डॉ. शंतनू अभ्यंकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल मेडिकल कमिशनच्या बोधचिन्हामध्ये धन्वंतरीची प्रतिमा असण्याला काहींनी विरोध दर्शवला आहे. खरं तर विरोध बोधचिन्हाला नाही, तर त्या आडून रुजू पाहणाऱ्या अवैज्ञानिक विचारसरणीला असायला हवा. सुश्रुत मुनी आज असते तर त्यांनीही आधुनिक वैद्यकशास्त्राला हजार प्रश्न विचारले असते आणि आपली संहिता नव्यानं लिहायला घेतली असती..

नॅशनल मेडिकल कमिशनने आपल्या बोधचिन्हामध्ये धन्वंतरीची प्रतिमा स्थानापन्न केली आहे. याला अपेक्षेप्रमाणे काही मंडळींनी, विरोध दर्शवला आहे. आक्षेप अनेक आहेत. कोणी म्हणतंय की युनानी या ग्रीक-अरबी-भारतीय शास्त्राला इथे अनुल्लेखाने मारलं आहे तर यामुळे सेक्युलॅरिझमभंग झाल्याचा केरळच्या आयएमएचा आरोप आहे.

बोधचिन्ह हा गंभीर प्रकार असतो. त्यातून काय बोध होणार हे अत्यंत महत्त्वाचे असते. संस्था आपली परांपरा, आराध्यमूल्ये, दृष्टिकोन, भावी वाटचाल अशा अनेक गोष्टी त्यातून सुचवत असतात. नॅशनल मेडिकल कमिशनसारख्या भारदस्त संस्थांना तर निश्चितच याबाबत गाफील राहून चालणार नाही. ‘आमच्या बोधचिन्हावर धन्वंतरी गेले वर्षभर तरी विराजमान आहेत, ती प्रतिमा नुकतीच रंगीबेरंगी तेवढी करण्यात आली आहे  (आणि इंडियाचे भारत, दीड महिन्यापूर्वीच केले आहे)’, असे स्पष्टीकरण एनएमसीने दिले आहे.

माझ्या मते या बदलला विरोध व्हायला हवा पण तो वेगळयाच कारणांसाठी. एकतर ती प्रतिमा त्या मूळ बोधचिन्हाशी काहीच नातं सांगत नाही. चित्रकाराने ती प्रतिमा आणि मूळ बोधचिन्ह, यात काही संगतीच  राखलेली नाही, सुसंगती तो दूरकी बात. धन्वंतरीची ती प्रतिमा इतकी रंगीबेरंगी केल्याने, एखाद्या शाळकरी पोऱ्याने आपल्या कंपासपेटीवर बटबटीत स्टिकर डकवावं तसं ते नवीन बोधचिन्ह दिसतं. आक्षेपार्ह बाब ही आहे.

हेही वाचा >>> महुआ मोईत्रांवरची ‘हकालपट्टी’ची कारवाई तकलादू ठरू शकते, ती का?

बाकी सेक्युलॅरिझमभंगाचा आक्षेप घेणाऱ्यांची बोधचिन्हं तरी कुठे सेक्युलर आहेत? कबुतराचे पंख, अस्क्लेपिअस, हर्मेस वगैरे ग्रीक-रोमन-ब्रिटिश देवदेवतांचे दंड, त्यांना विळखा घातलेले सर्प; अशी सर्व पाश्चात्त्य धर्मचिन्हे, शुभचिन्हे आयएमए, एम्स, अनेक प्रख्यात वैद्यकीय महाविद्यालये, एमएमसी (महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल) वगैरेंच्या बोधचिन्हांवर आजही जागा राखून आहेत. त्यांना ऑलिव्हच्या पवित्र पानांची महिरप आहे.   ही प्रिस्क्रिप्शनचा श्रीगणेशा करताना वापरली जाणारी खूण म्हणजे कोणा ज्युपिटरेश्वराची संक्षिप्त प्रार्थनाही आहे म्हणे. भारतातली विद्यमान वैद्यक व्यवस्था ब्रिटिश काळात घडली त्याचा हा परिपाक. मात्र त्यांनी ही चिन्हे प्रतीक-मात्र मानली आणि आधुनिक विज्ञानाची कास धरणारी वैद्यकी अवलंबली, याचाही हा परिपाक. ही सारी चिन्हे सेक्युलर म्हणायची का? तीही तद्दन धार्मिकच आहेत. जेत्यांच्या संस्कृतीचं जोखड आम्ही का आणि किती दिवस वाहायचं? आणि हे सगळं जैसे थेच ठेवायचं असेल तर आमच्या परंपरेशी नातं कसं राखायचं आणि तिचा अभिमान आम्ही मिरवायचा कसा?  भाळी धन्वंतरीची छबी आमच्या कमिशनने नाही वाहायची तर काय पाकिस्तानच्या?

