आर्थिक गणितांमुळे मुद्रित माध्यमांच्या अस्तित्वावरील टांगती तलवार, समाजमाध्यमांवरील अपमाहितीमुळे मुख्य माध्यमांच्या विश्वासार्हतेवर उभे राहिलेले प्रश्नचिन्ह, सामाजिक आणि राजकीय ध्रुवीकरणाचे परिणाम हे प्रश्न अमेरिकेतील माध्यमांसमोरही उभे आहेत. मात्र, त्यांना तोंड देण्यासाठीच्या प्रयत्नांतून आशादायक चित्रही निर्माण होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र १८३२ साली सुरू केले. त्यापूर्वी साधारण सव्वाशे वर्षे अमेरिकेत पहिले वृत्तपत्र प्रसिद्ध झाले. तीनशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या वृत्तपत्र माध्यमाच्या पडझडीच्या चर्चा अमेरिकेत अधिक आहेत. सध्या दर आठवड्याला दोन वृत्तपत्रे बंद होत असल्याच्या नोंदी विविध संस्थांच्या अहवालांत आहेत. गेल्या दहा वर्षांत वृत्तपत्रांच्या संख्येत निम्म्याने घट झाल्याचीही आकडेवारी दिसते. इंटरनेटवर सहज शोध घेतल्यास ही माहिती मेंदूवर आघात करते. ही पडझड इतकी की त्यातून ‘वृत्त वाळवंट’ अशी संकल्पना साधारण दोन दशकांपासून तेथे वापरली जाते. त्याचा अर्थ असा की कोणत्याही स्वरूपाच्या माध्यमांत स्थान नसलेला एखादा समुदाय, एखादे भौगोलिक क्षेत्र, अशी गावे किंवा परिसर जिथे पोहोचणारी किंवा तिथून प्रसिद्ध होणारी माध्यमे आता नष्ट झाली आहेत. अमेरिकेतील अशा वृत्त वाळवंटांची संख्या गेल्या वर्षीच्या एका अहवालानुसार दोनशेपेक्षा अधिक आहे. माध्यमांना लागलेली ओहोटी, त्यांचे बदलते स्वरूप, त्याचे सामाजिक दुष्परिणाम जाणून या परिस्थितीविरूद्ध लढा सुरू झाला आहे. अगदी प्रतिष्ठित संस्थांमधील माध्यमकर्मींपासून ते नव्याने काही प्रयोग करू पाहणाऱ्यांपर्यंत सारेच आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. सशक्त, स्वतंत्र माध्यमे असणे सामाजिक शुचितेसाठी आवश्यक आहे, हा या प्रयत्नांचा गाभा आहे.

हेही वाचा >>> चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…

अमेरिकेत सध्या चार हजारांहून अधिक समुदायांसाठीची वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. त्यातील बहुतेक साप्ताहिके आहेत. सगळीच मुद्रित माध्यमांत नाहीत तरी त्यांना २४ तास माहितीचा रतीब घालणाऱ्या संकेतस्थळांचे स्वरूप नाही. समुदायाचे, गावाचे, परिसराचे प्रश्न तेथील गरजा हेरून त्यांचे सविस्तर वृत्तांकन यातील बहुतेक वृत्तपत्रांमध्ये दिसते. ही वृत्तपत्रे पाहिली की तेथील स्थानिक संस्कृती, गावाचा कल, राजकीय समज यांचा अंदाज येतो. मोठ्या राजकीय घडामोडी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातम्या मोबाइलवर सहज उपलब्ध होत असताना आपल्या परिसरात काय चालले आहे याबाबतची उत्सुकता असणाऱ्या वाचक, प्रेक्षक, श्रोत्यांना कम्युनिटी किंवा काऊंटी वर्तमानपत्र आपलेसे वाटते, असे मिशिगन राज्यातील कलामझू येथील ‘नाऊ कलामझू’ या स्थानिक वृत्तपत्राच्या एलिझाबेथ क्लर्क यांनी सांगितले. जेव्हा जगाला करोनाच्या साथीने ग्रासले होते, तेव्हा म्हणजे २०१९ मध्ये बेन लँडो यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतरचा काळ हा माध्यमांसाठी अधिक पडझडीचा ठरला असला तरी ‘नाऊ कलामझू’च्या स्टार्टअपने आता चांगले बाळसे धरले आहे. हे स्टार्टअप सुरू करणारे बेन लँडो हे अफगाण युद्धाच्या काळात ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’साठी बगदाद येथे वार्तांकन करत होते. अमेरिकेतील आघाडीच्या अनेक माध्यम समूहांताली कामानंतर त्यांनी कलामझूमध्ये माध्यम क्षेत्रातील प्रयोगांना सुरुवात केली. कलामझू हे मिशिगन राज्यातील साधारण ७६ हजार लोकसंख्येचे शहर आहे. पूर्वी हे शहर वाहने, वैद्याकीय उपकरणे, वाद्यो यांच्या निर्मितीचे कारखाने आणि शेती यांवर अवलंबून होते. या शहराचा चेहरामोहरा आता झपाट्याने बदलू लागला आहे. त्यामुळे मांडायला हवेत आणि वाचायला हवेत अशा अनेक विषयांची खाण येथील सामुदायिक माध्यमे उपसताना दिसतात. याच शहरात तीन मजली ग्रंथालयातील बालकांसाठीच्या आणि कुमारांसाठीच्या कक्षात वाचकांची गर्दी असते. ती कायम राहावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात आणि पालकही त्या उपक्रमांना दाद देतात. हे चित्र येथील माध्यमकर्मींच्या प्रयत्नांमागील आशा टिकवून ठेवणारे आहे. या स्थानिक माध्यमांचे स्वरूप हे स्थानिक सांस्कृतिक वार्तांकन, कोण कोणास काय म्हणाले अशा स्वरूपाचे राजकीय वृत्तांकन असे अजिबातच नाही. शोधपत्रकारितेसाठी काही वृत्तपत्रे किंवा संकेतस्थळे ओळखली जातात. मुख्य प्रवाहातील राष्ट्रीय स्तरावरील माध्यमे सर्व विषय, सर्व समुदायांना सामावून घेऊच शकत नाहीत. तशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. मात्र निर्माण होणारी पोकळी स्थानिक माध्यमे भरून काढतात. अनेकदा स्थानिक प्रश्नांवर स्थानिक माध्यमांनी घेतलेली भूमिका अधिक परिणामकारक ठरते, असे सांख्यिकी माहितीचे विश्लेषण आणि शोधपत्रकारिता यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘प्रो पब्लिका’ या वृत्तसंकेतस्थळाच्या हारू कोरीन यांनी सांगितले.

