प्रज्ञा जांभेकर
बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा; टेनिसमध्ये सानिया मिर्झा ; मुष्टियुद्धात मेरी कोम ; तिरंदाजीत दीपिका कुमारी, अपूर्वी चंडेला; क्रिकेटमध्ये मिताली राज, झुलन गोस्वामी; जिम्नॅस्टिक्समध्ये दीपा कर्माकर, कुस्तीमध्ये साक्षी मलिक, गीता फोगट, विनेश फोगट; बुद्धिबळात तानिया सचदेव, हॉकीत राणी रामपाल, ॲथलेटिक्समध्ये पी. टी. उषा, अंजू बॉबी जॉर्ज, द्युती चंद, हिमा दास, पी. यू. चित्रा; भारोत्तोलनात मीराबाई चानू; स्क्वॅशमध्ये दीपिका पल्लीकल; नेमबाजीत मनु बाकर, हिना सिधू ; तरवारबाजी किंवा ‘फेन्सिंग’मध्ये भवानी देवी, टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रा, गोल्फमध्ये अदिती अशोक… ही यादी १०० पर्यंत काय आणखीही लांबवता येईल, पण हा या लेखाचा हेतू नाही. म्हणूनच मीही यादी एका क्षणी थांबवली आहे. या यादीवर सहजच नजर टाकली तरी तुमच्या लक्षात येईल की भारतीय महिला खेळाडूंनी जे यश मिळवलं आहे – तेही विविध क्रीडा प्रकारांत – त्याला तोड नाही. ही यादी एका परीनं तमाम महिला खेळाडूंचं प्रतिनिधित्व करते. सांगायचा मुद्दा हा की, या यादीतली प्रत्येक महिला वेगवेगळ्या, अपार अडचणींचा सामना करत यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. नाही म्हणायला पुरुष खेळाडूंनाही अडचणींचा सामना करायला लागतोच, पण महिला खेळाडूंना दुहेरी संघर्ष करायला लागतो. तिचा संघर्ष एक खेळाडू म्हणूनही असतो आणि एक महिला म्हणूनही.
अनेक दिग्गज महिला खेळाडूचं आपण कौतुक करतो. त्यांच्या यशाच्या कहाण्या प्रेरितही करतात. महिला खेळाडूंसाठी या गोष्टी फारशा सोप्या नसतात हे या यादीतल्या प्रत्येक महिलेच्या जीवनप्रवासाकडे नजर टाकली की लक्षात येतं. या सगळ्यांच्या संघर्षाच्या कहाण्याही नावांच्या यादीप्रमाणे न संपणाऱ्या आहेत.
महिला खेळाडूंच्या तुलनेत पुरुष खेळाडू आणि महिला खेळत असलेल्या क्रीडा प्रकारांपेक्षा पुरुष त्याच क्रीडा प्रकारात खेळत असले तरी अधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय असतात. पुरुष खेळाडूंना मानधनही जास्त मिळतं. क्रीडा क्षेत्रातील महिलांना भेडसावणारं पहिलं आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्यांच्या वेतनश्रेणीतली तफावत. महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूंच्या तुलनेत कमी किंवा निम्मं वेतन दिलं जातं. बक्षिसाच्या रकमेतही हाच दुजाभाव दिसतो. एकाच खेळात दोन्ही स्पर्धक सारखेच प्रतिभावान असले तरीही हा फरक केला जातो. सध्या महिला खेळाडूंची संख्या वाढत असली तरी पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंची सरसकट संख्या कमी आहे. हा फरक असूनसुद्धा अलीकडच्या काळात मोठ्या क्रीडा स्पर्धेत पात्र ठरलेल्या महिला खेळाडूंची संख्याही पुरुषांपेक्षा वाढलेली किंवा त्यांच्या इतकीच असल्याचं आकडेवारी सांगते! टोकियो ऑलिम्पिक्समधे तर काही क्रीडा प्रकारांत भारतातून फक्त महिलाच पात्र ठरल्या होत्या. तरीही सरसकट महिला खेळाडूंचं चित्र पाहता सहसा याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि पुरुषांसाठी सुरक्षित असलेल्या सुवर्णसंधींपासून महिला खेळाडू वंचित राहतात.
भारतीय क्रिकेट पुरुष संघाला मिळणारी लोकप्रियता भारतीय महिला क्रिकेट संघाला का मिळत नाही या मागचं कारण, या मागच्या मानसिकतेत सापडतं. मिताली राज आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करते आणि त्याची दखल प्रसारमाध्यमं शांतपणे घेतात त्यावेळी दिग्गज पुरुष क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा प्रसारमाध्यमांनी केलेला गाजावाजा आठवल्याशिवाय राहात नाही. या अर्थानं विचार केला तर हे एक आव्हानच नाही का…
महिला खेळाडूंकडे बरेचदा क्षमता आणि प्रतिभेचे घटक म्हणून पाहिलं जात नाही. यशस्वी आणि निपुण महिला खेळाडूंची देखील छाननी केली जाते. महिला खेळाडूंना स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता अधांतरी राहते आणि नोकरीच्या सुरक्षिततेची हमी कोणीच देत नाही. या सर्व आव्हानांना न जुमानता महिला खेळाडू उत्कृष्टता मिळवण्यासाठी झटतात आणि इतिहास घडवतात. समर्पण आणि कठोर परिश्रमाद्वारे महिला खेळाडू सर्व आव्हानांचा मुकाबला करत मार्ग शोधतात. कारकीर्दीच्या ऐन भरात असताना घरच्यांकडून होणारी लग्नाची घाई यामुळे अनेक उभरत्या महिला खेळाडूंच्या करिअरचा अकाली अंत झाल्याची उदाहरणं काही कमी नसतील.
