दिलीप य. देसाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुमेह उपचारपद्धती आणि योग्य जीवनशैलीबाबत सर्वसमावेशक दृष्टिकोन असणे कसे आवश्यक आहे, याविषयी डॉ. जगन्नाथ दीक्षित गेली काही वर्षे सातत्याने मांडणी करत आहेत. सुरुवातीला सांगणे आवश्यक आहे की प्रस्तुत लेखामधे मी जे विचार मांडत आहे त्यामधे डॉ. दीक्षित यांच्या उपचार पद्धतीचा प्रतिवाद करणे हा माझा उद्देश अजिबात नाही. डॉ. दीक्षित हे त्यांच्या या क्षेत्रातील गेल्या १० ते १२ वर्षांमधील कार्यासाठी निश्चित अभिनंदनास पात्र आहेत. परंतु जीवरसायनशास्त्र या विषयाचा एक अभ्यासक म्हणून त्यांच्या उपचारपद्धतीमध्ये जे विरोधाभास जाणवतात त्याबाबत चर्चा व्हावी या उद्देशाने हा लेख लिहित आहे. मराठी भाषेत ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ ही संज्ञा आहे. ती आरोग्याच्या संदर्भातही वापरली जाते. या अनुषंगाने विचार केल्यास डॉ. दीक्षित यांचा १८ वर्षांखालील मुले, गरोदर माता आणि टाईप १ मधुमेह रुग्ण वगळून इतर सर्वांसाठी एकच जीवनशैली आणि उपचारपद्धती हा दावा थोडा अप्रस्तुत वाटतो.

२० ते २५ वयाचे तरुण, ३५ ते ४५ या वयोगटातील तारुण्य आणि मध्यमवय यांच्या सीमारेषेवर असणारे नागरिक, ५०-६० चे वरिष्ठ नागरिक आणि त्यानंतरच्या वयोगटातील वृद्ध या प्रत्येक वयोगटातील आहारविषयक गरजा आणि जीवनशैली यांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे. या प्रत्येक वयोगटाची उष्मांक आणि पोषणमूल्ये यांची गरज वेगवेगळी आहे. व्यायाम करणारे सर्व वयोगटातील लोक बहुतेकदा त्यासाठी सकाळची वेळ निवडतात. रात्री निद्रावस्थेत न्यूनतम असणारा चयापचय दर सकाळच्या व्यायामानंतर वाढत जातो. म्हणून सकाळच्या, व्यायामानंतर उष्मांकांची गरज वाढलेली असते, या वेळात शरीराचा इन्सुलिन अवरोध कमी होऊन इन्सुलिन संवेदनशीलता वाढलेली असते आणि पेशींना शर्करा मिळण्यास अनुकूल परिस्थिती तयार झालेली असते. अशा वेळी व्यायामानंतर चांगल्या दर्जाची पोषणमूल्ये असणारा नाश्ता आवश्यक असतो. साधारण साडेआठ ते नऊ या दरम्यानची वेळ नाश्त्यासाठी आदर्श मानली जाते. या वेळी भरपूर नाश्ता केल्यानंतर डॉ. दीक्षित पद्धतीनुसार दुपारचे जेवण टाळावे लागेल. परंतु सकाळी नाश्ता करून आपापल्या कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या विशेषतः तरुण किंवा चाळिशीच्या आतील व्यक्तींना त्यांच्या चयापचय दरानुसार दुपारी एक वाजता चौरस आहार आवश्यक आहे. केवळ सकाळच्या नाश्त्यावर संध्याकाळी जेवणाची वेळ होईपर्यंत थांबणे या वयोगटातील लोकांसाठी अयोग्य ठरेल. मात्र ५५- ६० च्या लोकांसाठी बऱ्याच अंशी सकाळी नऊ ते दहा वाजता ग्रहण केलेले अन्न दिवसभर पुरेसे ठरेल. याबरोबरच कष्टाचे किंवा धावपळीचे काम करणारा वर्ग आणि सकाळच्या व्यायामानंतर दिवसभर बैठे काम करणारा वर्ग यांच्या आहारामधेही फरक करणे आवश्यक आहे.

