डॉ. जयदेव पंचवाघ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ हा विकार माहीत नव्हता तेव्हाही त्याच्या वेदना मात्र माहीत होत्या, म्हणूनच या विकाराचं वर्णन ‘टॉर्च्युरा ओरिस’ असं केलं गेलं. या छळामागची नेमकी कारणं शोधून आज विज्ञान त्यावर मात करू शकतं आहे..
‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ (टीएन) या विकारात चेहऱ्याला होणाऱ्या तीव्र वेदनेच्या लक्षणांविषयी आपण मागच्या लेखात चर्चा केली. या विकारामुळे चेहऱ्यावर होणाऱ्या असह्य वेदनेचं वर्णन इसवी सनाच्या सुरुवातीपासून वेगवेगळय़ा पद्धतीनं केलेलं आढळतं. अकराव्या शतकात अवीसेना या डॉक्टरने ट्रायजेमिनल न्यूराल्जियाला ‘टॉर्च्युरा ओरिस’ म्हणजेच ‘टॉर्चर ऑफ द फेस अॅण्ड माऊथ’ (चेहऱ्याचा पीडात्मक आणि क्रूर छळ) असं म्हटलं आहे.
इतकं समर्पक नाव मी आजपर्यंत दुसरं पाहिलेलं नाही. या नावावरून आठवलेली साधारण सतरा-अठरा वर्षांपूर्वीची घटना सांगतो. ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ या आजाराला पूर्वी आत्महत्याप्रेरक आजार म्हणायचे हे मला माहीत होतं खरं, पण हे भूतकाळातलं विधान नसून आजच्या युगातही जसंच्या तसं लागू आहे याचा जिवंत पुरावा माझ्यासमोर बसला होता. व्यवसायाने उच्चशिक्षित इंजिनीअर आणि स्वत:चा छोटा कारखाना असलेली ही व्यक्ती. आठ वर्षांपासून ट्रायजेमिनल न्यूराल्जियाच्या तीव्र वेदनेने त्याचं आयुष्य ग्रासलं होतं. त्यानंतर औषधांच्या दुष्परिणामांमुळे व्यक्तिमत्त्वात बदल होत गेला आणि शेवटी वेदना दाबण्यासाठी तो दारूच्या आहारी गेला. ‘टॉर्च्युरा ओरिस’ म्हणजेच ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’च्या दुखण्यानं फक्त त्याच्या चेहऱ्याचंच नव्हे, तर संपूर्ण आयुष्याचंच ‘टॉर्चर’ मांडलं होतं. आम्ही जेव्हा त्याच्या ट्रायजेमिनल नसेचा एमआरआय केला, तेव्हा या नसेवर रक्तवाहिनीचा तीव्र दाब असल्याचं स्पष्ट दिसत होतं. एमव्हीडी शस्त्रक्रियेनं त्याचं दुखणं गेलं तेव्हा त्याची वर्तणूक पाहून ‘आनंदानं वेडंपिसं’ होणं म्हणजे काय असतं याचं एक छोटं प्रात्यक्षिक बघायला मिळालं. घरी जाण्याआधी त्याने माझी गाठ घेतली आणि एमव्हीडी शस्त्रक्रियेबाबतीत आणि एकूणच ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या विषयाबाबतीत काम करणारं एक विशेष केंद्र किंवा संस्था काढण्याचं आश्वासनच माझ्याकडून घेतलं. या विषयात काम करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल मी त्या व्यक्तीचा ऋणी आहे.
