प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये
सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींची एकसंध मोठ बांधून रयतेचे राज्य उभे केले. गावातील शेवटच्या माणसाला सुरक्षा आणि आत्मविश्वास दिला. इथली स्त्री आणि तिची अब्रू सुरक्षित केली. हाच इतिहास शिवराय उत्तरकाळात अनेक राजांनी पुढे मोठ्या सन्मानाने चालवला. त्यात अठराव्या शतकात महाराष्ट्रातील एका शूर वीर धाडसी स्त्रीने आपले राज्य आणि राज्य कारभार मोठ्या हिमतीने चालवला अशा शूर लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज- ३१ मे रोजी  २९९ वी जयंती!

 इतिहास आणि ऐतिहासिक महापुरुष आपल्याला नित्य दिशादर्शक असतात. त्यांच्या जयंती वा स्मृतिदिनाला निव्वळ उत्सवाचे स्वरूप न देता आपण सावध होणे काळाची गरज आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आणि सर्वांगीण योगदान आपण लक्षात घेणे जरुरी आहे. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या साम्राज्यात सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक सलोखा, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांविषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे समूळ उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा पुरता बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क, सामान्य रयतेविषयी तळमळ असे महान समाजसुधारणावादी कृतिशील कार्य झाले, याची आठवण आजही हवी!  

हेही वाचा >>>मोदींच्या नव्या ध्यानमग्न छायाचित्राच्या प्रतीक्षेत…

अहिल्यादेवींचे सासरे मोठे धोरणी विचारवंत होते. दूरदृष्टीच्या मल्हाररावांनी पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही अहिल्यादेवींना तत्कालीन दरबाराची मोडी-मराठी लिहिणे, वाचणे आणि गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या. याशिवाय घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करणे, दरबारात बसणे, इतर अन्य राज्यांच्या राज दरबारासोबत पत्रव्यवहार करणे, लोकांमध्ये जाऊन न्यायनिवाडा करणे इत्यादी कृतीशील प्रशिक्षण दिले.  परिणामी अहिल्यादेवींची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली. आपल्या सासरचे हे सारेच संस्कार त्यांना मानाने आणि बुद्धीने सक्षम बनवत होते. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला. दूरदृष्टी आणि विचाराने सक्षम झालेल्या अहिल्यादेवींनी सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही जे मनोधैर्य दाखवले ते तत्कालीन परिस्थितीत अद्वितीय ठरणारे आहे. आपण जगलो तर लाखो प्रजाजनांना आयुष्यात सुखशांती लाभेल असा द्रष्टा विचार करून अहिल्यादेवींनी प्रजाहितासाठी जगण्याचा निर्णय घेतला. हा विचार धर्म, रूढी, परंपरा यापलीकडे माणूस म्हणून आपले कर्तव्य श्रेष्ठ आहे हे महत्त्वाचे मानणारा आहे आणि अहिल्यादेवींच्या कल्याणकारी राज्याचे ते वैचारिक अधिष्ठान आहे.

असे असताना तिकडे पेशवा रघुनाथराव यांनी होळकरांचे राज्य पेशवाईत विलीन करण्यासाठी ५० हजारांची फौज घेऊन इंदूरवर चढाई केली. यावेळी अहिल्यादेवींचे शौर्य, धैर्य आणि खंबीर नेतृत्व सर्वश्रुत झाले. पेशवा रघुनाथरावांना, ‘मी आणि माझ्यासोबत माझी स्त्री फौज आपल्यासोबत निकराने युद्ध करेल. आम्ही हरलो तर लोक तुमचे शौर्य नाकारतील आणि हरलो तर तुमची अब्रू धुळीला मिळेल!’ असा खणखणीत खलिता पाठवला. हे वाचल्यावर रघुनाथरावांनी वरमून, आक्रमणाचा विचार बदलला.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

हेही वाचा >>>मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निकाल वादग्रस्त का ठरतो?

अशा मुत्सद्दी अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी योजना आठवताना सम्राट अशोकाच्या राज्याची आदर्श दिसू लागतो. दोघांच्या कारकीर्दींमध्ये सुमारे १९०० वर्षांचे अंतर, पण अशोकाप्रमाणेच अहिल्यादेवींनीही  देशभर जागोजागी विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले आहेत. सगळीकडे रस्ते बांधले आणि पूल निर्माण केले. आजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला लाजवेल असे निर्माणाचे काम अहिल्यादेवींनी आपल्या राजेशाही काळात करून देशासमोर एक  राज्यकर्ती म्हणून मोठा आदर्श निर्माण करून ठेवला. एवढेच काय, आपली राजधानी महेश्वर येथे हलवून आपल्या राज्यातील अठरापगड जाती, अलुतेदार-बलुतेदार, व्यापारी, कारागीर, मजूर, विणकर, कलावंत, साहित्यिक इत्यादी गुणवंतांचे कल्याणार्थ त्यांना निधी, जमीन, घर इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मुंग्यांना साखर, पाण्यातील माशांना पिठाचे उंडे, उन्हाळ्यात वाटसरूंना थंड पाणी पिण्यासाठी पाणपोई, गरिबांसाठी अन्नछत्रे उभी केली. दिव्यांग, अनाथ, असहाय्य लोकांचे पुर्वसन केले. विशेषतः पक्षी, गुरे, ढोरे, वन्यप्राणी इत्यादींसाठी कुरणे निर्माण करतांना जंगलांचे संवर्धन केले. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आंबराई, बगीचे, विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. घाट बांधताना केवळ तज्ज्ञांची मते विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात, कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले.

  सामाजिक क्षेत्र योगदानाबरोबरच सर्वधर्मसमभावाचा आदर्श समोर ठेवत मंदिरे, मशिदी, दर्गे व विहार बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. सर्वसमावेशक कार्यामुळे सर्व जातिधर्मांचे लोक एकत्र आले. राज्यभर एकतेची विचारसरणी रुजली, एकात्मता निर्माण झाली. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातिभेदाला तडा दिला. अहिल्यादेवी या कृतीने महाराणी आणि एक  समाजसुधारक म्हणून लोकमान्य लोकमाता झाल्या. धर्माचे अवडंबर न माजवता केवळ मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानून प्रजेवर विचाराने त्यांनी अधिराज्य गाजवले. लोकांवर अधिक करांचा बोजा न लादता राज्याचा कोष समृद्ध केला. स्वतःचा खर्च मर्यादित करून खासगी उत्पादनाचा उपयोगसुद्धा लोककल्याणासाठी केला. आज माध्यमांत एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या तथाकथित धुरिणांनी किंवा समाजमाध्यमांवरील ‘फॉरवर्ड्स’ पाहात वेळ घालवणाऱ्या तरुणांनीही छत्रपती शिवराय आणि अहिल्यादेवी हे द्रष्टे आणि समासुधारक कसे होते, हे समजून घेण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींची जयंती, किंवा येत्या ६ जून रोजी येणारा शिवराज्याभिषेक दिन निव्वळ ‘साजरा’ न होता सत्कारणी लागेल.

लेखक कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय (सोनपेठ, जि. परभणी) येथे अध्यापन करतात. jayvithal@gmail.com

Story img Loader