शिवानी वालदेकर
यावर्षी आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करतो आहोत परंतु आजही आंबेडकरवाद हा बहुदा नकारात्मक चर्चेचा विषय होतो ही मोठी खंत आहे आणि यामुळेच आंबेडकरवादाचे सखोल व तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास व चिंतन सध्याच्या परिस्थितीत नितांत आवश्यक आहे. आंबेडकरवाद (Ambedkarism) हा नावाप्रमांणेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, सिद्धातांवर आधारित एक तत्त्वज्ञान, जीवनप्रणाली किंवा विचारप्रणाली आहे, असे दिसून येते. तरीही, आंबेडकरवादाचा नेमका अर्थ काय हे समजून घेण भाग आहे, तत्पूर्वी आपणांस सर्वप्रथम ‘वाद’ या शब्दाची मुळे जाणून घेणे अगत्याचे आहे.

‘वाद’ म्हणजे काय?

कोणत्याही समाजात व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीनुसार आणि युगतत्त्वाशी भिडण्याच्या तत्त्वज्ञाच्या कुवतीनुसार वेगवेगळे दृष्टिकोन, भूमिका आणि वेगवेगळ्या प्रणाली तयार होतात, या प्रणालींनाच ‘वाद’ असे म्हटले जाते. जीवनासंबंधीचे सुसंगत, सुघटित चिंतन म्हणजे तत्त्वप्रणाली; तर जीवनासंबंधी निर्माण केले गेलेले अत्यंत प्रस्तुत्त आणि जबाबदार प्रश्न आणि त्त्यांच्या उत्तरांचा तेवढ्याच जबाबदारीने, गांभीर्याने आणि तलस्पर्शी जिज्ञासेने शोध घेणे म्हणजे ‘वाद’ (इझम) होय. सामान्यतः एखाद्या प्रभावी तत्त्ववेत्त्याच्या विचार, आचार आणि उच्चारातून प्रणाली जन्माला येतात. म्हणून ‘ any distinctive doctrine or practice ’ अशी इझमची अर्थात वादाची व्याख्या केली जाते. प्रत्येक वाद म्हणजे एक जीवनप्रणालीच हे खरे असले तरी प्रत्येक वादातून जीवनविकासाच्या नियमांची सम्यक जाणीव व्यक्त होतेच असे नाही. काही वाद अधोगतीकडे जाणारे स्थितीवादी प्रमाणमूल्यावर आधारित व केवळ मूठभरांच्या हिताची व्यवस्था करणारे, संकुचित असतात व म्हणून नकोसेही वाटतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ वाचून-समजून घेतल्यास कळेल की, प्रचलित हिंदू जीवनपद्धतीला- हिंदुइझमला- नकार देण्यामागची त्यांची कारणे काय होती. याउलट, बुद्धिझम (Buddhism) सर्व मानवास समता, करुणेची शिकवण देऊन नवीन व मानवी कल्याणास आवश्यक ते बदल करण्याची सोय उपलब्ध करून देतो, एवढी उदारता कोणत्याही वादात नाही. यातूनच असे दिसून येते की, जो वाद माणसाच्या कृतीचे मूल्यमापन करणाऱ्या आपल्या मूल्यांना सतत उजळा देतो, आपल्या प्रमाणमूल्यावरील धूळ झटकून टाकून त्यांना सतत प्रगतीसन्मुख करत राहतो आणि आवश्यक नव्या प्रमाणमूल्यांना जन्म देण्याचे सामर्थ्य बाळगतो तो वादच मानवी जीवनाला उपकारक ठरतो. जीवनाची नवनिर्मिती करणारा असा वादच समाजात कालांतराने लोकप्रिय होतो.

