नोव्हेंबर महिन्यात दिल्ली परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५०० पर्यंत गेला. ही भयंकर परिस्थिती आज दिल्लीत आहे, उद्या थोड्याफार फरकाने इतर शहरांमध्येही असू शकते. अशा वातावरणात उद्याची पिढी गुदमरून जाते आहे. पण लक्षात कोण घेतो?
दसरा आटोपून दिवाळी येऊ लागली. दक्षिण दिल्लीच्या वसंतविहारमधील तीन वर्षांच्या आद्याचा आणि पाच वर्षांच्या आकाशचा खोकला काही केल्या थांबेना. घरात एअरकंडिशनर व एअर प्युरिफायर, शाळेला जाण्या-येण्यासाठी बी.एम.डब्ल्यू. गाडी. खोकला सुरू होताच आद्या-आकाशचे आईवडील अनुष्का व राकेश यांनी वेळ न दवडता उत्तम डॉक्टर गाठून वाफारा व इतर सर्व औषधं चालू केली. पंधरा दिवस झाले तरी खोकला कमी होण्याची लक्षणंच नव्हती. हे पाहून त्यांनी मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही दोन महिने जम्मूला जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या घरापासून काही अंतरावर दिल्लीतील धारावी – कुसुमपूर पहाडी झोपडपट्टी आहे. तिथल्या कच्च्या बांधकामाच्या खोलीत दोन वर्षांचा साकेत नाकाला लावलेल्या नेब्युलायझरच्या (द्रव औषधाची वाफ करून ती मास्क लावलेल्या नळीतून पोचवणारे उपकरण) नळीशी खेळतोय. चार वर्षांचा अक्षय खोकत-खोकत त्याला ते कधी मिळेल याची वाट पाहतोय. कचरा गोळा करणाऱ्या मथुराबाईं आणि रोजीवर जाणारे नवनाथ यांच्यासाठी हिवाळा म्हणजे छातीत कळ! त्यांच्या दोन्ही मुलांचा खोकला जन्मापासून पिच्छा सोडत नाही. उपचारात कधी हजार, कधी दोन हजार जाऊ लागले. डॉक्टरकडे जाऊन वाफ घेण्यासाठी दरवेळी ९०-१०० रुपये जायचे. शिवाय रोजगार बुडायचा. म्हणून ३०० रुपयांत वाफेचं उपकरण घेतलं. त्यात घालायचं औषध अधिक पुरवलं पाहिजे. म्हणून डॉक्टरांनी एकासाठी सांगितलेलं औषध निम्मं करून त्यात दोघांचं भागवायचं. या दोन्ही चिमुकल्यांना ढास लागते. उलट्या होतात. डोकं-छाती-पोट दुखत राहतं. दोघंही रात्रभर सारखं तळमळत-कळवळत राहतात. हतबल आईबापांच्या कानात खोकला घुमत, त्यांना कासावीस करत राहतो.
हेही वाचा >>>‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क किती काळ पायदळीच तुडवले जाणार?
नोव्हेंबर महिन्यात दिल्ली परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स ) ५०० पर्यंत गेला. ही भयंकर हवा सार्वजनिक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली व ‘राष्ट्रीय राजधानी प्रदेशा’मधील (नॅशनल कॅपिटल रिजन) नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद व गाझियाबाद या भागांतील सर्व पाच हजार ६१९ विद्यालये बंद ठेवण्याचा आदेश दिला. सुमारे ४५ लाख बालके घरात कोंडली गेली.
आपलं आरोग्य उत्तम व सुखदायी ठेवण्यासाठी हवेचा निर्देशांक ० ते ५० असणे आवश्यक आहे. ५१ ते १०० निर्देशांकाची हवा ही सामान्य असते. १०१ ते १५० गुणवत्तेच्या हवेमध्ये संवेदनशील व्यक्तीचे आजार बळावतात. १५१ ते २०० गुणवत्तेच्या ‘अपायकारक’ हवेमध्ये श्वसनाचे विकार साथीसारखे पसरतात. २०१ ते ३०० निर्देशांकाची हवा आरोग्यास ‘घातक’ असून तर ३०१ ते ५०० निर्देशांकाची ‘भयंकर विषारी’ हवा संचारबंदी आणते.
