डॉ. भूषण पटवर्धन

विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेपर्यंत म्हणजे विद्यापीठापर्यंत येऊ शकत नसेल, तर विद्यापीठाने त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, या डॉ. राम ताकवले यांच्या धारणेतून बहि:शाल शिक्षणास अधिक बळ मिळाले.

पुरंदरच्या भूमीत जन्मलेले, पुण्यभूमीमध्ये उच्चविद्याविभूषित होऊन राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात विकसित झालेले आश्वासक व्यक्तिमत्त्व म्हणून प्राध्यापक राम ताकवले शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वपरिचित होते. पदार्थविज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन व अध्यापन करीत असताना पुणे विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू होण्याचा बहुमान त्यांना लाभला. एक हाडाचा शिक्षक नेतृत्वाची संधी मिळाल्यास त्याचे सोने कसे करू शकतो हे कुलगुरू राम ताकवले यांनी दाखवून दिले. त्यांच्या काळामध्ये पुणे विद्यापीठाने क्षेत्रीय विद्यापीठापासून राष्ट्रीय विद्यापीठापर्यंत आपला ठसा उमटवला. शैक्षणिक व संशोधनाची गुणवत्ता वाढवून प्राध्यापक ताकवले यांनी विद्यापीठ प्रशासनामध्येही काही आमूलाग्र बदल घडवून आणले. विद्यापीठातील विभागांना स्वायत्तता देणे, आर्थिक सबलीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या समजावून घेऊन त्यांचे निराकरण करणे आणि विद्यार्थ्यांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून देणे, हे करीत असताना डॉ. राम ताकवले यांनी पुणे विद्यापीठाच्या र्सवकष विकासावर भर दिला आणि ते लोकाभिमुख करण्यासाठी मोठे योगदान दिले.

पुणे विद्यापीठाचे अकरावे कुलगुरू म्हणून २३ ऑगस्ट १९७८ साली त्यांनी कार्यभार स्वीकारला. पाच वर्षांच्या कारकिर्दीमध्ये प्रा. ताकवले यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विद्यार्थिदशेत असल्यापासून त्यांचे कार्य जवळून बघण्याचे भाग्य मला लाभले. माझ्या पदवीवर त्यांची स्वाक्षरी आहे, याचा मला खूपच अभिमान वाटतो.

सन १९८० साली पुणे विद्यापीठातर्फे पु. ल. देशपांडे यांना सन्माननीय पदवीने गौरवण्यात आले. त्या वेळेस पुलंनी दोन महत्त्वाच्या सूचना केल्या. पहिली म्हणजे पदवीदान समारंभ संपूर्ण मराठीमध्ये असावा आणि दुसरी म्हणजे पुणे विद्यापीठाचे स्वतंत्र गीत असावे. तेव्हा डॉ. ताकवले हेच कुलगुरू होते. त्यांनी या सूचनांचे स्वागत व त्वरित अंमलबजावणी केली. ‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’ हे मंगेश पाडगावकरांनी शब्दबद्ध केलेले आणि भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेले ‘पुणे विद्यापीठ गीत’ डॉ. राम ताकवले यांच्या कारकीर्दीमध्येच घडले. डॉ. ताकवले यांनी विद्यापीठ गीत हे समूहगीत आहे, संचलन गीत नव्हे, असे यथार्थ वर्णन करून विद्यापीठ व महाविद्यालयाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये गायले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तेव्हापासून आजतागायत हे सुरेल गीत प्रत्येक विद्यापीठप्रेमीच्या हृदयामध्ये घर करून आहे.

