मिलिंद मुरुगकर

अलीकडेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सामाजिक भेदभावाबद्दल एक अत्यंत स्वागतार्ह विधान केले. दुर्दैवाने आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने त्या विधानावर केलेल्या टीकेमुळे मोहन भागवतांच्या विधानाची गंभीर चर्चा शक्यच झाली नाही. ती आवश्यक आहे. आणि त्या चर्चेच्या केंद्रस्थानी समता आणि समरसता या शब्दातील भेद आहे.

usa president donald Trumps policies could also have economic impact Indian
ट्रम्प यांच्यामुळे भारतीय लोकांचा खिसा हलका होणार?
Mumbai municipal corporation election
महायुतीचे वर्चस्व मुंबई महापालिकेतही टिकले तर?
milind murugkar article on ladki bahin yojana and impact on maharashtra election result 2024
‘लाडकी बहीण’ला प्रत्युत्तर देण्याला अडथळा कोणाचा?
Chandu Patankar, cricketer, Senior cricketer Chandu Patankar ,
तेव्हा कसोटी खेळणाऱ्याला प्रतिदिन ५० रुपये मिळत… आठवणी एका ज्येष्ठ कसोटीपटूच्या
National Institute of Nutrition, Dietary Guidelines,
‘योग्य तेच खा’ सांगणारे धोरण अपुरे…
voting compulsory, Citizens who do not vote, vote,
मतदान न करणाऱ्यांना शिक्षा हवीच! हक्क बजावणे बंधनकारकच हवे!
mahavikas aghadi
‘संविधान बचाव’ आणि ‘गद्दारी’ कालबाह्य?
environmentally sustainable alternatives sustainable
पर्यावरणातील शाश्वत पर्याय खरोखरच शाश्वत आहेत का?

समता हा शब्द उच्चारला की अनेकांच्या मनात साम्यवाद किंवा समाजवाद येतो. पण तसे आकलन पूर्णतः चुकीचे आहे. समतेचे मूल्य व्यक्तिप्रतिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य या गोष्टीना केंद्रस्थानी ठेवते. साम्यवादात आर्थिक विषमतेचा मुद्दा केंद्रस्थानी असतो.

समाज व्यक्तींचा बनलेला असतो हे खरेच. पण प्रत्येक व्यक्ती ही अनन्यसाधारण (युनिक) असते आणि तरीही प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी समान प्रतिष्ठा असते हे मूल्य मानणे म्हणजे समतेच्या मूल्याचा स्वीकार करणे. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी समान प्रतिष्ठा असल्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीला तिच्यातील क्षमतेचा विकास करण्याची समान संधी देणारी व्यवस्था निर्माण करण्याचा सदोदित प्रयत्न करत राहणे हे समाज म्हणून सर्वांचे कर्तव्य असते अशी ही विचारसरणी.

समता या शब्दाचा समरसता या शब्दाशी काहीही संबंध नाही. सामूहिक कृती करण्यासाठी व्यक्तींनी विशिष्ट कार्याशी समरस होणे ही पूर्णतः वेगळी गोष्ट आहे. समरसतेचे समूहाशी अविभाज्य असे नाते असते. नाही तर व्यक्तींनी समरस कोणाशी व्हायचे ? कारण संघ ही एक सामाजिक संघटना आहे आणि त्याचे ध्येय समरसतावादी समाज निर्मिती हे आहे. समतावादी समाजनिर्मिती हे संघाचे ध्येय नाही. म्हणून संघ समतेच्या ऐवजी समरसता हा शब्द वापरतो. समता या शब्दाचा संघाला अडथळा का वाटतो ? किंवा हा शब्द संघाला अनावश्यक का वाटतो?

समरसतावादी भूमिकेत प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान प्रतिष्ठा असते या मूल्याला तत्त्वतःच नकार असतो. तसा नकार दिल्याखेरीज समरसता अशक्य असते. प्रत्येक व्यक्तीने समूहाशी समरस व्हायचे असते. आणि समूहाशी समरस होणे म्हणजे कोणत्या तरी श्रेणीबद्ध व्यवस्थेशी समरस व्हायचे असते. पण आधुनिक काळात उदयाला आलेली समतावादी विचारसरणी मात्र जोपर्यंत व्यक्ती इतरांना बाधा पोहचवणारी कृती करत नाही तोपर्यंत तिच्या स्वातंत्र्यावर कोणतेही बंधन असू शकत नाही असे मानते. आज आपल्याला युरोप अमेरिकेची जी प्रगती दिसते त्यात या समतेच्या, व्यक्तिप्रतिष्ठेच्या मूल्याचे मोठे योगदान आहे.

