स.१८६० साली मथुरा येथे विरजानंद दण्डी या प्रज्ञाचक्षु साधूंच्या आश्रमात पोहोचले. तेथे त्यांना वेदांच्या शुद्ध स्वरूपांची शिकवण मिळाली. तीन वर्षे संस्कृत व्याकरण, वेद-वेदांग इत्यादी आर्ष ग्रंथांचे श्रद्धेने अध्ययन करून त्यांना शुद्ध स्वरूपातील वेदज्ञानाचा बोध झाला.

पुढे गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेदज्ञानाच्या प्रसारासाठी वाहिले. भारतभर भ्रमण करून त्यांनी आपल्या प्रखर वाणीने जगाला वेदप्रतिपादित मानवतेचा संदेश दिला. महाभारतानंतर पाच सहस्र वर्षांच्या कालखंडात वैदिक तत्त्वज्ञानाला उतरती कळा लागली होती. वेदमंत्राचे विसंगत अर्थ केले जात असत. वेदांचे पंडित सायणाचार्य, महिधर, उव्वट इत्यादींनी केलेल्या एकांगी वेदभाष्यांमुळे तार्किक व विज्ञानवादी लोकांचा वेदांवरील विश्वास उडू लागला. तेव्हा दयानंदांनी निरुक्त व व्याकरण ग्रंथांच्या आधारे वेदमंत्रांचे आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक असे यौगिक अर्थ लावले आणि जगासमोर शुद्ध वेदार्थ प्रतिपादित केला.

वेदातील एक ईश्वर, एक मानवधर्म, एक उपासना पद्धती, एक समान जीवन पद्धती, यज्ञाचे विशुद्ध स्वरूप, गुणकर्म स्वभाव व संस्कारावर आधारित वर्णव्यवस्था, आदर्श आश्रम व्यवस्था आदी सर्व बाबी स्वामी दयानंदांनी यथार्थपणे मांडल्या. मानवी जीवनाची सार्थकता ईश्वर, आत्मा व सृष्टी व्यवस्थेप्रमाणे चालण्यातच आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले. ‘वेदांचे विचार हे केवळ एतद्देशीयांसाठीच नसून सर्व मानवांसाठी आणि समग्र विश्वासाठी खुले आहे. प्रचलित मत-पंथ(धर्म) व जाती असा कोणताही भेदभाव वेदात नाही. वेदातील शुद्ध ज्ञानाचा आधार घेऊनच संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित होऊ शकते,’ अशी त्यांची शिकवण होती.

आपल्या विचारांना मूर्त रूप देण्याच्या व सर्वत्र प्रसारित करण्याच्या उद्देशाने स्वामीजींनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबईमध्ये गिरगावातील प्रार्थना समाजाच्या शेजारी असलेल्या डॉ. माणेकजी अदेर यांच्या उद्यानात ‘आर्य समाज’ या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला या संस्थेचे २८ नियम होते. पुढे त्यांची संख्या दहा करण्यात आली. या नियमात वेदविद्या, ईश्वराचे सत्य स्वरूप, सत्यग्रहण, धर्माचरण, वैश्विक उन्नती, सर्वांशी प्रेम व्यवहार, अविद्येचा नाश व विद्यावृद्धी, सर्वांची सर्वांगीण प्रगती, सर्व हितकारक नियमांचे पालन इत्यादी विषयांचा समावेश आहे. याच नियमांना अनुसरून १५० वर्षांपासून आजपावेतो भारतासह विदेशातसुद्धा ही संस्था कार्यरत आहे. वैदिक ज्ञानावर विश्वास ठेवणारी जगातील कोणतीही बुद्धिप्रामाण्यवादी सत्यनिष्ठ व्यक्ती या संस्थेची सदस्य बनू शकते.

