-प्रा. डॉ. सुधाकर शेलार

आपण अलीकडे रोजच्या जगण्यात विज्ञानातून आणि तंत्रज्ञानातून निर्माण झालेली अनेक साधने वापरत असतो. या सगळ्या साधनांमागील विज्ञान आपल्याला समजलेले असतेच असे नाही. जी साधने आपण वापरतो त्यामागे जे मूलभूत विज्ञान आहे ते कोणत्या तत्त्वाने अस्तित्वात आले आहे, हे जर समजून घेतले तर आपले रोजचे जगणे बदलण्याची शक्यता आहे. आपल्या रोजच्या जगण्यात या विज्ञानामागे दडलेली तत्त्वे प्रतिबिंबित होणे म्हणजेच आपल्या जगण्यात विज्ञानवाद येणे. विज्ञानवाद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तर्कवादाचे शास्त्रशुद्ध परिणत असे रूप आहे. पूर्वी लोक तर्क करत, अंदाज बांधत त्यावरून परिस्थितीबद्दल काही विधाने करत. ही विधाने परिस्थितीच्या कसोटीवर पडताळून बघत. अनेक अनुभव घेत, ते अनुभव गाठीशी बांधत; त्यातून काही सिद्धांतांची बांधणी करत. पारंपरिक ज्ञान-विज्ञान याच मार्गाने विकसित झालेले आहे. या तर्कांना, अनुमानाला माणसाने जेव्हा प्रयोगाची जोड दिली; तेव्हा खऱ्या अर्थाने विज्ञान म्हणजे ‘विशेषज्ञान’ विकसित होऊ लागले. तर्कप्रमाण, अनुमानप्रमाण, अनुभवप्रमाण यापेक्षाही या ‘प्रयोगप्रमाणा’ला अधिक मान्यता मिळत गेली.

आपल्याकडची ज्ञानपरंपरा मात्र नेमकी याच ‘प्रयोगशरणते’पासून दूर उभी होती. आम्ही ‘तर्क’ प्रमाण मानला ‘अनुमान’ही प्रमाण मानले; त्यानंतर ‘अनुभव’ही प्रमाण मानला; पण प्रयोग करून बघण्याची तसदी मात्र घेतली नाही. त्यामुळे ‘ग्रंथप्रामाण्य’ आणि ‘शब्दप्रामाण्य’ यावरतीच आम्ही विसंबून राहिलो. साहजिकच रूढी, प्रथा, परंपरा यांचे पालन करत राहिलो. त्याबद्दल कधी प्रश्न उपस्थित केले नाहीत. आपले समाजजीवन स्थितीवादी बनत गेले. अनेक सामाजिक आणि धार्मिक रचनांचे जनकत्व आपण ईश्वराला बहाल करून टाकले. सामाजिक आणि धार्मिक रचनांबाबतीत युरोपमध्येही बराच काळ अशीच धारणा होती. धर्मशास्त्रामध्ये जे सांगितले आहे तेच प्रमाण. त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे म्हणजे धर्मद्रोह, पाखंड, अशी कल्पना प्रचलित होती.

पुढे युरोपमध्ये रेनेसान्सचे युग अवतरले. या युगात अनेक शास्त्रज्ञ उदयाला आले व विश्वाविरुद्ध उभे राहिले. पूर्वज सॉक्रेटिस त्यांचा आदर्श होता. ‘प्रयोगांती जे सिद्ध होईल तेच ज्ञान; आणि तेच स्वीकारार्ह’ अशी भूमिका या शास्त्रज्ञांनी घेतली. त्यामुळे १५ व्या १६ व्या शतकात युरोपमध्ये ज्ञानाचे पाऊल अधिक वस्तुनिष्ठ होत गेले. कोपर्निकस या शास्त्रज्ञाने पहिला धक्का दिला. त्याने सांगितले की, ‘सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते.’ ‘बायबल’मध्ये सांगितले होते की, पृथ्वी ही विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि सगळे तारे-ग्रह तिच्याभोवती फिरतात. धर्मगुरूंनी जाहीर केले की, ‘हा माणूस पाखंडी आहे.’

