आनंद हर्डीकर

एकीकडे हाडीमाशी खिळलेली ख्रिास्ती धर्मनिष्ठा आणि दुसरीकडे धमन्यांमधून वाहणारे मायमराठीतल्या संतसाहित्यावरचे प्रेम यामध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मन आणि लेखनही झोके घेत असे. कधी कधी ते दोन ऊर्जाप्रवाह त्यांना भिन्न भिन्न दिशांना खेचू पाहत आहेत, असेही जाणवत असे.

baba siddiqui cremated with state honors
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, बॉलिवूड कलाकारांसह राजकारण्यांनी दिला अखेरचा निरोप!
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
Success Story of Dr. Arokiaswamy Velumani founder of Thyrocare Technologies who built 3000 crore company
परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, शून्यातून कसं निर्माण केलं कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास
Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

ही बातमी ऐकल्यापासून गेल्या २०-२२ वर्षांमधले त्यांच्याबरोबरच्या संबंधांतले असंख्य प्रसंग डोळ्यांसमोरून तरळून गेले. खेळीमेळीतल्या चर्चेपासून धर्मतत्त्वांच्या व्यावहारिक आविष्काराबद्दलच्या खडाजंगीपर्यंतचे बरेचसे चढउतारही आठवले, पण जास्त प्रकर्षाने आठवत राहिले, ते परदेशांतल्या वास्तव्यात त्यांना वारंवार विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे त्यांनी दिलेले उत्तर.

‘पाक्स ख्रिास्ती इंटरनॅशनल’ या संस्थेने आयोजित केलेल्या एका परिषदेसाठी फादर दिब्रिटो युरोपमध्ये ब्रूसेल्स, रोम वगैरे बऱ्याच ठिकाणी गेले होते. तिथे राहत असताना अनेकदा त्यांना प्रश्न विचारला जात असे.

‘पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे का?’

ते उत्तर देत असत, ‘ख्रिास्ती तत्त्वज्ञानानुसार पुनर्जन्म नाही.’

फादरच्या या उत्तराने त्या प्रश्नकर्त्याचे समाधान होत नसे. त्यांचा दुसरा प्रश्न तयार असायचा- ‘पण समजा, पुनर्जन्म असलाच, तर तुम्हाला कुठे जन्म घ्यायला आवडेल? युरोपमध्ये की अमेरिकेत?’

दिब्रिटो उत्तर देत, ‘पुनर्जन्म असेलच आणि तो कुठे घ्यायचा, हे निवडण्याचे स्वातंत्र्य असेल, तर मी देवाला सांगेन, की मला पुन्हा भारतातच आणि तेही एखाद्या मराठी कुटुंबात जन्माला घाल!’ श्रोत्यांना आश्चर्याचा धक्का बसत असे.

हेही वाचा >>> अन्यथा: चंद्रमाधवीचा प्रदेश!

ही प्रश्नोत्तरे मला फादर दिब्रिटोंच्या व्यक्तिमत्त्वात वसणाऱ्या विरोधाभासाचे प्रतीक वाटतात. एकीकडे हाडीमाशी खिळलेली ख्रिास्ती धर्मनिष्ठा आणि दुसरीकडे धमन्यांमधून वाहणारे मायमराठीतल्या संतसाहित्यावरचे प्रेम यामध्ये त्यांचे मन आणि लेखनही झोके घेत असे. कधी कधी ते दोन ऊर्जाप्रवाह त्यांना भिन्न भिन्न दिशांना खेचू पाहत आहेत, असेही माझ्यासारख्या निरीक्षकाला जाणवत असे. आणि त्याच वेळी जाणवत असे, ती त्यांच्या मनातली सांस्कृतिक सेतुबंध उभारण्याबद्दलची खरीखुरी कळकळ. तशा सेतुबंधनाच्या कार्यात त्यांना मिळालेल्या यशापयशाचा लेखाजोखा मांडला जाणार असेल, तेव्हा मांडला जावो, पण आज मात्र हा माझा मित्र ‘ओअॅसिसच्या शोधात’ दूरवरच्या प्रवासाला निघून गेला आहे. त्या न परतीच्या वाटेवर ‘नाही मी एकला’ असा निरोप त्याने मागे ठेवला असला, तरीही कुठे तरी अंत:करणात जीवघेणी कळ उठतेच आहे.

सुमारे २० वर्षांपूर्वी दिब्रिटोंशी माझी पहिली प्रत्यक्ष भेट ‘राजहंस प्रकाशना’च्या मुंबईतल्या कार्यालयात झाली. ‘संघर्षयात्रा ख्रिास्तभूमीची’ हे त्यांचे आगामी पुस्तक संपादकीय नजरेने वाचून मी काही प्रश्नांची/शंकांची पानवार यादी तयार करून ठेवली होती. ती त्यांच्यासमोर ठेवल्यावर प्रथम त्यांना माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा, असे वाटले नाही; त्यांनी तेथल्या तेथे त्यांच्या दोन परिचित मान्यवरांना फोन केला आणि माझ्या शंकांबद्दल त्यांना विचारून खातरजमा करून घेतली – ‘फादर, तुमची संहिता मी वरवर वाचली आहे, चाळली आहे इतकेच. ती शब्दश: वाचून हर्डीकरांनी ज्या सुधारणा सुचवल्या आहेत, त्या बरोबरच आहेत,’ असे दोघा मित्रांकडून त्यांना सांगितले गेले. मग मात्र, त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि त्यांच्या-माझ्यात मनमोकळी चर्चा सुरू झाली, ती पुढे कायम होतच राहिली.

हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास: भाकितांचा भूतकाळ

पॅलेस्टाइनमधल्या सध्याच्या संघर्षाची मुळे ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या कटकारस्थानांमध्ये सापडतात, यासारख्या मुद्द्यांवर आमचे एकमत झाले, की त्यांच्या लक्षात येई की, १९७३ मधल्या ‘योम किप्पूर’ युद्धानंतर लगेच माझे ‘अंतहीन संघर्ष’ हे अरब-इस्राइल संघर्षाच्या प्रदीर्घ इतिहासावरचे पुस्तक प्रसिद्ध झाले होते आणि त्यानंतरही मी त्या समस्येचा अभ्यास सुरूच ठेवलेला आहे. शिवाय मी माझ्याजवळची माहिती त्यांचे पुस्तक अधिकाधिक चांगले व्हावे, आशयसमृद्ध व्हावे, याच हेतूने त्यांना पुरवतो आहे. मग आमच्या दोघांभोवती मैत्रीचा धागा विणला जाई. लेखक-संपादक या औपचारिक नात्यापलीकडचे भावबंध जुळले जात.

ते वसईतल्या एका छोट्याशा खेडेगावातल्या सामान्य कुटुंबात जन्मले असले, तरी मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकले आहेत. ख्रिास्ती धर्मोपदेशक म्हणून जसा मी त्यांना ओळखत होतो, तसाच ‘सुवार्ता’ या मासिकाचे संपादक म्हणूनही ओळखत होतो. त्या ख्रिास्ती नियतकालिकाचे अंतरंग व्यापक व्हावे म्हणून ख्रिासमस विशेषांकाप्रमाणेच ते दिवाळी विशेषांकही काढतात, मराठी साहित्यिकांचे साहित्य त्यात आवर्जून छापतात, हेही मला ठाऊक होते. गोरेगाव, पुणे, रोम वगैरे ठिकाणच्या ख्रिास्ती शिक्षण संस्थांमधील दहा वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून परतलेल्या दिब्रिटोंच्या विविध उपक्रमांमध्ये ख्रिास्ती धर्मप्रसाराचा अंतस्थ हेतू असतो, ही टीकाही माझ्या वाचनात होती. एवढेच नव्हे, तर मे. पुं. रेगे यांच्यासारख्या तत्त्वज्ञ विचारवंतांनी ही अपरिहार्यता जाणवली म्हणून ‘नवभारत’ या त्यांच्याच संपादकत्वाखाली निघणाऱ्या नियतकालिकामध्ये प्रदीर्घ लेख लिहून ‘दिब्रिटो यांच्या लेखनातून कालकूट (विष) पाझरत आहे’, अशा शब्दांत केलेला तर्कशुद्ध प्रतिवादही मी बारकाईने अभ्यासला होता.

उलटसुलट प्रतिक्रियांच्या अशा जंजाळात न अडकता दिब्रिटोंबद्दलचे स्वतंत्र आकलन केले पाहिजे; त्यांच्या लालित्यपूर्ण शैलीचे सौंदर्य आणि मराठी संतसाहित्यावरचे त्यांचे निरतिशय प्रभुत्व यांना दादही दिली पाहिजे, त्यांच्याबद्दलचा समतोल दृष्टिकोन बाळगला पाहिजे, अशा निष्कर्षाप्रत मी आलो आणि योगायोगाने त्यांच्या दोन पुस्तकांच्या संपादनाची लागोपाठ संधी मिळाल्यामुळे मला तशी तोलाई शक्यही झाली.

‘पोप दुसरे जॉन पॉल’ यांचे चरित्र आणि ‘सुबोध बायबल’ हा त्या ग्रंथाचा भावानुवाद अशी दिब्रिटोलिखित दोन पुस्तके ‘राजहंस’तर्फे मी संपादित केली. आमच्या संपादकीय विभागातली वैचारिक स्वायत्तता पुरेपूर उपभोगत मी त्या दोन्ही पुस्तकांच्या निमित्ताने दिब्रिटोंशी खूप चर्चा केली. चर्चेच्या विविध प्रश्नांवरील भूमिकांबद्दलचे प्रश्न-उपप्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडले; त्यांच्या वक्तव्यांमधील दुटप्पीपणाची अनेक उदाहरणे पुराव्यांसह त्यांच्यासमोर मांडली; तर्कशुद्ध प्रतिवाद केला.