आपल्या परंपरेशी नाळ जोडण्यात गैर काहीच नाही. आक्षेप धन्वंतरीच्या चित्राला नाही तर त्याच्या शेल्याआडून रुजू पाहणाऱ्या अवैज्ञानिक विचारसरणीला आहे.

डॉ. अ‍ॅबी फिलिप्स हा केरळी डॉक्टर यकृत विकारतज्ज्ञ आहे. काही आयुर्वेदिक औषधे यकृताला हानीकारक आहेत असं त्याच्या संशोधनाअंती लक्षात आले. त्याने त्याचे पेपर काही जर्नल्समधून प्रसिद्ध केले. विज्ञानाचा रिवाज असा, की हे संशोधन अमान्य असेल, तर रीतसर संशोधन करून ही औषधे कशी सुरक्षित आहेत याची माहिती विरोधी पक्षाने मांडावी. जर्नलमध्ये एकमेकांची यथेच्छ उणीदुणी काढावीत. पण नाही. काही उपासकांना हा रिवाज अमान्य असावा. दमबाजी, शिवीगाळ, धमक्या, दबाव वगैरे मार्गानी त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. त्यात माय-बापाचे, धर्म-जातीचेही उल्लेख आले. एका जर्नलमधून एक शोधनिबंध परत घेण्यास भाग पाडलं  गेलं. दरम्यान डॉ. अ‍ॅबी समाजमाध्यमांवर भरपूर प्रसिद्ध पावला. तिथेही जल्पकांनी त्याचा पिच्छा पुरवला. मात्र त्याच्या जाहीर भूमिकेमुळे काही औषधांचा (लिव्ह 52) खप कमी होऊ लागला. कंपनीने (हिमालया) कोर्टात धाव घेतली. डॉ. फिलिप्सचे एक्स अकाऊंट (@theliverdoc) एकतर्फी बंद झाले. सध्या ते पुनरुज्जीवित करण्यात आले आहे. लढा आणि संशोधन सुरूच आहे.

औषधांचे, अगदी जुन्यापुराण्या, पारंपरिक औषधांचे दुष्परिणाम लक्षात येणे यात लाज वाटण्यासारखं काय आहे? अपमान कुठे आहे? धोका लक्षात आल्याने बाजारातून बाद करण्यात आलेल्या कित्येक आधुनिक औषधांची जंत्री आपल्याला देता येईल. ही तर एक नियमित प्रक्रियाच आहे. आयुर्वेदाबाबतीत अशी पद्धतच विद्यमान नाही हे खरे. मग अशा संशोधनाबाबत, नव्याने धन्वंतरी मंडित झालेल्या एनएमसीची भूमिका काय असेल? अधिक संशोधनाची असेल का अधिक दांडगाईची असेल? हा धन्वंतरी कोणत्या बाजूला आश्वस्त करेल?

