ज्युलिओ एफ. रिबेरो

या दोघींपैकी एक माझ्या परिचयाची आहे, तर दुसरीला मी कधीही भेटलेलो नसूनही, मला तिचे व्यक्तिमत्व आवडते. या दोघीही सडेतोड बोलणाऱ्या, संघर्षशील स्वभावाच्या आहेत. त्या कुणाचे उगाच ऐकून घेणाऱ्या नाहीत. या दोघींची नावे गेल्या दोन आठवड्यांत बातम्यांमधून वारंवार आली, पण दुसरीचे नाव काही चांगल्या कारणासाठी आलेले नाही, हेही नमूद करावे लागेल.

navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Kushal Badrike
“कवीने संसारात अडकू नये…”, कुशल बद्रिकेने शेअर केला पत्नीबरोबरचा व्हिडीओ; श्रेया बुगडे कमेंट करीत म्हणाली…
A hoax bomb threat, Bharati Vidyapeeth medical college
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल
loksatta readers feedback
लोकमानस: विकासापेक्षा भावनांचे राजकारण सोपे

पण दोघींपैकी मला परिचित असलेली भारतीय पोलीस सेवेत माझ्यानंतर अनेक वर्षांनी आलेली अधिकारी म्हणजे मीरान चढ्ढा बोरवणकर. पंजाबच्या राज्यपालांचा सल्लागार या पदावर मी कार्यरत असताना मीरान चढ्ढा यांचे वडील पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते आणि सरकारी घरबांधणी योजनांपैकी जे घर त्यांना लॉटरी पद्धतीने मिळाले होते ते दुसऱ्या मजल्यावर होते. आजारी, वृद्ध असल्याने वडिलांना जिने चढता येत नाहीत, सबब तळमजल्यावरील घर त्यांना मिळावे अशी विनंती मान्य होईल का, हे विचारण्यासाठी त्या आल्या होत्या आणि त्यासाठी त्यांना माझी मदत हवी होती. मी माझ्याच्याने होईल तेवढे केले, पण काम झाले. मग मीही निवृत्त झालो, मुंबईत राहू लागलो आणि तेव्हा मीरान पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणून सातारा या राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात रुजू झाल्या. या जिल्ह्यातील एका समारंभाला मी उपस्थिती लावावी, अशी विनंती एकदा त्यांनी केली आणि पुणे ते सातारा अशी जा-ये करण्यासाठी गाडीही पाठवली. येता- जाता दोन्ही गाड्यांचे पोलीस-चालक ‘मॅडम एसपीं’बद्दल आदराने बोलत होते. ज्यांचे मनापासून ऐकावे असे नेतृत्व त्या करत आहेत, अशा निष्कर्षापर्यंत मी आलो.

पुढे काही वर्षांनंतर त्यांना महानिरीक्षक पद देऊन मुंबई शहर गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पाठवण्यात आले, तेव्हा माझ्याकडे त्या आशीर्वाद मागण्यासाठी आल्या होत्या. मी त्यांना सल्लाही दिला. या शहरातले अनेक पोलीस अधिकारी तेव्हा ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’, चकमकफेम म्हणवून घेण्यात धन्यता मानत होते आणि ते सारे गुन्हे शाखेत होते. ‘या स्पेशालिस्टांपासून विभागाला मुक्त करा’ हा माझा सल्ला होता आणि तो पाळलाही गेला. अर्थात त्याच वेळी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अनामी रॉय यांनीही तेव्हा अशाच प्रकारच्या सूचना दिल्या होत्या, हे मी नंतर ऐकले. त्या वेळी मात्र मला अनामी रॉय यांच्या सूचनांबद्दल काही माहीत नव्हते.

मीरान यांना सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये भाषणासाठी अनेक निमंत्रणे येत. विशेषत: स्त्रियांशी, महिला-सक्षमीकरणाशी संबंधित कार्यक्रमांसाठी अधिक. ‘एक प्रामाणिक, सक्षम आणि निष्पक्ष पोलीस अधिकारी,’ ही त्यांची ख्याती त्यांची जिथे जिथे नियुक्ती झाली तिथे आधीच पोहोचलेली असे. पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी ठसा उमटवला होता. पुणे हे त्यांच्या पतीचे मूळ गाव होते, ते (अभय बोरवणकर) हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, पण त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेऊन उत्पादन युनिट सुरू केले.

