भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘डॉ. आंबेडकर : द मॅन हू शेप्ड इंडियाज डेमोक्रॅटिक रिपब्लिक’ हे पुस्तक २०२४ मध्ये प्रकाशित झाले. ब्रिटिश अमलाखालील भारताच्या घटनात्मक सुधारणांच्या प्रक्रियेत डॉ. बाबासाहेबांचे योगदान असून संविधानसभेपुढे राज्यघटनेचा मुसदा मंजूर करून घेण्याची कठीण जबाबदारी त्यांनी पार पाडली; तरीसुद्धा बाबासाहेबांची ओळख दलितांचे नेते अशीच ठसवण्यात आली, याची बोच लेखकाला आहे. भारताचे लोकशाही प्रजासत्ताकात रूपांतर करण्यात बाबासाहेबांच्या भूमिकेचे यथार्थ दर्शन घडवण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे लेखकाने नमूद केले आहे.

डॉ. नरेंद्र जाधव यांची ४४ पुस्तके प्रकाशित आहेत; त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरच मराठी, हिंदी, इंग्रजीत मिळून २४ पुस्तके आहेत. बाबासाहेबांवरील या नव्या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे एकाच वेळी ते मराठी आणि इंग्रजीत आले आहे. इंग्रजीत दिल्लीच्या ‘कोनार्क’ प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले हे पुस्तक पाच भागांत आहे. पहिल्या भागात डॉ. आंबेडकर यांचे बालपण ते शिक्षणाचा प्रवास सांगताना, बाबासाहेबांना आलेले अस्पृश्यतेचे दाहक अनुभव आणि त्याचा त्यांच्या भूमिका निर्माण होण्यावर झालेला परिणाम लेखकाने मार्मिकपणे नोंदवला आहे.

कोलंबिया विद्यापीठाला आणि ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ला बाबासाहेबांनी जे शोधप्रबंध सादर केले, त्या प्रबंधांच्या मार्गदर्शकांनी लिहिलेल्या प्रस्तावनांचे काही संदर्भ डॉ. जाधव नोंदवतात. मायदेशातील घडामोडींचे डॉ. आंबेडकर यांनी केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषण अर्थशास्त्राला त्यांनी दिलेले मौल्यवान योगदान आहे, ही कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रा. एडविन सेलिग्मन यांची यापैकी एक टिप्पणी. एकाच वेळी बाबासाहेबांचा जीवनप्रवास आणि त्या संदर्भातले पूरक लेखन या पुस्तकात पानोपानी दिसते.

१९१३ मध्ये बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले, तेव्हा तेथे कृष्णवर्णीयांचे आंदोलन धुमसत होते. अमेरिकेतली गुलामगिरी आणि भारतातील अस्पृश्यता यांची बाबासाहेबांनी चिकित्सा केली. अस्पृश्यता ही अप्रत्यक्ष गुलामगिरी असून ती अनिवार्य बाब असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते कसे आले, याची हकिकत यामध्ये नमूद आहे. बाबासाहेबांच्या मनात प्रजासत्ताकवादाचे बीजारोपण या वास्तव्यात झाल्याचा लेखकाने निष्कर्ष काढला आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ विल्यम गॅरिसन, बुकर टी. वॉशिंग्टन, विल्यम डुबॉइस, एडमंड बर्क, जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंतांचे विचार बाबासाहेबांनी कुठे, कुठे उद्धृत केले याची संगतवार माहिती डॉ. जाधव देतात.

राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचे योगदान हे केवळ ते राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यापासूनच असल्याचे म्हणणे गैर असल्याचे लेखक अनेकदा बजावतो. बाबासाहेबांनी उभारलेल्या पददलितांच्या मुक्तीच्या लढ्यांचीही नोंद त्यांच्या संविधान-कार्याच्या दृष्टीने तितकीच महत्त्वाची आहे. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, भीमा कोरेगाव युद्धस्मारकाला भेट, महाडचा तळे सत्याग्रह, विविध मंदिरप्रवेशांचे सत्याग्रह आदी लढ्यांमधून लोकांच्या राज्याची, प्रजासत्ताकाची संकल्पना दृग्गोचर झाल्याचा लेखकाचा दावा आहे.

भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेशी, संविधान संमत होण्याआधीची किमान ५५ वर्षे चाललेल्या लढ्यांतून बाबासाहेब अविभाज्यपणे जोडले गेले होते, हे प्रतिपादन या पुस्तकातली नवी उपलब्धी म्हणावी लागेल. तसेच लोकमान्य टिळकांच्या काळात १८९५ च्या स्व-राज्य विधेयकाची निर्मिती हा भारतीय स्वरूपाची राज्यघटना तयार करण्याचा पहिला प्रयत्न होता, असे धाडसी मत लेखकाने नोंदवले आहे. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड होण्यापूर्वी बाबासाहेबांनी राज्यघटनेची अनौपचारिक प्रत तयार केल्याची व त्यातील कलमांची माहितीही इथे मिळते.

अस्पृश्यांसाठी स्वतंत्र की राखीव मतदारसंघ असावेत हा भारतीय अकादमिक चर्चाविश्वातील सनातन वाद आहे. त्याचाही समाचार लेखकाने जागोजागी घेतला आहे. मुस्लीम आणि शिखांना त्या वेळी स्वतंत्र मतदारसंघ बहाल करणारी काँग्रेस दलितांची मात्र राखीव मतदारसंघावर बोळवण करत असल्याबाबत बाबासाहेबांनी विचारलेले सवाल अंतर्मुख करणारे आहेत. ‘‘स्वतंत्र मतदारसंघांशिवाय अस्पृश्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही,’’ हे बाबासाहेबांचे विचार काळाच्या कसोटीवर उतरलेले आज आपण पाहत आहोत. राखीव मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ यांविषयीचे समज-गैरसमज हा ग्रंथ बऱ्यापैकी दूर करतो. या ग्रंथात याविषयी परिशिष्ट आहे.

पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे बाबासाहेबांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात घेण्यास राजी नव्हते. पण राष्ट्रउभारणीच्या कार्यात बाबासाहेबांचे योगदान महत्त्वाचे असल्याने महात्मा गांधी यांनी आग्रह धरल्याची माहिती पुराव्यासह लेखकाने नोंदवली आहे. पत्रकार अरुण शौरी यांनी बाबासाहेबांना ‘खोटा मनू’ ठरवण्याचा केलेला प्रयत्न आणि हिंदू कोड बिलप्रकरणी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांची माघार या विषयांची झाडाझडती लेखकाने चांगलीच घेतली आहे.

या ग्रंथात आक्रमक बाबासाहेब उमगतील. अस्पृश्यता, तिचे मूळ, त्यामुळे समाजरचनेला आलेली अवकळा आणि ती संपवण्याचे मार्ग… यांविषयीचे बाबासाहेबांचे उतारेच्या उतारे यात आहेत. ग्रंथाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे याच्या तळटिपा. जवळपास प्रत्येक पानावर तळटीप आहे. त्यामुळे माहितीचा खजिना आणि त्याच्या किल्ल्याही वाचकांना उपलब्ध होतात. या तळटिपा बाबासाहेबांचे लेखन आणि भाषणे या खंडांपुरत्या नाहीत, त्या अन्य (सुमारे ७५) ग्रंथांच्या आहेत. काही टिपा संकेतस्थळाच्या आहेत.

अमेरिकेच्या राज्यघटनेने तिच्या नागरिकांना ३५ प्रकारचे अधिकार दिले तर भारताच्या राज्यघटनेने ४४ प्रकारचे अधिकार दिले. १७८९ नंतर अस्तित्वात आलेल्या विविध राज्यघटनांचे सरासरी आयुष्यमान १७ वर्षे आहे. तुलनेत भारताच्या राज्यघटनेने ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. पाकिस्तानने आजपर्यंत तीन वेगवेगळ्या घटना स्वीकारल्या आणि घटनाबाह्य राजवटी सत्तेवर असण्याचा तिथला कालावधी मोठा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या १२ देशांपैकी तीन देशांच्या राज्यघटना अस्तित्व टिकवून आहेत. हे देश म्हणजे तैवान, दक्षिण कोरिया आणि भारत. याकडे लेखकाने अंगुलिनिर्देश केला आहे.

