संयुक्त राष्ट्रांतर्फे आयोजित हवामान बदलविषयक शिखर परिषदेत प्रतिजैविक प्रतिरोध (अँटिबायोटिक रेझिस्टन्स) या समस्येचा आढावा घेण्यात आला. १८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान जागतिक प्रतिजैविक जनजागरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त..

प्रा. मंजिरी घरत

मानवावरील उपचारांत, अन्नोत्पादक प्राण्यांमध्ये वजनवाढीसाठी तसेच जंतुप्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा अतिरेकी वापर होत आहे. पर्यावरणात जागोजागी प्रतिजैविकांचे अंश साठत गेले आहेत. प्रतिजैविकांचा गैरवापर कुठेही झाला तरी संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाची फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, पर्यावरण प्रकल्प, जागतिक आरोग्य संघटना आणि वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ या चार जागतिक संघटनांनी ‘मिळून सारे करू प्रतिजैविक प्रतिरोधाचा प्रतिबंध,’ असे ध्येयवाक्य यंदाच्या प्रतिजैविक सप्ताहासाठी निश्चित केले.

प्रतिजैविक प्रतिरोध म्हणजे नेमके काय?

शरीरातील उपद्रवी जिवाणूंचा नायनाट करणे हे प्रतिजैविकांचे काम असते. मात्र त्यांचा अति प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, तेव्हा शरीरातील जिवाणूंना प्रतिजैविकांची काम करण्याची पद्धत जोखण्याची संधी मिळते. त्यातून ते स्वत:त बदल (म्युटेशन) घडवून आणतात. नैसर्गिकरीत्यासुद्धा म्युटेशन होत असतात, पण प्रतिजैविकांच्या अतार्किक वापराने त्यांना चालना मिळते आणि जिवाणूंच्या प्रतिजैविकांनाही चकवा देणाऱ्या बंडखोर प्रजाती निर्माण होतात. प्रतिजैविके मग त्यांच्यापुढे केविलवाणी ठरतात. त्यांची परिणामकारकता कमी होत संपत जाते. यालाच म्हणतात प्रतिजैविक प्रतिरोध किंवा अँटिबायोटिक रेझिस्टन्स. पुढे प्रतिरोध ही समस्या वैयक्तिक न राहता सामाजिक आरोग्याची बाब होते. 

प्रतिजैविकांची निवड?

आज २००-२५० प्रतिजैविके आणि त्यांची मिश्रणे उपलब्ध आहेत. काही अँटिबायोटिक नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे जिवाणूंच्या थोडय़ाच जातींविरुद्ध काम करतात. उदा. पेनिसिलीन हे मुख्यत: ‘ग्राम पॉझिटिव्ह’ (उदा. घसा, श्वसनमार्ग यांच्या संसर्गाला कारणीभूत ठरणारे स्ट्रेप्टोकोकाय हे जिवाणू) प्रकारच्या जिवाणूंविरुद्ध उपयुक्त ठरते. तर काही प्रतिजैविके ‘ब्रॉड स्पेक्ट्रम’ म्हणजे जिवाणूंच्या बहुविध प्रजातींविरुद्ध उपयुक्त आहेत. उदा. सिप्रोफ्लोक्सासिन किंवा सेफ्लॉस्पोरीन गटातील बहुतांशी प्रतिजैविके ही ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह अशा विविध जिवाणूंविरुद्ध प्रभावी आहेत. प्रतिजैविकांची निवड ही संसर्गाच्या प्रकारानुसार, लक्षणे, आजाराची गुंतागुंत, रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, वय पाहून करणे गरजेचे असते. विशिष्ट कालावधीत विशिष्ट मात्रेत प्रतिजैविकांचा ‘कोर्स’ करायला सांगितले जाते, जेणेकरून सर्व जंतूंचा नायनाट होईल. क्षयरोगसारख्या संसर्गात किमान सहा ते आठ महिने औषधे घ्यावी लागतात.

वापराविषयी प्रमाण मार्गदर्शक तत्त्वे

जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिजैविकांचे तीन गटांत वर्गीकरण केले आहे. आवश्यकतेनुसार शक्यतो ‘अ‍ॅक्सेस’ ही पहिल्या गटातील प्रतिजैविके वापरावीत. ‘वॉच’ म्हणजे अगदी जपून वापरायची प्रतिजैविके आणि ‘रिझव्‍‌र्ह’ ही अत्यंत गंभीर परिस्थितीत वापरायची राखीव अस्त्रे. वापरातील ६० टक्के प्रतिजैविके ही अ‍ॅक्सेस गटातील असावीत अशी अपेक्षा आहे.

