डॉ. अनंत फडके
कोविड-१९ वरील लशीची ‘वर्धक मात्रा’ अर्थात ‘बूस्टर डोस’ हा अद्यापही चर्चेचाच विषय आहे.. लसकुप्यांचा साठा अधिक, म्हणून मात्रा मोफत दिली जाते आहे का, ज्येष्ठ नागरिकांनाच असलेली ही मात्रा आता ‘सर्वासाठी’ कशी, आदी प्रश्न अगदीच चुकीचे नसले, तरीही लशीबाबत जागृती आवश्यक आहे..
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाची जनतेला एक भेट म्हणून १५ जुलै ते ३१ ऑगस्ट १८ ते ६० वयोगटातीलही लोकांना कोविड-१९-लस मोफत मिळेल, असे सरकारने जाहीर केले. त्यामागची पार्श्वभूमी व कोविड-१९च्या नव्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तिसरा डोस घ्यावा का याची थोडक्यात चर्चा करू. हा बूस्टर डोस सुमारे सहा महिने सर्वासाठी मोफत नव्हता. पंतप्रधानांनी २५ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर केले होते की कोविड-१९-लशीचे दोन डोस मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांना तिसरा डोस १० जानेवारी २२ पासून घेता येईल. ‘द वायर’च्या बनज्योत कौर यांनी माहिती अधिकाराच्या वापरातून नेटाने काही महिने प्रयत्न करून पुढे आणले की लशीच्या वापराला परवानगी देण्यासाठी भारतात असलेल्या पाच-सहा राष्ट्रीय समित्यांपैकी कोणाचीच हा बूस्टर डोस देण्याची शिफारस नव्हती! सिरम इन्स्टिटय़ूटने बूस्टर डोससाठी केलेला अर्ज फेटाळताना २१ डिसेंबरला संबंधित तज्ज्ञ समितीने म्हटले की इंग्लंडमधील ७५ लोकांवर केलेल्या संशोधनाचा सिरमने आधार घेतला आहे. भारतीय लोकांवर अभ्यास करून त्यांनी अर्ज करावा. असे असूनही १० जानेवारीपासून सरकारने सर्वाना तिसरा डोस देण्याचे का ठरवले?
२२ एप्रिल २०२२ला सिरम इन्स्टिटय़ूटच्या पूनावालांनी जाहीर केले की त्यांनी ३१ डिसेंबरपासून ‘कोव्हिशिल्ड’चे उत्पादन मागणी नसल्याने बंद केले. बूस्टर डोस व मुलांना लस देण्याबाबत निर्णय मंद गतीने होत असल्याची त्यांनी तक्रार केली. पण बनज्योत कौर यांना ३० जून २२ ला ‘ड्रग्स कंट्रोलर’ने कळवले की मुळात असे डोस देण्यासाठी त्यांच्याकडे कोणीही परवानगी मागितलेली नाही! दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण एप्रिल ते जून या काळात ६० टक्क्यांहून फक्त ६५ टक्क्यांपर्यंत वाढले कारण लोकांचा लस घेण्याचा कल कमी झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना तिसरा डोस मोफत मिळत असूनही फक्त पाच कोटी लोकांनी तिसरा डोस घेतला. पूनावालांनी सांगितले की सप्टेंबरनंतर त्यांचे २० कोटी डोस निकामी झाल्याने फेकून द्यावे लागतील. २२ जूनला आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले की राज्य व केंद्र सरकारांकडे कोविड-लशीचे सुमारे १२ कोटी डोस पडून आहेत. बूस्टर डोस देण्याबाबत भारतात पुरेसे संशोधनच झाले नसताना लशीचे डोस वाया जाऊ नये म्हणून सरकारने सरसकट सर्व प्रौढांना ३१ ऑगस्टपर्यंत मोफत कोविड-१९ लस देण्याचा निर्णय घेतला असा संशय येतो.
