असिफ बागवान

कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘ओपनएआय’मध्ये गेल्या चार दिवसांत जे काही घडले त्याचा तर्क लावणे ‘चॅटजीपीटी’लाही जमणार नाही. या घडामोडींची सुरुवात झाली कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांच्या हकालपट्टीने. ‘ओपनएआय’ या ‘ना नफा’ कंपनीला लागणारा निधी पुरवणाऱ्या गुंतवणूकादारांना खेचून आणणाऱ्या अल्टमन यांची अचानक झालेली उचलबांगडी खळबळ उडवणारी ठरली. पाठोपाठ कंपनीचे अध्यक्ष ग्रेग ब्रोकमन हेही पायउतार झाले. त्यावरून तर्कविर्तक लढवले जात असतानाच या कंपनीचे सर्वात मोठे गुंतवणूकदार असलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट’ने नव्या कृत्रिम प्रज्ञा विभागाची स्थापना करत त्यात या दोघांना सामावून घेतले. या हालचालींनी भुवया उंचावल्या असताना ‘ओपनएआय’मधील ७५०पैकी ५०० कर्मचाऱ्यांनी अल्टमन यांना हटवणाऱ्या संचालक मंडळालाच बडतर्फ करण्यासाठी राजीनाम्याची धमकी दिली. हे नेमके काय सुरू आहे, याबद्दल गोंधळ उडाला असतानाच बुधवारी सॅम अल्टमन आणि ग्रेग ब्रोकमन यांना ओपनएआयमध्ये पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. एवढेच नव्हे तर, कंपनीच्या संचालक मंडळात मोठे फेरबदल करण्यास सुरुवात झाली असून अल्टमन, ब्रोकमनसह मायक्रोसॉफ्ट कंपनीलाही संचालक मंडळात स्थान देण्याचे ठरले आहे.

A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक

कॉर्पोरेट जगतातील ‘बोर्ड रूम’मधील अशा उलथापालथींकडे बाहेरील जगात मनोरंजन म्हणून पाहणे ठीक. पण ‘ओपनएआय’चे तसे नाही. ही कंपनी कृत्रिम प्रज्ञेच्या (आर्टिफिशियल इंटिलिजन्स-एआय) क्षेत्रातील सर्वात प्रगत कंपनी. चॅटजीपीटी हे चॅटबोट तंत्रज्ञान विकसित करून ‘ओपनएआय’ने ‘एआय’च्या विलक्षण क्षमतेची चुणूक जगाला दाखवली. अशा कंपनीत चार-पाच दिवसांत तीन वेळा सीईओ बदल होणे, अध्यक्ष हटवण्यात येणे, संचालक मंडळाला बाहेरचा रस्ता दाखवणे आणि कर्मचाऱ्यांनी थेट राजीनाम्याची धमकी देणे अशा घटना घडणे गंभीर आहे. त्यामुळे या घडामोडींच्या आधीच्या आणि नंतरच्या परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक ठरते.

‘ओपनएआय’ ही मूळात ‘ना-नफा’ तत्वावर स्थापन झालेली कंपनी. अल्टमन यांच्यासह ‘एआय’ संशोधक इलया सट्स्कीव्हर आणि अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क या संस्थापकांनी कृत्रिम प्रज्ञा संशोधनासाठी तिची स्थापना केली. कालांतराने मस्क यांनी त्यातून अंग काढून घेतले. पण अल्टमन यांनी २०१८मध्ये मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून अब्जावधी डॉलरची गुंतवणूक कंपनीत आणत तिचे काम पुढे नेले. ८६ अब्ज डॉलर इतके विद्यमान मूल्य असलेल्या या कंपनीत मायक्रोसॉफ्टचा ४९ टक्के हिस्सा आहे. तरीही कंपनीच्या संचालक मंडळात मायक्रोसॉफ्टला स्थान नव्हते. ‘ओपनएआय’ कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात संशोधनाच्या टप्प्यावर होती तोपर्यंत हे चालणारे होते. मात्र, ‘चॅटजीपीटी’च्या निर्मितीनंतर समीकरणे बदलू लागली. ‘चॅटजीपीटी’ यशस्वी झाल्यानंतर ‘ओपनएआय’कडे गुंतवणूदारांचा ओढा वाढू लागला. त्याचवेळी या संशोधनातून अर्थार्जन करण्याचा मार्गही अल्टमन यांच्यासह काहींना दिसू लागला. आता वेळ न दवडता हे तंत्रज्ञान व्यापारासाठी उपलब्ध व्हायला हवे, असा आग्रह वाढू लागला आणि तिथेच कंपनीत दोन गट निर्माण झाले.

कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान आता व्यावसायिक वापरासाठी सज्ज आहे, असे अल्टमन यांचे ठाम मत आहे. मात्र, याला ‘ओपनएआय’च्या संचालक मंडळात असलेले कंपनीचे संस्थापक संशोधक इलया सट्स्कीव्हर यांच्यासह संचालक मंडळातील आणखी तिघांचा विरोध होता. त्यातील हेलन टोनर आणि ताशा मॅक्कॉली हे तर ‘एआय’चे कट्टर विरोधक. हे तंत्रज्ञान मानवासाठी मारक असल्याने त्यात पुढे जायलाच नको. किमान त्याची घाई तर नकोच, असा त्यांचा आग्रह आहे. यावरून ‘ओपनएआय’चे नेतृत्व दुभंगले. अल्टमन कुणाचे ऐकत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी एकत्र येऊन त्यांनाच बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, ही बाब कंपनीच्या गुंतवणूकदारांना रूचली नाहीच शिवाय कंपनीचे कर्मचारीही नोकऱ्या सोडण्याची धमकी देऊ लागले. त्यामुळे ‘ओपनएआय’समोर माघार घेण्यावाचून गत्यंतर उरलेले नाही, असे सध्या दिसत आहे.

अल्टमन यांच्या पुनरागमनासोबत कंपनीच्या संचालक मंडळाची फेररचनाही होणार आहे. त्यात मायक्रोसाॅफ्टचाही समावेश होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत मायक्रोसॉफ्टने या कंपनीच्या बघ्या गुंतवणूकदाराची भूमिका वठवली होती. मात्र, आता कंपनीला थेट निर्णयप्रक्रियेत स्थान मिळाले आहे. अल्टमन यांच्याप्रमाणेच मायक्रोसॉफ्टलाही ‘एआय’ तंत्रज्ञान बाजारपेठेसाठी सज्ज झाल्याचे वाटते. त्यामुळे येत्या काळात कंपनीची पावले व्यापारीकरणाकडे पडणार हे निश्चित आहे.

या घटनाक्रमाच्या मुळाशी कृत्रिम प्रज्ञेबाबत सुरुवातीपासून असलेले दोन मतप्रवाह आहेत. औषधसंशोधनापासून जटील शस्त्रक्रियेपर्यंत आणि गुणवत्तापूर्ण समान शिक्षणापासून अंतराळ मोहिमांपर्यंतच्या अनेक कार्यांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. त्याचवेळी या तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी, संहारक शस्त्रांचा स्वयंप्रेरीत वापर यासारखे धोकेही संभवतात. त्यामुळे हे तंत्रज्ञान विकसित करताना मानवहितांचे रक्षण हा हेतू केंद्रस्थानी असावा, असा आग्रह धरला जात आहे. यावरून ‘एआय’ संशोधक, उद्योजक, धोरणकर्ते राजकारणी यांचे परस्परविरोधी गट तयार झाले आहेत. या तंत्रज्ञानाचे बाजारीकरण करण्यासाठी उत्सुक मंडळी एका बाजूला आहेत तर, दुसऱ्या बाजूला कोणतीही घाई न करता मानवहिताच्या दृष्टिकोनातून ‘एआय’बाबत सावध पावले उचलणाऱ्यांचा गट आहे. ज्या गटाला अधिक तज्ज्ञ मनुष्यबळ, आर्थिक रसद आणि पाठबळ मिळेल, तो गट सरस ठरेल आणि त्याच दिशेने हे तंत्रज्ञान जाईल. ही स्पर्धा आता आणखी तीव्र होत जाईल. यातून ‘ओपनएआय’चे जे होईल ते होईल पण हे प्रकरण आपल्यासाठी ‘आय ओपनिंग’ म्हणजेच डोळे उघडणारे आहे.

कृत्रिम प्रज्ञेचा अविचारी किंवा अतिरेकी वापर मानवजातीसाठी घातक आहे. ‘डीपफेक’सारखे उद्योग त्याचे खूपच छोटे उदाहरण आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाला नियमांची वेसण घालणे आवश्यक आहेच. गेल्या महिन्यात ब्रिटनमध्ये झालेल्या ‘एआय’ सुरक्षा परिषदेत अमेरिका, चीनसह अनेक देशांनी याबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता निव्वळ चिंता व्यक्त करून भागणार नाही तर या तंत्रज्ञानाचे नियमन करण्यासाठी पावले उचलावी लागतील.

asif.bagwan@expressindia.com

Story img Loader