‘मूर्तिपूजा म्हणजे व्यभिचार आहे, तो गुन्हा करणाऱ्यांना त्यांच्या बालबच्च्यांसह धोंडमार करून (लिंचिंग) ठार मारा’ असा सुस्पष्ट आदेश देणारा मोझेस ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून तुम्ही गौरवू शकता तरी कसे?’ ‘पोलंडपासून सोव्हिएत युनियन – साम्यवादी चीनपर्यंत विविध देशांत कॅथलिक चर्चने हस्तक्षेप केला, त्या देशांमधील बंडखोरांना छुपी मदत दिली, तर ती तुम्हाला आक्षेपार्ह वाटत नाही, पण या भारतात मात्र धर्मसंस्थेने राजकारणात हस्तक्षेप करू नये, अशी प्रवचने तुम्ही देत सुटता. हा दुटप्पीपणा तुम्ही कसा काय समर्थनीय मानता?’ हे आणि असे इतरही अनेक प्रश्न मी दिब्रिटोंना समोरासमोर विचारले. त्यांनी कधीही त्याबद्दल माझ्याजवळ नाराजी व्यक्त केली नाही किंवा दिलीपराव माजगावकरांकडे तक्रारही केली नाही.

माझ्या अशा प्रश्नांचा त्यांच्यावर निश्चित परिणाम झाला असावा. त्यांनी माझ्याबरोबरच्या चर्चेत या प्रश्नांना उत्तरे देऊन मला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला नाही, तरी त्यांनी त्या प्रश्नांची दखल घेऊन लेखनात काही सौम्य बदल केले. काही ठिकाणी चर्चकडून झालेल्या अन्यायाची आणि गफलतींची कबुलीही दिली. पण त्यांच्या तशा लेखनावर चर्चच्या यंत्रणेची असणारी पकड इतकी जबरदस्त होती, की ते माझ्या अपेक्षेइतकी बंडखोरी करू शकले नाहीत. मात्र ‘मोझेस ते येशू हा जुन्या करारापासून नव्या करारापर्यंतचा प्रवास म्हणजे असहिष्णुतेकडून सहिष्णुतेकडे झालेला प्रवास आहे,’ अशी आपल्या विवेचनाची पुनर्मांडणी त्यांनी केली. शिवाय आपल्या सहिष्णू अध्ययनशीलतेचा उत्कट आविष्कार घडवीत दिब्रिटोंनी मी सुचवत गेलो, त्या त्या संज्ञांबद्दलच्या किंवा संकल्पनांबद्दलच्या अभ्यासपूर्ण टिपा लिहिल्या. थोड्याथोडक्या नाहीत, तब्बल १९०६!

माझ्यासारखा एक हिंदुत्ववादी संपादक (फादरच्या भाषेत संघाशी नाळ जुळलेला) आणि दिब्रिटोंसारखा एक कर्मठ ख्रिास्ती साहित्यिक यांनी एकत्र येऊन सुबोध बायबलचा प्रकल्प पूर्ण केला आणि तो सचित्र महाग्रंथ फादरच्या अपेक्षांपेक्षाही जास्त गाजला. आमच्या उभयतांच्या भावजीवनातला तो एक उत्कर्षबिंदू म्हणजे दिलीपराव माजगावकरांना आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनाही अपेक्षित असणारा सांस्कृतिक सेतुबंधनाचाच एक प्रयोग होता.

तशा सांस्कृतिक सेतुबंधनाचे एक स्वप्न दिब्रिटोंनी माझ्याजवळ एकदा बोलून दाखवले होते. ‘स्नेहसदन’मधून निघून गायकवाड वाड्यावरून नागनाथ पाराजवळच्या ‘राजहंस’ कार्यालयाकडे जाताना त्यांनी मला ग. त्र्यं. माडखोलकरांच्या- पत्रकारितेतल्या त्यांच्या गुरूच्या- ‘एकला’ या कादंबरीत दिब्रिटोंचे पात्र कसे रंगवले आहे, हे सांगितले होते. माडखोलकर त्यासाठी ‘स्नेहसदन’मध्ये गेले होते, तेथील भोजनापूर्वीचा ‘सहनाववतु…’ हा मंत्र म्हणण्याचा प्रसंग त्यांनी अनुभवला होता आणि मग लिहिला होता. ही माहितीही पुरवली होती आणि नंतर म्हणाले होते, ‘पुण्यातल्या कँपमध्ये इंग्रजीभाषक ख्रिास्ती लोकांची मोठी वस्ती आहे. त्यांचा अन्य मराठीभाषक ख्रिास्ती समाजाशीही फारसा संपर्क नाही. सदाशिव- शनिवार पेठांतील लोकांनाही त्यांच्याशी सोयरसुतक वाटत नाही. ही बाब हितावह नाही. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी पुण्याच्या पेपल सेमिनरीमध्ये साजरी होईल आणि रेव्हरंड ना. वा. टिळकांची जयंती केसरीवाड्यात साजरी होईल, तेव्हा खरे भारतीय मनोमीलनाचे स्वप्न साकार होईल!’

फादर दिब्रिटोंच्या निधनाची बातमी ऐकून मला आमचे दोघांचे हे संभाषणही आठवले आणि वाटले, की त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी तरी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मराठी कुटुंबातच पुनर्जन्म लाभावा!