पण संघाला प्रिय असलेले समरसतेचे मूल्य हे व्यक्तीला दुय्यम स्थान देते. संघाच्या दृष्टीने समूह महत्वाचा, व्यक्ती दुय्यम. मग त्या समूहाला संघ हिंदू म्हणतो. आणि हिंदू म्हणजे नेमके कोण याची चर्चा करतो. संघ कधीही व्यक्तीचे स्वातंत्र्य, तिची प्रतिष्ठा या शब्दांचा उल्लेखदेखील करत नाही. खरे तर समाजातील सर्वात दुर्बल घटक कोण तर व्यक्ती. पण संघ समूहाच्या बाजूने असतो. संघ समूहवादी असतो. कारण तो समरसतावादी असतो. व्यक्तीने समूहाशी समरस व्हायचे असते. डॉ आंबेडकरांनी, ज्योतिराव फुले यांनी, शाहू महाराजांनी, आगरकरांनी या समरस होण्याच्या मागणीला नकार दिला. आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहिले. आगरकरांच्या कार्याला इतर तिघांच्या तुलनेत मर्यादा होत्या. पण तरीही या चौघांमध्ये एक समान धागा होता. तो म्हणजे हे चौघेही समाजसुधारक प्रबोधन युगाची अपत्ये होती. दिवंगत विचारवंत मे. पु. रेगे यांच्या शब्दात सांगायचे तर हे असे युग जिथे मानवी समाजाला समान व्यक्तिप्रतिष्ठेच्या मूल्याची स्पष्ट आणि स्थिर ओळख झाली.

आधुनिक काळात झालेली जाणीव अशी की व्यक्ती ही समाजातील सर्वात दुर्बल घटक असते आणि दुर्बल सामाजिक घटकातील व्यक्ती आणखीनच दुर्बल असते. अवाढव्य ताकद असलेल्या शासनव्यवस्थेसमोर व्यक्ती अगदीच अगतिक ठरते. म्हणून शासनावर अंकुश ठेवणाऱ्या मानवी हक्क आयोगासारख्या संस्था आधुनिक लोकशाही देशात फार महत्वाची भूमिका बजावतात. पण एव्हढा बलाढ्य संघ आपल्याला मानवी हक्काच्या क्षेत्रात काम करताना दिसत नाही. मानवी हक्क या संकल्पनेची चेष्टा करण्यात, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमधील विसंगती शोधण्यात संघ विचाराचे लोक आघाडीवर असतात. संघ समरसतावादी असल्यामुळे समाजातील बलशाली हितसंबंधांना धक्का पोचवणाऱ्या संघर्षात संघ कधीही दिसत नाही. ‘एक गाव एक पाणवठा’ ही सत्तरीच्या दशकातील मोहीम समतावादी डॉ. बाबा आढावच काढू शकतात, संघ नाही. कारण संघ समतावादी नाही. समरसतावादी आहे. स्त्रीमुक्ती, दलित मुक्ती, एलजीबीटीक्यू ही सर्व आंदोलने व्यक्तिस्वातंत्र्यवादी आंदोलने आहेत म्हणून ही समतावादी आंदोलने आहेत. समरसतेच्या मूल्याशी या आंदोलनांचा सांधा जुळूच शकत नाही.

हिंदू समाजातील जातीची उतरंड खूप चिवट आणि खूप भयानक आहे. ज्या दलित समाजाने खूप सोसले आहे आणि अजूनही हा समाज हे सोसतो आहे, त्याला या व्यवस्थेबद्दल कमालीची चीड असणे स्वाभाविक आहे. या समाजातील तरुण विचारवंतांची या व्यवस्थेविरुद्ध येणारी प्रतिक्रिया सवर्ण समाजाला कितीही त्रासदायक वाटली तरी ती त्याने खुल्या मनाने स्वीकारली पाहिजे. आपण खरे समतावादी असू तर या प्रतिक्रियेचा आपल्याला एव्हढा त्रास का होतो याचाच विचार केला पाहिजे.

पण संघाचा समरसतावाद तसे अविष्कार स्वातंत्र्य दलित समाजाला देऊच शकत नाही. सरसंघचालक आपण आपल्याच लोकांना मानवतेनेदेखील मान खाली घालावी असे वागवले, असे म्हणतात, तरी त्यांना खूप पूर्वी आपण तसे नव्हतो असे म्हणावे लागते. आणि इथेच दलित समाजाचे किंवा सामाजिक विषमता मान्य नसणाऱ्यांचे आविष्कार स्वातंत्र्य संकुचित होते. व्यवहारात समरसता या शब्दाचा अर्थ समाजातील सत्तासंबंधाच्या उतरंडीला शरण जाणे असाच बनतो. कारण समरसतावादी विचारसरणी कोणत्याही प्रकारच्या बंडखोरीकडे संशयाने बघते. आणि न्याय्य समाजनिर्मितीसाठी तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात व्यक्तीच्या बंडखोरीला मोकळा अवकाश आवश्यक असतो. तरच एखाद्या व्होल्टेयरचा आणि आंबेडकरांचा उदय शक्य असतो.

