उत्तम शिक्षणाने उत्तम समाज घडवता येतो, यावर ठाम विश्वास असणाऱ्या समविचारी मंडळींच्या प्रयत्नांतून ‘विद्यादान सहाय्यक मंडळा’ने गेल्या १६ वर्षांत राज्यातल ग्रामीण तसेच शहरी भागातील वंचित आणि दुर्बल घटकांतील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वांगीण हातभार लावला जातो. अर्थसहाय्यासाठी काटेकोर निवड प्रक्रिया राबवली जाते. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना व्यापक सामाजिक आणि संस्थात्मक कुटुंबांचा भाग करून घेण्याची कार्यपद्धती आणि त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकास करणारे मूलगामी प्रारूप हे ‘विद्यादान’चे वेगळेपण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वीस वर्षांपूर्वी म्हणजेच, २००४ सालच्या मध्यात ‘लोकसत्ता’मध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापूर या दुर्गम तालुक्यातील एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक परवडीसंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. शहापूरमधल्या त्या विद्यार्थ्याला दहावीत ९२ टक्के गुण मिळूनही केवळ घरची आर्थिक स्थिती खडतर असल्याने त्याला पुढील शिक्षण घेता येत नव्हते. ते वृत्त वाचून ठाण्यातील काही सुजाण मंडळी त्याच्यापर्यंत पोहोचली आणि तेथील विदारक स्थिती पाहून अस्वस्थता घेऊनच परतली. या मंडळींनी त्या मुलाला आर्थिक मदत केली, शिवाय त्याला ठाण्यात शिक्षणासाठी घेऊनही आले. परंतु प्रश्न केवळ एका मुलाचा वा कुटुंबाचा नव्हता. त्या भागातली बहुतांश सर्वच कुटुंबे अत्यंत हलाखीत, अभावात जगत होती. तिथल्या सर्वच विद्यार्थ्यांसमोर भवितव्याविषयी अनेक प्रश्न आ वासून उभे होते. त्या सर्वांना ठाण्यात घेऊन येणेही शक्य नव्हते. त्यातूनच मग या मंडळींनी शहापूरमध्येच संस्थात्मक पायाभरणी सुरू केली आणि १५ ऑगस्ट २००८ रोजी ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ ही संस्था आकारास आली.

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड

अभियंता म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेऊन वयाच्या साठीत आनंदवनस्नेही मंडळाच्या माध्यमातून स्वत:ला समाजकार्यात वाहून घेतलेल्या दिवंगत भाऊ नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विद्यादान सहाय्यक मंडळा’ने कामास सुरुवात केली. वंचित मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित भावनेने कार्यरत असलेल्या या संस्थेशी, विविध क्षेत्रांचा अनुभव असलेले गीता शहा, संदीप भागवत, अदिती पंडित, नारायण पोंक्षे, वर्षा जोशी, निवेदिता जोशी, सुबोध जठार, प्रमथेश नवलेकर यांच्यासारखी अनेक मंडळी जोडली गेली आणि ‘विद्यादान सहाय्यक मंडळा’चा कार्यविस्तार होत गेला. तसेच सुरुवातीच्या काळापासून उद्याोजक अरुणभाई शेठ आणि ‘केअरिंग फ्रेंड्स’ संस्थेचे निमेशभाई शहा यांचे संस्थेला नेहमीच मार्गदर्शन मिळत आहे. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय ‘विद्यादान’चा हा निरंतर यज्ञ सुरू आहे. संस्थेचे मुख्य केंद्र ठाण्यात असून शहापूर, बोरिवली, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर येथे संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या ठाणे आणि कळवा येथील सात वसतिगृहांतून ७० मुला-मुलींची राहण्या-जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सक्षम विद्यार्थी, सक्षम राष्ट्र

२००८ साली केवळ २३ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या ज्ञानकेंद्री उपक्रमातून गेल्या १६ वर्षांत ९१५ विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन आज स्वत:च्या पायावर उभे आहेत. संस्थेच्या मदतीने शास्त्र, वाणिज्य, कला, वैद्याकीय, अभियांत्रिकी, परिचर्या, उपयोजित कला अशा जवळपास १६ विद्याशाखांतील ७२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सक्षम विद्यार्थी घडवून सक्षम राष्ट्रनिर्माणासाठी प्रयत्नशील राहण्याचे ब्रीद संस्थेने जपले आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी ही शिकवण लक्षात ठेवून स्वयंप्रेरणेने संस्थेच्या कामात पुढाकार घेत आहेत. संस्थेच्या www. vsmthane. org या संकेतस्थळाची निर्मिती असो किंवा संस्थेची अंतर्गत विदा व्यवस्थापन (डेटा मॅनेजमेंट) प्रणाली विकसित करणे असो; माजी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी त्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : दीड शतकाच्या दस्तावेजांना आधुनिकीकरणाचा साज

विद्यार्थी निवडीची काटेकोर प्रक्रिया

‘चला शिक्षक जोडू या’सारख्या अभियानाद्वारे संस्था ग्रामीण भागातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. संस्थेच्या संकेतस्थळावर अर्ज करून, तसेच इतर संस्था अथवा हितचिंतकांच्या साहाय्याने गरजू विद्यार्थी संस्थेपर्यंत पोहोचतात. या सर्व विद्यार्थ्यांची काटेकोर पडताळणी केली जाते. अर्जदार विद्यार्थ्यांच्या घरी संस्थेकडून गृहभेटी घेतल्या जातात, विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जाते. त्यानंतर मुख्य मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांची अर्थसाहाय्यासाठी अंतिम निवड केली जाते.