भारतीय प्रजासत्ताकाच्या प्रदीर्घ आणि संघर्षपूर्ण वाटचालीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यभागी असल्याचे सांगण्यात हा ग्रंथ यशस्वी ठरला आहे. ‘भारतीय प्रजासत्ताक साकार करणारा महामानव’ हे आंबेडकरांचे स्थान स्वीकारा… ही या ग्रंथाची हाक आहे.

डॉ. आंबेडकर : द मॅन हू शेप्ड इंडियाज डेमोक्रॅटिक रिपब्लिक’

लेखक : डॉ. नरेंद्र जाधव,

प्रकाशक : कोनार्क पब्लिशर्स, दिल्ली,

पृष्ठे : २६४किंमत : १२९९ रु.

ashok.adsul@expressindia.com

बुकलेट

अबुजाचा पुस्तकअजुबा…

नायजेरिया या देशावरदेखील ब्रिटिशांचेच राज्य होते. तो ऑक्टोबर १९६० मध्ये भारतासारखा स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षणाची आणि शासनव्यवहाराची प्रथम भाषा इंग्रजी निवडली. भाषेबाबत देशी आणि इंग्रजीची सरमिसळ संस्कृती नाकारल्याने आज आफ्रिकेतील सर्वाधिक श्रीमंत अर्थव्यवस्था याच देशाची आहे. दरडोई उत्पन्नात भारतापेक्षा केवळ ११ अंकांनी मागे असले, तरी कला-संस्कृती आणि साहित्यात जी आफ्रिकन निर्यात होते, त्यात नायजेरिया आघाडीवर आहे. किमान डझनभर आंतरराष्ट्रीय लेखक या देशाने का दिले, त्याचा धांडोळा अबुजा शहरातील या ग्रंथदालनातून घेता येईल. लागोसमधील पुस्तक दुकानांचेही यूट्यूबवर तपशील सापडतील. पण हरखून जाण्यासाठी हा दृश्य-तपशील पुरे.

https:// tinyurl. com/5 y547 ukz

चार पिढ्यांतील बुकर्स...

चिन्वा अचेबी ते चिगोझी ओबियामा असे ९० एक वर्षांच्या काळात बुकरसाठी नामांकित झालेले नायजेरियन लेखक बरेच. अचेबी यांना २००७ साली मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला, तर बेन ओक्री यांना १९९१ साली बुकर. नव्वद वर्षांत या देशाने घडविलेल्या साहित्यिकांबद्दल थोडी अधिकची माहिती ‘बुकर’ पारितोषिकाच्या संकेतस्थळावरील ‘लाँग रिड’ विभागात वाचायला मिळेल.

https:// tinyurl. com/ mr6 cbzuu

उत्सुकता वाढविणारा लेखक...

ए. इगोनी बॅरेट या लेखकाच्या उपलब्ध ऑनलाइन कथात्मक किंवा अकथनात्मक लेखनापैकी कोणतेही सुरू करा, थांबवून किंवा दुर्लक्षून पुढे जाता येणार नाही. लागोसच्या शहरगावांतून किंवा इतर उपनगरांमध्ये घडणाऱ्या भारतीय लेखकांच्याच समकालीन कथा वाचत आहोत, असे वाटेल. एका कथेत भारतीय मालक असलेल्या सुपर मार्केटमधील दुजाभावाची घटना सापडेल. तर एका कथेत शकीरा या गायिकेच्या गाण्यांनी वेड्या झालेल्या मुलीची गोष्ट. हा दहा वर्षांपूर्वीचा ‘आय वॉण्ट टू बी अ बुक’ लेख त्या वर्षी प्रचंड गाजलेला. एक कादंबरी आणि दोन कथासंग्रह नावावर असलेल्या या लेखकाच्या मुबलक उपलब्ध मुलाखती आणि कथांविषयी या वाचनातून उत्सुकता वाढेल.

https:// tinyurl. com/5 n8 dape9