कोपर्निकस काही परमेश्वराच्या वा धर्माच्या विरुद्ध निघालेला नव्हता. तो सत्याच्या शोधात निघालेला होता. कोपर्निकसचं संशोधन पकडून पुढं अन्य शास्त्रज्ञांनी काम केलं. विशेषत: गॅलिलिओला त्याच्या दुर्बिणीच्या शोधामुळे जवळपास हेच भोगावं लागलं. त्यानं माफी मागितल्यामुळे तो सुटला, पण त्याच्या दुर्बिणीतून त्याने सिद्ध करून दाखवलं की, पृथ्वी सूर्याभोवतीच फिरत आहे. पुढे अनेक शास्त्रज्ञांनी अक्षरश: छळ सोसत, अगदी अंधारकोठडी, मृत्युदंड सोसत वैज्ञानिक सत्य जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. धर्मविरोधी मत मांडले म्हणून अनेक विज्ञाननिष्ठ व्यक्तींना प्राण गमवावे लागले. मात्र यातूनच युरोपमध्ये विचारक्रांती झाली.

विज्ञान उदयाला आल्यानंतर पुढे या विज्ञानाचा मानवी जीवनाच्या भौतिक सुखासाठी कसा वापर करता येईल याचा विचार सुरू झाला. त्यातून तंत्रज्ञानाचा जन्म झाला. वाफेच्या अंगी शक्ती असते हा झाला शोध; पण या शक्तीने चक्र फिरवता येऊ शकते; आणि फिरवलेल्या चक्रावर स्वार होता येऊ शकते, हेच ते तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा वापर करत भौतिक सुखसाधनांची निर्मिती करण्यात युरोप आघाडीवर होता. यातूनच तिथे औद्योगिक क्रांती सुरू झाली. उद्योगविश्वाबरोबरच त्यांचे शस्त्रविश्वही प्रगत झाले. वाहतूकव्यवस्थाही प्रगत झाली आणि या बळावर युरोप व्यापारासाठी आणि जगावर राज्य करण्यासाठी बाहेर पडला.

व्यापारासाठी आणि साम्राज्य विस्तारासाठी बाहेर पडलेल्या या युरोपीय देशांबरोबरच विज्ञान जगभर पोहोचले. आपल्याकडेही एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश आल्यानंतरच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील या सगळ्या सुविधा अवतीर्ण झाल्या. ब्रिटिशांनी दाखवलेल्या वाटेने आपली आधुनिक विज्ञानाची आणि सुधारणावादी विचारांची वाटचाल सुरू झाली. ब्रिटिश राजवटीत इथला युगधर्म बदलला. धारणा बदलल्या. एकोणिसाव्या शतकात नवा सामाजिक विचार उदयाला आला. स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि स्वातंत्र्यानंतरही त्याच दिशेने ही वाट विकसित होत राहिली. आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आहोत; पण आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साधनसामग्रीसाठी, युद्ध सामग्रीसाठी आणि रोजच्या जगण्यातल्या साधनांसाठीसुद्धा आपल्याला युरोप व अन्य देशांवरच अवलंबून राहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. जागतिकीकरणानंतर जग जवळ आले, जग एक खेडे झाले असे म्हटले जाते; त्यामुळे आज भौतिकसुखासाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित गोष्टी सर्वत्र उपलब्ध आहेत. आपल्याकडेही त्या उपलब्ध आहेत. या गोष्टींचा वापर केला की आपण आधुनिक झालो; असा एक समज रूढ झालेला आहे; पण खरे तर तो अपसमज आहे.

