मनोरुग्ण कुठे जात असतील, त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचे अंत्यसंस्कार कोण करत असेल, त्यांचे कुटुंबीय त्यांना का स्वीकारत नाहीत, असे प्रश्न सर्वानाच पडतात. पण संदीप शिंदे या तरुणाने या प्रश्नांना स्वत: भिडण्याचा निश्चय केला आणि यवतमाळमध्ये ‘नंददीप फाऊंडेशन’ संस्था आकारास आली.

कुटुंबीयांचा आधार तुटलेले, बेघर झालेले मनोरुग्ण रस्तोरस्ती किंवा गल्लोगल्ली दिशाहीन भटकताना आढळतात.. उघडय़ावरचे किंवा फेकलेले अन्न खाऊन गुजराण करतात.. सर्वच शहरांमध्ये कमीजास्त प्रमाणात असे चित्र दिसते. अपवाद यवतमाळ शहराचा. गेल्या तीन वर्षांत यवतमाळमधील चित्र पालटले. रस्त्यांवर फिरणारे मनोरुग्ण दिसेनासे झाले. आज शहराचा फेरफटका मारला तर एकही मनोरुग्ण केविलवाण्या अवस्थेत भटकताना दृष्टीस पडत नाही. हे कसे घडले? यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील चांदापूर येथील संदीप बाबाराव शिंदे हा युवक बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर यवतमाळमध्ये केशकर्तनालयात काम करू लागला. काही दिवसांतच त्याने स्वत:चे ‘केशकर्तनालय’ सुरू केले. पण त्याचवेळी त्याच्यावर एक आघात झाला. शिक्षण पूर्ण करून नुकताच नोकरी करू लागलेला त्याचा लहान भाऊ -राजेश याचा मृत्यू झाला. भावाच्या अकाली निधनाने संदीप मानसिकदृष्टय़ा कोसळला. नैराश्यात गेला. भावाच्या आठवणीने व्याकूळ होऊन गावोगावी दिशाहीन भटकला. याच भटकंतीत त्याला मनोरुग्णांच्या सेवेचा मार्ग गवसला. तो यवतमाळला परतला आणि भटकणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या ‘केश कर्तनालया’मध्ये आणून त्यांची सेवा करू लागला.

Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Big opportunity for India in international project Square Kilometer Array Observatory Regional Vida Center will be established
आंतरराष्ट्रीय प्रकल्पात भारताला मोठी संधी! प्रादेशिक विदा केंद्र उभे राहणार
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
maharashtra vidhan sabha election 2024 tought contest in five assembly constituencies in akola district
अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार

हे मनोरुग्ण कुठे जात असतील? काय खात असतील? त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचे अंत्यसंस्कार कोण करत असेल? त्यांचे कुटुंबीय त्यांना का स्वीकारत नाहीत.? संदीप यांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले. याच काळात करोना आजाराची महासाथ आली. टाळेबंदीमुळे जवळजवळ सर्वचजण घरात कोंडले गेले. संदीप मात्र घराबाहेर पडले. बेघर मनोरुग्णांना, भिकाऱ्यांना शोधून त्यांनी त्यांना अन्न पुरवले. त्यांची सेवा केली, काळजी घेतली.

हळूहळू संदीप या कामात भावनिकदृष्टय़ा गुंतले गेले. इतके की त्यांनी सुस्थितीत चाललेला आपला केशकर्तनालयाचा व्यवसाय इतरांकडे सोपवला आणि मनोरुग्णांच्या सेवेत झोकून दिले. पत्नी नंदिनी आणि मित्रांच्या सहकार्याने २०२१ मध्ये त्यांनी ‘नंददीप फाऊंडेशन’ची स्थापना केली. संदीप आणि नंदिनी यांच्या नावातील अक्षरांतून ‘नंददीप’ हे नाव साकारण्यात आले आहे. या संस्थेने देशात आणि परदेशातही आता ओळख मिळविली आहे. संदीप यांनी आपली पत्नी आणि मित्रांच्या सहकार्याने मनोरुग्णांच्या जीवनात नंदादीपच प्रज्वलित केला आहे.

‘नंददीप फाऊंडेशन’मुळेच यवतमाळमधील भटकणाऱ्या मनोरुग्णांना निवारा मिळाला आहे. संस्थेच्या निवारा केंद्रामुळे मनोरुग्णांची वाटचाल खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण जीवनाकडे सुरू झाली आहे. अन्न-वस्त्र, वैद्यकीय उपचार, समुपदेशन या गरजांच्या पूर्ततेबरोबरच त्यांच्याकडून योगासने, व्यायामही करून घेतला जातो. कुटुंबाने नाकारलेल्या या मनोरुग्णांच्या हाताला सर्जनशील उपक्रमांतून रोजगारही देण्याचे प्रयत्न चालू आहेत.

हेही वाचा >>> सन्मानाने जगण्याची ‘आकांक्षा’

मनोरुग्ण कितीही आक्रमक असला तरी त्याला शांत करून स्वत:बरोबर नेण्याचे ‘संवाद कौशल्य’ संदीप यांना अवगत आहे. मात्र काही आक्रमक मनोरुग्णांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचीही उदाहरणे आहेत. चावा घेणे, दगड मारणे असे प्रकार तर त्यांनी सर्रास अनुभवले. एक अनुभव तर मृत्यूच्या दारातून परतल्याचाच आहे. बी.एस्सी. (कृषी) पदवीधर असलेल्या एका मनोरुग्णास संदीप यांनी स्वत:बरोबर आणले. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने अंगाला पाणी लावले नसल्याचे त्याच्या एकंदर स्थितीवरून दिसत होते. त्याला आंघोळ घालत असताना त्याने संदीप यांचा गळा आवळला. त्याला बाजूला करण्यासाठी दहा जणांनी ताकद लावली.

