डॉ. अजय वैद्य
गोव्यातील विविध सामाजिक संस्थांचे अध्वर्यू आणि ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’च्या कला विभागाचे संस्थापक रामकृष्ण नायक यांचे अलीकडेच निधन झाले, त्यानिमित्ताने त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्तृत्वाचा आलेख..
‘धि गोवा हिंदू असोसिएशन’चा कला विभाग स्थापन करण्याबद्दल १९५४ साली चर्चा चालली होती तेव्हा संस्थेतल्या बुजुर्गाचा त्याला कडवा विरोध होता. पण रामकृष्ण नायक वगैरे तरुण मंडळींचा आग्रह कला विभाग स्थापन करावा असा होता. या मंडळींनी बुजुर्ग मंडळींचे आव्हान स्वीकारले आणि ‘गोवा हिंदू’च्या कला विभागाची स्थापना झाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य नाटयस्पर्धा सुरू झाली होती. आणि त्यात ‘गोवा हिंदू’ने ‘सं. संशयकल्लोळ’, ‘सं. शारदा’, ‘मृच्छकटिक’सारखी नाटके सादर करून स्पर्धेत प्रथम पारितोषिके पटकावली. पुण्याची ‘पीडीए’, ‘रंगायन’सारख्या मातब्बर संस्थांशी टक्कर देऊन मिळवलेलं हे यश होतं. त्यामुळे संस्थेतील बुजुर्गाचा विरोध पुढे मावळला. यात रामकृष्ण नायक यांचं नेतृत्व, शिस्त आणि कलेची जाण कारणीभूत होती. नंतर ‘गोवा हिंदू’ व्यावसायिक रंगभूमीवर उतरली. त्यावेळी वसंत कानेटकर ‘पीडीए’ आदींसाठी नाटकं लिहित. गोव्याचे भिकू पै आंगले त्यांच्या खूप जवळचे. त्यांच्यामुळेच कानेटकरांची ‘गोवा हिंदू’ला ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक दिलं. एकदा ‘मृच्छकटिक’ पाहायला कानेटकर आले होते. आशालता वाबगावकर त्यात काम करत होत्या. त्यांना पाहून कानेटकर उद्गारले, ‘ही माझी मत्स्यगंधा’. त्यावेळी ‘मत्स्यगंधा’ हे नाटक ‘गोवा हिंदू’कडे आलं. आणि रामदास कामत व आशालता वाबगावकर यांनी ते गाजवलं. या नाटकाच्या तालमी लॅमिंग्टन रोडला संस्थेच्या जागेत सुरू होत्या. तेव्हा त्याचं संगीत कुणी करावं याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आधी वसंत देसाईंना विचारलं गेलं. ते म्हणाले, ‘मी एका गाण्याचे ५०० रुपये घेईन.’ संस्थेला हे काही परवडण्यासारखं नव्हतं. मग सी. रामचंद्र यांना विचारण्यात आलं. पण त्यांचंही काही जमलं नाही. तेव्हा रामकृष्ण नायकांनी पं. जितेंद्र अभिषेकींचं नाव सुचवलं. आणि पुढचा इतिहास तर सर्वश्रुतच आहे.
हेही वाचा >>> आधार देणारे अदृश्य खांब हीच खरी संपत्ती
‘गोवा हिंदू’ मध्ये कमालीची शिस्त होती. कलावंतांना प्रयोगानंतर लगेचच नाईट दिली जाई. मा. दत्ताराम यांनी एकदा रामकृष्ण नायकांना सांगितलं होतं की, ‘गोवा हिंदू’ च्या चोख मानधनामुळेच मी वसईत घर घेऊ शकलो.’ रामकृष्ण नायकांना बेशिस्त बिलकूल खपत नसे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मधील प्रमुख कलावंत काशिनाथ घाणेकरांचं दारूचं व्यसन नायकांना आवडत नव्हतं. त्यांनी शंभराव्या प्रयोगाला त्यांच्या नाईटचं पाकिट त्यांना दिलं आणि नाटकातून काढून टाकलं. त्याआधी कृष्णकांत दळवींकडून रामकृष्ण नायकांनी ही भूमिका बसवून घेतली होती. पुढच्या प्रयोगात दळवी घाणेकरांच्या भूमिकेत उभे राहिले आणि प्रेक्षकांना हे कळलंदेखील नाही.
‘स्पर्श’ हे जयवंत दळवींचं नाटक. कुष्ठरोग्यांच्या समस्येवरचं. याचा अनुभव घेण्यासाठी जयवंत दळवी, रामकृष्ण नायक वगैरे मंडळी एका आश्रमात गेली होती. तिथं बरे झालेले कुष्ठरोगीच सगळी कामं करीत असत. तिथे ही मंडळी जेवायला बसली तर कुष्ठरोग्यांच्या हातचं जेवण घेणं त्यांना अवघड गेलं. या समस्येची तीव्रता त्यांना स्वत:लाच जाणवली आणि हे नाटक संस्थेनं रंगभूमीवर आणलं.
‘गोवा हिंदू’ मध्ये तीन तीन मॅनेजर होते. एकावेळी संस्थेच्या नाटकांचे तीन तीन दौरे चालू असत. पण कुठल्याही दौऱ्याची आखणी करताना रामकृष्ण नायक आणि सीताराम मणेरीकर वगैरे आधी स्वत: त्या गावात एसटीचा खडतर प्रवास करून जात. राहण्या – खाण्याची व्यवस्था नीट होईल ना, याची खातरजमा करून घेत आणि मगच नाटकाचा दौरा आखत. त्यामुळे ‘गोवा हिंदू’मध्ये कलाकारांचे कधीच हाल झाले नाहीत.