आंबेडकरवाद

वर अधोरेखित केल्याप्रमाणे आंबेडकरवाद हे एक मानवतावादी व विज्ञानवादी तत्त्वज्ञान असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगत विचारांचा जणू वारसाच आहे. आंबेडकरवादाचे सर्वात प्रमुख तत्त्व ‘समानता’ हे असल्यामुळेच भारत देशासह जगभरातील अनेक लोकांवर त्याचा प्रभाव असून समानतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मानावाचा त्यात समावेश होतो. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, धम्म, लोकशाही, महिलाधिकार, अहिंसा, सत्य, मानवता, विज्ञानवाद, संविधान ही आंबेडकरवादाची काही मुख्य तत्त्वे आहेत. या तत्वाचे शब्द आणि कृतीत पालन करणाऱ्यांस, मानव-मुक्तीचा मार्ग अनुसरणाऱ्यांना ‘आंबेडकरवादी’ (Ambedkarite) म्हणतात. डॉ. आंबेडकरांच्या दलित जाहीरनाम्यातून आंबेडकरवाद उफाळून येतो, जसा कम्युनिस्ट जाहिरनाम्यातून मार्क्सवाद आणि हिंद स्वराजमधून गांधीवाद उफाळलेला दिसतो.

आंबेडकरवाद ही जिवंत विचारसरणी आहे. आंबेडकरवाद हे वैचारिक सखोलतेचे शास्त्रीय विवेचनही आहे ज्यात सुसंवादाचा मार्ग मोकळा आहे. माणुसकीला व नैतिकतेला ज्यात प्राधान्य आहे तर अन्याय, असमानता व शोषणाची त्यात होळी आहे. आंबेडकरवादाने हजारो वर्षांच्या गुलामीला आगीत दहन करून मानवी मन मुक्त केलेले आहे. आंबेडकरवाद हे प्रेम, करुणा, मैत्रीचे घर आहे ज्यात संवाद व क्षमाशीलता यांचही वास्तव्य आहे आणि हा विचार वारसा आबेडकरांच्या वैचारिक पूर्वजांकडून (बुद्ध, कबीर, फुले) त्यांना लाभला आहे. आंबेडकरवाद सांगतो की, आपले तत्त्वचिंतन जीवनाच्या सर्वच अंगोपांगांचे सम्यक आकलन करणारे व्हावे आणि परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान करणारे ते असावे आणि सोबतच ते सर्वार्थानी मानवसमाजाला उपकारक व्हावे, ही आंबेडकरवादाची भूमिका आहे.

आंबेडकरवादाने ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म आणि परलोक या गोष्टींना स्पष्ट नकार दिला आहे. धर्म, धर्मविधी आणि माणसांच्या मेंदूंना गोठविणारी कर्मकांडे यांची संगत अत्यंत सावधगिरीने आंबेडकरवादाने तोडून टाकली आहे. लोक दुःखदैन्यात पिचत आहेत. तेव्हा दुःखांचा विनाश हाच आंबेडकरवादाचा जन्म हेतू आहे. इहजीवनातील दुःखे त्यांच्या कारणांपासून उद्भवतात आणि ती कारणे नष्ट झाल्याशिवाय परिणाम नष्ट होणार नाही हा ‘कार्य-कारण सिद्धान्त’ आंबेडकरवादाचा केंद्रबिंदू आहे. बुद्धिप्रामाण्यवाद आणि बंधुत्वाची नीती यांच्या संयोगातून न्यायाची कल्पना साकार होत असल्याने इतरांना ‘त्याने/तिने चांगले वागावे’ असे ज्यांना वाटते त्यांनीही इतरांशी चांगले वागायला हवे. इतरांवर अन्याय करणारी व्यक्ती इतर कुणाला न्याय मागण्याचा हक्क गमावून बसते. कारण, न्याय ही एकमार्गी वाहतूक नाही. म्हणून Be wise, be just असे आंबेडकरवाद सांगतो.

आंबेडकरवादाचे सांगणे असेही आहे की महापुरुषाने आपल्या अनुयायांवर वा कोणावरही आपले निर्णय लादू नयेत. महापुरुषाने लोकांना प्रेरणा द्यावी, त्यांना जागृत करावे, मार्गदर्शन करावे. अनुयायांनी आपल्या महापुरुषाने सांगितलेल्या तत्त्वांची नीट ओळख करून घ्यावी. या तत्त्वांचे मूल्य आणि महत्त्व त्यांना कळले तर त्यांनी त्या तत्त्वाचा प्रसार करावा. महापुरुषाचे गोडवे गाण्यापेक्षा हे करणे जास्त कठीण आहे; पण महत्त्वाचेही आहे. म्हणूनच आंबेडकरवाद मानसिक वैचारिक प्रबोधनाला महत्त्व देतो. आंबेडकरवादाचा असा ठाम विश्वास आहे की, परिवर्तन घडविता येते आणि मनाचे परिवर्तन हीच खरी क्रांती होय. त्यामुळे आंबेडकरवाद हे जिवंत आणि गतिमान तत्त्वज्ञान आहे असे दिसून येते.