या शस्त्रक्रियेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या खोलात जाण्याआधी ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा आजार का होतो याच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं आहे. कारण याचं नेमकं उत्तर बहुसंख्य रुग्णांना माहीत नसतं. ट्रायजेमिनल नस ही एखाद्या इलेक्ट्रिकल केबलप्रमाणे असते. आपल्याला माहीत आहे की, एखाद्या मोठय़ा केबलच्या आत अनेक मध्यम आकाराच्या लहान-लहान छोटय़ा केबल असतात. आणि अशा प्रत्येक छोटय़ा केबलच्या आत अनेक वायर असतात. मोठय़ा केबलला तर रबराचं किंवा प्लास्टिकचं आवरण असतंच, पण प्रत्येक छोटय़ा केबललासुद्धा असं वेष्टन असतं. आतल्या प्रत्येक वायरलासुद्धा स्वत:चं असं प्लास्टिकचं आवरण असतं, जेणेकरून एका वायरमधला विद्युतप्रवाह दुसऱ्या वायरमध्ये पसरणार नाही आणि त्यातून जाणाऱ्या विद्युतप्रवाहांची सरमिसळ होणार नाही.. अर्थात, शॉर्ट-सर्किट होणार नाही. म्हणजेच वायरभोवतालचं रबरी वेष्टन ‘इन्शुलेशन’चं किंवा रोधकाचं कार्य करत असतं. आता समजा, या मोठय़ा केबलच्या आत एकूण शंभर वायर असतील आणि प्रत्येक एक वायर विशिष्ट एका दिव्यालाच विद्युतपुरवठा करत असेल तरी या इन्शुलेशनमुळे गडबड किंवा शॉर्टसर्किट होत नाही. ट्रायजेमिनल नस हीसुद्धा हिरडय़ा, दात व चेहऱ्यावरील संवेदना वाहून नेणारी केबल आहे. तिच्या आत अनेक सूक्ष्म नसा आहेत. या प्रत्येक नसेला स्वत:चं असं रोधक आवरण (इन्शुलेशन) आहे. हे रोधक आवरण ‘मायलीन’ या मेदयुक्त पदार्थाचं बनलेलं असतं. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजारात या सूक्ष्म नसांपैकी काही नसांचं रोधक आवरण नाहीसं होतं. त्यामुळे एका नसेतला ‘करंट’ दुसऱ्या नसेत ‘शॉर्टसर्किट’ होतो आणि वेदनांचा भडका उडतो. म्हणूनच जरी चेहऱ्यावरच्या विशिष्ट बिंदूला स्पर्श झाला तरी त्या विशिष्ट भागातून निघणाऱ्या संवेदनावाहक चेतातंतूतला विद्युतप्रवाह प्रत्यक्ष ट्रायजेमिनल नसेतून जाताना ‘शॉर्टसर्किट’सारखी क्रिया होऊन इतर चेतातंतूत पसरतो. म्हणून मग नाकपुडीला स्पर्श झाला तर त्याची कळ डोळा व कपाळात पसरू शकते किंवा घास चावताना वरच्या हिरडीला स्पर्श झाला तर कळ गाल व हनुवटीत पसरू शकते.. वगैरे.
पण मुळातच चेतातंतूंवरचं आणि नसांवरचं हे ‘इन्शुलेशन’ का झडतं किंवा विरतं? ज्या व्यक्तींना हा आजार होतो त्या रुग्णांच्या ट्रायजेमिनल नसेच्या मेंदूलगतच्या भागात (ज्याला ‘आरईझेड’ म्हणजे ‘रूट एन्ट्री झोन’ म्हणतात, त्या भागात) रक्तवाहिनीचा दाब आलेला असतो. म्हणजेच, त्या नसेत एक किंवा अधिक रक्तवाहिन्या घुसलेल्या असतात. रक्तवाहिनीचा दाब हा फक्त दाब नसतो तर रक्तवाहिन्यांच्या ठोक्यांमुळे हा स्पंदनयुक्त असा दाब असतो. म्हणजे मिनिटाला जवळजवळ सत्तर ते ऐंशी वेळा- म्हणजे जी आपल्या हृदयाच्या ठोक्यांची सर्वसाधारणपणे गती असते किंवा ज्याला आपण नाडीचा वेग म्हणतो त्याच वेगाने- या रक्तवाहिन्यांचा ‘स्पंदनयुक्त’ दाब या नसेवर पडत असतो. मिनिटाला ऐंशी वेळा.. म्हणजे तासाला ४८०० वेळा आणि दिवसात तब्बल एक लाख पंधरा हजार वेळा!