सामाजिक संतुलन…

मुख्य माध्यमांतील वृत्तांकनात स्थान न मिळणाऱ्या विषयांचे किंवा समुदायांचे वार्तांकन स्थानिक वृत्तपत्रांतून प्रामुख्याने केले जाते. त्यामुळे एकूण माध्यम आढावा घेतल्यास सामाजिक संतुलन आपसूक राखले जाते. एलजीबीटीक्यू समुदायाचे प्रश्न, त्यांच्यासाठीचे वृत्तांकन ‘वॉटरमार्क’ प्रकाशन करते. फ्लोरिडातील शाळांमध्ये अवांतर वाचनासाठीच्या अनेक पुस्तकांवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात पालकांची चळवळ उभी राहते त्याचे श्रेय हे तेथील स्थानिक माध्यमांचे आहे. सेंट्रल फ्लोरिडा पब्लिक मीडिया या स्थानिक रेडिओ वाहिनीची पत्रकार डॅनियल हिने केलेल्या बातम्या, विशेष कार्यक्रम यानंतर पुस्तक बंदीचा विषय फ्लोरिडापुरता मर्यादित न राहता देशपातळीवरील पोहोचला. सातत्याने वादळांचा तडाखा झेलणाऱ्या फ्लोरिडा राज्याला शहरातील नेमकी स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ही रेडिओ वाहिनी आपलीशी वाटते. माध्यमांपुढे आव्हाने आहेतच. मात्र माहिती, गॉसिप यापलीकडे जाऊन स्थानिक प्रश्न मांडल्यास त्याला वाचकांचीही साथ मिळते, असे ‘ब्लॉक क्लब’ शिकागोच्या माईक डम्की यांनी सांगितले. ब्लॉक क्लब शिकागो ही ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणारी माध्यमसंस्था आहे. वाचकांकडून मिळणाऱ्या निधीवर या संस्थेचे अर्थकारण अवलंबून आहे.