परवा व्हॉटसअ‍ॅपवर एक व्हीडिओ पहाण्यात आला. आयुर्वेदाची विजय पताका म्हणून तो व्हीडिओ समाज माध्यमांवर फडकत होता.  (तो सत्य मानून पुढील विवेचन केलं आहे.) त्यातल्या पेशंटच्या गालफडाला एक मूठभर आकाराची, भली मोठी गाठ होती. ती चिरटली  होती आणि त्यातून आतील मांस उकळी फुटावी तसं फुटून बाहेर आलं होतं.  ही कॅन्सरची तिसऱ्या टप्प्याची गाठ आहे असंही दाखवलं होतं. म्हणजे ती दिसत होती त्याहून कितीतरी अधिक पसरली होती. व्हीडिओतील पोरगेलेसा वैद्य एक कोयत्यासारखे हत्यार तापवून घेतो आणि ती गाठ वरच्यावर कचाकचा कापून काढतो. भूल म्हणून एक बर्फाचा खडा तेवढा फिरवला आहे, हे अभिमानानं नमूद केलं होतं. हे सारं एका साध्याशा  खोलीत घडतं. ग्लोव्ह्ज वगळता कोणीही काही घातलेले नाही. कॅप मास्क, गाऊन, निर्जंतुकीकरण वगैरेची कुणालाच गरज भासलेली नाही. वाईट वाटतं ते त्या पेशंटबद्दल. आर्थिक ओढग्रस्तीच्या, सामाजिक रीतीभातीच्या  आणि आंधळया पॅथी-निष्ठेच्या अदृष्य धाग्यांनी त्याला या वैद्य-बुवांच्या दारी आणून सोडलं असणार. सामान्यांना तो व्हीडिओ भयानक वाटेल. पण कोणाही शिकल्या सवरल्या डॉक्टरला तो क्रूर, बीभत्स आणि भयसूचक वाटेल. उत्तम वेदनाहरक औषधं उपलब्ध असताना बर्फाचा खडा भूल म्हणून फिरवणं आणि ते समाजमाध्यमांवर मिरवणं हे क्रूरच आहे. तिसऱ्या टप्प्याची कॅन्सरची गाठ अशी वरच्यावर छाटली तरी आत दशांगुळे उरणारच. ती पुन्हा दशमुखांनी वर येणारच. हे तर वैद्यकीय अनास्थेचं,  निष्काळजीपणाचं, अमानुषतेचं  बीभत्स टोक. आणि हा व्हीडिओ भयसूचक अशासाठी की आपण जे दाखवले ते चमत्कारिक नसून चमत्कारच आहे असा भ्रम त्याच्या कर्त्यांना झाला आहे. एनएमसीच्या लोगोत नव्यानेच दाखल झालेल्या धन्वंतरीला हे अपेक्षित नसावं अशी अपेक्षा.

क्षणभर मनात विचार आला, आज सुश्रुत मुनी असते तर त्यांनी हेच केलं असतं का? त्यांना अज्ञात, पण आज ज्ञात असलेलं; भूल, निर्जंतुकीकरण, कर्क-शास्त्र, आधुनिक उपकरणं, ई.  सोडून त्यांनी असलं शल्यकर्म  केलं असतं का? उलट मला वाटतं, ओ.टी. ड्रेस घालून, वॉश-बिश घेऊन, सगळयांचे गुड मॉर्निग स्वीकारत, शुश्रुत सर आजच्या थिएटरमधे पधारले तर तिथला लखलखाट आणि चकचकाट पाहून ते बेहद्द खूश होतील. नव्या यंत्रांबद्दल, तंत्रांबद्दल हजार प्रश्न विचारतील आणि बाहेर जाताच आपलीच संहिता नव्यानं लिहायला सुरुवात करतील!  हे नव्यानं लिहिणं होतं आयुर्वेदात. काही शतकांची परंपरा होती. पण नंतर ती गेली.

म्हणूनच एनएमसीच्या बोधचिन्हात धन्वंतरी या सांस्कृतिक प्रतीकाला निश्चितच हक्काची जागा आहे. भीती धन्वंतरीची नाही. त्याच्या आढय़ताखोर, बेमुरवत, आंधळया भक्तीची मात्र आहे. या बदलामुळे जर पोथीनिष्ठा येणार असेल,  अवास्तव दावे आणि  तथ्यहीन वल्गना सुप्रतिष्ठित होणार असतील, तर आक्षेप आहेच आहे.

shantanusabhyankar@hotmail.com