एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री

दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतील करारांमुळे विकासाच्या वाटा प्रशस्त होणार आहेत. २०२४च्या जागतिक आर्थिक मंचावर झालेले सामंजस्य करार केवळ आर्थिक व्यवहार नाहीत. तर या करारांच्या माध्यामातून विकासाचा पूल बांधला जाणार आहे. महाराष्ट्र हे भारताच्या विकासाचे इंजिन ठरण्यास हातभार लागणार आहे…

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
q2 gdp growth estimate may be revised upwards nageswaran
दुसऱ्या तिमाहीतील ‘जीडीपी’त फेरउजळणीनंतर वाढ दिसणे शक्य -नागेश्वरन
how to tackle food inflation causes of food inflation measures to control food inflation
अन्नधान्याची महागाई रोखणार कशी?

जागतिक आर्थिक मंचावर प्रगती, गुंतवणूक आणि विकासावर चर्चा करणे, आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणे हे सर्वार्थाने समृद्ध करणारे आणि आनंद देणारे असते. दावोसमध्ये पार पडलेल्या ५४व्या जागतिक आर्थिक परिषदेतील वैचारिक देवाणघेवाण आणि राज्याला मिळालेले घवघवीत यश माझ्यासाठी मोलाचे ठरले. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून लाखो नागरिकांच्या आशा, आकांक्षा सोबत घेऊन गेलो होतो. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व करताना राज्याच्या भविष्याला आकार देण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. ती पार पाडता आली याचे समाधान आहे.

वैचारिक, व्यापारी आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने ‘विश्वासाची पुनर्बांधणी’ ही यंदा जागतिक आर्थिक परिषदेची संकल्पना होती. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विकासाच्या संकल्पनेशी ती तंतोतंत जुळणारी आहे, असे मला वाटते. आर्थिक गुंतवणुकीसाठी, भागीदारीसाठी विश्वासाचा पाया भक्कम असणे आवश्यक असते. दावोसमधील आर्थिक परिषदेमध्ये केवळ विश्वासाची पुनर्बांधणी झाली असे नाही, तर उज्ज्वल भविष्याचा भक्कम, भरभराटीचा पाया रचण्यासाठी सारे एकवटल्याचे दिसले.

हेही वाचा >>>चीन- तैवान वाद वाढणे जगासाठी चिंताजनक आहे, कारण…

जागतिक पातळीवर विश्वास

महाराष्ट्राची भक्कम आर्थिक स्थिती आणि उद्याोगपूरक वातावरण गुंतवणूकादारांना आपलेसे वाटते, हे आम्ही केलेल्या सामंजस्य करारांवरून प्रकर्षाने जाणवले. शिवाय, राज्याच्या भरभराटीविषयी जागतिक पातळीवर असलेला विश्वासही यानिमित्ताने दिसून आला. या आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी एकूण तीन लाख ५३ हजार कोटींचे करार करण्यात आले. विश्वास आणि भगीदारी या दोन गोष्टी भविष्यातील आर्थिक स्थैर्याच्या द्याोतक आहेत, असाच निष्कर्ष यातून काढता येईल.

करारांबरोबरच राज्याकडे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक स्वारस्य प्रस्तावांच्या स्वरूपात आली आहे. जागतिक पातळीवरील परिषद आणि करार यांमुळे विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक विकासाच्या वाटा प्रशस्त होणार आहेत. २०२४च्या जागतिक आर्थिक मंचावर झालेले सामंजस्य करार केवळ आर्थिक व्यवहार नाहीत. तर या करारांच्या माध्यामातून विकासाचा पूल बांधला जाणार आहे. हरित हायड्रोजन प्लाण्ट्स, माहिती केंद्र, स्टील उत्पादन, रिन्युएबल एनर्जी अशा अनेक क्षेत्रांसाठी ही गुंतवणूक आमुलाग्र बदल घडवणारी असेल. आपल्या राज्याचा आर्थिक कणा मजबूत होण्याबरोबरच स्थैर्याचा नवा सूर गवसणार आहे. जगात आर्थिक अस्थिरता आणि साशंकतेचे वातावरण दिसत असतानाच भारतात मात्र एक सकारात्मकता आहे. प्रगतीची आस आहे. त्यामुळेच हे करार आपल्यासाठी स्थैर्याची नवी आशा घेऊन आले आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी ही गुंतवणूक वेगवान विकासाचा संदेश घेऊन आली आहेत.

नव्या संधींची ग्वाही

कुठल्याही आर्थिक प्रयत्न आणि विकासाचे यश हे त्यातून निर्माण होणाऱ्या संधींवर अवलंबून असते. आजचे सामंजस्य करार नेमकी हीच ग्वाही देत आहेत. या करारांतून, गुंतवणुकीतून महाराष्ट्रात जवळपास दोन लाख रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. राज्याचे उज्ज्वल भविष्य ज्या तरुणांच्या हाती आहे, त्यांना दिलेला हा विश्वास आणि बळ आहे. चांगल्या भविष्याची हमी आहे. औद्याोगिक असो वा तंत्रज्ञानातील संधी, इथे निर्माण होणारा प्रत्येक रोजगार कुशल कामगारांसाठी पर्वणीच ठरणार आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये प्रत्येकाला सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध करून देण्याच्या आमच्या विचार आणि ध्यासाला हे सारे साजेसेच ठरते.