२०१६ पासून आजवर दिल्लीतील हवेची गुणवत्ता ३०० ते ९०० यांमध्ये हेलकावे खात राहतेय. धुकं आणि प्रदूषण यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या स्मॉगमुळे दृश्यमानता १०० मीटरवर येऊन ठेपते. विमान व रेल्वे प्रवास ठप्प पडतो. रस्त्यांवर मंदगती वाहनांची दाटी होते. गलिच्छ हवेमुळे दरवर्षी शाळा १०-१५ दिवसांसाठी बंद ठेवाव्या लागतात. सर्व इस्पितळं श्वसनविकारांच्या रुग्णांनी भरून जातात. कित्येकांना खाट मिळत नाही.
दिल्लीतील शाळांत सुमारे नऊ लाख विद्यार्थ्यांनी ‘शिक्षणाचा हक्क’ योजनेत प्रवेश घेतला आहे. ‘शाळा बंद’ झाल्यावर आठ दिवसांत वंचित वर्गातील पालकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे प्रत्यक्ष वर्गांच्या निलंबनाचे पुनरावलोकन करण्याची विनंती केली. अर्जदारांची बाजू मांडताना वरिष्ठ विधिज्ञ मेनका गुरुस्वामी म्हणाल्या, ह्यह्णआमच्या घरातील व आमच्या भागातील हवा स्वच्छ नाही. आमच्याकडे ऑनलाइन क्लासेसमध्ये सहभागी होण्यासाठी उपकरणे लॅपटॉप वा मोबाइल नाही. अनेक सरकारी शाळांमध्ये हवा शुद्धीकरण यंत्रे बसवली आहेत. बहुतेक गरीब आपल्या मुलांना त्यांच्या घराजवळच्या शाळेत पाठवतात. (लांब अंतराचा प्रवास हा केवळ उच्चभ्रूंना परवडतो.) त्यांना मध्यान्ह भोजन हेदेखील एक प्रोत्साहन असते. ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे आहे, अशांसाठी काही वेगळी प्रणाली असावी.’
हेही वाचा >>>भारतीय संविधानातील भारतीयतेचा प्रश्न!
आपण शाळेतच ‘आपला मेंदू आणि शरीर यांचं कार्य व्यवस्थितपणे चालण्यासाठी उत्तम व पुरेसा ऑक्सिजन अनिवार्य आहे.’ हे शिकतो. प्राणवायूच गचाळ असेल तर काय, हे मात्र त्यात लिहिलेलं नव्हतं. त्याच्या प्रात्यक्षिकासाठी ‘चलो दिल्ली!’ पाच वर्षांपूर्वी दिल्लीत जन्मलेल्या चिमुकल्यांना १,८२६ पैकी केवळ १० दिवसच चांगली हवा लाभली. पावसामुळे ६३२ दिवस हवा मध्यम होती. ८१ दिवसांमध्ये, हवा अतिशय गंभीर होती. त्यांना तब्बल ८२६ दिवस ‘हानीकारक’ हवेचा सामना करावा लागला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार प्रदूषित हवेतील सूक्ष्मकण पी.एम.२.५ (२.५ मायक्रॉन जाडीचे- आपल्या केसांची जाडी ३० ते ४० मायक्रॉन असते.) यांचं प्रमाण एक घनमीटर हवेत पाच मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक नसावे. एका दिवसात १५ मायक्रोग्रॅमहून अधिक सूक्ष्मकण शरीरात जाऊ नयेत.
प्रदूषणग्रस्त दिल्लीत कोणाला व कशी हवा मिळते, याचं सर्वेक्षण मागील वर्षी केलं होतं. ‘श्रीमंत कॉलनीत सुरक्षिततेची सर्व साधने वापरणाऱ्या मुलाच्या शरीरात ३६.६ मायक्रोग्रॅम तर झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाच्या शरीरात १४९ मायक्रोग्रॅम दूषित सूक्ष्मकण शिरकाव करतात.’ असं त्यात लक्षात आलं. हे सूक्ष्मकण जात-धर्म-वर्ग असा कोणताही भेद न करता नाकावाटे शरीरात घुसतात आणि शरीरातील प्रत्येक यंत्रणेवर वाईट परिणाम करतात. मेंदू, फुप्फुस, हृदय, मूत्रपिंड, यकृत, आतडे, हाडे, प्रजनन प्रणाली व अंत:स्रावी प्रणाली किंवा कोणतीही यंत्रणा प्रदूषणाच्या तावडीतून सुटू शकत नाही.
