एजाजहुसेन मुजावर
खिलारी जनावरे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले वैभव. त्यांचे संगोपन होण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे. विशेषत: आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी, विषमुक्त सेंद्रीय शेतीसाठी, शेती आणि शेतकरी कुटुंबाच्या खर्चात बचत करण्यासाठी शेतकऱ्याच्या दारात खिलारी जनावरांचा गोठा असणे गरजेचे असते. या खिलारी जनावरांच्या संगोपनाची यशोगाथा सांगणारा हा लेख.
सध्याच्या आधुनिक आणि धावपळीच्या काळात भौतिक आयुष्य जगण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने, नवनवीन आलिशान, महागडी चार चाकी मोटारींना मागणी वाढत आहे. त्यासाठी खरेदीदारांना सहा महिने-वर्ष अगोदर मागणी नोंदवावी लागते. परंतु, एखाद्या खिलारी गाय खरेदीसाठी वर्ष-दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागते, हे कोणी सांगितले तर ते अतिशयोक्ती ठरेल. पण विश्वास बसणार नाही, हे सत्य आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील शेज बाभळगावचे शेतकरी शशिकांत शंकर पुदे यांच्या गोठय़ात खिलारी कालवडींच्या खरेदीसाठी दूरदूरचे शेतकरी येतात आणि आगाऊ रक्कम देऊन कालवडीची प्रतीक्षा करतात. खिलारी गायी-बैलांचे महत्त्व समाजात पुन्हा एकदा अधोरेखीत होऊ लागल्याचे हे लक्षण तेवढेच महत्त्वाचे मानले जात आहे.
खरे तर एकेकाळी खिलार जनावरांसाठी सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यासारखा परिसर महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांमध्ये प्रसिद्ध मानला जायचा. परंतु ही ओळख आणि तो लौकिक काही वर्षांपासून लुप्त होत आहे. सांगोला तालुक्यात वाढेगाव, कडलास, अकोले, मेडिशगी आदी गावांच्या शिवारात हजारोंच्या संख्येने खिलार जनावरे असायची. पण मागील तीस-चाळीस वर्षांत बदलत्या काळात ही जनावरे अतिशय मर्यादित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शेज बाभळगावचे शशिकांत पुदे असो वा इंदापूरचे धीरज दिलीप कासार, यांनी आपल्या शेतात खिलार जनावरांचे संगोपन करण्याचे प्रयोग तेवढय़ाच धाडसाने यशस्वी केले आहेत.
हेही वाचा >>>उसाचा तुरा!
शशिकांत पुदे यांचा शिवपार्वती प्रतिष्ठानाच्या अंतर्गत खिलार प्रकल्प कार्यरत आहे. सेंद्रीय शेतीसाठी खिलार जनावरांचे संगोपन उपयुक्त मानले जाते. त्याचेच गणित घालून पुदे कुटुंबीयांकडून खिलार जनावरे संगोपनाची वडिलोपार्जित परंपरा खंडित न होता कायम चालत आली आहे. त्यांच्या शेतातील गोठय़ात दूरदूरच्या भागातील शेतकरी येऊन खिलार जनावरांची पाहणी करतात आणि माहिती घेतात. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शशिकांत पुदे व त्यांचे कुटुंबीय तेवढय़ाच उत्साहाने वेळ देतात. खिलार कालवडींची मागणी होते. परंतु तेवढय़ा प्रमाणात कालवडी उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांची आगाऊ रक्कम देऊन मागणी नोंदविली जाते. कालवड उपलब्ध होण्यासाठी वर्ष-दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. त्याचे इंगित समजावून सांगताना शशिकांत पुदे हे खिलारी जनावरे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले वैभव असल्याचा आवर्जून उल्लेख करतात. त्यांचे संगोपन होण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे. विशेषत: नव्या पिढीला आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी, आजारपणापासून वा दवाखान्यापासून दूर ठेवायचे असेल तर प्रत्येक कुटुंबीयांकडे खिलार गाय असणे गरजेचे आहे. खिलार गायीचे दूध लहान मुलांना, आजी-आजोबांसह कुटुंबीयांना मिळणे गरजेचे आहे. मन लावून काम केल्यास खिलार जनावरांपासून आर्थिक उत्पन्न निश्चित मिळते. पण निदान आपल्या कुटुंबीयांपुरते तरी विषमुक्त अन्न तयार करायचे तर सेंद्रिय शेतीसाठी समाजाची वाटचाल होत राहावी, अशी अपेक्षा शशिकांत पुदे व्यक्त करतात.
हेही वाचा >>>मुलांना समाजजीवनाचेही धडे देणाऱ्या फिनलँडच्या शाळा…
दैनंदिन मानवी आहारामध्ये खिलार गायीचे तूप अतिशय उपयुक्त आहे. लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी त्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. तूप हे हाडांमध्ये वंगणाचे, हाडांची झीज भरून काढण्याचे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करते. खिलार गायीच्या तुपाला प्रतिकिलो पाच हजार रुपये इतका भाव आहे. एक किलो तूप तयार करण्यासाठी ३२ लीटर दूध लागते. हे काम तेवढेच जिकिरीचे असते. खिलार गायीचे दूध प्रति लीटर ८० रुपयांस विकले जाते. तूप आणि दूध खरेदी करणारे ग्राहक वरचेवर वाढत आहेत. पुदे यांच्या गोठय़ात आजमितीला २७ खिलार जनावरे आहेत. यात ९ मोठय़ा दुभत्या गायी, ७ कालवडी, ३ खोंड आणि ४ वळूंचा समावेश आहे. काजळी खिलार आणि कोसा खिलार अशा उपजातीही आहेत.