मधुमेही तसेच मधुमेहाची शक्यता असणाऱ्या लोकांच्या आहाराबाबत फक्त इन्सुलिन आणि साखरेचे प्रमाण याचा विचार करून आहाराचा प्रकार आणि वेळ ठरवली जाते. वास्तविक साखर फक्त ऊर्जा देण्याचे काम करते, त्याव्यतिरिक्त शरीराची जडणघडण, प्रतिकारशक्ती, हाडांची मजबुती, चयापचय प्रक्रियेस लागणारी प्रथिने, कॅल्शिअम, मेदाम्ले, जीवनसत्वे, क्षार, सूक्ष्मपोषकद्रव्ये या सर्व गोष्टी दिवसाच्या आहार योजनेमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. अन्यथा केवळ साखर योग्य प्रमाणात राखली म्हणजे लढाई जिंकली असे मानणे सर्वथा अयोग्य आहे. साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी आहार कमी करण्याच्या नादात आवश्यक पोषणमूल्ये न मिळाल्याने हाडांचा ठिसूळपणा, प्रतिकारशक्ती कमी होणे अशा गोष्टी घडू नयेत म्हणून मधुमेही व्यक्तींनी चौरस संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

सर्व पोषणमूल्ये असणारा आहार दिवसाच्या दोन जेवणांमधे बसवणे आणि खाणे कितपत शक्य आहे याचासुद्धा विचार होणे गरजेचे आहे. उदा. सकाळी व्यायाम केल्यावर दूध, अंडी, मोड आलेली कडधान्ये आणि आवडीनुसार कर्बोदके घेतली जातात. दुपारच्या जेवणात चपाती, भाजी, डाळ, दही, कोशिंबीर आणि मांसाहारी व्यक्ती, मासे किंवा किंवा चिकन घेते. संध्याकाळी साडेचार पाचच्या सुमारास थोडा सुकामेवा, शेंगदाणे, चणे किंवा मोसमी फळे गरजेनुसार आणि आपापल्या वयोगटातील भुकेनुसार घेतली जातात. रात्रीचे जेवण आहार शास्त्रानुसार कमी उष्मांक असणारे आणि पचण्यास हलके अशा स्वरूपाचे घेणे सयुक्तिक ठरते. मात्र फक्त दोन वेळा जेवण घेणे निश्चित केल्यास वर नमूद सर्व आवश्यक अन्नघटकांचा त्यामध्ये समावेश करणे महाकठीण काम आहे. तसेच रात्रीचे जेवण भुकेपोटी जास्त होणे शक्य आहे. निद्रावस्थेमधे चयापचय दर न्यूनतम असल्याने रात्रीच्या जेवणात घेतलेले अधिकचे उष्मांक उलट चरबीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. वरील सर्व गोष्टी विचारात घेतल्यास, दोन वेळच्या जेवण घेण्याच्या पद्धतीनुसार अतिशय कसरत केली तरच योग्य आणि संतुलित आहार घेणे शक्य आहे.

‘मधुमेही रुग्णांना, मधुमेहतज्ञ डॉक्टर आपला मधुमेह कधीही बरा होणार नाही आणि तो वाढतच जाईल असे सांगतात,’ हे डॉ. दीक्षित यांचे विधान पटण्यासारखे नाही. कोणता चांगला डॉक्टर आपल्या रुग्णांना नकारात्मक सूचना करेल? माझ्या माहितीतले अनेक मधुमेह तज्ञ डॉक्टर रुग्णांना कमीत कमी औषधे आणि जीवनशैलीमधील योग्य बदल याच्या आधारे अत्यंत शिस्तबद्धरित्या मधुमेह नियोजन आणि रेमिशनसाठी मदत करताना दिसतात. तीच गोष्ट आहार तज्ञांबाबत. अनेक आहार तज्ञ आणि व्यायाम तज्ञ त्यांनी सुचवलेल्या आहार पद्धती, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल यांच्या आधारे मधुमेह नियोजन यशस्वीरीत्या करत असतात, फक्त त्याचा डेटा गोळा करुन प्रसिद्ध करण्याइतका त्यांच्याकडे वेळ नसतो. डॉ. जगन्नाथ दीक्षित करत असलेले कार्य निश्चित कौतुकास्पद आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे की बाकी सर्व आहार, विहार आणि उपचार पद्धती फोल आहेत. व्यक्तीच्या गरजेनुसार आहार सुचवून सेलेब्रिटी व्यक्तींचे विशेषतः सिने कलाकार लोकांचे वजन आटोक्यात ठेवणाऱ्या एक आहार तज्ञ त्यांच्या अभ्यासानुसार सल्ला देतात, त्यात गैर काय? कोणतीही आहारपद्धती त्या त्या तज्ञ व्यक्तीने आपला अभ्यास आणि ठोकताळे यातून तयार केलेली असते. त्यांच्या पद्धतीवर अनाठायी टीका करण्यापेक्षा त्यांचे आणि आपले अनुभव शेअर केल्यास रुग्णासाठी आणखी चांगली आहार आणि जीवनशैली तयार करता येईल. व्यायामशाळेत व्यायाम करणे आणि गरजेनुसार प्रथिन पुरके घेणे यावरही डॉ. दीक्षित आपल्या व्याख्यानातून टीका करतात.