आता अशी कल्पना करा की एखाद्या इलेक्ट्रिक केबलवर एखादी व्यक्ती हातोडा घेऊन घाव घालत आहे. कालांतराने काय होईल? प्रथम केबलच्या आतल्या आणि हातोडय़ाचे घाव पडणाऱ्या भागाखालच्या वायर्सवरचं रबराचं आवरण खराब होईल, त्याला तडे पडून ते झिजेल आणि वायरच्या आतल्या तांब्यासारख्या धातूचे तंतू उघडे पडतील.
नेमकी हीच गत ट्रायजेमिनल नसेतील चेतातंतूंची होते. ज्या चेतातंतूंवर रक्तवाहिनीची स्पंदनं घाव घालत असतात त्यांच्यावरचं मायलीनचं आवरण विरत जाऊन हळूहळू नष्ट होतं आणि चेहऱ्याच्या संवेदनांचं शॉर्टसर्किट होऊन तीव्र वेदनेचा वारंवार भडका उडू लागतो.
अनेक रुग्ण मला असं विचारतात की फक्त काही व्यक्तींमध्येच असं का होतं आणि दुसरं म्हणजे जर ही रक्तवाहिनी अशा रीतीने नसेला खेटून किंवा नसेत रुतून बसलेली असेल तर आयुष्याच्या पहिल्या काही वर्षांत हा त्रास का होत नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, ज्याप्रमाणे दोन व्यक्तींच्या डोक्याचा आकार वेगळा असतो त्याचप्रमाणे कवटीच्या आतल्या निरनिराळय़ा विभागांचा आकारसुद्धा वेगळा असतो. ट्रायजेमिनल न्यूराल्जियाच्या रुग्णांमध्ये जन्मत:च ही नस मेंदूतून जिथे बाहेर पडते त्याच्या आजूबाजूचा भाग लहान असतो. त्यामुळे ही नस आणि बाजूच्या रक्तवाहिन्या अत्यंत दाटीवाटीने त्या भागात सामावलेल्या असतात. आपलं वय जसं वाढत जातं तसं आपल्या शरीरातील सर्वच रक्तवाहिन्या कमी/जास्त प्रमाणात लांब होत जातात आणि त्याचबरोबर आकारानं नागमोडीसुद्धा होतात. ज्या रुग्णांमध्ये नसेभोवतीचा भाग लहान असतो तिथल्या रक्तवाहिन्या वयानुसार जशा लांब आणि नागमोडी होत जातील तशा त्या नसेमध्ये रुतू लागतात. महिने आणि वर्ष जातील तसतशा त्या नसेवर अधिकाधिक दाब निर्माण करतात आणि वर नमूद केल्याप्रमाणे संवेदनांचा शॉर्टसर्किट होऊन वेदनेचा भडका उडतो. ट्रायजेमिनल न्यूराल्जियाचा आजार असलेल्या रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्णांमध्ये अशा प्रकारचा रक्तवाहिनीचा स्पंदनयुक्त दाब हेच आजाराचं कारण असतं.
मात्र या आजाराची इतरही काही कारणं आहेत. ही अगदी मोजक्याच रुग्णांमध्ये दिसून येतात तरी ती नमूद करणं इष्ट होईल.
नस मेंदूतून बाहेर येण्याच्या भागात होणाऱ्या गाठी, मल्टिपल स्क्लेरॉसिससारखे आजार, रक्तपुरवठय़ातली कमतरता (स्ट्रोक), नसेभोवती होणारा जंतुसंसर्ग अशी काही तुलनेने विरळा कारणं आहेत.
या भागात होणाऱ्या गाठी बहुतांश वेळा कॅन्सरच्या नसतात; पण त्या योग्य शस्त्रक्रियेनं काढून टाकण्याची गरज असते. एकूणच या आजाराचं निदान आणि योग्य उपचार कोणत्या प्रकारे करता येतात हे सांगण्यासाठी आणखी एका लेखाची गरज लागणार हे स्पष्ट असल्यानं, त्याची चर्चा पुढच्या आठवडय़ात करू.
ट्रायजेमिनल नसेवर आलेला रक्तवाहिनीचा दाब (शस्त्रक्रियेदरम्यान सूक्ष्मदर्शित्राद्वारे टिपलेली प्रतिमा)
(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.
brainandspinesurgery60@gmail.com