स्वामी दयानंद २० जून १८७५ रोजी न्यायमूर्ती म. गो. रानडे, महादेव मोरेश्वर कुंटे, गणेश जनार्दन आगाशे इत्यादी प्रतिष्ठित मंडळींच्या आग्रहावरून पुण्यनगरीत दाखल झाले. शहराच्या वेताळ पेठेतील शंकरशेठ यांच्या वाड्यात त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वामीजी येथे जवळपास अडीच महिने राहिले. या दरम्यान शहरात त्यांची ५० व्याख्याने झाली. त्यांपैकी बुधवार पेठेतील तांबड्या जोगेश्वरीजवळच्या भिडे वाड्यात झालेली स्वामीजींची १५ व्याख्याने ऐतिहासिक ठरली. ही व्याख्याने ऐकण्यासाठी त्या वेळी श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत. दररोज होणारी व्याख्याने लिपीबद्ध करून ती ‘ज्ञान प्रकाश’मध्ये प्रकाशित होत असत. लेखनाचे हे कार्य म. मो. कुंटे व जनार्दन आगाशे यांनी केले. आज ही ऐतिहासिक व्याख्याने ‘पुणे प्रवचन’ या ग्रंथाच्या रूपात उपलब्ध आहेत. उर्वरित जवळपास ३५ व्याख्याने गंगारामभाऊ मस्के यांनी पुण्याच्या छावणी (कॅम्प) भागात चालविलेल्या ईस्ट स्ट्रीटवरील मराठी शाळेत पार पडली.

शेवटच्या दिवशी ५ सप्टेंबर १८७५ रोजी स्वामीजींच्या अनुयायांनी त्यांच्या सन्मानार्थ हत्तीवरून भव्य अशी मिरवणूक काढली. या शोभायात्रेत महात्मा फुले, न्या. रानडे यांच्यासह अनेक गणमान्य सुधारणावादी व्यक्ती सहभागी झाल्या. कारण स्वामीजींचे पांडित्य, विद्वत्ता आणि सुधारणेचे कार्य पाहून ही मंडळी प्रभावित होती. या मिरवणुकीला अनेक सनातन्यांनी विरोध केला. काही ठिकाणी चिखल-धोंडय़ाचा मारादेखील केला. या मिरवणुकीचा निषेध म्हणून विरोधकांनी एका गाढवावर ‘गर्दभानंद’ असे लिहून एक समांतर मिरवणूकदेखील काढली.

त्याच काळात स्वामीजींना पुणे येथे आर्य समाजाची स्थापना केली व न्या. रानडे हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष बनले. नंतर स्वामीजी चार-पाच दिवस नाशिकमध्येही आले होते. तेथील पंडितांना शास्त्रार्थाचे आव्हान दिले. सातारा येथे ते एक महिनाभर राहिल्याचा उल्लेख आढळतो.

महर्षी दयानंदांचे विचार हे विशुद्ध वेदज्ञानावर आधारित आहेत. निसर्ग अथवा प्रकृती, जीव किंवा जगन्नियंता परमेश्वर या तीन तत्त्वांना ते मूलभूत मानतात. यालाच वैदिक त्रैतवाद असेही म्हणतात. परमेश्वर हा नित्य आणि अविनाशी असून तो अजन्मा आहे. तो कधीही अवतार घेत नाही किंवा शरीर धारण करीत नाही. तो मूर्तीत नसून सर्वशक्तिमान, सच्चिदानंदस्वरूप व सर्वांतर्यामी आहे, असे ते मानतात. वेद हे अपौरुषेय असून ते ज्ञानाचे सागर व सत्याचे माहेर आहे. सर्व प्रकारच्या विद्यांची उत्पत्ती वेदातून होते. म्हणून वेद शिकणे, शिकविणे, ऐकणे व ऐकविणे हा सर्वांचा परमधर्म आहे. अविद्येचा नाश आणि विद्येचा विकास करणे हे आपले कर्तव्य आहे.

