डॉ. राजेंद्र डोळके
परंपरा वेदांपासूनची सांगायची; तर मग राजकीय पवित्र्यांऐवजी वेदांची वैश्विकता आपण मान्य करणार का?
हिंदू धर्माचे, हिंदूंचे अथवा हिंदूत्वाचे नेमकेपण सांगण्याचे प्रयत्न एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरू झालेले दिसतात. यामागे इंग्रजांची भारतावरील सत्ता व हिंदू-मुस्लिमांबाबत ‘फोडा व झोडा’ ही नीती, हे कारण आहे. हिंदूंची व्याख्या करण्याचा पहिला ठळक प्रयत्न म्हणून लो. टिळकांनी केलेल्या व्याख्येकडे बोट दाखवावे लागते. त्यांची व्याख्या अशी-
प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाम् अनेकता।
उपास्यानामनियम: एतत् धर्मस्य लक्षणम्।।
या व्याख्येत वेदांना प्रमाण मानणे, मोक्षाची अनेक साधने व उपास्यदेवतांची विपुलता ही हिंदू धर्माची प्रमुख लक्षणे सांगितली आहेत. १९२३ मध्ये स्वा. सावरकरांनी ‘हिंदूत्व’ हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी या विषयावर बरेच विवेचन केले आणि ‘हिंदू’ कोणास म्हणावे हे सांगितले. त्यांची व्याख्या अशी-
आसिंधुसिंधुपर्यन्त यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिन्दुरिति स्मृत:।।
याचा अर्थ सिंधू नदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या या देशातील कोणीही व्यक्ती, ज्याची ही पितृभक्ती आहे आणि तो पुण्यभूमी मानतो, तो हिंदू होय. याच परंपरेत ‘भाला’कार भोपटकरांचाही उल्लेख करावा लागतो. त्यांची व्याख्या अशी-
धेनुर्यस्य महामाता वेदा धर्मस्य जीवनम्।
प्रतिमापूजनं चैव, स वै हिन्दुरिति स्मृत:।।
या व्याख्येत गो-मातेला पूज्य व वेदांचे प्रामाण्य मानण्यावर विशेष भर आहे.
१९२५ साली ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना झाली. नागपुरातील मा. गो. वैद्य हे विद्वान गृहस्थ रा. स्व. संघाचे बरीच वर्षे अधिकृत प्रवक्ते होते. त्यांचे या विषयावरचे अनेक लेख व पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यातून हिंदूत्वाविषयीची ‘संघा’ची भूमिका समजते. ती अशी- ‘हिंदू’ हा शब्द तुलनेने अर्वाचीन. पण या संस्कृतीचा वारसा फार प्राचीन. संघाने हिंदू शब्द संस्कृतीच्या अर्थाने स्वीकारला. हिंदू हा एक समाज, एक मानवसमूह आहे. हिंदूत्व म्हणजे सांस्कृतिक एकता आणि राष्ट्रत्व. हिंदू राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद एकच. ‘हिंदू राष्ट्र’ हे रा.स्व. संघाचे एक सिद्धांत वचन आहे, हे जगजाहीर आहे. धर्मासाठी इंग्रजीत ‘रिलीजन’ हा शब्द आहे. पण ‘रिलीजन’ म्हणजे संप्रदाय. धर्म ही संकल्पना खूप व्यापक आहे. धर्म शब्दात संस्कृतीचाही आशय अंतर्भूत आहे. हिंदूत्व’ म्हणजे ‘हिंदूइझम’ही नव्हे.
