ॲड. राजा देसाई
सत्ताकारण आज भांडवलशाही स्पर्धेहूनही हीन होत चाललं आहे. माणसातील निकृष्टतेला खतपाणी घालणारा ‘आत्मस्तुती, परिनदे’चा रतीब सुरू आहे. म्हणूनच तर तटस्थ विचार-संवाद आणि आत्मपरीक्षणही यांची तीव्र गरज आहे. पण सामाजिक वातावरण असहिष्णुता/ द्वेषव्याप्त असेल तर सामाजिक सौहार्दासाठीचा विचार-संवाद, आत्मपरीक्षण कसं होणार?
स्वामी विवेकानंदांनी जगाला काय सांगितलं? ‘माझ्यासाठी सर्वच धर्म सत्य आहेत. माणूस असत्याकडून सत्याकडे नव्हे तर सत्याकडून अधिक सत्याकडे जातो. सूर्य डोंगराच्या वेगवेगळय़ा ठिकाणांहून वेगळा वाटला तरी तो एकच असतो तसंच.’ त्यावर ‘शिकागो हेराल्ड’ने म्हटलं, ‘अशा धर्म-विचारांच्या भारतात पश्चिमेनं धर्मप्रसारक पाठवणं हे किती चुकीचं आहे हे आता तरी आपल्या लक्षात यावं!’
स्वामीजींनी भारताला काय सांगितलं? ‘मानवाच्या इतिहासात प्राणिमात्राच्या ऐक्याचा धर्म-विचार अत्यंत दृढपणं कोणी मांडला असेल तर तो हिंदूंनी आणि त्याचबरोबर अगदी स्वधर्मीयही दलित-शूद्रांना सर्वात जास्त पायदळी कोणी तुडवलं असेल तर तेही हिंदूंनीच!.. मात्र हा दोष धर्माच्या माथी मारण्याची चूक सुधारक करीत आहेत.. पुरोहितगिरी तसेच धर्माचार्य ‘शिवू नको’च्या डबक्याबाहेर येऊन जगाकडे पाहातील तर दृष्टी बदलेल. भारतानं परधर्मी जगाला अस्पर्श ठरवणारा ‘म्लेंच्छ’ हा शब्द ज्या दिवशी शोधून काढला, त्या दिवशी त्यानं आपल्या अवनतीचा पाया घातला. ‘म्लेंच्छ’च्या ठिकाणी मूर्तीला बसवून, ‘हिंदू-मुसलमान एकत्र जगू शकत नाहीत’ या फाळणी-विषानं पाकिस्तानला दयनीय बनवलं; ईश्वर करो आणि आपली अवस्था तशी न होवो.’
आणखी वाचा – स्वामी विवेकानंद सर्वव्यापी धर्मविचार!
आता परिस्थिती/संदर्भ जरूर प्रचंड बदलले आहेत. पण आत्मपरीक्षणाची गरज कधीच संपत नसते. सारे राग, लोभ बाजूला ठेवून स्वामीजींनी सांगितलेल्या हिंदू-धर्मविचारांच्या प्रकाशात देशाची सामाजिक-धार्मिक परिस्थिती प्रामाणिकपणे तपासण्याची आज आपली तयारी आहे का?
