तारेची कुंपणं, सिमेंटच्या भिंती, वाटेवर अणकुचीदार खिळे, बॅरिकेड्स, शस्त्रसज्ज वाहनं, आकाशात भिरभिरणारे ड्रोन, अश्रुधुराच्या न‌ळकांड्यांचा वर्षाव, ठिकठिकाणी पोलीस- दंगलरोधक पथकं आणि लष्कर तैनात… दिल्लीपासून डब्लिनपर्यंत जगभरातल्या अनेक रस्त्यांवरची ही सारी सज्जता कशासाठी? तर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्यासाठी. जणू काही हे ट्रॅक्टर नसून शत्रूंचे रणगाडेच आहेत आणि आता ते चाल करून येणार आहेत… किंवा रांगेत उभे असलेले शेकडो ट्रॅक्टर्स अचानक ट्रान्सफॉर्मर होऊन दारुगोळ्यांच्या वर्षाव करणार आहेत. जगभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांत मागण्या आणि समस्यांएवढाच सामाईक घटक आहे- ट्रॅक्टर! अनेक बलशाली सरकारांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या सामर्थ्याचं आणि असंतोषाचही प्रतीक ठरलेल्या या वाहनाविषयी…

ट्रॅक्टरच आमचं घर, तेच आमचं शस्त्र…

ट्रॅक्टर शेतकऱ्यासाठी नांगरणी, पेरणी, फवारणी, वाहतूक अशी अनेक कामं करतो, पण वेळ आली तर हाच ट्रॅक्टर शेतकऱ्यांचं घर होऊन त्यांना आश्रयही देऊ शकतो आणि शास्त्र होऊन त्यांच्यासाठी लढाही देऊ शकतो. २०२०-२१ मध्ये दिल्लीच्या वेशीवर याची झलक पाहायला मिळाली. थंडी-वाऱ्यात महिनोन महिने ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी तेव्हा ट्रॅक्टर हेच घर झालं होतं. शेतातली आवजारं आणि गुरांचा चारा वगैरे वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडली जाते. अशाच ट्रॉली भरभरून अन्नधान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तू शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी आणल्या होत्या. एरवी उघड्या असणाऱ्या या ट्रॉलीवर ताडपत्रीचं छत घालून त्यातच अनेकांनी संसार थाटले. ट्रॅक्टर ट्रॉलीचं छोटसं गावच दिल्लीच्या वेशींवर वसलं होतं. यात दोन ट्रॉली जोडून तयार केलेली… किचन आणि वॉशरूमदेखील असलेली घरंही होती. एखाद्या गावात चालावेत तसे सर्व दैनंदिन व्यवहार या ट्रॉलींमध्ये चालत. यावेळीही २५००हून अधिक ट्रॅक्टर आणि ५०० अन्य वाहनं, सहा महिने पुरेल एवढं शिधासाहित्य घेऊन राजधानीच्या वेशींवर एकवटले आहेत. पुन्हा एक ट्रॅक्टर ट्रॉलीचं शहर आकार घेऊ लागलं आहे आणि हे चाकांवरचं शहर राजधानीत पोहोचू नये म्हणून सरकार हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे.

Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न

हेही वाचा – आचार्य विद्यासागर: एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व

ट्रॅक्टरमधून चालणारं वृत्तपत्र

२०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांनी पत्रकारितेची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही ट्रॅक्टर ट्रॉलीतून एक वृत्तपत्र चालवलं होतं. नाव होतं ‘ट्रॉली टाइम्स’. त्या काळात त्याचे २२ अंक प्रसिद्ध झाले होते. गुरुमुखीतून प्रसिद्ध होणाऱ्या या वृत्तपत्राच्या दर आठवड्याला सुमारे पाच हजार प्रती छापून मोफत वाटल्या जात. त्यातला मजकूर मोफत पुनर्प्रकाशित करण्याची परवानगीही देण्यात आली होती. अजय पॉल नट हा तरुण शेतकरी ‘ट्रॉली टाइम्स’चा संस्थापक असून गुरदीप धारीवाल आणि सुरमीत मावी हे सहसंस्थापक आहेत. त्या काळात ऑस्ट्रेलियातल्या अनिवासी भारतीयांनी या वृत्तपत्राच्या १० हजार प्रति छापून मोफत वाटून आंदोलनाला समर्थन दिलं होतं.

जर्मनीत हॉर्न, हेडलाइट्सने झोप उडाली

बर्लिनमधल्या ब्रँडेनबर्ग गेटवर भर बर्फवृष्टीतही ट्रॅक्टर्सच्या रांगा लागल्या आहेत. रात्री-अपरात्री जोरजोरात हॉर्न वाजवत आणि हेडलाइटने परिसर प्रकाशित करत पुढे जाणारे ट्रॅक्टर्स परिसरातल्या रहिवाशांची झोप उडवत आहेत. अनेकांनी ट्रॅक्टर भरून शेणखत आणलं आहे आणि ते तिथल्या पार्लमेंटच्या गेटवर रितं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ट्रॅक्टर्सवर ‘इम्प्टी ट्रॅक्टर्स, गेम ओव्हर’, ‘विदाउट फार्मर्स नो फ्युचर’ अशी घोषवाक्य लिहिण्यात आली आहेत. तर फ्रँकफर्टमधला एक पूल ट्रॅक्टर्सने बंद करून ठेवला आहे.