लहान मुलांचा श्वास घेण्याचा वेग हा प्रौढांपेक्षा अधिक असल्यामुळे त्यांच्या शरीरात दूषित हवा अधिक प्रमाणात जाते. त्यातून खोकला, ब्राँकायटिस व दमा आदी विकार होत आहेत. वारंवार अस्वच्छ हवा घेण्याने फुप्फुसाचं कार्य बिघडून क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिजेस (सी.ओ.पी.डी.) होत आहेत. दिल्लीतील किमान २२ लाख शाळकरी मुलांची फुप्फुसं कमालीची दुबळी झाली आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर’च्या अहवालानुसार, ‘२०२१ मध्ये भारतात पाच वर्षांखालील अंदाजे १६ लाख मुलांचा हवाप्रदूषणामुळे मृत्यू झाला असावा.’
दिल्लीतील अनेक पालक डॉक्टरांकडे तक्रार घेऊन जातात आणि सांगतात की ‘मुलं अजिबात स्वस्थ बसत नाहीत, सतत गडबड करतात, अभ्यासावर लक्ष केंद्रित करत नाहीत. ‘तेव्हा त्यांना समजतं की, ‘मुलांना अवधानअस्थिरता आणि अतिक्रियाशीलता (अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर) हा एक मेंदूचा आजार आहे.’
दिल्लीतील प्रख्यात लंग्ज सर्जन डॉ. अरविंदकुमार म्हणतात, ‘प्रदूषित हवेने मुलांच्या मेंदूपेशींना सूज (न्युरो-इन्फ्लेमेशन) येत आहे. संप्रेरक ग्रंथींच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन मानसिक आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे मुलं अति-उत्तेजित होत आहेत. ती खोडकर नसून प्रत्यक्षात ती हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांनी त्रस्त आहेत. दूषित हवेमुळे दिल्लीतील रहिवाशांची फुप्फुसं अजिबात धूम्रपान न करता पूर्णपणे काळवंडत आहेत. बालवयातील दमा सर्रास होत असून दिल्ली ही ‘दम्याची राजधानी’ झाली आहे. फुप्फुसात सूक्ष्मकण जमा झाल्यानंतर ते बाहेर काढता येत नाहीत. तो उतींचा एक भाग होऊन जातो. हवाप्रदूषण ही ‘कोविड’सारखीच वैद्याकीय आणीबाणी आहे. फुप्फुसाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण चक्रावून टाकणारं आहे. भारतात तो साथीसारखा पसरण्याची भीती वाटते.’
बकाल हवेत राहणाऱ्या महिलांच्या संप्रेरकांच्या पातळीवर व मासिक पाळीवर परिणाम होतो. गरोदर महिलांच्या गर्भाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन गर्भावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती होण्याची शक्यता असते, बाळाच्या जन्मानंतर कमी वजन, अविकसित फुप्फुसं आणि बालमृत्यूचा धोका वाढतो.
‘दिल्लीची नरकपुरी कोणी केली?’ त्याला वाहनं जबाबदार की शेतीमधल्या धसकटांचा धूर?’ , ‘दिल्ली की पंजाब- हरियाणा?’, ‘राज्यं की केंद्र?’ यांवर वाद सतत घातले जातात. अशा वेळी दिल्लीच्या ३००० कि.मी. परिघात कोळशावर चालणाऱ्या ११ औष्णिक वीज प्रकल्पांकडे सोयीस्कर कानाडोळा केला जातो. गेल्या आठवड्यात ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’च्या संशोधनाचे निष्कर्ष जाहीर झाले. ‘जून २०२२ ते मे २०२३ ह्या कालावधीत ९० लाख टन भाताचा पेंढा जाळल्याने १८ किलो टन प्रदूषित वायू बाहेर पडले. तर राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील औष्णिक वीज प्रकल्पांनी २८१ किलो टन सल्फर- डाय- ऑक्साइड हवेत सोडला.’
