नीरज राऊत
पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या समस्येचा अभ्यास केल्यानंतर निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. अंजली कानिटकर आणि डॉ. हेलन जोसेफ यांनी ‘आरोहन’चे काम सुरू केले. आदिवासी उत्थानाचे हे कार्य १५ वर्षांपासून सुरू आहे.
पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यात कुपोषणामुळे बालमृत्यू होत असल्याच्या बातम्या २००५ आणि २००६ या वर्षांत येत होत्या. त्याची दखल घेऊन मुंबईतील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. अंजली कानिटकर आणि डॉ. हेलन जोसेफ यांच्या पुढाकाराने दुर्गम भागात होणाऱ्या बालमृत्यूंमागील कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी एक प्रकल्प हाती घेण्यात आला. ‘अॅक्शन रिलेटेड टू द ऑर्गनायझेशन ऑफ एज्युकेशन, हेल्थ अँड न्यूट्रिशन’ (एआरओईएचएन – आरोहन) या नावाने कामाची सुरुवात झाली. रोजगारासाठी होणारे स्थलांतर, कुपोषण तसेच आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींमुळे बालमृत्यू होत असल्याचे अभ्यासकांना आढळले. या समस्या सोडवायच्या तर तातडीने काही ठोस करण्याची गरज त्यांना वाटली. त्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. २०१४ मध्ये ‘आरोहन’ची नोंदणी सामाजिक संस्था म्हणून करण्यात आली. डॉ. हेलन जोसेफ, अंजली कानिटकर आणि त्यांचे नऊ सहकारी संस्थेचे काम पुढे नेत आहेत.
कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर या पालघर जिल्ह्यातील प्रमुख समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागातील लोकवस्त्यांना स्वयंपूर्ण करण्याचे आव्हान ‘आरोहन’ संस्थेने स्वीकारले आहे. आरोग्य शिक्षण, पोषक आहार, जलसंधारण आणि स्थानिक पातळीवरच रोजगारनिर्मिती या संदर्भातील संस्थेचे कार्य दखल घेण्याजोगे आहे. सध्या जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायती, ९८ महसुली गावे, ३३१ पाडे आणि ३३० अंगणवाडी केंद्रांमध्ये संस्था १०० पेक्षा अधिक कर्मचारी, स्वयंसेवकांच्या मदतीने कार्यरत आहे.
हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : ‘नकोशीं’ना नवजीवन
सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांच्या पायावर शाश्वत बदल घडवून आणण्याची क्षमता आदिवासींमध्ये निर्माण करणे हे ‘आरोहन’चे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी ग्रामीण-आदिवासी युवावर्गाची फळी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम संस्था करत आहे.
गेल्या दीड दशकात संस्थेने मोखाडा, जव्हार, डहाणू आणि पालघर तालुक्यांमध्ये आपल्या कामाचा विस्तार केला आहे. सध्या संस्थेमार्फत राबवण्यात येणारे प्रकल्प २० हजार नागरिकांच्या जीवनाशी निगडित आहेत. डोंगराळ प्रदेश असलेल्या या भागात २५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान होते. वाहून जाणाऱ्या पाण्याच्या साठवणुकीसाठी विशिष्ट रचनेच्या लघु आणि मध्यम बंधाऱ्यांची कामे संस्थेने हाती घेतली आहेत. शासनाची शेततळे योजना अल्पभूधारकांसाठी उपयुक्त ठरत नसल्याने ३० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असणारे जलकुंड प्रकल्प वेगवेगळय़ा गावांमध्ये राबविण्यात आले आहेत. त्याचबरोबर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून उपसा सिंचन पद्धत राबवणे, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे, वाफे तयार करून तसेच मल्चिंग (आच्छादन) या आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याचे काम संस्था करत आहे.
कुपोषणामुळे होणारे माता आणि बालमृत्यू ही जव्हार-मोखाडय़ातील गंभीर समस्या. त्यामुळे या प्रश्नावर संस्थेने काम करणे क्रमप्राप्तच होते. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील आदिवासी मुलांच्या वाढीचे नियमित मापन, मुलांचे आणि गरोदर महिलांचे वेळेवर लसीकरण व्हावे यासाठी संस्थेने स्थानिक अंगणवाडय़ांसह काम केले. बालसंगोपनातील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती महिलांना देण्यासाठी संस्थेने माता मेळावे आयोजित केले. बालविवाह रोखण्यासाठी तसेच दोन बाळंतपणांमध्ये अंतर राखण्यासाठी संस्था सातत्याने ग्रामस्थांशी संवादाचे उपक्रम राबवत आली आहे.
किशोरवयीनांमध्ये निकोप नातेसंबंधांबाबत जाण निर्माण व्हावी आणि त्यांना स्वत्वाची जाणीव व्हावी, यासाठी मुला-मुलींच्या कार्यशाळा घेणे, आहारात स्थानिक रानभाज्यांच्या समावेशाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रानभाज्या महोत्सव आयोजित करणे, पोषक आहाराबातत जनजागृती करणे इत्यादी उपक्रम संस्था सातत्याने राबवत असते.
उपजीविकेसाठी होणारे स्थलांतर रोखण्याचे आव्हान संस्थेपुढे आहे. अल्पभूधारक, भूमिहीन आदिवासी महिला आणि शेतकरी-शेतमजुरांचे बचतगट स्थापन करून त्यांना भातमळणी यंत्रे, तेल घाणे, सौर ड्रायर, शेतीउपयोगी अवजारे देऊन त्यांच्यात उद्यमशीलता निर्माण करण्याचे प्रयत्न संस्था करीत आहे. त्याचबरोबर शेतीपूरक प्रक्रिया उद्योग सुरू करून उपजीविकेसाठी होणाऱ्या स्थलांतराला आळा घालण्याच्या उद्देशाने संस्थेने काही गावांमध्ये उपक्रम सुरू केले आहेत. शासनाच्या ‘महात्मा गांधी नरेगा’ योजनेतून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा आणि स्थलांतराला काही प्रमाणात आळा बसावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सूर्यमाळ येथील कातकरी पाडय़ावरील २०० नागरिकांचे स्थलांतर कायमचे रोखण्यात संस्थेचे योगदान आहे.
हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : अक्षम मुलांना ‘पाठबळ’
जलसंधारण, शेती आणि शेतीआधारित उपजीविकेची साधने, शिक्षण आदी सर्वच बाबतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आदिवासी समूह आणि तंत्रज्ञान यातील अंतर कमी करण्याकडे ‘आरोहन’ संस्था विशेष लक्ष देत आहे. जटिल आणि खर्चीक तंत्रज्ञानाऐवजी शाश्वत आणि लोककेंद्री तंत्रज्ञान वापरण्यावर संस्थेचा भर आहे. सिंचन आणि घरगुती वापराच्या पाणीउचल प्रकल्पांसाठी तसेच शेतमाल प्रक्रियेचे लघुउद्योग चालवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर संस्थेने केला आहे. मोखाडा तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये स्वयंपाकासाठी आणि आंघोळीच्या गरम पाण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतावर चालणाऱ्या यंत्रणा बसवल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आश्रमशाळांमध्ये संगणक कक्ष, डिजिटल शिक्षणासाठी संस्थेने मदत केली आहे. तसेच वाचनालय आणि विज्ञान प्रयोगशाळा उभारणीमध्येही शाळांना साहाय्य केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत: तरुणांना शहरी भागांची माहिती मिळावी तसेच सरकारी कार्यालयांतील कामकाज समजावे यासाठी भेट आणि पाहणी दौरे आयोजित करण्याबरोबरच पेसा कायदा आणि पंचायतराजबाबत माहिती देण्यासाठी संस्थेने उपक्रमही राबविले आहेत.
काही गावांमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामविकास आराखडे तयार करण्यास संस्थेने मदत केली आहे. मोखाडा तालुक्यात जनसंवाद कार्यक्रम आयोजित करून शिक्षण, आरोग्य यांसह विकासाच्या सद्य:स्थितीबाबत नागरिक, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यात परस्परसंवाद घडवून आणण्याचा, त्यातून नागरिक आणि प्रशासनातील दरी कमी करण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. तसेच नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती पुरवून त्यांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे आणि पाठपुरावा करण्यासाठी संस्थेने स्थानीय पातळीवर जनजागृती केली आहे. भविष्यात मोखाडा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमधील १०१ पाडय़ांना ‘आदर्श श्वाश्वत ग्राम’ बनवण्याचे ‘आरोहन’चे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : विशेष मुलांची ‘मनाली’
जलसंधारण आणि जलव्यवस्थापन, आधुनिक शेती- पीकपद्धती, लोकाभिमुख तंत्रज्ञानाच्या वापरातून शाश्वत उपजीविका साधनांची निर्मिती, महिला-बाल आरोग्य, पोषण आहार, दर्जेदार शिक्षण, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती आणि माहिती- तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक परिसराच्या दृष्टीने आवश्यक विदासंचय (डेटाबेस) करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्या अनुषंगाने माहिती, प्रयोग आणि प्रशिक्षणचे केंद्र सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याची सुरुवातही छोटय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. स्थानिक आदिवासी तरुण-तरुणींना तंत्रज्ञानाचा वापर आणि देखभाल-दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या केंद्रामध्ये असेल. यातून विकासकामांसाठी आवश्यक तंत्रकुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच उपलब्ध होऊ शकेल. बचत गटांच्या उत्पादनांचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि त्यांच्या विक्रीची व्यवस्थाही या केंद्रामध्ये असेल. हे केंद्र आदिवासींच्या विकासात महत्त्वाची कामगिरी बजावेल, असा विश्वास ‘आरोहन’ संस्थेला वाटतो. मात्र हे बहुउद्देशीय केंद्र उभारण्यासाठी समाजानेही हातभार लावण्याची गरज आहे.
संस्थेपर्यंत कसे जाल?
एसटी बस किंवा खासगी वाहनाद्वारे संस्थेच्या जव्हार येथील माँ मंझिल, सिल्व्हासा रोड या कार्यालयात पोहोचता येते. मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील मनोर मस्तान नाका येथून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर जव्हार लागते.
धनादेश या नावाने काढावा
AROEHAN
(८०जी सवलतपात्र आहे.)
संस्थेची कामगिरी
९४० एकर क्षेत्रफळावर भाजीपाला, फुलशेती, फळबागांची निर्मिती
६००० शेतकऱ्यांमार्फत चार लाख ९३ हजार आंबा, काजू, बांबू आदी झाडांची लागवड.
५० गावपाडय़ांमध्ये २२० जलसंधारण प्रकल्प, २५ कोटी लिटर पाण्याची साठवणूक.
३० गावांमध्ये ३५ सौरऊर्जा प्रकल्प राबवून ३४० किलो वॉट हरित ऊर्जेची निर्मिती.
२४८ गावांमध्ये आरोग्य व स्वच्छता समित्यांची स्थापना, ६९२ माता समित्या क्रियाशील.
कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून ९१० कुटुंबांना परसबाग लागवडीसाठी मदत, प्रोत्साहन.
मोखाडा तालुक्यातील १० आश्रमशाळांतील ७००० हून अधिक विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी उपक्रम.
धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, तिसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००