प्रशांत देशमुख, वर्धा

देशातील प्रमुख प्रगतशील राज्य अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख… प्रबोधनाची उज्ज्वल परंपरा सांगणारा, विवेकाची कास धरल्याचा अभिमान बाळगणारा हा प्रदेश… तरीही वेशीबाहेरील वस्तीचे दु:ख पूर्णपणे दूर करण्यात यश मिळाले नाही. मात्र, त्या ध्येयाच्या दिशेने अविरत चालणारी पावले आपल्याला दिसतात. वैयक्तिक, भौतिक सुखाचा विचार न करता वंचित समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचा हरपलेला सन्मान परत मिळवून देण्यासाठी काम करणारे हजारो हात राज्यभर विखुरलेले पाहायला मिळतात. वर्धा जिल्ह्यातील रोठा या गावातील ‘उमेद’ ही संस्थाही त्याच साखळीतील मोलाचा दुवा आहे.

टिश काळापासून ‘गुन्हेगारी जमात’ हा कलंक अंगावर बसलेल्या व आजही त्याचे चटके झेलणाऱ्या पारधी समाजाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी अद्याप वक्रच आहे. कधीच कायमचा पत्ता नसलेली व हल्ली मुक्काम कुठे, हेही सांगता न येणाऱ्या या समाजाचे वंचितपण अजूनही कायम आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीने ‘परंपरागत’ कामेच करावी, या मानसिकतेच्या दृष्टचक्रात अडकलेला हा समाज पोटच्या मुलाबाळांना भीक मागण्यासाठी अजूनही पिटाळतो. हे चित्र पाहून मन विदीर्ण झालेल्या मंगेशी मून यांनी त्यामध्ये बदल घडवण्याचा संकल्प सोडला. मंगेशी यांच्या वडिलांनी त्यांना वर्ध्याजवळ रोठा या गावी शेतजमीन दिली होती. त्याचा उपयोग वैयक्तिक लाभासाठी करून घेण्याऐवजी मून यांनी त्यावर उमेद प्रकल्पाचा पाया रचला. पारधी समुदायातील तसेच अन्य काही वंचित समूहातील मुलांसाठी हा प्रकल्प २०१४-१५पासून भविष्यासाठी आशेचा किरण ठरला आहे.

हेही वाचा >>> ग्रंथसंपदेचे राखणदार: आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास

हा प्रकल्प वर्ध्यामध्ये उभारण्यात आला असला तरी त्याची सुरुवात मुंबईत झाली. लोकलने प्रवास करताना मंगेशी मून यांना फलाटाच्या आजूबाजूला पारधी कुटुंबे दिसायची. या कुटुंबांमधील मुले भीक मागण्याच्या नादात गाडीखाली आली, काही अपंग झाली. अशा वेळी पोटातील भुकेची आग माणुसकीचा कसा बळी घेते हे मून यांना दिसले. आपली मुले अपंग झाली याबद्दल त्यांच्या आईवडिलांना फार दु:ख नसायचे. अपंग मुलांना जास्त भीक मिळेल ही भावना अधिक प्रबळ असायची.

उमेदची स्थापना

मून यांनी रस्त्यावरील सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांशी संवाद वाढवला. त्यातून त्यांना मिळालेली माहिती त्रासदायक होती. भीक मागण्यासाठीच मुलांना जन्म द्यायचा. स्वत:ला मूल नसेल तर दुसऱ्याची मुलं भाड्याने घ्यायची. भिकेचे हिस्से करायचे. मुलांनी भीक मागून मिळवलेला पैसा दारू, जुगार यामध्ये घालवायचा. भांडण-तंटेही नेहमीचेच. हे सर्व प्रकार लक्षात आल्यावर मंगेशी मून यांनी मुंबईत भीक मागणाऱ्या मुलांचा ठिकठिकाणी शोध घेतला. यापैकी काही मुले वर्ध्याजवळ पारधी बेड्यावरील असल्याचे त्यांना समजले. भीक मागण्यासाठी ही वंचित कुटुंबे महानगरात स्थलांतर करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर या मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. मुंबईत लोकलमध्ये, आझादनगर, बँडस्टँड अशा ठिकाणी भीक मागणाऱ्या मुलांचा शोध घेतला. सानपाडा पुलाखालून १८ मुलांना त्या रोठा येथे घेऊन आल्या. त्यांच्या पुनर्वसनासाठी ‘उमेद एज्युकेशनल ट्रस्ट’ स्थापन केला. गेल्या दशकभरात उमेदच्या कामाचा पसारा वाढत तिथे सध्या साधारण ७० मुले आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत राहत आहेत.

या मुलांना रोठा येथे आणल्यानंतर त्यांच्या राहण्याची सोय झाली. पण मुलांसाठी कपडेलत्ते आणि जेवणाचा प्रश्न मुख्य होता. त्यासाठी मून यांनी अनेकांकडे मदत मागितली. दान देण्याचे आवाहन समाजमाध्यमांवर केले. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. मात्र केवळ यावर अवलंबून राहणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वत:च्या शेतात धान्य पिकवायला सुरुवात केली. त्यातून थोडाफार पैसा मिळाला आणि जेवणाची भ्रांत मिटली. यापुढचा टप्पा अधिक परीक्षा पाहणारा होता.

हेही वाचा >>> दलितांचा शिक्षणप्रश्न कायमच, आधी जातीव्यवस्थेमुळे, आता अर्थव्यवस्थेमुळे!