केवळ भौतिक साधनसुविधांची रेलचेल झाली म्हणजेच राहणीमान सुधारले, असे होत नसते; तर तुम्ही तुमच्यात किती मूल्यात्मक बदल केला, तुम्ही कोणती आधुनिक मूल्ये स्वीकारली व आचरणात आणली, विज्ञानाची साधने वापरताना तुम्ही किती ‘विज्ञानवादी’ झालात यावर तुमची आधुनिकता अवलंबून असते. या दृष्टीने भारतातील चित्र अतिशय निराशाजनक आहे. आम्ही विज्ञानाची साधने वापरतो; पण त्या पाठीमागे दडलेले तत्त्व आम्ही कधीही समजून घेतलेले नसते. त्यामुळे साधनव्यवस्था अर्वाचीन काळातील आणि मूल्ये मध्ययुगीन अशी आमची स्थिती झाली आहे. आम्ही कम्प्युटरचे उद्घाटन नारळ फोडून करतो, नवीन गाडी घेतल्यानंतर तिची आम्हाला पूजा करावीशी वाटते आणि नवीन घर बांधल्यानंतर त्याची शांती करावीशी वाटते. या मानसिकतेचे विश्लेषण आपण नेमके कसे करणार आहोत? ही मानसिकता बदलण्यासाठी विज्ञानवादाला अनुषंगून नवीन मूल्यमांडणी करण्याची आवश्यकता आहे.

विज्ञानवादाची व्याख्या अगदी सोपी आहे. विज्ञानवाद म्हणजे कार्यकारणसंबंधातून आणि प्रयोगांतून हाती आलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे. या विश्वातील प्रत्येक गोष्ट कार्यकारणसंबंधानेच अस्तित्वात आलेली असते. प्रत्येक गोष्ट ही आपल्या आधी घडून गेलेल्या गोष्टीचे ‘कार्य’ असते आणि नंतर घडणाऱ्या गोष्टीचे ‘कारण’ असते. जोपर्यंत आपल्याला एखाद्या घटनेमागील कार्यकारणसंबंध उलगडल्यानंतर ती घटना सामान्य नैसर्गिक घटना आहे, याचा उलगडा होत जातो. दोन पदार्थांच्या एकत्र येण्यातून घडणारी प्रक्रिया तिसऱ्या पदार्थाच्या निर्मितीला कारणीभूत ठरते. तेव्हा ती प्रक्रियाच प्रयोगाचे रूप धारण करत असते. ‘विज्ञानवाद म्हणजे फक्त अंधश्रद्धाविरोध’ असे समीकरण नसून विज्ञानवाद ही अतिशय व्यापक संकल्पना आहे. म्हणून विज्ञानवादी होताना तारतम्यविवेक हवा; त्यासोबत नीरक्षरविवेकही हवा.

‘विज्ञानवादाची लक्षणे’ कोणती ?

वस्तूनिष्ठ निर्णय घेणे. भावनिकता जपताना भावनेच्या आहारी न जाणे, स्वतःच्या फायद्याचे निर्णय घेताना सामाजिक, नैसर्गिक हानी होते आहे का याचा विचार करणे. स्वतः सोबत इतरांच्याही भल्याचा विचार विज्ञानवादात गृहीत आहे. विज्ञानवादाला ‘साध्यसाधनविवेक’ आणि ‘साधनशुचिता’सुद्धा अभिप्रेत आहे. नियमाधिष्ठित आचरण अभिप्रेत असल्याने भ्रष्टाचाराला विज्ञानवादात स्थान नाही. सार्वजनिक व्यवस्थांची जपणूक, त्यांच्या संवर्धनाची भूमिका घेणे विज्ञानवादात अपेक्षित आहे. पुरोगामी, डोळस भूमिका घेता यायला हवी. सांवधानिक नियमांचे पालन स्वतः करणे व इतरांना करावयास भाग पाडणे, सामाजिक शहाणीव प्रकट करणे. वर्तनातून स्वतःची व स्वतःच्या वर्गाची सामाजिक प्रतिष्ठा कायम राखणे, अंधश्रद्धांचा त्याग करणे, विविध जीवनांगांचा आस्वाद, विविध कला क्रीडा यांचा आनंद याला विज्ञानवाद कधीही विरोध करीत नाही. समाजात वावरताना बुद्ध्यांक आणि भावनांक यांचा सुयोग्य मेळ घालता यायला हवा, आपले आदर्श कोणते असावेत याचा विवेक हवा. आस्तिक-नास्तिकभाव यातही तारतम्य करता यायला हवे. मात्र हे करताना रूढी, प्रथा, परंपरा, सण-उत्सव, विधी-कर्मकांडे, यांची चिकित्सा करूनच त्यांचा स्वीकार (वा नकार) करण्यासंदर्भातील भूमिका घेणे म्हणजे विज्ञानवादी होणे होय.