हेही वाचा >>>सामान्य माणसांना व्यवस्थेविषयी वैफल्य वाटणे हे अराजकाला निमंत्रण!

देशाच्या विकासाचे इंजिन

जागतिक नेते, उद्याोगातील गुंतवणूक आणि धोरणकर्त्यांच्या मते महाराष्ट्र राज्य आदर्श ठरत आहे, ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. महाराष्ट्र आर्थिक, औद्याोगिक आणि पायाभूत सुविधांच्या पातळीवर समर्थ होत असून भारताच्या विकासाचे इंजिन ठरत आहे. महाराष्ट्राच्या लौकिकात भर पडत आहे. अदानी, आर्सेलर मित्तल, लुईस, ड्रेफ्यूज् आणि श्निंडरसारख्या औद्याोगिक क्षेत्रातील बड्या, नावाजलेल्या मंडळींना भेटल्यामुळे त्यांच्या योजना, धोरणे आणि वैश्विक विचार समजून घेणे मला शक्य झाले. विश्वासार्हता आणि सहकार्याचे वातावरण हे उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे, हे पुन्हा सिद्ध झाले.

परिषदेमध्ये झालेला प्रत्येक संवाद, सहभाग आणि सहकार्यासाठी पुढे केलेला प्रत्येक हात आणि स्वाक्षरी केलेला प्रत्येक सामंजस्य करार जागतिक वर्तुळामध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठी किती उपयुक्त असेल, हे यातून सिद्ध होते. संघटित होणे, एकत्र येणे आणि भविष्यासाठी मंथन करणे या केवळ सैद्धांतिक संकल्पना नाहीत, तर एकमेकांच्या भरभराटीसाठी साथ आणि सहकार्य करण्याची ही हमी असते. हाच विश्वास आम्ही आमच्या संवादांतून, चर्चांतून, करारांमधून एकमेकांना दिला. यातूनच आम्ही प्रगतिशील जगाची आव्हाने पेलण्यास अधिक सक्षम होत आहोत.

ओमान, यूएई, दक्षिण कोरिया आणि इतर राष्ट्रांबरोबर झालेली आमची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार आणि सहकार्याची कवाडे खुली करणारी आहे. अन्नप्रक्रिया, शाश्वत पर्यटन, डिजिटल युग, सेमी कंडक्टर आणि कौशल्य विकास यावर आमची झालेली चर्चा, संवाद या क्षेत्रांशी निगडित होता.

संघटितपणे पाहिलेले स्वप्न

दावोसभेटीतून महाराष्ट्राला गवसलेले काही मांडताना, त्यावर विचार करताना मला माझ्यावर असलेली महत्त्वाची जबाबदारी पूर्ण केल्याचे समाधान मिळते आहे. तिथे दिलेली हमी म्हणजे केवळ कागदावरील स्वाक्षरी नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला दिलेले ते वचन आहे. विश्वासार्हता आणि सहकार्याच्या बळावर समृद्धीकडे नेणारा तो एक मार्ग आहे. या मार्गावर आव्हाने निश्चितच आहेत. २०२४च्या जागतिक आर्थिक मंचावर केलेले सामंजस्य करार आमच्यासाठी मार्गदर्शन आहेत. ते आम्हाला प्रगतीच्या वाऱ्याची दिशा दाखवत आहेत. भविष्यात आर्थिक प्रगती, शाश्वत विकास आणि स्थैर्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या वैश्विक प्रयत्नांचे आणि आशावादाचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत.

एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणे हा काही महाराष्ट्राचा ‘एकला चलो रे’ असा प्रवास नसून सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघटितपणे पाहिलेले ते स्वप्न आहे. आता ही विश्वासार्हता निर्माण करण्याचा मार्ग संघटितपणे आखणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र आता सज्ज आहे आणि विश्वाची दारे आपल्या सहकार्यासाठी उघडी आहेत. विकासाच्या नव्या जगात भक्कम आणि आश्वासक पाऊल ठेवण्याची संधी आपल्यासमोर उभी आहे. तिचा पुरेपूर लाभ घेणे हे आपले कर्तव्य आहे. आपले खरे यश केवळ आर्थिक निकषांवर ठरणार नाही. प्रगती करताना, यश मिळवताना आपण किती लोकांची मने जिंकली, कोणाला सोबत घेऊन गेलो, यावर त्याची महत्ता ठरणार आहे.

२०२३च्या जागतिक आर्थिक परिषदेत मी पहिल्यांदा गेलो, तेव्हा महाराष्ट्रासाठी न भूतो न भविष्यति अशी गुंतवणूक होऊ शकली. त्या वेळी अंमलबजावणीसाठी हाती घेण्यात आलेले प्रकल्प आज प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्याच मार्गावर २०२४मध्ये नव्याने पाऊल टाकत आपण अधिक वेगवान आणि सक्षम वाटचाल केली आहे. पुढे पडणारे प्रत्येक पाऊल सर्वांना अधिक उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याकडे घेऊन जाणार आहे. जागतिक मंचावर अविरतपणे यशस्वी वाटचाल करण्यासाठी, महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर ओळख मिळवून देण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे.

Story img Loader