तात्यासाहेब शिरवाडकरांचं ‘नटसम्राट’ गाजत होतं तेव्हा एकदा तात्यासाहेब रामकृष्ण नायकांना म्हणाले, ‘ज्येष्ठांच्या म्हातारपणावरील हे नाटक वगैरे ठीक आहे. परंतु खरंच हा प्रश्न खूप गंभीर आहे. तेव्हा वृद्धांसाठी काहीतरी करा.’ तेव्हा उत्तम चाललेला आपला चार्टर्ड अकौंटंटचा व्यवसाय बंद करून रामकृष्ण नायकांनी खांद्याला झोळी लावली आणि ते ‘स्नेहमंदिर’च्या उभारणीसाठी कामाला लागले. तेव्हा गोव्यातले लोक चिडले. म्हणू लागले, ‘हे फक्त कुटुंब मोडायला निघालेत.’ गोव्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे हेही ‘स्नेहमंदिर’च्या विरोधातच होते. पण एकदा सारासार विचार करून निर्णय घेतल्यावर रामकृष्ण नायकांनी माघार घेतली नाही. त्यांनी दारोदार जाऊन देणग्या गोळा केल्या आणि ‘स्नेहमंदिर’ उभारले. पुढे एकाकी वृद्धांच्या समस्येचं गांभीर्य समाजालाही पटलं आणि ‘स्नेहमंदिर’ छानपैकी नांदतं – खेळतं झालं. साठ ते सत्तर वयांपर्यंतच्या ज्येष्ठांना ‘स्नेहमंदिर’ मध्ये वास्तव्य करता येतं. पण त्यानंतर कुठे जायचं, हा प्रश्न त्यांना भेडसावे. परत घरी जाणं शक्य नसे. मग ७० ते ८० वयातल्या लोकांसाठी ‘सायंतारा’ हे निवासगृह बांधण्यात आलं. पण त्यापुढे जगणाऱ्यांची काय सोय? म्हणून मग एका खाणमालकानं दिलेल्या दीड कोटीच्या देणगीतून ‘आश्रय’ हे तिसरं निवारागृह बांधण्यात आलं. या सगळया खटाटोपात सरकारकडून एक पैशाचीही मदत संस्थेने कधी घेतली नाही. आजही ‘स्नेहमंदिर’मधील रहिवाशांकडून महिना साडेसात हजार रु. ‘सायंतारा’ साठी दहा हजार रु. आणि ‘आश्रय’मधील खाण्यापिण्यासकट वास्तव्यासाठी बारा हजार रु. घेतले जातात. त्यातूनही हा व्यवहार तोटयाचाच राहिला आहे. पण देणग्या वगैरेंतून वरची रक्कम उभी केली जाते. ‘सायंतारा’तील ज्येष्ठांसाठी आरोग्यसेवा लागणार हे लक्षात घेऊन ‘कुवळेकर नर्सिग होम’च्या सहकार्याने परिचारिका प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. ‘स्नेहमंदिर’मधील ज्येष्ठ आजूबाजूच्या मुलांसाठी क्लास घेतात; ज्याचा लाभ गरीब, होतकरू मुलांना होतो. या मुलांच्या उत्कर्षांसाठी ‘गोवा हिंदू’ने शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या. शालेय ते पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संस्था लाखो रुपयांच्या शिष्यवृत्त्या दरवर्षी देत असते.
काही वर्षांमागे गोव्यातल्या लोकांसाठी मोबाइल क्लिनिक हा उपक्रम सुरू करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने ही योजना सुरू करण्यात आली. तिचा लाभ गावोगावच्या खेडुतांना होऊ लागला. आता खेडोपाडी डॉक्टर, आरोग्यसेवा पोहोचल्यामुळे हा उपक्रम बंद करण्यात आला आहे.
रामकृष्ण नायकांनी सतत नवनव्या उपक्रमांची स्वप्ने पाहिली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झोकून देऊन व्रतस्थपणे आयुष्यभर काम केले. देणग्या गोळा करण्यासाठी त्यांच्या अनेक वर्षे गोवा- मुंबई अशा फेऱ्या होत. परंतु त्यांनी वाढत्या वयातही ट्रेनशिवाय कधी प्रवास केला नाही. संस्थेचा पैसा अनावश्यक बाबींसाठी खर्च करण्यास त्यांचा कायम आक्षेप असे. स्वत:च्या बाबतीतही त्यांनी हा नियम काटेकोरपणे पाळला.
संस्थेचे काम करताना कधीही व्यक्तिगत मानसन्मान, पुरस्कार स्वीकारायचा नाही, हे पथ्य त्यांनी स्वत:ला घालून घेतले होते. त्यामुळे ‘पद्मश्री’ वगैरे पुरस्कारांना त्यांनी कायमच विरोध केला. झी जीवनगौरवचा अपवाद करता कधीही ते पुरस्कार घ्यायला गेले नाहीत. समाजकार्य करायचं तर कोणतेही पाश नकोत म्हणून ते अविवाहित राहिले. दोन वर्षांपूर्वीपर्यंत ते ‘गोवा हिंदू’च्या कामात सक्रिय सहभाग घेत. दोन – तीन वर्षांपासून वयपरत्वे त्यांचं ‘स्नेहमंदिर’मध्येच वास्तव्य होतं. तिथल्या सांस्कृतिक, ‘कला’त्मक कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावत. त्यांच्या रूपाने समाजाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, कलात्मक आणि सामाजिक घडणीसाठी अथक जळणारा नंदादीप आज निमाला आहे.