मीरान यांनी अलीकडेच त्यांच्या पोलिसी कारकीर्दीची कहाणी प्रकाशित केली आहे. शरद पवार यांचे पुतणे आणि काकांशी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांसह फारकत घेऊन भाजपला साथ दिल्यानंतर राज्याचे एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी गृहमंत्री पदावर असताना, पोलीस खात्याच्या मालकीच्या भूखंडाच्या विक्रीसाठी आग्रह कसा धरला आणि हा भूखंड एका वादग्रस्त बिल्डरकडे कसा गेला, हे सांगणाऱ्या एका प्रकरणामुळे या पुस्तकाबद्दल राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.

त्या भूखंड विक्रीचा व्यवहार मीरान यांच्या आधी हे पद सांभाळणाऱ्यांच्याच कार्यकाळात मार्गी लागला होता. पण प्रत्यक्ष ताबा द्या असे जेव्हा मंत्रीमहोदयांनी सांगितले तेव्हा मीरान यांनी, पोलिसांच्या निवासासाठी जमीन तातडीने आवश्यक असल्याचे कारण देऊन ताबा देणे नाकारले. ती जमीन विकण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती मीरान चढ्ढा बोरवणकर यांनी सरकारला केली, त्यामुळे मंत्र्यांची नाराजी ओढवली. त्यामुळे मीरान यांना पुण्यातील त्यांच्या आवडीच्या पोस्टिंगला मुकावे लागले, पण तत्त्वाग्रह त्यांनी कायम राखला.

दुसऱ्या महिलेबद्दलही मी लिहिणार आहे. मोहुआ मोइत्रा या तृणमूल काँग्रेसच्या फटकळ आणि झुंजार लोकसभा सदस्य. पश्चिम बंगालमधील कृष्णनगर हा त्यांचा मतदारसंघ. या मोहुआ मोइत्रांवर सध्या, लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका प्रख्यात बांधकाम-व्यवसायिकाकडून पैसे घेतल्याचा आरोप होतो आहे. कथित लाच ज्याने दिली, त्या बांधकाम-व्यवसायिकाचे मुख्यालय दुबईत आहे. तसेच हे प्रश्न ज्यांच्या विरुद्ध विचारण्यासाठी लाच दिली गेली, ते म्हणजे अदानी- भारतातली दुसऱ्या क्रमांकाची धनिक व्यक्ती आणि भाजपशी कथित लागेबांधे असणारे म्हणून अदानी ओळखले जातात. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता अगदी अबाधित असताना मोदींना अडचणीत आणण्यासाठी अदानींच्या व्यवहारांबद्दलचे प्रश्न मोहुआ मोइत्रा विचारत होत्या. अदानींबद्दलचे सत्य काय, याचा पिच्छा मोइत्रा यांनी पुरवला. बांधकाम-व्यवसायिक हिरानंदानी यांनी अदानींंबद्दलच्या व्यावसायिक असूयेतून मोइत्रांना मदत पुरवली असावी, अशी एक शक्यता आहे. मात्र मोइत्रा स्वत: हिरानंदानी यांचा उल्लेख ‘चांगले मित्र’ असा करतात आणि हेच हिरानंदानी, मोइत्रांची परदेशातील वा कधीकधी दिल्लीतील हाॅटेल बिले, अन्य खर्च आपणच करत असू असे लोकसभेच्या नीतिमत्ता समितीपुढे शपथपत्रात सांगतात. ते शपथपत्र लगोलग माध्यमांकडे पोहोचते.