शिक्षणाच्या वाटेतील खडतर आव्हाने

या मुलांना शाळेत दाखला मिळावा या हेतूने मून त्यांना घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या. पण मुलांच्या नावाचा एकही शासकीय किंवा कौटुंबिक चिटोराही नव्हता. त्यामुळे त्यांना शाळेत दाखल कसे करायचे असे म्हणत शाळेकडून त्यांना परतवून लावण्यात आले. यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाची मदत मिळाल्याने मुलांना एका खासगी शाळेत प्रवेश मिळाला. मात्र, ही मुले घाणेरडी, चोऱ्या करणाऱ्या कुटुंबातील आणि भांडकुदळ आहेत असे आरोप सुरू झाले. गावातील पालकांनी तक्रारी केल्या. परत शासकीय हस्तक्षेप झाला. मात्र, नंतर चोरीचा ठपका ठेवून मुलांना शाळेतून काढण्यात आले. त्याची चौकशी झाल्यावर दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले. अखेर, मंगेशी यांच्या मदतीला मग राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठान मानस मंदिर शाळेचे व्यवस्थापन धावून आले. याच शाळेत आता प्रकल्पातील मुले शिकतात.

संकटांची मालिका

मुले शाळेत जायला लागून चार-सहा महिने होत नाहीत तोच काही मुलांचे पालक प्रकल्पावर धावून आले. मुले परत द्या म्हणून त्यांनी गलका केला. प्रकल्पाच्या दारावरच आमची मुले परत द्या म्हणून आरडाओरडा व्हायचा. प्रसंगी प्रकल्पावर दगडफेक केली जात असे. मुले शिकली तर भीक कोण मागणार असा त्यांच्या पालकांचा सवाल असे. काही पालक आपल्या मुलांना परत घेऊन गेल्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडत असे. प्रकल्पातील चंद्रमुखी आणि मुस्कान या दोन मुलींचे उदाहरण बोलके आहे. या मुली भीक मागून आपल्या कुटुंबाला पोसायच्या. त्या उमेद येथे येऊन शिकू लागल्या. मात्र त्यांच्या आईवडिलांनी भांडण करून त्यांना परत नेले. त्यांना कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये फुगे विकण्यासाठी पाठविले जात असे. त्या आलेली कमाई आईच्या हातात देत. मात्र तो पैसा दारू पिण्यात उडवला जाई. भांडण आणि मारहाण याला कंटाळून दोघी जणी परत प्रकल्पावर पळून आल्या, पण त्यांचे आईवडील पुन्हा त्यांना घेऊन गेले. त्यामध्ये त्यांच्या शिक्षणात दोन वर्षांचा खंड पडला. शेवटी दोघी जणी त्यांच्या आजीच्या मदतीने परत आल्या. गेल्या वर्षीच दोघी जणी चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काहीतरी करून दाखवायचे अशी जिद्द आहे. आईवडिलांकडे परत जाण्यास त्यांनी नकार दिला आहे. येथेच राहून त्या कला, कौशल्ये शिकत आहेत. दोघींना पुढील शिक्षणासाठी पुण्यात ठेवणार असल्याचे मून यांनी सांगितले.

पालकांचे हट्ट

आपले मूल परत न्यायचेच असा हट्ट धरणाऱ्या काही पालकांनी वर्धा पोलिसांकडे धाव घेतली होती. पोलिसांनी त्यांची समजूत घालून परत पाठविले. त्यानंतर पालकांनी अमरावती पोलिसांकडे धाव घेतली. ‘मॅडम आमच्या मुली परत देत नाहीत,’ अशी तक्रार केली. पोलिसांनी मून यांना मुलांना परत करण्याचे निर्देश दिले. तेव्हा मुलींना परत पाठवते पण त्यांची जबाबदारी अमरावती पोलिसांनी घ्यावी, तसे लेखी लिहून द्यावे असे म्हटल्यावर पोलिसांनी हात झटकल्याचे मून सांगतात. यानंतर, आईवडिलांनी जात पंचायत, समाज प्रमुख, इत्यादींचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी मून यांच्या परोक्ष पालक मुलांना बळजबरीने घेऊन गेले. या सर्व संघर्षाला तोंड देत उमेदचे काम सुरू आहे.

मुलांबरोबर आनंदाचे क्षण घालविण्यासाठी वर्धा शहरातील अनेक कुटुंबे प्रकल्पावर वाढदिवस साजरे करतात. त्यांना मदत देतात. त्यापूर्वी मुलांना स्वावलंबनाचा पहिला धडा श्रमदानातून मिळतो. मंगेशी मून यांच्या आईचा मुलांना आजी म्हणून लळा लागला आहे. मून यांच्या परिवारातील सर्वच सदस्य पालक म्हणून मुलांची काळजी घेतात. पण पुढे काय, हा प्रश्न आ वासून उभा आहे. मुलांची संख्या वाढत असल्याने खर्चही वाढत आहे. ‘या कोवळ्या कळ्यांमाजी, लपले ज्ञानेश्वर, रवींद्र, शिवाजी’ ही राष्ट्रसंतांची उक्ती मंगेशी मून यांना सार्थ ठरवायची आहे. प्रत्येक मुलाचे भविष्य मोठे करायचे आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

वर्धा एसटी बस स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर रोठा या गावी हा उमेद प्रकल्प आहे. जाण्यासाठी ऑटोरिक्षा आणि अन्य वाहने उपलब्ध असतात. वर्धा-यवतमाळ बायपासवर उमरी चौकातून केवळ एक किलोमीटर अंतरावर प्रकल्प गाठता येतो.

उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट

Umed Education Charitable Trust

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८०-जीकरसवलतपात्र आहे.

ऑनलाईन देणगीसाठी तपशील

बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा पौड रोड

●खाते क्रमांक : ०१९१००१०२०५४५

●आयएफएससी कोड : COSB0000019