(कोणीही, कितीही पुरावे व सिद्धता द्या वा आदेश द्या, औष्णिक वीज प्रकल्प कोणालाही व कशालाही जुमानत नाहीत.)
तर अशी ‘बांका’ दिल्ली नगरी जात्यात असेल तर उर्वरित देश सुपात आहे ! ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ ने ‘भारताच्या ६५५ जिल्ह्यांमधील (एकूण ७८७ पैकी) प्रदूषित हवेतील सूक्ष्मकणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. २००९ ते २०१९ या काळात दरवर्षी अंदाजे ३८ लाख बळी गेले.’ असं म्हटलं आहे.
जगातील अति प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली, मुंबई, लखनौ, चंडीगड, विशाखापट्टणम, मीरत व रोहतक आदी कोंदट शहरं येतात. चेन्नई, कोलकाता, पाटणा, नागपूर व दुर्गापूर अशी देशातील प्रदूषित शहरांची संख्या वाढतच आहे. हे पाहून सर्वोच्च नायालयानेच ‘हवाप्रदूषण ही संपूर्ण भारताची समस्या आहे.’ असं सांगून भारत सरकारला अति प्रदूषित शहरांची यादी सादर करा’ असा आदेश नुकताच दिला आहे.
भारतात पर्यावरणीय पत्रकारितेचा पाया रचणाऱ्या अनिल अग्रवाल यांनी १९९५ साली, ‘स्लो मर्डर- द डेडली स्टोरी ऑफ व्हेईकल पोल्युशन इन इंडिया’ हे पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी ‘विषारी हवा ही मंदगतीने नागरिकांची हत्या करत आहे’ असं दाखवून दिलं होतं. त्या वेळचे उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘स्लो मर्डर’चं प्रकाशन झालं होतं. पाठोपाठ अग्रवाल यांनी ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरन्मेंट’च्या वतीने ‘स्वच्छ हवेचा हक्क’ मागणारी मोहीम हातात घेतली. ‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था भीषण का आहे? डिझेल वाहनांमुळे कसं व किती प्रदूषण होतं? कालबाह्य वाहनं रस्त्यावरून का धावतात? वेगवेगळ्या वाहनांच्या धुरांवाटे कोणकोणते वायू हवा नासवतात? याची माहिती समस्त नागरिकांना देण्यासाठी भित्तिपत्रकं, व्याख्यानं व कार्यशाळांचा धडाका लावला. या मोहिमेत शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी सक्रिय झाले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शाळकरी मुलांकडून निवेदन स्वीकारून ‘हवा स्वच्छ करण्याची हमी’ दिली. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, त्यामधील निष्कर्षांशी सहमती दाखवू लागले. प्रसारमाध्यमांनी विषारी वायूंच्या विळख्याला ठळक प्रसिद्धी दिली. याची दाखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे न्या. कुलदीप सिंग यांनी ‘दिल्लीमधील हवेचे प्रदूषण रोखण्याचा’ आदेश दिला. ’सार्वजनिक वाहतूक सुधारण्याकरिता १ एप्रिल २००१ पर्यंत दहा हजार नव्या बसेस रस्त्यावर आणाव्यात. बसेस, तीनचाकी रिक्षा व चारचाकी टॅक्सी नैसर्गिक वायूवर चालवाव्यात. कालबाह्य व प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी’ असं त्या आदेशात म्हटलं होतं. त्यामुळे दिल्लीतील डिझेल वाहनं बंद करून नैसर्गिक वायूचा वापर सुरू झाला होता. परंतु त्यानंतर दिल्लीत सार्वजनिक वाहतूक यंत्रणा प्रभावी न झाल्याने खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढतच गेली. तसेच औष्णिक वीज प्रकल्पही विस्तारत व वाढत गेले. आता अग्रवाल असते तर त्यांनी हवाप्रदूषणाला ‘सुपरफास्ट मर्डर’ म्हटलं असतं.
