प्रशांत रुपवते
हिंदू धर्मामध्ये मोठा टक्का इतर मागास प्रवर्गाचा आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या महसुलातूनच हिंदू संस्कृतिरक्षण, धर्मकारण, मठ, आखाडे आदी धार्मिक व्यवस्था चालतात. त्यामुळे इतर मागासवर्गातील धर्मातराची धर्ममरतडांना धास्ती वाटते.
हिंदू धर्मव्यवस्थेत ‘आऊटगोइंग’ होते, पण ‘इनकिमग’ला मात्र वाव नाही. अर्थात ज्या सनातन वा पुरातन धर्मव्यवस्था आहेत तेथेही त्या धर्मात प्रवेश करता येत नाही. यहुदी, पारसी, जैन, आदी धर्माचे तसे आहे. जे सेमेटिक धर्म आहेत, त्यातील यहुदी पुरातन तर ख्रिश्चन, इस्लाम तुलनेत नवीन धर्म आहेत. याकारणे त्यांच्यासाठी धर्मप्रसार ही बाब प्राधान्यक्रमावर होती. त्यामुळेच केवळ या दोन धर्मामध्ये ‘बॅप्टिनिझम’ ही संकल्पना आहे. म्हणजे आमिषे, प्रलोभने, सेवा आदीद्वारे धर्मातरे घडवून आणणे. काही धर्मातरे या पद्धतीने झाली आहेत तर काही बळजोरी, तलवारीच्या धाकानेही झाली असल्याचे आक्षेप घेतले जातात. स्वामी विवेकानंद यांच्या मते भारतामध्ये कनिष्ठ, अस्पृश्य जातींनी जातव्यवस्था, पुरोहित, सरंजाम वर्गाच्या शोषणाला कंटाळून मोठय़ा प्रमाणात धर्मातरे केली.
तर ‘इंडिया मूव्हिंग: अ हिस्ट्री ऑफ मायग्रेशन’ या ग्रंथाचे लेखक चिन्मय तुंबे धर्मातराला नवीन आयाम देतात. व्यक्ती वा समूहाला विकास साधायचा असेल तर स्थलांतर एक उत्तम मार्ग असतो. मात्र भारतीय चातुर्वण्र्य, जातव्यवस्थेने व्यक्तीसमष्टीच्या विकासाच्या संधी मर्यादित केल्या. याकारणे केवळ स्थलांतर नव्हे तर धर्मातर हा त्यासाठीचा एक प्रभावी मार्ग असल्याचे जगाला दाखवून दिले. याचे उत्तम उदाहरण आहे मोहम्मद अली जिना यांचे वडील ‘पुंजाजी जिना’!अद्यापही भारतामध्ये जातव्यवस्थेमुळे विकासाच्या, व्यवसाय संधी या आक्रसलेल्याच आहेत. पिढय़ान् पिढय़ा इथले भांडवलही जातीयच राहिले आहे. व्ही. आय. पाव्हलोव्ह यांच्या ‘द इंडियन कॅपिटलिस्ट क्लास, ए हिस्टॉरिकल स्टडी’ या ग्रंथामध्ये याबाबत विस्तृत विवेचन आहे. मुंबईतील गुजराती- मारवाडी- पारशी व्यापारी, सावकारांनी त्यांचा भांडवल संचय चीनमध्ये अफू निर्यात करून केला आहे, असे सदर ग्रंथात नमूद केले आहे. आणि सद्य:स्थितीमध्येही हे भांडवल जातीयच आहे, हे देशातील नवोद्योगी व्यक्तींची नावे पाहिली तरी स्पष्ट होते.
अशा या वैदिक संस्कृतीला बुद्धाने आव्हान देत बौद्ध धम्म स्थापन केला. अनेकांनी धम्म तत्त्वज्ञान हा जीवनमार्ग म्हणून स्वीकारला. सम्राट अशोकाच्या काळात धम्माचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला. त्यानंतर काही शतकांनी त्याला पहिले आव्हान दिले ते केरळच्या कालडी गावचे आद्य शंकराचार्य तथा ‘प्रच्छन बुद्ध’ यांनी (इ. स. ७८८ – ८२०). त्यांनी चार दिशांना चार वैदिक पीठे स्थापन केली. केवळ ३२ वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या शंकराचार्य यांनी वैदिक तथा हिंदू धर्मसंस्थेला संघटित केले. वैदिक धर्माला नवीन संजीवनी दिली. हा अध्याय प्रतिक्रांती म्हणून ओळखला जातो. येथून हिंदू धर्मव्यवस्थेत प्रथमच ‘घरवापसी’ या संकल्पनेचा उदय झाला.