अशा प्रकारे या विद्वानांनी हिंदू आणि हिंदूत्व याबद्दल आपले विचार मांडले आहेत. यावरून असे लक्षात येते की, या संकल्पना स्पष्ट तर होत नाहीतच उलट गोंधळ वाढवण्यास कारणीभूत ठरतात. याचे कारणच हे आहे की, ‘हिंदूत्वा’चे स्वच्छ आणि नि:संदिग्ध स्वरूप स्पष्ट नाही. ज्या व्याख्या सांगितल्या जातात त्यात एकवाक्यता नसते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी याविषयी लिहितात, ‘.. भालाकार भोपटकर यांनी केलेली व्याख्या सनातन्यांचे प्रतिनिधित्व करणारी, सावरकरांची व्याख्या हिंदूत्वाच्या राजकारणासाठी केलेली व लोकमान्यांनी केलेली व्याख्या ही संपूर्णत: अप्रमाण अशी असल्याने या तीनही व्याख्या स्वीकारताच येणार नाहीत.’ (‘नवभारत’ मासिक; जुलै-ऑगस्ट १९९५; पृ. ५१-५२)
सारांश, हिंदूत्वाची सुस्पष्ट, नि:संदिग्ध व्याख्या नसल्याने सर्वसामान्यांच्या मनातील संभ्रम वाढतच जातो. म्हणूनच त्या विचारांच्या सर्वोच्च नेत्यांकडून निरनिराळय़ा वेळी परस्परविरोधी विधाने ऐकावयास मिळतात. संभ्रम कायम ठेवण्यात अशी एक सोय असते, की यात प्रत्येक वेळी गरजेनुसार नवीन अर्थ भरता येतो आणि कोणी जर त्यात स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला तर ‘आम्हाला ते म्हणायचेच नव्हते’ अथवा ‘तुम्हाला आमचे म्हणणे समजलेच नाही’ असे म्हणता येते.
‘हिंदू’ हा शब्द धर्मवाचक
सत्य हे आहे की, हिंदू हा शब्द ‘हिंदू धर्म’ याच नावाने अनेक शतकांपासून रूढ झालेला आणि लोकांच्या मनात याच अर्थाने तो घट्ट झाला आहे. आपल्या नित्याच्या बोलण्यात अथवा वर्तमानपत्रात हिंदू हा शब्द असंख्य वेळा आलेला असतो. तेव्हा आपल्यासमोर त्या शब्दाचा कोणता अर्थ उभा राहतो? हिंदू धर्म असाच ना? ‘भारतातील हिंदूंचे प्रमाण’, ‘हिंदू असुरक्षित आहेत’, ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ वगैरे शब्दप्रयोगातील ‘हिंदू’ हा शब्द कशाचा बोध करून देतो? हिंदू धर्माचाच ना! ‘हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या’ या वाक्यप्रयोगात तर हिंदूंना ‘धार्मिक भावना’ असतात म्हणजेच हिंदू हा धर्म आहे, हे उघडउघड मान्य केलेले असते. स्वामी विवेकानंद आणि डॉ. राधाकृष्णन हे ‘हिंदू धर्म’ असाच शब्दप्रयोग करतात. असे असताना विनाकारण ‘हिंदू’ म्हणजे परंपरा, संस्कृती, विचारधारा, जीवनप्रणाली, उदात्त जीवनमूल्ये वगैरे शब्दांच्या जंजाळात जनसामान्यांना अडकवून मुद्दाम भ्रमजाल निर्माण करण्यात काय अर्थ आहे? हिंदू शब्द धर्म या अर्थाने एकदा स्वीकारला की मग ‘हिंदूत्व’ या शब्दाचा अर्थ आपोआपच स्पष्ट होतो. आणि तो म्हणजे हिंदू धर्माची वैशिष्टय़े अथवा फार तर आपल्या (हिंदू) धर्माचा अभिमान असणे.
आपल्या धर्माचा अभिमान असणे वाईट नसते. पण परधर्मीयांबद्दल द्वेष असणे वाईट. आणि ‘हिंदूत्वा’ला आज नेमका हाच अर्थ प्राप्त झाला आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्याच्या दृष्टीने आपल्याला रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाकडे वळावे लागते. कारण गेल्या तीन दशकांपासून ‘हिंदूत्व’ याच मुद्दय़ाशी निगडित झाले आहे. गतेतिहासात बाबराने राममंदिर पाडून तेथे मशीद बांधली हा हिंदूत्वावरचा कलंक आहे, म्हणून तो पुसून टाकण्यासाठी मशीद पाडून त्या ठिकाणी राममंदिराची उभारणी झाली पाहिजे. त्या मशिदीचे अस्तित्व म्हणजे अपमानित काळाची आठवण आहे. राममंदिराची उभारणी झाल्याने तो आत्मसन्मान प्राप्त झाल्याचे समाधान मिळेल. त्यातील महत्त्वाचा मुद्दा हा केवळ ‘राममंदिर बांधणे’ हा नाही. तर ‘मशीद पाडून त्याच ठिकाणी राममंदिर बांधणे’ हा आहे. अशा रीतीने राममंदिर उभारले म्हणजे मग गतकाळातील अपमानाचा सूड उगवल्याचे व त्याचबरोबर विजयाचे समाधान मिळते. गतकाळातील अपमानाच्या आणि पराभवाच्या खुणा हव्यातच कशाला? म्हणून रामजन्मभूमीनंतर काशी, मथुरा प्रकरणे तयार आहेतच. त्या सर्व प्रकारांचे जो समर्थन करेल तो हिंदूत्ववादी आणि जो विरोध करेल तो हिंदूत्वद्रोही असे मानले जाईल.