प्रत्येक व्यक्तीला तिच्या गरजेनुसार व्यायाम आणि आरोग्यपूर्ण आहार पद्धती निवडण्याची प्रत्येक मुभा आहे. केवळ आपलीच आहार आणि व्यायामपद्धती योग्य असा अट्टाहास नसावा. सकाळी सुमारे ४५ मिनिटे कार्डिओ व्यायाम करावा ही सूचना योग्यच आहे, पण कमी प्रमाणात मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कार्डिओबरोबर कमी ताकदीचे, स्नायूवर्धक किंवा वजन उचलण्याचे व्यायाम केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. त्यामुळे स्नायूंचा टोन, सांध्यांची क्षमता आणि हाडांची घनता सुधारते. स्नायू बळकट करण्याच्या व्यायामानंतरचा उष्मांक खर्च होण्याचा कालावधी सुमारे ३६ ते ४८ तासांचा असतो. स्नायू पूर्वावस्थेत येण्यासाठी लागणाऱ्या या कालावधीस व्यायामाच्या भाषेत आफ्टरबर्न असे म्हणतात. साहजिकच या व्यायामामुळे इन्सुलिन सेन्सिटिविटी म्हणजे पेशींची इन्सुलिन ग्रहण करण्याची क्षमता वाढते, म्हणजेच इन्सुलिन अवरोध कमी होतो. थोडक्यात कार्डिओ आणि ताकदीचे व्यायाम हे दोन्ही केल्यास मधुमेही रुग्णांना जास्त फायदा मिळतो. अतिस्थूलपणाबाबतचे विधानही असेच बुचकळ्यात टाकणारे आहे. प्रत्येक मधुमेही व्यक्ती स्थूल असेलच असे नाही, कृश दिसणारी व्यक्ती पण मधुमेही असू शकते हे बरोबरच आहे. पण स्थूल असणाऱ्या विशेषतः कंबर, पोट या भागात चरबी असणाऱ्या व्यक्तींना मधुमेहाचा धोका सर्वात जास्त असतो ही वस्तुस्थिती आहे.

डॉ. दीक्षित सांगतात की डोळे, कान उघडे ठेवून एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते त्यापेक्षा वेगळी दिसली तर तिची शहानिशा करणे आवश्यक आहे. हीच गोष्ट त्यांनी स्वतः सुद्धा अंगिकारली पाहिजे आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या परंतु वेगळ्या आहार, विहार आणि व्यायाम पद्धतीने, त्यांच्याच भाषेत मधुमेह रेमिशन स्तरावर आणण्यात यशस्वी झालेल्या इतर तज्ञ डॉक्टर आणि आहारतज्ञ यांचे अनुभव मनापासून स्वीकारले पाहिजेत. अंतिमतः देशातील ११ कोटी मधुमेही रुग्णांची औषधे आणि जीवघेणे दुष्परिणाम यांच्यापासून सुटका होणे महत्वाचे आहे.

लेखक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा, मुंबई येथील निवृत्त उपसंचालक असून जीवरसायन शास्त्र आणि रेणविय जीवशास्त्र हे त्यांचे विशेष अभ्यास क्षेत्र आहे.

rajddesai@Yahoo.co.in

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about dr jagannath dixits holistic approach to diabetes treatment and lifestyle and contradiction dvr
Show comments