ख्रिश्चन, इस्लामाच्या प्रचार-प्रसाराने देशात धर्मातर हा प्रश्न व्यापक आणि गंभीर बनला. वेदप्रामाण्य धुडकावून देणाऱ्या जैन, बुद्धिझमपेक्षा या एकेश्वरी धर्मातील धर्मातरे वैदिकांना जास्त धोकादायक वाटत आली आहेत, ती केवळ हे धर्म परकीय आहेत म्हणून नव्हे. तर मुख्य म्हणजे या दोन्ही धर्मामध्ये असलेले समता हे मूलभूत तत्त्वज्ञान, परंतु त्यापेक्षा या धर्मव्यवस्थांना वैदिक चातुर्वण्र्य जातव्यवस्थेअंतर्गत आणणे वा अंकित करणे असंभव आहे. कारण गोळवलकर यांनी त्यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात याचे विवेचन केले आहे. त्यात आदिपुरुष संकल्पना, पुरुषसूक्तातातील वर्णनाद्वारे स्पष्ट केले आहे की जे लोक चातुर्वण्र्य व्यवस्था मानतात तेच हिंदूू वंशाचे लोक आहेत!
या सर्व पृष्ठभूमीवर घरवापसीचे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात करण्यात आले. त्यांना अगदी इव्हेंटचे स्वरूप देऊनही अपेक्षित प्रतिसाद आला नाही. कारण मुळात हिंदू धर्मव्यवस्थेत इनकिमग ही संकल्पना नाहीच. आणि चातुर्वण्र्य, जातव्यवस्था घरवापसी कार्यक्रमात ही सर्वात मोठी धोंड आहे. ९२ साली पुण्यामध्ये झालेल्या घरवापसी कार्यक्रमात तत्कालीन शंकराचार्यानी स्पष्ट केले की, घरवापसी करणाऱ्या व्यक्तीची पूर्वाश्रमीची जी जात असेल तीच घरवापसीनंतर कायम राहील!
अशा विविध कारणांनी ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मात होणाऱ्या धर्मातरांचे प्रमाण कमी झाले आहे. मुख्य म्हणजे यांच्या धार्मिक संस्थांना येणारा निधी आटला आहे. देशात वाढलेले शिक्षणाचे प्रमाण तसेच इतर सोयीसुविधा हे त्यामागचे कारण आहे. ज्यांनी या धर्मामध्ये धर्मातरे केली त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय यापेक्षाही सांस्कृतिक आयुष्यात गुणात्मक फार फरक पडलेला नाही. आणि दुसरं म्हणजे हिंदू धर्मामध्ये सुमारे २५० वर्षांपूर्वी ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज यांच्याद्वारे प्रबोधन युगाने आणलेली धर्मचिकित्सा, सुधारणा आणि त्याचा कासवगतीने का होणारा अंमल. (गायपट्टा सोडून) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वाना कायदयाचा आधार, अस्मिता देणारे संविधान!
याउपरही हिंदूू धर्मातील आऊटगोइंग मात्र थांबलेले नाही. त्यासाठी बुद्धिझमकडे समाजाचा ओढा मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. हे आऊटगोइंग केवळ पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींपर्यंत मर्यादित राहिलेले नाही. यामध्ये इतर मागासवर्गाचा टक्का मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसतो आहे. (संदर्भ – १ डिसेंबर २०२२ ‘लोकसत्ता’, देवेश गोंडाणे यांचे वृत्त – यंदा २६ हजार नागरिकांकडून धम्मदीक्षा, ४ जानेवारी २०२३ ‘लोकसत्ता’ बापू राऊत यांचा लेख- ‘बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची प्रेरणा काय?’ २०१३ साली नवता प्रकाशनाचे ‘पडघम सांस्कृतिक निष्ठांतराचे’ हा ग्रंथ, दिवंगत हनुमंत उपरे यांचे ‘चलो बुद्ध की ओर’ अभियान हे वानगीदाखल संदर्भ.
वर उद्धृत केलेल्या कारणांसह महत्त्वाची घडामोड म्हणजे, बिहारमध्ये सुरू असलेल्या जातवार जनगणनेचा अहवाल जाहीर झाल्यानंतर होणारी मोठी उलथापालथ, आणि अनेक राज्यांमध्ये जातवार जनगणनेची होणारी मागणी या धर्ममरतडांना असुरक्षित करते आहे.
यापूर्वी पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाने मोठय़ा प्रमाणात धम्माचा स्वीकार केला. त्यानंतर भटक्याविमुक्त समाजाने तो केला. तोपर्यंत या धर्ममरतडांना आक्षेप नव्हता. मात्र इतर मागासवर्गाचा टक्का धम्माकडे आकर्षित होत असल्यामुळे ते जास्त असुरक्षित झाले. त्याची परिणती ‘धर्मातरबंदी’ कायद्यात झाली आहे.