‘हिंदूत्वा’चा आजचा अर्थ
हा मुद्दा आज महाराष्ट्रात चाललेल्या राजकारणावरून अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट होतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना हिंदूत्वद्रोही ठरवण्याचे प्रयत्न जोरदार रीतीने चालू आहेत हे सर्वानाच ठाऊक. का, तर त्यांनी आपले वडील ‘हिंदूहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे जे तमाम हिंदूंना रस्त्यावर उतरवून, महाआरत्या करवून एका समुदायाच्या हृदयात धडकी भरवत होते. त्यांचे हिंदूत्व सोडून ‘धर्मनिरपेक्ष’ अशा काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता स्थापली आणि ‘हिंदूत्वा’स संकटात टाकले. महामहीम राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना ‘आप कबसे धर्मनिरपेक्ष हो गये’ असे विचारल्याचे सर्वाना स्मरत असेलच. म्हणजे आपला धर्माभिमान अथवा धर्माधता सोडून धर्मनिरपेक्षता अथवा सर्वसमावेशक असे हिंदूत्व धारण केले म्हणजे ‘हिंदूत्वा’शी द्रोह केला असा त्याचा अर्थ. कारण ‘हिंदूत्वा’मध्ये फक्त हिंदूंच्याच हितांना प्राधान्य अपेक्षित असते इतर धर्मीयांच्या हितांना नसते. या विवेचनावरून हे लक्षात येते की, ‘हिंदूत्वा’ला आज प्राप्त झालेल्या अर्थात स्वत:च्या म्हणजे हिंदू धर्माचा अभिमान अथवा धर्माधता एवढेच लक्षण पुरेसे नाही तर एका विशिष्ट समुदायाला नकार, विरोध आणि त्याचा द्वेष हीही लक्षणे समाविष्ट करावी लागतात. म्हणजेच ‘हिंदूत्वा’ची आजची व्याख्या तयार होते. ‘हिंदूत्वा’चा आजचा नक्की आणि निश्चित अर्थ हाच आहे.
‘हिंदूत्वा’चा ‘खरा’ अर्थ
‘हिंदूत्वा’ला आज हा अर्थ प्राप्त झाला असला तरी प्राचीन काळापासून सांगितला गेलेला त्याचा ‘खरा’ अर्थ मात्र तो नव्हे. कारण प्रतिपक्षाला नाकारण्याकरिता अथवा त्याला संपवण्याकरिता त्याचेच गुण आपल्याला अंगीकारावे लागतात. तो जेवढा आक्रमक आणि हिंस्र असतो त्याच्याहीपेक्षा जास्त आक्रमक आणि हिंस्र आपल्याला व्हावे लागते. आपली हिंदू संस्कृती अशी शिकवण देत नाही. त्या संस्कृतीला ‘विश्वव्यापिनी’ संस्कृती म्हणजे अखिल विश्वाला कवेत घेणारी संस्कृती म्हटले जाते. हिंदू लोकांचा वैदिक धर्म हा सर्व जगाचा धर्म आहे व पृथ्वीवरील सर्व लोकांनी तो येथून शिकून जावा असे म्हटले आहे. ‘सर्वेन: सुखिन: संतु। सर्वे संतु निरामया:। सर्वे भद्राणि पश्यंतु। माकश्चिदु:खभाग्भवेत्’ अशी या संस्कृतीची मनीषा आहे. ही संस्कृती समतेचा पुरस्कार करून जितकी स्वधर्मनिष्ठ आहे तितकीच परमधर्मसहिष्णूही आहे. आपल्या संस्कृतीत सांगितली गेलेली ही तत्त्वे आत्मसात करण्यातच शांती आणि सर्वाचे कल्याण आहे. ‘हिंदूत्वा’ला आज कोणताही अर्थ प्राप्त झालेला असला तरी त्याचा ‘खरा’ अर्थ हा असा आहे.
rajendradolke@gmail.com