नवनव्या उपप्रकारांची आव्हाने
कोविड-१९ विषाणूचे उपप्रकार आल्याने नवे आव्हान उभे राहिले. डिसेंबर-२०२१ पासून ‘ओमायक्रॉन’ उपजातीच्या विषाणूमुळे नवी लाट आली. त्यात सहा महिन्यांपूर्वी लस घेतलेल्यांना किंवा कोविड-१९ झालेल्यांनाही ‘ओमायक्रॉन’ची बाधा झाली. पण ‘ओमायक्रॉन’च्या रुग्णांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे व मृत्यूचे प्रमाण खूपच कमी राहिले असे सरासरी काढल्यावर अगदी ढोबळपणे दिसते. हमी कशाचीच नाही. ‘ओमायक्रॉन’ची साथ ओसरू लागल्यावर वाटले होते की आता आणखी लाट कदाचित येणार नाही. पण ‘बीए-५’ या नव्या उप-प्रजातीची लाट येऊन कोविड-१९ आजार युरोप- अमेरिकेमध्ये खूप वेगाने पसरतो आहे. भारतातही हे होऊ घातले आहे. अमेरिकेमध्ये रोज ३०० पेक्षा जास्त जण या लाटेमध्ये दगावत असून रोज सुमारे सव्वा लाख लोकांना नवीन लागण होते! त्यापासून संरक्षण मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे बूस्टर डोस घेणे. पण दुसऱ्या बाजूला नवे संशोधन सांगते की सध्याच्या लशींमुळे मिळणारे संरक्षण डेल्टा, ‘ओमायक्रॉन’, ‘बीए-५’ या नव्या उप-प्रजातींच्या विरोधात कमी झाले आहे. दोन लशी घेतल्यावरही, बूस्टर घेतल्यावरही कोविड-१९ झाल्याचे अनेक नागरिकांनी ऐकले, पाहिले, अनुभवले आहे. मात्र कोविड-१९ झाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याने बूस्टर डोस कशाला घ्यायचा असा अनेकांना प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने पद्धतशीर लोकशिक्षणाची मोहीम आखून याचे शास्त्रीय उत्तर सोप्या भाषेत द्यायला हवे. तसे न करता ३१ ऑगस्टपर्यंत सर्व प्रौढांना मोफत लस देण्याचा नुसता निर्णय जाहीर केला. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद थंड राहणे साहजिक आहे.
बूस्टर डोस का आणि कोणी घ्यावा?
‘सार्स कोव्ह-२’ या विषाणूतील एका प्रथिनाचा भाग प्रयोगशाळेत बनवून त्याच्या आधारे सध्याच्या लशी बनवल्या आहेत. डेल्टा, ‘ओमायक्रॉन’, व ‘बीए-५’ या नवीन उप-प्रजातींमधील प्रथिनांची रचना बऱ्यापैकी वेगळी असल्याने या जुन्या लशी ‘सार्स कोव्ह-२’च्या नव्या उप-प्रकारांपासून कमी संरक्षण देतात. त्यामुळे लस घेऊनही काही जणांना पुनर्लागण व आजार होतो. तसेच लशीमुळे कोविड-१९ आजारापासून मिळणारे संरक्षण बहुसंख्य लोकांमध्ये तीन महिनेच टिकते. मात्र तीव्र आजार व मृत्यू याचे प्रमाण खूप कमी आहे. या पार्श्वभूमीवर खालील दोन गटांच्या लोकांनी तिसरा डोस घ्यायला हवा – एक – ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे – एच.आय.व्ही. लागण झालेले, कर्करोगावर औषधे घेणारे, शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे घ्यावी लागणारे इ. लोक. दुसरे – ४० ते ६० वयोगटातील विशिष्ट सह-व्याधी (मधुमेह, उच्च-रक्तदाब, लठ्ठपणा, फुप्फुसाचे तीव्र आजार इ.) असलेले आणि साठीच्या पुढील वयोगटातील सर्व जण. या दोन गटांमध्ये तीव्र कोविड-१९ व मृत्यूचा धोका तरुणांपेक्षा खूपच जास्त असल्याने सरकारने त्यांना प्राधान्याने लस देण्याचे २०२१ मध्ये ठरवले होते. आता लशीचा पुरवठा पुरेसा असल्याने प्राधान्य ठरवण्याची गरज नाही. पण ज्यांना मुळातच तीव्र कोविड-१९ होण्याची शक्यता फारच कमी आहे अशांना म्हणजे तरुणांना, लहान मुलांना लस देण्यात हशील नाही. आणखी एका कारणासाठी त्यांनी तिसरा डोस घेऊ नये. अनेक देशांतील संशोधनातून स्पष्ट झाले आहे की काही कोविड-लशीच्या बाबतीत लस घेतलेल्यांच्या रक्तामध्ये गुठळय़ा (विशेषत: मेंदूतील रक्तवाहिनीत) झाल्यामुळे गंभीर धोका होऊ शकतो. त्याचे प्रमाण दर एक ते दोन लाख डोसमागे एक आहे. काही प्रगत देशांमध्ये स्वतंत्र तज्ज्ञ, जनमत यांचा दबाव बराच जास्त आहे; सरकारी यंत्रणा कडक आहे. त्यामुळे मूळ अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या व म्हणून ‘सिरम’च्याही संकेतस्थळावर हा धोका नमूद केला आहे. भारतात मात्र सरकारी आकडेवारीप्रमाणे पहिल्या ७.५ कोटी डोसमागे २७ अशा केसेस आढळल्या; म्हणजे सुमारे १५ लाख डोसमागे एक. या नोंदी ठेवण्याची व्यवस्था दुबळी ठेवली गेल्याने हे प्रमाण इतके कमी सापडले. रक्ताच्या गुठळीच्या धोक्यामुळे इंग्लंड व इतर आठ युरोपीय देशांत ती फक्त वयस्करांना दिली जाते. पण भारतात सर्व प्रौढांना दिली जाते आहे!