इतर मागासवर्गाने धम्म स्वीकारण्याची यांना धास्ती का वाटावी? त्यासाठीच्या अनेक कारणांपैकी तीन कारणं संक्षिप्तपणे पाहू या.हिंदू धर्मामध्ये मोठा टक्का इतर मागास प्रवर्गाचा आहे. यांच्याकडून येणाऱ्या महसुलातूनच हिंदूू संस्कृतिरक्षण, धर्मकारण, मठ, आखाडे आदी धार्मिक व्यवस्था चालतात. कायदे इतिहासात प्रसिद्ध असलेल्या केशवानंद भारती प्रकरणातून याबाबतचा अंदाज येऊ शकतो. भारती हे शंकराचार्य होते. त्यापेक्षाही अधिक स्पष्टता १ जानेवारी २००५ रोजी अमरावती येथील कार्यक्रमात दिवंगत राजीव दीक्षित यांनी केलेल्या विवेचनातून येते. ते सांगतात, अमेरिकेची कोलगेट कंपनी संपूर्ण भारतात व्यवसाय करून जितका पैसा अमेरिकेत पाठवते, त्याच्या तीनपट रक्कम केवळ अमेरिकन संस्थेचे बंगळूरुचे एक इस्कॉन मंदिर पाठवते. हे सर्व मी ठोस पुराव्यानिशी सांगतो आहे. ही मंदिरे त्यांच्या कमाईचे स्रोत आहेत, असेही ते नमूद करतात.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये नोंदणीकृत तीन हजारांहून जास्त देवस्थाने आहे. या देवस्थानांची उलाढाल किती असू शकते? इतर मागास वर्गाने धर्मातर केले तर हा सर्व महसूल आटणार आहे. या व्यवस्थेला सर्व पैसा याच वर्गाकडून येतो. प्राच्यविद्या अभ्यासक शरद पाटील त्यांच्या ‘दास शूद्रांची गुलामगिरी’ या ग्रंथात नमूद करतात की, हिंदूू धर्मात ३६५ दिवसांत दोन हजारांपेक्षा जास्त कर्मकांडे (म्हणजेच महसुलाची साधने) आहेत. मुख्य मुद्दा हा अर्थकारणाचा आहे. त्याकारणे धर्मातरबंदीचा कायदा आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे संस्कृतिरक्षणासाठी, हिंदूराष्ट्र उभारणीसाठी आघाडीचे मनुष्यबळ, पायदळाचा पुरवठा या वर्गाकडून होतो. मग लव्ह जिहाद, कथित गोवंशहत्या विरोधातील आंदोलने, आरक्षण.. अगदी मंडल आयोगाविरोधातील आंदोलने ते संस्कृतिरक्षणासाठी आपले सणवार उन्मादात साजरे करण्यासाठीचे मनुष्यबळ या वर्गातून येते. दहीहंडी, गणेश विसर्जन या धार्मिक कार्यक्रमांत प्रत्येक वर्षी दुर्घटना घडतात. काही जखमी तर काहींचा बळी जातो. दहीहंडीमध्ये २०२२ वर्षी तीन बळी गेले, त्यांची नावे पाहा. (या अगोदरच्या पाच.. दहा.. वीस.. वर्षांपूर्वीची नावे बदललेली दिसतील परंतु वर्ग एकच दिसेल!) वा वरील जी आंदोलने नमूद केली आहेत त्यातील आरोपींची नावे पाहा. सर्व इतर मागासवर्गातील दिसतील. चुकूनही त्रवर्णिकांची नावे दिसणार नाहीत. धर्मातरांमुळे हा भारवाही, आघाडीच्या पायदळाचा पुरवठा खंडित होऊ शकतो. म्हणून धर्मातरबंदी.
तिसरा मुद्दा या वर्गाला संस्कृतिरक्षण, धर्मरक्षण, कर्मकांडांत गुंतवले नाही तर हा वर्ग मुख्य प्रवाहात येणार. स्पर्धा तीव्र होणार. मूठभरांच्या वर्चस्वाला बाधा येणार. त्यामुळे कधी ‘खतरे में’ तर कधी ‘गर्व से कहो’च्या नशेत झुलवत ठेवणे. धर्मकथा, पुराणे, कीर्तने, पावित्र्य-अपावित्र्य यांची मूल्यरचना, दैववाद ते अवतारवाद यांचे अवडंबर माजवून या वर्गाला आभासी जगात, वास्तवाच्या आकलनापासून दूर नेले जात आहे. त्यांच्यातील विचार करण्याच्या उपजत प्रवृत्तीचे दमन करून पदयात्रा, महायात्रा, महाआरत्या, भोंगे, हनुमान चालीसा यांच्या फेऱ्यात अडकवून संस्कृती -धर्माच्या भ्रमात विद्रोहहीन केले जाते आहे. तो या व्यवस्थेतून बाहेर पडू पाहील, विचाराची, विकासाची आकांक्षा करेल तर त्यासाठी धर्मातरबंदी ! शेवटी बहुजनांनी आ. ह. साळुंखे सर म्हणतात ते ध्यानात घेतले पाहिजे की, ‘गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म कधीही एक नसतो!’
लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.
(संस्कृतिरक्षणासाठी, हिंदूराष्ट्र उभारणीसाठी मनुष्यबळ इतर मागासवर्गाकडून मिळते.)
prashantrupawate@gmail.com