फ्रान्समध्ये ट्रॅक्टरवर राष्ट्राध्यक्षांची व्यंगचित्रं

भारतात जसा दिल्लीला ट्रॅक्टरने वेढा घातला आहे तसाच फ्रान्समध्ये पॅरिसभोवतीही ट्रॅक्टर्सने वेढा घातला आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पॅरिसच्या वेशींवर शस्त्रसज्ज वाहनं तैनात आहेत. दंगलप्रतिबंधक पथकं आणि लष्कराच्या तुकड्याही वेशीवर खड्या आहेत. फ्रान्सचा राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या मृत शेतकऱ्याच्या कापडी प्रतिकृती ट्रॅक्टरवर बांधून शेतकऱ्यांच्या वेदना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ट्रॅक्टर अडवल्यामुळे शेतकरी वाटेतच कॅम्पिंग करत आहेत.

इटलीत हॉर्न आणि राष्ट्रगीत

एका रांगेत पुढे निघालेले आणि एका सुरात हॉर्न वाजवत जाणारे शेकडो ट्रॅक्टर, मध्येच ट्रॅक्टर थांबवून खड्या आवाजात राष्ट्रगीत गाणारे शेतकरी अशा दृश्यांमुळे रोमच्या वेशींवरील परिसरात युद्धसदृश वाटावं असं वातावरण निर्माण झालं आहे. इथल्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या दर्शनी भागांवर सरकारच्या धोरणांचा निषेध करणारी आणि शेतकऱ्यांच्या वेदनांवर जळजळीत भाष्य करणारी व्यंगचित्र रंगविण्यात आली आहेत.

ग्रीसमध्ये वाटेतच शेतकरी मेळा

ग्रीसच्या रस्त्यांवरही ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. तिथे सरकारच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी वाटेतच कृषी मेळा भरवला. आपापले ट्रॅक्टर्स थांबवून शेतकरी या मेळ्यात सहभागी झाले. योग्य दर मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी सफरचंद आणि सुक्या मेव्याची पोती रस्त्यात रिती केली. तिथे २०१६-१७ मध्येही जाचक कर आकारणीचा निषेध करण्यासाठी आशाच स्वरूपाचं ट्रॅक्टर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे शेतकऱ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या करांत अवघ्या तीन वर्षांत १३ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्याविरोधात हजारो ट्रॅक्टर्सनी महामार्ग रोखून धरले होते. आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या अश्रुधुराच्या माऱ्यानंतर आंदोलनाने हिंसक रूप धारण केलं होतं.

हेही वाचा – ओबीसींचा खरा शत्रू कोण?

युरोपियन युनियन पार्लमेंट परिसरात शेणाचे ढिगारे, अंडीफेक

ब्रसेल्समधल्या युरोपियन युनियन पार्लमेंटकडे जाणारे रस्तेही ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. पॅरिस आणि ब्रसेल्सदरम्यानचा महामार्ग ट्रॅक्टर्सनी अडवला आहे. शेतकरी महामार्गावर आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर सुकलेलं शेण आणि चारा आणून टाकत आहेत. ठिकठिकाणी असे ढिगारे साचले आहेत. काही ठिकाणी सरकारी इमारतींवर अंडी फेकली जात आहेत.

आयर्लंड

आयर्लंडची राजधानी डब्लिनच्या रस्त्यांवर अतिशय संथ गतीने पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. आरामात ट्रॅक्टर चालवत वाहतूककोंडी करणं आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेणं हा त्यामागचा उद्देश आहे.

आमच्याच देशात आमच्याच हक्काच्या संसदेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला बंदी का, असा प्रश्न हे सारे शेतकरी उपस्थित करत आहेत. आम्ही काही शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा घेऊन चाल करून आलेले दहशतवादी नाही. आम्ही सामान्य शेतकरी आहोत. सरकारच्या जाचक नियमांनी आणि हवामान बदलांच्या दुष्परिणामांनी नाडले जात आहोत. आमचं म्हणणं ऐकून घेणं आणि आमच्या समस्या सोडवणं हे सरकारचं कामच आहे, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. जगभरातल्या विविध देशांतल्या सरकारांनी आपल्याच देशातल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर्सना रोखण्यावर जेवढा पैसा आणि श्रम खर्च केले आहेत तेवढेच श्रम शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी खर्च केले असते, तर कदाचित परिस्थिती सर्वांसाठीच सुकर झाली असती.

vijaya.jangle@expressindia.com