जगभरात विषारी हवा हा ‘दोष ना कोणाचा !’ असंच वातावरण प्रदीर्घ काळापासून आहे. त्याविरोधात लंडनमधील एका झुंझार आईनं शर्थीचा लढा दिला. गरिबीनं ग्रासलेल्या अतिप्रदूषित वस्तीत राहणाऱ्या लंडनच्या एला अडू किसी देब्रा या नऊ वर्षांच्या मुलीला दम्याच्या विकारानं ग्रासलं. तिला तीन वर्षांत २७ वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. २०१३ साली ती गेली. एलाची आई रोसामंड यांनी ‘माझ्या मुलीचा आजार व मृत्यू यासाठी स्थानिक प्रदूषणच जबाबदार आहे’ असा आरोप करून लंडनच्या न्यायालयात दाद मागितली होती. मात्र २०१८ मध्ये ‘दम्यामुळे श्वसनयंत्रणा निकामी होऊन एला दगावल’’ असा निकाल देऊन खटला संपवला होता. त्याने रोसामंड खचल्या नाहीत. त्यांनी डॉक्टर, वैज्ञानिक, संशोधन संस्था, वकील व स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने सज्जड पुराव्यानिशी नव्यानं आरोपपत्र दाखल केलं. परिणामी २०२० च्या डिसेंबरमध्ये एलाच्या मृत्यू प्रमाणपत्रात बदल करून त्यामध्ये ‘दूषित हवेमुळे एलाचा मृत्यू झाला’ असं स्पष्टपणे नमूद केलं गेलं. त्यानंतर ब्रिटनच्या न्यायालयानं ऐतिहासिक निर्णयातून ‘विषारी हवेस स्थानिक प्रशासनाला जबाबदार’ ठरवलं. (‘लोकरंग’ २० डिसेंबर २०२०) पुढे न्यायालयाने ‘एला ही हवेच्या प्रदूषणाची बळी आह’’ असं घोषित केलं. जगाच्या इतिहासात प्रथमच हवा प्रदूषणाचा बळी व त्याची जबाबादारी ठरविण्याचा निवाडा झाला. (‘लोकरंग’ ९ मे २०२१) रोसामंड यांनी ‘एलाच्या अकाली मृत्यूच्या भरपाई’पोटी दोन लाख ९३ हजार पौंड रकमेचा (तीन कोटी तेरा लाख रुपये) दावा केला होता. २०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात ब्रिटन सरकरने समझोता करताना, रोसामंड यांना नुकसानभरपाई म्हणून अघोषित रक्कम दिली आहे. त्यातून रोसामंड यांनी ‘द एला रॉबर्टा फाउंडेशन’ची स्थापन केली आहे. त्या देश-विदेशात जाऊन सांगत आहेत, ‘स्वच्छ हवेत श्वास घेता येणं हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. तो त्याला मिळालाच पाहिजे. मुलाचा वर्ण, वंश, वर्ग व स्थळ या बाबींमुळे त्यात यत्किंचितही फरक पडता कामा नये.’
आपल्याकडे हवा प्रदूषणाबाबत अनेक अहवाल, संशोधनं, निष्कर्ष व धोक्याचे इशारे सतत येत राहतात. न्यायालये ताशेरे ओढतात. प्रदूषणाचं क्षेत्र व प्रमाण कमी न होता वाढतच जातं. एकेक बळी जात राहतात. अशा गुदमरवून टाकणाऱ्या हवेत आपली पुढची पिढी दिवस व दम काढत आहे. कल्पित लेखकांना ‘ही पिढी भविष्यात घराला व वाहनांना खास ऑक्सिजन पुरवठा करून घेईल. घराबाहेर पडल्यावर नाकाला ऑक्सिजनची नळी लावेल.’ असं वाटतं.
तात्पर्य : आपल्या देशातील अविरत ‘वायुकांड’ आपल्याच आबालवृद्धांना ‘काळ्या हवेची शिक्षा’ व ‘रोगट आयुष्याची जन्मठेप’ देत आहे.
पर्यावरण अभ्यासक
atul.deulgaonkar@gmail.com