धर्म हा आचरणात व आचरणाचा उगम अंत:करणातील सुष्टदुष्ट भावात. सुष्ट दृढ करणं व दुष्ट कमी तरी करणं याचे प्रयत्न ही धर्मसाधना. मंदिर, मशीद, पूजा, नमाज इ. धर्माची असंख्य बाह्यांगं म्हणजे त्या सद्भाव-रोपटय़ाचं संरक्षण करणारं कुंपण. पण काळाच्या ओघात कुंपणानं तो भावच गिळून टाकला आणि श्रेष्ठ कोण ही भांडणं सुरू झाली. त्यावर मात करणाऱ्या भारताच्या जीवनदृष्टीचा विचारच स्वामीजींनी पश्चिमेला सांगितला; मात्र तो तेव्हाच्या ज्ञात विज्ञानाधारे. जड-चैतन्याच्या वादाला अनेक बाजू असल्या तरी चैतन्य तत्त्वाचा (लॉ ऑफ कन्व्हर्जन ऑफ एनर्जी) विचार करता एक प्रश्न उभा राहातो. जडात मुळातच चैतन्य अंतर्निहित नसेल तर हे नवे असामान्य चैतन्य कुठून आणि कसे येईल? म्हणून वेदान्त म्हणतो की जडाची अनंत सजीव- निर्जीव रूपं म्हणजे त्या एकमेव अविनाशी चैतन्याची केवळ अभिव्यक्ती आहे. म्हणून सारे प्राणिमात्र ही त्याचीच अपत्ये आहेत. मग हिंदूंसाठी ‘सर्वात बंधुभाव’ (अद्वैत) ही भावुक कविकल्पना उरत नाही. ‘धर्मा’च्या याच अर्थाने स्वामीजी म्हणतात : ‘भारतानं आपला अविनाशी सत्याचा (सृष्टीच्या एकत्वाचा) धर्म सोडला तर त्याला कोणीही वाचवू शकणार नाही व तो जपला तर त्याच्या नखालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. परदास्य आलं ते तो धर्म आपण सोडला म्हणून!’
असो. डार्विनच्या उत्क्रांतिवादानं श्रद्धाधारित सेमिटिक धर्म गडबडले, पण त्यानंतर दोन दशकांनी स्वामीजी पश्चिमेतच विज्ञानाला फक्त एकच वेदान्ती प्रश्न विचारतात : ‘उत्क्रांती (इव्हॉल्यूशन) बरोबर आहे, पण सहभाग (इन्व्हॉल्यूशन कल्ल५’४३्रल्ल) नसेल तर उत्क्रांती कशातून?’ पश्चिमेतील बुद्धिवंत (इंगरसोलपासून रोमां रोलांपर्यंत) व शेकडो सुशिक्षित लोक स्वामीजींकडे आकृष्ट झाले ते भारताच्या याच धर्मदृष्टीमुळं.
पण भारत आज कोणती दिशा अंगीकारीत आहे? आपण सामान्य माणसे, तत्त्वज्ञानाच्या खोलात जाऊ शकत नसतो हे स्वाभाविकच. त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धा काळानुरूप शक्य तेवढय़ा जरूर जपाव्यात; मात्र त्या सर्वच धर्मीयांच्या जपाव्यात. धर्मातरविरोधी कायदे, बुरखा इत्यादी अनेक गोष्टींवरून होणाऱ्या वादांमागे (राजकारण सोडलं तरीही) दोन्ही बाजूंची प्रदीर्घ मानसिकता आहे. त्याची चर्चा अवश्य होऊ दे; मात्र ती द्वेषमूलक नको. ‘द्वेष करण्यानं द्वेष करणाऱ्यांचंच अध:पतन होतं’ हा आहे स्वामीजींचा इशारा; व्यक्तिजीवनासाठीही कमालीचा मोलाचा. जेवढं समाजमानस उदार होईल तेवढं उदार होणं सत्ताकारणाला भागच पडेल.
आणखी वाचा – चतु:सूत्र (गांधीवाद) : दोन महामानवांचे जीवनदर्शन
‘वसुधैव कुटुंबकम्’ दृष्टी कोणती? प्रत्येक मानवी समूह काही क्षेत्रांत पुढे तर काहींत मागे असतो. हिंदूंतही अनेक वाईट गोष्टी होत्या/आहेत व आपण त्या बऱ्यापैकी वेगानं सोडीत आहोत. गोऱ्या साम्राज्यवाद्यांनी आपल्याकडे कसं पाहिलं? ख्रिश्चन मिशनरी आपला धर्म घेऊन आम्हाला ‘सुसंस्कृत’ करायलाच आले नव्हते का? पण काय झालं शिकागो परिषदेत? म्हणून प्रश्न आहे तो अशा सांस्कृतिक वादांत भारताची काही वेगळी दृष्टी आहे का? स्वामीजी सांगतात : ‘दुसऱ्या कोणालाही आपल्या सांस्कृतिक पट्टय़ांनी मोजू नका. ज्याला त्याला आपला विकास त्याच्या स्वभावानुसार करू द्या. त्यात तुम्ही आपला हात देऊन मदत करू शकत असाल तर ती करा; नसेल तर हात बांधून बाजूला उभे राहा, पण कोणाला शिव्याशाप देऊ नका..’ प्रचंड विविधता असूनही आजचा भारत घडला आहे तो केवळ या दृष्टीमुळं, तो भाव जपू या.