अपसमजांशी लढा…

माहितीचा मारा, समाजमाध्यमांतून पसरवले जाणारे अपसमज, राजकीय हेतूंनी प्रसारित केली जाणारी चुकीची वृत्ते यांमुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. वास्तविक आजही मुख्य प्रवाहातील माध्यमांचे वृत्तांकन हे अपसमज पसरवणारे नसते. ते राजकीयदृष्ट्या एकतर्फी वाटू शकते. मात्र खोटी माहिती दिली जात नाही. कारण मुख्य प्रवाहातील माध्यमांना कायद्याची चौकट आहे. ती व्यवस्थेला, वाचकांना उत्तरदायी आहेत. असे असताना समाजमाध्यमांवर वृत्तवाहिनी असल्याचा दावा करणाऱ्यांकडून केले जाणारे वार्तांकन किंवा काहीही पार्श्वभूमी नसताना अचानक सुरू होणाऱ्या संकेतस्थाळांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवा या माध्यमांच्या विश्वासार्हतेला नख लावतात. सातत्याने एखादी गोष्ट सांगितल्यावर त्यावर वाचक किंवा प्रेक्षकाचा विश्वास बसू लागतो. अशा वेळी माध्यमांनी कितीही खरे समोर आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाच अपशब्द ऐकावे लागतात. माहिती चुकीची असेल तरी आवडणारी किंवा सोयीची असेल तर वाचक किंवा प्रेक्षक त्यावरच विश्वास ठेवतात. हे सर्व वेळीच थांबवले नाही तर त्याची झळ मुख्य प्रवाहातील माध्यमांना सोसावीच लागेल. त्यासाठी माध्यमांनीच ठोस पावले उचलण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मत एका ज्येष्ठ महिला पत्रकारांनी व्यक्त केले. समाजमाध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अपसमजांबाबत वेगवेगळ्या प्रकारे जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न माध्यम संस्था, महाविद्यालये किंवा अनुभवी माध्यमकर्मी वैयक्तिक पातळीवर करत आहेत. वस्तुस्थिती कशी पडताळावी, का पडताळावी याबाबत अगदी साध्या सोप्या मार्गाने माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘वेस्ट मिशिगन युनिव्हर्सिटी’मधील माहिती देणारे चक्र असेल, काही खेळांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करणे असे प्रयत्न होत आहेत. त्याला अद्याप मोठ्या चळवळीचे किंवा सांघिक प्रयत्नांचे स्वरूप नसले तरी येत्या काळात ते गरजेचे ठरणार आहे, असे मत वेस्ट मिशिगन युनिव्हर्सिटीच्या माध्यम विभागातील प्राध्यापिका डॉ. सू एलिना क्रिस्टीन यांनी व्यक्त केले.

मुद्रित माध्यमांची ओढ

गेल्या दशकभरातील माध्यमांच्या व्यावसायिक पडझडीच्या काळात सर्वात मुद्रित माध्यमे भरडली गेली. अमेरिका त्याला अपवाद नाहीच. किंबहुना जो प्रवाह अनेक देशांत करोनाच्या साथीनंतर दिसू लागला तो अमेरिकेत त्यापूर्वीच पसरू लागला होता. मात्र, तरीही आता पुन्हा मुद्रित माध्यमांकडे वळणारेही काही आहेत. गेल्या दोन वर्षांत स्थानिक पातळीवर किंवा एखाद्या विषयाला वाहिलेली, शहरापुरती, गावापुरती अशी वृत्तपत्रे सुरू झाली आहेत. शिकागोमधील पॅक्सटन या शेतीप्रधान गावात ‘फोर्ड काऊंटी क्रॉनिकल’ हे वृत्तपत्र २०१९ मध्ये सुरू झाले. साधारण चार हजार लोकसंख्येच्या गावात या वृत्तपत्राचा खप हा १२०० ते १३०० असल्याचा त्याच्या स्थापकांचा दावा आहे. संकेतस्थळापेक्षा मुद्रित माध्यमातून मोजका, आवश्यक मजकूर वाचकाला मिळतो. मुद्रित माध्यमांचे व्यावसायिक गणित निश्चित आहे तसे ते डिजिटल माध्यमाचे नाही, असे तेथील स्थानिक वृत्तपत्रांच्या स्थापक किंवा संपादकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ‘काऊंटी हायवे’ हे वृत्तपत्र अगदी जुन्या चेहऱ्यामोहऱ्यात जेफरसन मॉरली यांनी सुरू केले. ते समुदायापुरते किंवा शहरापुरते नाही. अमेरिकेतील सर्व राज्ये, युरोपातील काही देश, ऑस्ट्रेलिया येथेही ते पोहोचते. रिपोर्ताज, शोधमालिका, सखोल विश्लेषण, वृत्तलेख अशा स्वरूपातील या वृत्तपत्राचे वर्षातून सहा अंक प्रसिद्ध होतात. अमेरिकेत एका अंकाची किंमत साधारण साडेआठ डॉलर्स इतकी आहे. मात्र, तरीही त्याचे नोंदणीकर्ते वाढत असल्याचे आकडेवारी सांगते आहे. मुद्रित माध्यमांचे खरे नाही, या समजाला छेद देणाऱ्या या नव्या वृत्तपत्राचे उदाहरण हे वृत्त वाळवंटे कमी होण्याची आशा निर्माण करणारे आहे.

अमेरिकी सरकारच्या ‘इंटरनॅशनल व्हिजिटर्स लीडरशिप प्रॉग्राम’अंतर्गत मराठी माध्यमांतील सहा पत्रकारांना अमेरिकेतील विविध व्यवस्था जाणून घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाच्या कालावधीत तेथील अनेक ज्येष्ठ माध्यमकर्मींना भेटता आले. त्यादरम्यानची ही निरीक्षणे आहेत.

rasika.mulye@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about social and political polarization facing by american media zws