वस्तुस्थिती काय दिसते?

काही डॉक्टर्स, काही रुग्णालये या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करतात. पण गरज नसताना प्रतिजैविके देणे, त्यांचा मोठय़ा प्रमाणावर विनाकारण वापर, एका वेळी दोन प्रतिजैविकांचा मारा अशी बरीच ‘प्रिस्क्रिप्शन्स’ आढळतात. चाचणी करण्याची सुविधा सहजी, माफक दरात उपलब्ध नसणे, झटपट गुण यावा ही रुग्णांची अपेक्षा, औषधनिर्मिती कंपन्यांचे ‘प्रॉडक्ट प्रमोशन’, अपुरे वैद्यकीय ज्ञान, प्रतिजैविक प्रतिरोधासंबंधी माहिती नसणे किंवा निष्काळजी दृष्टिकोन अशा अनेक बाबींमुळे हे घडते. अलीकडे प्रतिजैविक वापरासाठी झालेल्या एका पाहणीत ‘वॉच’ गटातील प्रतिजैविकांचा वापर तब्बल ५५ टक्के आणि ‘अ‍ॅक्सेस’ अँटिबायोटिकचा वापर फक्त २७ टक्के होता. ज्यावर किंमत नियंत्रण असते अशा ‘आवश्यक औषधांच्या यादी’तील प्रतिजैविके केवळ ४९ टक्के वापरली गेली.

३४ टक्के औषध मिश्रणे वापरली गेली. प्रतिजैविके वारंवार वापरल्याने आतडय़ांतील उपयुक्त जिवाणूंनाही धक्का बसतो. उपद्रवी संधिसाधू जिवाणू, बुरशीच्या प्रजातींना संधी मिळते आणि नवे आजार उद्भवतात. रुग्णाने मागितली म्हणून, अनेक औषध दुकानांत (सन्माननीय अपवाद वगळता) ती विकली जातात. वास्तविक फार्मासिस्टने विनाप्रिस्क्रिप्शनने प्रतिजैविके विकणे योग्य नाही. रुग्णही डॉक्टरांनी लिहून दिलेली प्रतिजैविके जबाबदारीने घेत नाहीत. जरा बरे वाटले की औषधे थांबवली जातात आणि त्यामुळे पुढे बंडखोर जंतुजन्य संसर्गाचा सामना करावा लागतो. लक्षणे सारखी वाटली म्हणून उरलेली प्रतिजैविके इतर कुटुंबीयांनी घेणे योग्य नाही. प्रगत देशांत किरकोळ आजारांसाठी पहिल्या दिवसापासून प्रतिजैविके देत नाहीत. रुग्णसुद्धा प्रतिजैविकांचा आग्रह धरत नाहीत.  फार्मासिस्टही प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैविके देत नाहीत. काही देशांत रुग्णास संसर्ग आहे का याची शहानिशा करायला औषधांच्या दुकानांत चाचण्या करतात. संसर्ग आढळल्यास डॉक्टरकडे पाठवतात.

पाळीव प्राण्यांतील वाढता वापर

गाई, म्हशी, डुकरे, शेळी, मेंढय़ा, कोंबडय़ा अशा पाळीव प्राण्यांत प्रतिजैविकांचा वापर प्रचंड वाढत आहे. प्राण्यांमध्ये सर्वात जास्त- २३ टक्के प्रतिजैविके चीनमध्ये वापरली जातात, अमेरिका १३ टक्के, ब्राझील ९ टक्के आणि भारत व जर्मनी प्रत्येकी ३ टक्के असे सध्याचे चित्र आहे. प्राणी आणि मनुष्य यांमधील संसर्ग बरेचसे समान असल्यामुळे त्यांच्यासाठीची प्रतिजैविकेही बरीच समान असतात. प्राण्यांत एखाद्या प्रतिजैविकाविरुद्ध बंडखोर जिवाणू निर्माण झाले की ते मनुष्यात प्रवेशतात. २०१७ साली सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेण्ट या संस्थेने चार राज्यांतील १२ पोल्ट्रीचे सर्वेक्षण करून ई कोलाय, क्लेबसियाला आणि स्टाफयलोकोकस लेन्टस हे जिवाणू महत्त्वाच्या १६ प्रतिजैविकांना दाद देतात  का ते पाहिले. यापैकी १०० टक्के ई कोलाय, ९२ टक्के क्लेबसियाला आणि ७८ टक्के स्टाफयलोकोकस हे १० ते १२ प्रतिजैविकांना प्रतिरोधक झाले होते. अर्थातच ही बंडखोरी आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही.