हिरानंदानींनी माेइत्रा यांना असा दगा का दिला असावा, असे विचारले असता त्या म्हणतात की हें सारे ‘पीएमओ’च्या – पंतप्रधान कार्यालयाच्या- सांगण्यावरून होत असावे. राज्ययंत्रणेच्या पाशवी सामर्थ्यापुढे काहीच चालले नसावे. पण लाचेच्या बदल्यात लोकसभेत प्रश्न विचारल्याची मोईत्रा यांच्या विरोधातील तक्रार सभापतींकडे आणि संसदेच्या नीतिमत्ता समितीकडे कशी पोहोचली? या प्रश्नावर मोइत्राने विभक्त झालेल्या प्रियकराकडे बोट दाखवतात आणि त्याने बदला घेण्याचा प्रयत्न केला असावा, असे म्हणतात. हा माजी प्रियकर सर्वोच्च न्यायालयात वकील आहे, त्याने भाजपच्या एका खासदाराशी संपर्क साधला आणि खासदाराने हा विषय सभापतींकडे मांडला.

मोहुआ मोइत्रांसाठी ही परिस्थिती कठीण दिसते आहे. त्यांच्या पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी याही काहीच बोलत नाहीत. दुसरीकडे, मोइत्रा विचलित झालेल्या दिसत नाहीत, त्या लढल्याशिवाय राहाणार नाहीत. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे, त्या झुंजार आहेत. न्यायालयात अलीकडे लागलेल्या काही निकालांनी विवाहित जोडीदाराचे अधिकार लिव्ह-इन भागीदारांना दिले आहेत. मोहुआ मोइत्रा हे सिद्ध करू शकल्या की तक्रारदार हा त्यांचा लिव्ह-इन पार्टनर होता (या दोघांचा पाळीव कुत्रा ‘हेन्री’ याचा ताबा आता कुणाकडे असावा यावरून सध्याचे भांडण आहे), तर अशा व्यक्तीने ते एकत्र असताना तिच्याकडून कायकाय समजले होते याच्या आधारे तिच्याचविरुद्ध तक्रार करणे हे कितपत विश्वासार्ह मानायचे, असा कायदेशीर प्रश्न निर्माण होतो.

चिडलेल्या माजी प्रियकरानेच भाजपला माहिती दिली, हे आता उघड आहे. सत्ताधारी पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांना, ‘हिरानंदानी हे मोइत्रांना अदानींविरुद्ध प्रश्न विचारण्यासाठी सर्व सामग्री देत होते’ असे या ‘माजी’ व्यक्तीने सांगितलेले आहे. खासदार मोइत्रा यांनी स्वत:चे लोकसभेचे लॉग-इन तपशील आणि पासवर्ड हिरानंदानी यांना दिला होता, यासाठी मोइत्रांना सज्जड तंबी मिळणारच, याची खात्री आहे. पण मुख्य आरोप आहे तो ‘प्रश्नांसाठी पैसे घेतले’ हा. अर्थातच, दर्शन हिरानंदानी यांच्या प्रतिज्ञापत्रात, प्रश्नांसाठी पैसे दिले गेल्याचा स्पष्ट उल्लेख कुठेही नाही, परंतु मोइत्रांसाठी आपण भरीव खर्च कसा आणि का केला याचा मात्र तपशील आहे – त्याचा खुलासा मोइत्रा कसा करणार आहेत?

संसदेत प्रश्न विचारण्याच्या मोबदल्यात पैसे घेतल्याबद्दल अनेक खासदारांवर आरोप झालेले आहेत. आताही हा खेळ खेळणारे इतर अनेकजण असतील. फरक इतकाच की मोहुआ मोइत्रा यांच्यावर भ्रष्ट व्यवहाराचा संशय कोणीही घेतला नाही.

मोहुआ मोइत्रांमुळे लोकसभेत विरोधाचा बुलंद सूर उमटला, असेच मी आणि माझे अनेक परिचित- आम्ही सारेचजण मानतो. किंबहुना, त्या नसतील तर सभागृहाचे कामकाज चित्रवाणीवरून पाहण्यात काही अर्थच उरणार नाही, यावरही आम्हा अनेकांचे एकमत आहे. त्यामुळेच मोहुआ मोइत्रा यांना माझा मोफत सल्ला : मित्र निवडताना फार काळजीपूर्वक निवडा!

लेखक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत.

(समाप्त)