एकीकडे सध्या शेतीकामासाठी गाय-बैलांचा वापर जवळपास नाहीसा झाला आहे. शेतात मशागतीपासून ते पेरणी, मळणीपर्यंतची सारी कामे यांत्रिक पद्धतीने होतात. त्यामुळे खिलार जनावरांचे संगोपन करणे परवडत नाही, असा सार्वत्रिक सूर आहे. परंतु शेतामध्ये फक्त रासायनिक औषधे, कीटकनाशकांचा वापर करताना त्यावर होणारा भरमसाठ खर्च होतो. किंबहुना उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त असतो. त्याचा हिशेब शेतकरी ठेवत नाहीत. उलट सेंद्रिय शेती करायची तर तुलनेने उत्पादन खर्च कमी येतो. त्यासाठी अस्सल देशी खिलार जनावरे उपयुक्त ठरतात. आजच्या यांत्रिक युगात सर्व काही मिळत असेल. पण शेण आणि गोमूत्र कुठल्या यंत्रात तयार होत नाही. त्यासाठी खिलार जनावरांना पर्याय नाही. गोमुत्रामध्ये नत्र, गंधक, फा?ॅस्फरसचे प्रमाण विचारात घेता त्या माध्यमातून शेतजमिनीला लागणारे नैसर्गिक पोषक घटक उपलब्ध होतात. हे सगळे खिलार गाय-बैलांच्या शेण आणि मुत्रामध्ये आहेत. देशी खिलार जनावरे सांभाळण्यासाठी होणारा खर्च आजच्या घडीला आवाक्याबाहेर झाला आहे. त्यांचे संगोपन परवडते का ? त्यांचे पालनपोषण नेमके कसे असते ? ही तारेवरची कसरत नव्हे काय, या प्रश्नांसह तद्अनुषंगिक शंकांचे निरसन पुदे करतात.
पुदे यांच्या गोठय़ात आर्थिक उत्पन्नाचा विचार करता दूध वंशावळ भ्रूण जतन करण्यात आले. ३० वर्षांपूर्वी त्यांच्याकडे सोन्या नावाचा बैल सांभाळताना त्याच्या माता-पित्याच्या वंशाची माहिती होती. त्याचे आई-वडील दोघेही जनावरे नागपूर चॅम्पियन होते. गायीला सकाळ व संध्याकाळ मिळून प्रत्येकी अकरा लीटर दूध होते. त्याचा अभ्यास करून त्याचेच वंश जतन केले जात आहे. त्यातील एका गायीला आतापर्यंत चौदावेळा नैसर्गिक वंशवृद्धी झाली आहे. त्याचीही माहिती नोंद करून ठेवली आहे. कृत्रिम रेतन केले जात नाही. खिलार कालवडी खरेदी करताना शेतकरी यांनी याच अनुषंगाने माहिती घेऊन त्याचा अभ्यास करावा, खिलार गायीची शरीरयष्टी, कासांची रचना, ठेवण यांचा विचार करावा, असा सल्ला पुदे देतात. गाय वेतल्यानंतर कालवड-खोंडाला पहिल्या सहा महिन्यांपर्यंत गायीचे अर्धे दूध द्यावे लागते. कालवड जन्मल्यानंतर ३० दिवसांत त्याची माहिती खरेदीदार यांस दिली जाते. त्यानंतर सात महिन्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने संगोपन करून ती कालवड प्रत्यक्ष खरेदीदाराच्या हवाली केली जाते. एका कालवडीची किंमत साधारणपणे ५० हजार ते ५५ हजार रुपयांपर्यंत ठरते. कालवडीसाठी दररोज दोनवेळा खुराक देताना त्यात मिनरल मिस्कर, मल्टि व्हिटॅमिन असते. जनावरांना दर दोन महिन्यांत एकदा जंतनाशक द्यावे लागते.
पुदे यांनी स्वत:च्या शेतात सेंद्रिय पद्धतीची शेती करताना कोकणच्या धर्तीवर काजू, सुपारी, आंबा, फणसाचे उत्पन्न घेतले आहे. सोबत खिलारी जनावरांची चांगल्या प्रकारे बंदिस्त आणि मोकळय़ा पद्धतीने जोपासना केली आहे. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित केले आहे. पुदे यांच्या प्रमाणेच इंदापुरात दिलीप कासर यांनीही खिलार गायींसह कालवडी, खोंड आणि वळूंची जोपासना केली आहे. गीर गायींपेक्षा खिलार गायी अधिक मोलाच्या आहेत. खिलार जनावरे ही महाराष्ट्राला लाभलेले वैभव आहे. त्यांचे जतन व्हावे, अशी अपेक्षा या अनुभवी गोपालकांनी केली आहे.