कार्यकर्ता पालक

निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी ‘विद्यादान’मध्ये प्रवेश मिळतो. वर्षभरातील प्रगतीचा आढावा घेऊन संस्था विद्यार्थाचा प्रवेश पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेते. या प्रक्रियेत ‘कार्यकर्ता पालक’ महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रति विद्यार्थी एक या प्रमाणे सध्या ४६० हून अधिक ‘कार्यकर्ता पालक’ कार्यरत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम

संस्थेने १६ विविध विद्याशाखांच्या करिअर टीम तयार केल्या असून त्यांचे नेतृत्व या क्षेत्रातील अनुभवी आणि जेष्ठ मंडळी करत आहेत. विद्यार्थ्यांकरिता वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यात करिअर मार्गदर्शन सत्रे, कौशल्य विकास आणि संवाद कौशल्य विकसनाचे कार्यक्रम, सामाजिक शिबिरे, इंग्रजी संभाषणाचे वर्ग, वाचनालय, विविध कार्यशाळा, व्यावसायिक मुलाखत प्रशिक्षण, वक्तृत्व स्पर्धा, ‘व्यक्त व्हा’ व्यासपीठ आदींचा समावेश आहे. ‘डिजिटल सक्षमीकरण’ उपक्रमांतर्गत संस्था विद्यार्थ्यांना संगणक, लॅपटॉप आणि स्मार्ट फोन उपलब्ध करून देते.

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : तीन शतकांचा दुवा सांधणारी ‘पुणे सार्वजनिक सभा’

सामाजिक बांधिलकीचे संस्कार

विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सामाजिक शिबिरांना पाठवून त्यांना सामाजिक प्रश्नांची आणि ते सोडवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची जाणीव करून दिली जाते. यातून घडणारे विद्यार्थी आव्हानांचा, संकटांचा आणि समस्यांचा समर्थपणे सामना करण्यासाठी सक्षम होतात. याची प्रचीती करोना काळात ‘विद्यादान’च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध सामाजिक कामांमधून आली. ‘विद्यादान’च्या माजी विद्यार्थ्यांतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘बी फ्रँक’ पथकाने समाजातील दुर्बल घटकांतील शाळकरी मुलांसाठी ‘स्कूल चले हम’ हा उपक्रम विकसित केला आहे. यात इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘कृतीतून शिक्षण’ या तत्त्वाने विविध कौशल्ये शिकवली जातात. याद्वारे आठ हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना संस्थेशी जोडून घेतले आहे.

विविध पुरस्कार

संस्थेच्या कामाची नोंद घेऊन संस्थेला ‘गाइडस्टार इंडिया’कडून सन २०२३-२४ करिता पारदर्शक कार्यशैलीसाठी गौरविण्यात आले. ‘मन:शक्ती केंद्रा’तर्फे ‘मन:शक्ती सद्भावना पुरस्कारा’ने आणि ‘आचार्य अत्रे कट्ट्या’तर्फे ‘कृतज्ञता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आला आहे. याशिवाय ‘मास्टेक’तर्फे दिला जाणारा ‘सीएसआर पुरस्कार’ही ‘विद्यादान सहाय्यक मंडळा’ला मिळाला आहे.

विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे वाढते शैक्षणिक खर्च, नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची निकड, राबविण्यात येणारे कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च अपेक्षित आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, अधिकाधिक विद्यार्थ्यांना स्वावलंबी करणे, पूरक अभ्यासक्रम देऊन सक्षम करणे, मुलींच्या शिक्षणास विशेष प्रोत्साहन देणे, विविध उपक्रमांची आखणी करणे अशी उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. येत्या पाच वर्षांत ‘विद्यादान’ची विद्यार्थी संख्या १,५०० पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

आपणही सहभागी होऊ शकता

आपण आपली मदत देणगी स्वरूपात किंवा समर्पित देणगीदार म्हणून विद्यार्थ्याची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी घेऊन, तसेच वस्तू स्वरूपात (लॅपटॉप, स्मार्ट फोन आदी), ‘विद्यादान’च्या एखाद्या कार्यक्रमाचे प्रायोजक होऊन किंवा संस्थेच्या उपक्रमात सहभागी होऊन अथवा कार्यकर्ता, कार्यकर्ता पालक होऊन करू शकता.

हेही वाचा : ‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…

ऑनलाईन देणगीसाठी तपशील

●बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा ठाणे

●खाते क्रमांक : 0400501086161

●आयएफएससी कोड : COSB0000040

१०२, पहिला मजला, खोपट एसटी स्टँड बिल्डिंग, खोपट, ठाणे पश्चिम ४००६०२ हा संस्थेचा पत्ता आहे. ठाणे रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील खोपट येथील खोपट एसटी बसस्थानक इमारतीतील पहिल्या मजल्यावर (कार्यालय क्र. २) संस्थेचे मुख्य केंद्र आहे.

विद्यादान सहाय्यक मंडळ, ठाणे

VIDYAADAN SAHAYYAK MANDAL THANE

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

बँकिंग पार्टनर

दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about vidyaadan sahayyak mandal thane social work in education field since 16 years css