कोणत्याही स्थलकालाशी निगडित प्रश्नांची उत्तरे काढण्याची पद्धती असे आंबेडकरवादाचे स्वरूप आहे आणि त्यामुळेच कदाचित आंबेडकरवाद हा अधीक लोकप्रिय व मानवाच्या मन, विचार आणि वृत्तीमधील परिवर्तनाची जननी आहे. त्यामुळेच महाकवी नामदेव ढसाळ त्त्यांच्या ‘गोलपिठा’ या काव्यासंग्रहतील ‘डॉ. आंबेडकर’ या कवितेत लिहितात, ‘जो दिग्विजयी तंद्रीतून आमच्यात उतरतो नि शेतातून गर्दीतून नि मोर्च्यातून नि लढ्यातून आमच्याबरोबर असतो नि आम्हाला शोषणातून सोडवतो तोच तू आमचा’.

आंबेडकरवादी संस्कृती

भारतामध्ये विसाव्या शतकात आंबेडकरवादी संस्कृती या नावाने एका देदीप्यमान संस्कृतीची निर्मिती झाली. या संस्कृतीला खास तिचे असे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहे, तत्त्वज्ञान आहे आणि एखादे सुंदर आणि आशयसंपन्न शिल्प असावे तसे रूपही या संस्कृतीला आहे. ‘संस्कृती या शब्दात कृ हा मूळ धातू असून त्याचा अर्थ करणे असा आहे. कृ पासून बनलेल्या ‘कृती’ या शब्दाला सम हा उपसर्ग लागून संस्कृती हा शब्द तयार झाला…’अशी संस्कृतीची व्याख्या भारतीय संस्कृती कोशाच्या नवव्या खंडात दिली आहे. लेखिका इरावती कर्वे यांनी ‘मनुष्यसमाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी, पण विचारांना आकलन होणारी मनोमन सृष्टी म्हणजे संस्कृती.’ यावरून असा निष्कर्ष काढता येतो की एखाद्या समाजाची जगण्याची पद्धती म्हणजे त्या समाजाची संस्कृती होय. समाजाची संस्कृती त्या समाजातील माणसांच्या वागण्या-बोलण्यातून साकार होत असते. आंबेडकरवादी संस्कृती ही प्रगतिशील, मानवताप्रेमी, समताप्रेमी व न्यायप्रेमी आहे. आंबेडकरवादात मुक्तपणे विचार करण्याचे स्वातंत्र आहे आणि त्यामुळेच प्रत्येक मुक्त मनास हा विचार हवाहवासा आहे. आंबेडकरवादी संस्कृती ही प्रत्येकास ज्ञानासाठी धडपडण्यास प्रेरित करते. आंबेडकरवादी संस्कृती ही निर्जात (casteless) संस्कृती असून यात माणसाची मने सुसंस्कृत होतात, असे मला वाटते.

थोडक्यात, आंबेडकरी संस्कृती ही लोकशाहीची जोड असलेली, मानवी मन चेतन करून त्यात माणुसकी निर्माण करणारी, प्रेम-मैत्री-करुणा या त्रिसूत्रींनी बांधलेली एक उत्कृष्ट अशी मानवी जीवन जगण्याची सुंदर कलाच आहे. म्हणूनच कवी सुरेश भट बाबासाहेबांना आदरांजली वाहताना म्हणतात,

‘‘कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे,

तू दिलेले पंख हे, पिजंरे गेले कुठे,

या भराऱ्या आमुच्या, ही पाखरांची वंदना,

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.”

लेखिका द युनिव्हर्सिटी ऑफ एडिन्बर्ग (स्कॉटलंड, यू. के.) या विद्यापीठातून सामाजिक व राजकीय विज्ञान विषयात पोस्टग्रॅज्युएट आहेत.

shivani.k.waldekar@gmail.com

(समाप्त)