प्रामाणिकपणा हा विज्ञानवादाचा एक अविभाज्य भाग आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन विज्ञानवादाला अपेक्षित असते. विज्ञानवादी व्यक्ती आप्तवाक्यावर डोळे झाकून कधीही विश्वास ठेवत नाही. विज्ञानवादात अभिनिवेशी भूमिकेला नाही. सापेक्ष भूमिकेलाही स्थान असू शकत नाही. व्यवहारवादाला मात्र इथे प्राधान्य मिळू शकते. विज्ञानवादात धार्मिक शिक्षणापेक्षा आधुनिक शिक्षण महत्त्वाचे आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वर्ज्य आहे. विज्ञानवादाचा स्वीकार केल्यानंतर त्याच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी आपल्यावर असते. विज्ञानवाद चंगळवादाला खतपाणी घालत नाही.

कोणत्या विज्ञानावर विश्वास ठेवायचा?

हा मात्र अलीकडच्या काळात निर्माण झालेला प्रश्न आहे. अलीकडे छद्म-विज्ञान जोमात आहे. यात विज्ञानाचा आभास निर्माण करत त्याचा सोयीस्कर वापर केला जातो. अशा वेळी साध्या तर्काचा वापर करावा. वेळ ही वेळ असते, त्यामुळे मुहूर्त-शुभमुहूर्त वगैरे संकल्पना विज्ञानवादाला अमान्य आहेत. विज्ञानवादात ज्योतिषज्ञानाला- ज्योतिषशास्त्राला स्थान नाही. त्यामुळे कुंडली वगैरे प्रकार त्याला मान्य नाही. विज्ञानवाद अफवांवर विश्वास ठेवू देत नाही; विज्ञानवाद गर्भलिंग तपासणीसारख्या वैज्ञानिक शोधांच्या गैरवापराचे समर्थन करीत नाही.

एकंदर विज्ञानवाद म्हणजे काय तर विवेकवाद. सद्सद्विवेक. लोकांना काय वाटते यापेक्षा माझी सद्सद्विवेकबुद्धी काय सांगते, ते महत्त्वाचे. विज्ञानातून येते ती अशी सत्यनिष्ठा, विवेकनिष्ठा. त्यामुळे विज्ञानवादातूनच खरा मानवतावाद उदयाला येऊ शकतो. रुढी एखाद्या व्यक्तीवर वा समूहावर अन्याय करणाऱ्या असतील तर मानवतावादीदृष्टीने त्यांना नकार देणे, सर्व मानव समान आहेत, सर्वांना जगण्याचा-वावरण्याचा समान अधिकार आहे. मानवतावादी दृष्टिकोन ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वावर आधारलेला आहे. ‘विज्ञानवाद’ त्याच्या विरोधी नाही; तर त्याला पायाभूत ठरणारा आहे. अंतिमत: विज्ञानवाद सत्याचे प्रतिपादन करणारा आणि सत्याचा स्वीकार करणारा आहे, एवढे ध्यानी घेतल्यास अनेक समाजविघातक कृती टाळता येऊ शकतील.

(लेखक अहिल्यानगर येथील अहमदनगर महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत.)

shelarsudhakar@yahoo.com