पुणे विद्यापीठ लोकाभिमुख होण्यासाठी डॉ. ताकवले विशेष आग्रही होते. त्यांच्या काळात बहि:शाल शिक्षणास अधिक बळ मिळाले. समाजामधील गृहिणी, शेतकरी, नोकरदार अशा अनेक घटकांना महाविद्यालयामध्ये पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेणे शक्य नव्हते हे त्यांनी हेरले. विद्यार्थी विद्यापीठात येऊ शकत नसतील तर विद्यापीठाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. राष्ट्र सेवादलाचे संस्कार आणि प्रा. ग. प्र. प्रधान यांच्यासारख्या समाजाभिमुख प्राध्यापकाच्या सान्निध्यामध्ये असणाऱ्या राम ताकवले यांना प्रेरणा मिळाली असावी. यामधूनच १९८३ साली डॉ. ताकवले यांनी पुणे विद्यापीठामध्ये दूरशिक्षण केंद्र सुरू केले. यामधूनच कालांतराने मुक्त शिक्षण संस्था कार्यरत झाली आणि कालांतराने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून डॉ. ताकवले यांनी मोलाची कामगिरी केली. पूर्वीची बहि:स्थ शिक्षण पद्धती सुदृढ करीत असतानाच तंत्रज्ञानाचा उपयोग करून दूरशिक्षण, मुक्त शिक्षण, दूरस्थ शिक्षण अशा संकल्पना त्यांनी प्रभावीपणे विकसित केल्या व ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य सार्थ केले. निवृत्तीनंतरही डॉ. ताकवले यांनी मुक्त शिक्षणाचा प्रसार केला. दिल्लीमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द आजही अनेकांच्या स्मरणात आहे. डॉ. राम ताकवले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पुणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत लंडनच्या मुक्त विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवीने गौरवले हे विशेष!

डॉ. ताकवले हे अत्यंत नि:स्पृह, अभ्यासू, निगर्वी आणि संवेदनशील, अत्यंत रुबाबदार, हसतमुख व आश्वासक व्यक्तिमत्त्व होते. पुणे विद्यापीठ प्रशासन सबल करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. विद्यापीठांमधील विविध विभागांना शैक्षणिक स्वायत्तता देऊन आर्थिक विकेंद्रीकरण करण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत दूरदर्शी होता. विभागप्रमुखांचे पद ही कोणाची कायमची मक्तेदारी होऊ नये म्हणून त्यांनी दर तीन वर्षांनी रोटेशनची पद्धत आणली. विद्यापीठामधील विविध विचारांचे गट, संघटना यांच्यामध्ये समन्वय आणून विद्यार्थी व समाजोपयोगी निर्णय घेण्याचे कौशल्य डॉ. ताकवले यांच्याकडे होते. त्या काळात पुणे विद्यापीठामध्ये अनेक नवीन प्रकल्प व संकल्पना उदयाला आल्या. आंतरविद्याशाखीय केंद्र, शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्र, उद्योगजगताबरोबर सहकार्य, या बरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही डॉ. ताकवले यांनी पुणे विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला.

सामाजिक न्याय, समता, बंधुत्व आणि सर्वसमावेशकता या तत्त्वांना अनुसरून डॉ. ताकवले यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सन २००३ ते २००६ या कालखंडामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषदेचे, म्हणजेच ‘नॅक’ बंगलोरचे अध्यक्ष होते. याच ‘नॅक’च्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचे समजल्यावर फेब्रुवारी, २०२२ मध्ये डॉ. ताकवले यांना प्रथम भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. ‘नॅक’ने भविष्यामध्ये कोणती दिशा घ्यावी या संबंधाने त्यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. ‘नॅक’च्या श्वेतपत्रिकेच्या निर्मितीमध्ये डॉ. ताकवले यांनी उत्साहाने मार्गदर्शन केले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी ऊर्जेने, सर्जनतेने, आपुलकीने आणि कर्तव्यबद्धतेने विद्वत्तापूर्ण मार्गदर्शन केले, ते आम्हास प्रेरणादायी होते. लक्ष्मणासारखे सदैव त्यांच्या मदतीसाठी हजर असणारे त्यांचे बंधू प्रा. एम. जी. ताकवले यांनीही या कार्यात मोलाची मदत केली.

आज प्रा. राम ताकवले आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार सर्वच शिक्षणप्रेमींना व बहुजनांना प्रेरणादायक ठरतील. पुरंदरमधील हरगुडे या छोटय़ा गावामधून आलेल्या डॉ. राम ताकवले यांनी शिक्षणाचा प्रसार समाजामधील शेवटच्या घटकापर्यंत कसा होईल यासाठी सर्व आयुष्य वेचले व हजारो विद्यार्थी, प्राध्यापक आणि शैक्षणिक नेतृत्व घडवले. अशा या द्रष्टय़ा शिक्षणतज्ज्ञास आदरांजली!

bpatwardhan@gmail.com