२६ फेब्रुवारी रोजीच्या सावरकर पुण्यतिथीनिमित्त टिळक आणि सावरकर यांच्या विचार आणि कृतीमधील साम्यस्थळे..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र माधव साठे

लोकमान्य टिळक आणि स्वा. सावरकर ही भारतीय इतिहासातील दोन श्रेष्ठ नररत्ने होती. या दोहोंमध्ये गुणांची खाण होती. स्वा. सावरकरांनी, लोकमान्यांना आपले राजकीय गुरू मानले होते. लोकमान्यांचा उल्लेख ते ‘गुरुणां गुरु’ असे नेहमी करत. टिळकांचा, सावरकरांवर लहानपणापासून प्रभाव होता. गुरू-शिष्यांची ही एक अनोखी जोडी होती. या दोन थोर पुरुषांनी भारताच्या पुनर्निर्माणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्यात गुरू-शिष्याचे नाते तर होतेच, परंतु त्या नात्यात आपुलकी होती आणि परस्परसंबंधांच्या दृढतेची एक रेशीमगाठही होती.

‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रात सावरकर लिहितात ‘लोकमान्यांच्या अत्यंत कृतज्ञ आणि अत्यंत निष्ठावंत अनुयायांहून मी कृतज्ञ आणि निष्ठावंत होतो आणि राहिलो. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी लोकमान्यांचे सर्व राजकारण आणि उपदेश आचरण्याची पराकाष्ठा करून त्यांच्या कार्यक्षेत्राच्या पुढच्या प्रत्यक्ष रणक्षेत्रात उतरण्याची हाव धरली; धाव घेतली! त्यांच्यापुढे धावून त्यांचे मनोगत, उद्दिष्ट (स्वराज्य) सिद्धीस नेण्यास झटलो. ते खड्गाची मूठ होते तर आम्ही क्रांतिकारक त्यांचे पाते होतो. पाते हे मुठीच्याच मनोगताचे पारणे फेडीत असते. मूठ जेवढी भक्कम तेवढीच तलवार प्रभावी. मूठ वैचारिक बैठक तर पाते प्रत्यक्ष कृती- दोन्हीही महत्त्वाचे, दोन्हीही अभिन्न!

सावरकरांचे बालपण भगूर व नाशिक येथे गेले. त्या वेळी ‘केसरी’ व ‘काळ’ वाचून त्यांच्यातील स्फुिलग विकसित होत गेले. सन १९०० मध्ये त्यांनी टिळकस्तवन करून लोकमान्यांवरील आपली भक्ती प्रकट केली. त्याच वर्षी त्यांनी मित्रमेळय़ाची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून लोकमान्यांनी सुरू केलेल्या शिवजयंतीचा नाशिकमध्ये आरंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज हे दोघांचे आदर्श होते.

शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी सावरकर पुण्यात गेले. फग्र्युसन महाविद्यालयात ते शिकत होते. त्यांना शिक्षणापेक्षा टिळकांचे अधिक आकर्षण होते. त्यांचे मार्गदर्शन व सहवासाची त्यांना प्रचंड ओढ होती आणि त्यांना तशी पुढे संधीही प्राप्त झाली. तो काळ परदेशी वस्तूंवर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करणारा होता. ७ ऑक्टोबर १९०५ रोजी सावरकरांनी लोकमान्य आणि ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून विदेशी कपडय़ांची होळी केली. त्यांच्या या कृतीविरुद्ध फग्र्युसनचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना शिक्षा केली. लोकमान्यांनी २४ ऑक्टोबर १९०५ रोजी ‘केसरी’त ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ या शीर्षकाचा निषेधात्मक अग्रलेख लिहिला व सावरकरांविषयीचे ममत्व दाखवून दिले. लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी उच्च शिक्षणासाठी भारतीयांसाठी श्री शिवाजी शिष्यवृत्ती सुरू केली होती. सावरकरांना बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला जायचे होते. लोकमान्यांनी सावरकरांना या शिष्यवृत्तीसाठी शिफारसपत्र दिले व त्यामुळे सावरकर लंडनमध्ये जाऊ शकले. १९०८ मध्ये लोकमान्यांना सहा वर्षांची कठोर शिक्षा झाली व त्यांची रवानगी मंडाले येथे करण्यात आली. सावरकरांनी लंडनमधून ‘लोकमान्यांना काळय़ा पाण्याची शिक्षा’ हे बातमीपत्र छापून पाठवले व शिवाय कॅक्स्टन सभागृहात निषेध सभेचे आयोजन केले. १९२० मध्ये लोकमान्यांचे निधन झाले त्या वेळी सावरकर अंदमानमधील काळकोठडीत होते. सावरकरांनी त्या वेळी शोक व्यक्त करण्यासाठी तुरुंगातील केवळ बंदिवानांना नव्हे तर अंदमानमधील सर्व रहिवाशांना उपवास करण्याचे आवाहन केले. सावरकरांना जशी टिळकांविषयी भक्ती होती तसेच लोकमान्यांनाही सावरकरांबद्दल जिव्हाळा होता. १९१९ मध्ये टिळकांना घेऊन लंडनला बोट निघाली होती. पोर्ट सैदला वाटेत तीन-चार दिवस मुक्काम होता. लोकमान्यांनी या प्रवासात चिरोल खटल्याची आवश्यक पुस्तके बरोबर घेतली होती, पण त्याचबरोबर सावरकर बंधूंच्या खटल्याची कागदपत्रेही टिळक घ्यावयास विसरले नव्हते. टिळक ती कागदपत्रेही उघडून वाचत होते. ‘जन्मठेपेची शिक्षा देण्यापेक्षा अशा माणसाला एकदम ठार मारून टाकल्यास बरे.. तुरुंगात आयुष्य कंठित असताना बिचाऱ्यांना किती यातना सोसाव्या लागतात.’ ग.म. नामजोशी हे त्या वेळी टिळकांच्या समवेत होते. नामजोशी यांनी ही आठवण लिहिली आहे. (टिळकांचे स्वगत – टिळकांच्या आख्यायिका व आठवणी – खंड १)