सरसंघचालकांच्या या विधानावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची तीव्र प्रतिक्रिया आली. ब्राह्मण महासंघाने म्हटले की “त्या काळी काही ब्राह्मणांनी चुका केल्या असतील तर ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी त्यांना विरोधही केला आहे. पण असे न म्हणता सरसकट ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याचं विधान मोहन भागवतांनी का करावे ?” मग मुळात सरसंघचालकांनी ब्राह्मण आणि पापक्षालन हे शब्द वापरले की नाही यावर वादंग झाले. मोहन भागवत यांचे पूर्ण भाषण वाचले तर ते कोणत्या जातीतील लोकांना हा सल्ला देत आहेत हे खरे तर स्पष्ट आहे. कारण शास्त्रांच्या आधारे जातीय विषमतेचे केले जाणारे समर्थन मोहन भागवतांना अमान्य आहे असे त्यांनी भाषणात स्पष्ट म्हटले आहे. आणि शास्त्राचा आधार घेण्याचा अधिकार असलेली एकच जात हिंदू धर्मात आहे. पण तो महत्वाचा मुद्दा नाही. (ज्या लोकांना आपण मानवतेने देखील मान खाली घालावी अशी वागणूक दिली असे मोहन भागवत म्हणतात त्यात ब्राह्मण आणि इतर उच्चवर्णीय देखील येतात). महत्वाचा मुद्दा असा की आज आपण पापक्षालन करायचे म्हणजे नेमके काय करायचे आणि आपण ‘समरसता’ हे मूल्य मानत असू तर खरोखर पापक्षालन घडणार तरी आहे का ? पापक्षालन म्हणजे इतिहासात शेकडो, हजारो वर्षे एका विशिष्ट समूहातील व्यक्तींवर झालेल्या अन्याय अत्याचारांबद्दल जाणीव, संवेदनशीलता बाळगणे. आणि त्या अन्यायाचे त्या समाजावर जे परिणाम झाले असतील, त्याच्या आज करायला लागणाऱ्या भरपाईलादेखील मनापासून तयार असणे.

ब्राह्मण महासंघ म्हणतो की ब्राह्मण समाजातील लोकांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध ब्राह्मण समाजातील लोकांनीच आवाज उठवला. हे खरे आहे, पण इथे ब्राह्मण महासंघ ही गोष्ट कदाचित सोयीस्करपणे विसरतो की असा आवाज उठवणारे कोणीच कधीही ब्राह्मण महासंघाचे सदस्य झालेच नसते. आपल्या जातीचा अभिमान बाळगणे हे त्यांना अतिशय हिणकस असेच मूल्य वाटले असते.

इथे ब्राह्मण महासंघाने घेतलेल्या दुसऱ्या एका भूमिकेचा मात्र आदर करू. सरसकट सर्व ब्राह्मणांनी पापक्षालन का करावे असा त्यांचा भागवतांना प्रश्न आहे. हा प्रश्न समतावादी भूमिकेतून येतो. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी समान अशी प्रतिष्ठा असते. व्यक्ती कोणत्या जातीत, धर्मात, वर्गात जन्मली आहे यावरून ती प्रतिष्ठा कमी जास्त होत नाही हे ते समतेचे मूल्य. हे मूल्य ब्राह्मण महासंघ मानत असेल तरच केवळ एखादी व्यक्ती ब्राह्मण जातीत जन्मली आहे म्हणून त्या व्यक्तीने आपल्या जातीत जन्मलेल्या इतर व्यक्तींनी केलेल्या अन्यायाबद्दल अपराधगंड का बाळगायचा हा त्यांचा प्रश्न रास्त आहे. कारण एखाद्या विशिष्ट जातीत जन्मणे किंवा न जन्मणे हा तर केवळ अपघात असतो. अशी समान व्यक्तिप्रतिष्ठेची समतावादी भूमिका ब्राम्हण महासंघ घेत असेल ती अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. ब्राह्मण महासंघातील कोणतीही व्यक्ती आपण या जातीत जन्मलो म्हणजे आपण इतर जातीतील कोणाहीपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहोत असेही अजिबात मानत नसेल हेदेखील यात ओघानेच येते. आणि असे असेल तरच त्यांना मोहन भागवतांच्या विधानावर आक्षेप घेता येईल.

(लेखक सामाजिक व आर्थिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

milind.murugkar@gmail.com