स्वामीजींनी सव्वाशे वर्षांपूर्वी ‘विश्वधर्मा’द्वारे एक प्रकारे जागतिक ऐक्याचाच विचार मांडला: ‘मी भारताचा आहे, तेवढाच जगाचा आहे. मला अतिरेकी राष्ट्रवाद मान्य नाही.. सत्य हा माझा ईश्वर व विश्व हा माझा देश!’षड्रिपूंतील सत्तावासनेची लोकशाहीतील रूपं वेगळी. लोकांना मुक्त करण्याच्या भाषेमागे विरोध नष्ट करून आपली सत्ता निरंकुश व्हावी ही वासना दडलेली असतेच. मग सत्तेच्या चिलखतातून नैतिकतेची सुई बिचारी कशी बरं टोचणार? स्वामीजी म्हणतात, ‘कितीही नव्या समाजरचना बनवा, माणसाच्या वक्रबुद्धीपुढे सारं मुसळ केरात!’
थोडक्यात समाजाच्या अर्धविकसित लोकशाही-मानसिकतेत व्यक्ति-विचारस्वातंत्र्य वगैरे गोष्टी या नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या बुद्धी-हृदयाच्या उन्नत/अवनत अवस्थेवरच वा दयेवर अवलंबून राहाणार. असं का होतं? ‘(ज्यातून आपला विकास झाला त्या) प्राणिमात्रांतील निरंकुश सत्ताभिलाषेसहित सर्व प्रकारच्या हिंस्र वासना अजूनही आपल्यात भरपूर शिल्लक आहेत, वेळ/संधी मिळताच त्या उफाळून येतात. विचारांचा मुक्त संघर्ष मानवी विकासासाठी अत्यावश्यक आहे. जीवनाच्या सर्वागांत विविधता हे मानवाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. एकजिनसीपणा हा मृत्यूच!’ स्वामीजी.
आणखी वाचा – जयंती विशेष: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ध्यानधारणा! विवेकानंदांचा संदेश
असो. खरं तर आता अस्मितांच्या लढायांत सर्वच धर्मासमोरचं भविष्यानं वाढून ठेवलेलं आव्हान कोणतं? तर भयाण वेगानं तंत्रज्ञान देत असलेली अनंत साधनं/सेवा, सार्वत्रिक होत जाणारी सुबत्ता, अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्याची नैसर्गिक भूक भागवणारी अनुकूल परिस्थिती आणि अनंत भोगसाधनांची क्षणात होणारी उपलब्धता यांच्या एकत्रित वावटळीतून संयमित संतुलित जीवनाशिवाय लाभू न शकणारी समाधान/शांती माणूस कशी मिळवणार?
सत्तेनं खुद्द ईश्वराचंच स्थान बळकावण्यातून धर्मावरचं संकट असं गडद होण्यापूर्वीच स्वामीजींनी एक इशारा देऊन ठेवलाय. ‘अगदी भयंकर दोषांविषयीही कोणत्याही धर्माला जबाबदार धरणं चूक आहे. धर्माच्या नावावर जी दुष्कृत्ये घडली ती कुटिल राजकारणामुळे, धर्मामुळे नव्हे! सत्य आणि ईश्वर हेच माझे राजकारण आहे. खरा धार्मिक उदार असणारच कारण त्याला माणसाविषयीचं प्रेम तसं व्हायला भाग पाडतं. भेदबुद्धीनं समाजात ऐक्य स्थापन करू पाहाणं हे चिखलानं चिखल धुणं आहे. जे धर्माचे दुकान चालवतात ते धर्मात स्पर्धा, झगडे, स्वार्थपरता इ. गोष्टी आणतात.’ आज स्वामीजींच्या जयंतीदिनी धर्म-प्रकाशासाठी यापेक्षा आणखी एका तरी अक्षराची गरज आहे का?
लेखक निवृत्त प्राध्यापक आणि विवेकानंद साहित्याचे अभ्यासक आहेत.
rajadesai13 @yahoo.com