लशीपेक्षा रोगाकडून धोका अधिक!
पडून राहिलेले डोस संपवण्यासाठी सरकार सर्वाना लस देत आहे असा समज, सरकारी निर्णय-प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने होणे साहजिक आहे. म्हणून वरील धोका लपवता कामा नये. जनतेला सांगायला हवे की ‘हा धोका पत्करून वरील गटातील लोकांनी तिसरा डोस घ्यावा’ कारण कोविड-१९ मुळेही रक्तात गुठळय़ा होतात व त्याचे प्रमाण लशीमुळे होणाऱ्या या धोक्याच्या दसपट आहे. शिवाय कोविड-१९ मुळे तीव्र आजार होण्याची शक्यता या गटांतील लोकांमध्ये तुलनेने जास्त असते. ‘लस घेण्यापेक्षा कोविड-१९ परवडला’ असे वरील वयोगटातील लोकांनी अजिबात समजू नये.
ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही अशांनी आता तरी लस घ्यावी. त्यातील अनेकांना त्यांच्या नकळत कोविड-१९ चा संसर्ग होऊन नैसर्गिक प्रतिकारशक्ती आली असेल. पण कोविड-१९ साथ संपलेली नाही. ‘सर्व जण सुरक्षित तरच आपण सुरक्षित’ असे कोविड-१९ बाबत आहे. आफ्रिकेत फक्त १८ टक्के लसीकरण झाले आहे. कारण त्यांना विकसित देशांनी मोफत लस दिली नाही. त्यामुळे तिथे लागण, आजार होतच राहिल्याने नवनवीन उप-जाती बनण्याची शक्यता जास्त राहणार आहे. वरील सर्व गोष्टी लक्षात घेता वरील गटातील लोकांनी लस घ्यायला हवी.
लस घेण्याचा दुसरा छोटा फायदा आहे – ‘लॉन्ग कोविड’ची शक्यता लशीमुळे १५ टक्क्यांनी कमी होते. ‘लॉन्ग कोविड’ म्हणजे, सौम्य कोविड-१९ झाल्यावरही काही जणांना खोकला येत राहणे, प्रचंड थकवा येणे; दम, चव, वास न येणे/बदलणे, मेंदूच्या कामकाजावर परिणाम, हृदयाचे ठोके कमी-जास्त होणे, जागेवरून उठल्यावर रक्तदाब एकदम तात्पुरता कमी होणे इ.पैकी त्रास खूप दिवस होऊ शकतो. इतरही चित्रविचित्र, कित्येकदा अतिशय त्रासदायक लक्षणे खूप दिवस ग्रासतात. कोविड-१९च्या संसर्गामुळे येणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती (मग आजार होवो वा ना होवो) किंवा लसीकरणामुळे येणारी प्रतिकारशक्ती यांमुळे आता कोविड-१९ मुळे तीव्र आजार व मृत्यू यांची शक्यता खूपच कमी झाली असली तरी सौम्य कोविड-१९ झाल्यावरही ‘लॉन्ग कोविड’ होऊ शकतो.
लागणीचे प्रमाण वाढत आहे. त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी केवळ लस पुरेशी नाही. बंद जागेत असताना सर्वानी एन-९५ मास्क घालणे; इतरांपासून सहा फूट अंतर ठेवून बसणे, खिडक्या उघडय़ा टाकणे, घराबाहेर पडल्यावर इतरांपासून सहा फूट अंतर ठेवणे, इ. पथ्ये पाळायला परत सुरुवात करावी.
लेखक विज्ञान आणि समाज यांच्या संबंधाचे अभ्यासक आहेत.
anant.phadke@gmail.com