रुग्णांच्या मलमूत्रातून बाहेर पडणारी औषधे, कचऱ्यात टाकलेली मुदतबाह्य किंवा नकोशी प्रतिजैविके; फार्मा उद्योजकांनी नीट प्रक्रिया न करता फेकलेली प्रतिजैविके हे सारे पर्यावरण पोटात घेते. या ना त्या रूपात त्यांचे अंश अन्नसाखळीतून परत आपल्याकडे येतात आणि वर्तुळ पूर्ण होते. स्वीडिश एजन्सी सीव्ही पाणी या विषयावर काम करते, त्यांनी ‘रिस्पॉन्सिबल अँटिबायोटिक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’ स्थापन केली आहे. ती प्रतिजैविके उत्पादकांनी अधिक जबाबदारीने अँटी-मायक्रोबिल औषधांचे उत्पादन करावे, पर्यावरणात अँटिमायक्रोबिलचे अंश पोहोचून प्रतिरोध वाढू नये यासाठी ती प्रयत्नशील आहे.  प्रतिजैविकांवर आधारित औषधांची मिश्रणे शास्त्रीयदृष्टय़ा अतार्किक असण्याचीच शक्यता, ही भारतातील मोठी डोकेदुखी आहे. २०१५ मध्ये ७५ देशांच्या सर्वेक्षणात भारतात सर्वात जास्त म्हणजे तब्बल ८० प्रतिजैविक मिश्रणे बाजारात होती आणि त्यातही प्रगत देशांत न वापरली जाणारी मिश्रणे सर्वाधिक होती. त्यातील ७५ टक्के औषधे ही आवश्यक औषध यादीतील नव्हती. अशा औषध मिश्रणांचा वापरदेखील प्रतिजैविक प्रतिरोध वाढण्यास कारणीभूत ठरतो.

प्रतिजैविके प्रतिरोधाची समस्या अशी बहुआयामी आहे. शासन, प्रशासन, डॉक्टर्स, औषध कंपन्या, फार्मासिस्ट्स, रुग्ण, रुग्णालये, शेतकरी, अन्नोत्पादकांनी या एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. प्रतिजैविके प्रतिरोध थोपवण्याचा सर्वात कमी खर्चीक आणि सोपा उपाय म्हणजे ती कमी वापरावी लागतील अशी परिस्थिती निर्माण करणे, संसर्ग होऊ न देण्याचा प्रयत्न करणे हाच होय. प्रतिजैविक युगाचे जनक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी ‘जपून वापरा प्रतिजैविके’ असा इशारा नोबेल पारितोषिक स्वीकारतानाच दिला होता. तो आपण गांभीर्याने घेतला नाही. आज प्रतिरोधाचा टाइम बॉम्ब समोर उभा आहे. आपल्याला आता तरी भान येईल का?

लक्षात ठेवण्याजोगे..

  • प्रतिजैविके डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याची औषधे आहेत, स्वत:च्या मनाने घेण्याची नाहीत.
  • इतर औषधांप्रमाणेच अँटिबायोटिक्सच्या लेबलवर डावीकडे तांबडी रेघ, आरएक्स ही खूण, शेडय़ुल एच किंवा एच१ असे चौकटीत लिहिलेले असते.
  • लवकर बरे व्हायचेय, स्ट्राँग औषध द्या, अँटिबायोटिक्स द्या, असा दबाव डॉक्टरांवर वा फार्मासिस्टवर आणू नये. फार्मासिस्टनेही प्रिस्क्रिप्शनविना प्रतिजैविके विकणे योग्य नाही.
  • प्रिस्क्रिप्शनमध्ये प्रतिजैविक लिहिले आहे का, असल्यास ते कोणते, त्याचा कोर्स किती दिवसांचा हे जाणून घ्यावे. त्वरित बरे वाटले तरी औषधांचा कालावधी पूर्ण करावा.