आपले आचरण धर्मानुसार व्हावे. जगातील सर्व मानव एकसमान असून ती एकाच परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून सर्वांनी आपल्या उन्नतीसोबत इतरांचीही उन्नती करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे स्वामीजी मानतात. वेदामध्ये अंधश्रद्धा, अंधविश्वासांना मुळीच थारा नाही. तसेच मूर्तिपूजेसारखे स्तोम वेदात आढळत नाहीत. भूत, प्रेत, पिशाच या भ्रामक कल्पनांवर विश्वास न ठेवता सत्य स्वीकारावे आणि अष्टांगयोगाचे पालन करीत जीवन शुद्ध बनवावे व सर्वव्यापक देवाचे एकाग्र मनाने ध्यान करावे, अशी स्वामीजींची शिकवण होती. शिक्षणाशिवाय समाज व राष्ट्राचा उत्कर्ष होणार नाही. पण हे शिक्षण चारित्र्य निर्माण करणारे व सर्वस्वी जीवनाचा विकास साधणारे असावे, यासाठी गुरुकुलीय शिक्षण पद्धतीचा स्वामीजींनी पुरस्कार केला. विद्यार्थी हा गरीब असो की श्रीमंत घरचा, सर्वांची वेशभूषा व खान-पान एकसारखे असावे. मुलींसाठी वेगळ्या कन्या गुरुकुलामध्ये शिक्षण दिले जावे, त्यांनाही उपनयनाचा अधिकार आहे. मुलांप्रमाणे मुलींनीही सर्व क्षेत्रांत पारंगत झाले पाहिजे, असे स्वामीजी मानतात. व्यक्तीपेक्षा राष्ट्र महत्त्वाचे असून सर्वांनी राष्ट्रहित जोपासवे. स्वदेशी, स्वराज्य, स्वभाषा इत्यादींचा पुरस्कार करून ते विश्वातील प्रत्येक मानवाला एकसमान होण्याचे आवाहन करतात.

स्वामीजींनी सत्यार्थ प्रकाश, संस्कार विधी, ऋग्वेदादी भाष्यभूमिका हे ग्रंथ रचले. देवधर्माधिकांविषयी समाजात फोफावत चाललेल्या मूर्तिपूजा, बुवाबाजी, अवतारवाद यांसारख्या भ्रामक कल्पना, विविध अंधश्रद्धा, रूढी परंपरा, नास्तिकवाद, भौतिकवाद यांना स्वामीजींनी वेदविचारांच्या आधारे परास्त करून यथार्थ आध्यात्मिक ज्ञान जगासमोर मांडले. त्यांनी आपल्या वेदभाष्य व इतर ग्रंथात सतत मानवाच्या एकतेचा व एकात्मतेचा संदेश दिला आहे. मानवनिर्मित मत-पंथ व जातिभेद सोडून सर्वांनी वेदप्रतिपादित मानवीय मूल्यांचा आश्रय घ्यावा आणि श्रेष्ठ मानव बनावे, तसेच जगाला मानवतेच्या छत्रछायेखाली आणावे, अशी त्यांची आकांक्षा होती. स्वामीजींच्या विचार व कार्याला अनेकजण त्यांचे शिष्य झाले. लाला लाजपतराय, स्वामी श्रद्धानंद, महात्मा हंसराज, पं. श्यामजी कृष्ण वर्मा, रामप्रसाद बिस्मील इत्यादींनी स्वामीजींपासून प्रेरणा घेतली. तर कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हेदेखील स्वामीजींचे भक्त व आर्य समाजाचे अभिमानी होते.

स्वामीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनुयायांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासह गोरक्ष आंदोलन, हिंदी सत्याग्रह, गोवा स्वातंत्र्यसंग्राम तसेच हैद्राबाद मुक्तीसंग्रामात भाग घेऊन अनेकांनी राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभाग घेतला. अशा थोर युगपुरुषाचा द्विजन्मशताब्दी वर्षात देशवासीयांनी त्यांच्या विचारांचा वसा घेणे ही काळाची गरज आहे.

लेखक- म. दयानंद चरित्राचे अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.

nayankumaracharya222@gmail.com

Story img Loader