करोनाच्या जागतिक खडतरकाळात सुरू झालेल्या संदीपच्या मनोरुग्णसेवेला हातभार लावण्यासाठी शेकडो हात पुढे आले. मनोरुग्णांना सामाजिक संस्थांमध्ये नेऊन सोडण्याचे काम संदीपने हाती घेतल्याचे कळताच यवतमाळच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाने रुग्णवाहिका दिली. संदीप यांनी आजपर्यंत १५० हून अधिक मनोरुग्णांना राज्यातल्या विविध निवारा केंद्रांमध्ये नेऊन सोडले आहे. यवतमाळमध्ये मनोरुग्ण निवारा केंद्र उभे राहावे, यासाठी संदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, जागा आणि पैशांची मोठी अडचण होती. अशा वेळी यवतमाळ नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी पुढे सरसावल्या. त्यांनी बंद पडलेल्या शाळेची इमारत तात्पुरत्या स्वरूपात निवारा केंद्र चालवण्यासाठी ‘नंददीप फाऊंडेशन’ला दिली. या शाळेला निवारा केंद्राचे स्वरूप आणण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी ‘सेवा समर्पण प्रतिष्ठान’ची स्थापना करून ‘नंददीप फाऊंडेशन’ला मदतीचा हात दिला. शरद उपलेंचवार केंद्राला लागणारे सर्व साहित्य मोफत देतात. सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र पवार प्रशासकीय कामकाज, लेखाजोखा सांभाळतात, तर सेवानिवृत्त कवायतदार महेश कळसकर मनोरुग्णांना कवायती शिकवतात. सुनीता भितकर, भाविका भगत या रांगोळी आणि शिवणकामाचे प्रशिक्षण देतात. शहरातील अनेक नागरिक वाढदिवस वा स्मृतिदिनानिमित्त निवारा केंद्राच्या एकवेळच्या भोजनाची जबाबदारी उचलतात. अनेकदा लोकसहभागातूनच भोजनयज्ञ चालतो.

हेही वाचा >>> तिरंदाजांना नव‘दृष्टी’

‘नंददीप फाऊंडेशन’च्या निवारा केंद्रात सध्या देशभरातील १६० मनोरुग्ण आहेत. दररोज नवे रुग्ण दाखल होत आहेत. रात्री, अपरात्री कधीही फोन वाजतो. संदीप स्वत: रुग्णवाहिका घेऊन तेथे पोहोचतात. अशा तऱ्हेने मनोरुग्णांची संख्या वाढत असल्याने तात्पुरत्या स्वरूपातील निवारा केंद्राची सध्याची जागा अपुरी पडत आहे. शिवाय, हे केंद्र नागरी वस्तीत आहे. मनोरुग्ण अनेकदा भांडतात, ओरडतात. त्याचा स्थानिकांना त्रास होतो. या रुग्णांवर नियमित वैद्यकीय उपचारांचीही गरज असते. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम निवारा केंद्रात येऊन मनोरुग्णांवर नियमित उपचार आणि त्यांचे समुपदेशन करतात. ‘नंददीप फाऊंडेशन’ संस्थेचे सेवाकार्य कोणत्याही शासकीय मदतीशिवाय केवळ लोकसहकार्य आणि लोकसहभागातून चालू आहे. मनोरुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने मोठय़ा जागेची, स्वतंत्र इमारतीची आवश्यकता आहे. पूर्णवेळ वैद्यकीय सेवा आणि समुपदेशन केंद्र, हेल्पलाइन सुरू करण्याबरोबरच बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या हाताला काम देण्यासाठी लघु आणि गृहउद्योगातून रोजगारनिर्मितीचा संस्थेचा संकल्प आहे. त्यासाठी जमीन खरेदी करून सुसज्ज निवारा केंद्र उभारण्यासाठी समाजाच्या पाठबळाची आवश्यकता आहे.

– नितीन पखाले

जिवंतपणीच मदतीचा हात द्या

‘जय गाडगेबाबा : मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणीच मदतीचा हात द्या’, हे घोषवाक्यच संदीपने तयार केले आहे. संदीप दिसताच मनोरुग्ण त्याला बिलगतात. संदीपने आतापर्यंत २३४ मनोरुग्णांना आपल्या मनोरुग्ण निवारा केंद्रात बरे करून त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतील बऱ्या झालेल्या व्यक्तींनी संदीप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या घरी नेऊन सोडले आहे. एका बऱ्या झालेल्या व्यक्तीला तर नेपाळला त्याच्या घरी सोडण्यात आले आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

संस्थेचे निवारा केंद्र यवतमाळ शहरातील समर्थवाडीत असलेल्या नगर परिषद शाळा क्र. १९ मध्ये आहे. विमानाने नागपूरला आल्यास नागपूर-तुळजापूर महामार्गाने यवतमाळ येथे यावे लागते. रेल्वेने आल्यास बडनेरा, धामणगाव येथे उतरावे लागते. वर्ध्याहून रस्तामार्गे पोहोचता येते.

धनादेश या नावाने काढावा

नंददीप फाऊंडेशन, यवतमाळ

NANDADEEP FOUNDATION,  Yavatmal

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्र. 1060501023782

 IFSC CODE –  COSB0000106

कॉसमॉस बँक, सुभाष नगर, यवतमाळ

धनादेश येथे पाठवा.. एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, तिसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००