स्त्री-पुरुष असमानता ही भारतीय समाजातल्या प्रमुख चिंतांपैकी एक आहे. त्याला क्रीडा क्षेत्रही अपवाद नाही. क्रीडा क्षेत्रातली लैंगिक असमानता तर अत्यंत स्पष्ट आहे. सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्या आहेतच. प्रशिक्षकांकडून होणारा लैंगिक छळ काही नवीन नाही. महिला खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कारकीर्दीत कोणत्या ना कोणत्या स्तरावर भेदभावाचा सामना करावा लागला आहे. निवड समितीतले अधिकारी असोत, संघ प्रशिक्षक असोत, सरकार असो किंवा त्यांचे स्वतःचे कुटुंबीय असोत, या सगळ्यांकडून महिला खेळाडूंना त्रास सहन करावा लागला आहे. २००९ मधे सुवर्णकन्या पी.टी. उषा आपल्याशी झालेल्या भेदभावानंतर मीडियावर तुटून पडली होती. क्रीडा क्षेत्रातल्या महिलांच्या वैयक्तिक जीवनात प्रसारमाध्यमं ‘अतिरिक्त स्वारस्य’ दाखवून वाद निर्माण करतात हे चुकीचंच आहे. त्यांच्या क्रीडा पोशाखांविषयी टीका टिप्पणी करणंहीच अयोग्य आहे.
क्रीडा क्षेत्रात अनेक प्रतिभावान महिला यशाची शिखरं गाठत आहेत, प्रगतीकडे वाटचाल करत आहेत. हे ओळखण्याची गरज आहे. त्यांना समान संधी मिळण्यासाठी हवी इच्छाशक्ती. भारतातील क्रीडा क्षेत्रातील अनेक महिलांनी भेदभाव, सामाजिक वंचना आणि सांस्कृतिक भेदभाव यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करून स्वत:साठी एक आशादायक कारकीर्द प्रस्थापित केली आहे. महिला खेळाडूंनी केवळ एक आई होण्याशिवाय इतर अनेक भूमिका निभावत समाजात एक आदरणीय स्थान व्यापलं आहे. त्यांचे कठोर परिश्रम आणि स्वतःला सिद्ध करण्याची आवड यामुळे त्यांना आदर मिळण्यास मदत झाली आहे.
महिला खेळाडूंनी संघर्ष केला आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. त्या सर्व अडथळे पार करतात आणि अंतिम गेम-चेंजर्स ठरतात. अनेक खेळाडूंनी आपल्या शानदार विजयासह देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. केवळ पुरुषांपुरते मर्यादित असलेल्या खेळामधेही- मग ते वैयक्तिक क्रीडा प्रकार असोत की सांघिक – महिलांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. महिला खेळाडूंची संख्या सतत वाढत आहे.
केवळ भारतातच नाही तर जगभरात महिला खेळाडूंना कमी लेखल्याच्या घटना होत असतात. त्यांच्या क्षमता पुरुषांच्या तुलनेत कमी समजल्या जातात तरीही त्या यशस्वी होतात. व्यवसायाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना अपमानित केलं जातं. त्यांना त्यांची स्वप्नं साकार करण्याची आणि करिअर घडवण्याची परवानगी (!) नसते. आजही महिलांना खेळांमध्ये इतकी वेगळी वागणूक दिली जाते हे खेदजनक आहे. भारतातील महिलांकडे अजूनही घर बनवण्याचे आणि मुलांचं संगोपन करणारी यंत्रं म्हणून पाहिलं जातं. खेळांमधल्या त्यांच्या सहभागाबाबत अजूनही समाजात उदासीनताच आहे.
जीवनातील अनेक गोष्टींप्रमाणेच बदलाची सुरुवातही आपल्यापासूनच होते, ती तशी करायलाही हवी. महिला केवळ कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा कणा आहेत.
जगभरातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र आणायची ताकद क्रीडा क्षेत्राकडे आहे. शतकानुशतके पुरुषांनी स्त्रियांवर अत्याचार केले आणि त्यांना कनिष्ठ मानले. त्यांना संधींपासून वंचित ठेवण्यात आले आणि त्यांना क्षुल्लक कामासाठी योग्य मानले गेले. अनेक दशकांहून अधिक काळ, स्त्रियांनी वर्चस्ववादी संस्कृतीतून मार्ग काढला आहे. कधीही हार न मानल्यानं त्या आता शिखरावर पोहोचल्या आहेत. भेदभाव आणि अपमानित होऊनही, चिकाटी आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या इच्छेनं त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. समाजाच्या सक्षमीकरणात मोठी भूमिका बजावणाऱ्या या खेळाडूंनी सिद्ध केलं आहे की समर्पण आणि कठोर परिश्रमातून स्वप्नं साकार केली जाऊ शकतात.
jambhekar.prajna@gmail.com