स्वदेश, स्वधर्म, संपूर्ण स्वातंत्र्य, देशी भाषांमधून राष्ट्रीय शिक्षण, परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार, राष्ट्रवाद, राष्ट्र या संकल्पनांबद्दल स्पष्ट व स्वच्छ धारणा इ. बाबींमध्ये टिळक आणि सावरकर यांच्यात समान भूमिका होती. निर्भेळ देशभक्ती, निर्भयता, ज्ञानोपासना, ज्ञानयुक्त कर्म, लेखन, वाचन व व्यासंग, प्रज्ञा व प्रतिभेचा संगम, मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व, जननेतृत्व, अपार परिश्रम, आत्मविश्वास या दोहोंमधील गुणविशेष होते. ब्रिटिशांच्या जोखडातून भारतास मुक्त करून स्वातंत्र्य मिळविणे हे दोघांचे ध्येय होते. सशस्त्र क्रांतीने सावरकर स्वातंत्र्य मिळवू पाहात होते. तर जहाल असून सनदशीर मार्गाने लोकचळवळीतून स्वातंत्र्य प्राप्त करण्याचा मार्ग लोकमान्यांनी निवडला होता. टिळकांचा मार्ग काहीसा वेगळा असला तरी त्यांनी क्रांतिकारकांना वाऱ्यावर सोडले नाही. सर्व तत्कालीन क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान होते. टिळकांच्या सहकार्याने व प्रेरणेने सावरकर लंडनमध्ये गेले व तिथे त्यांनी ब्रिटिशांच्या राजधानीत सुरुंग लावला. इंग्लंडमधील वास्तव्यात सावरकरांनी मॅझिनीच्या आत्मचरित्राचा अभ्यास केला. गुरुमुखी शिकून शीख गुरूंचे ग्रंथ वाचले व पुढे शिखांचा इतिहास लिहिला. अंदमानच्या बंदिगृहात ते बंगाली शिकले. तेथील राजकीय बंदिवानांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली. त्यांना साक्षर बनवले. स्पेन्सर, मिल, शेक्सपिअर, कार्लाईल, नित्शे, थॉमस मूर इ. जगप्रसिद्ध लेखकांचे साहित्य त्यांनी अभ्यासले होते. लोकमान्यांची प्रखर बुद्धिमत्ता, व्यासंग तर सर्वश्रुत आहे. ‘गीतारहस्य’ लिहिताना विदेशातील मॅक्सम्युल्लर, स्पेन्सर, कान्ट, सली, पॉल डायसेन, ग्रीन इ. पाश्चात्त्य चिंतकांचे दाखले दिल्याचे त्यांत आढळते.

टिळक व सावरकरांना व्यायामाची आवड होती. दोघांची शरीरयष्टी तशी लहान, परंतु दोघांनी आपले शरीर पीळदार बनवले होते. सावरकरांचे कमावलेले शरीर बघून त्यांना लंडनमधील मंडळी लंडनमधील सुप्रसिद्ध मल्ल सँडोची छोटी आवृत्ती म्हणत. लोकमान्यांनीसुद्धा महाविद्यालयीन जीवनात एक वर्ष केवळ तालीम करून आपले शरीर सुदृढ करण्यात खर्च केले होते. घरच्या मुलांकरिता देशी पद्धतीच्या व्यायामाची सोय त्यांनी आपल्या वाडय़ात करून ठेवली होती.

कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाण्याचा दोघांचा स्वभाव होता. स्थितप्रज्ञता त्यांच्या रक्तात होती. कोणत्याही संकटात ते डगमगत नसत. १९०२-०३ मध्ये पुण्यात प्लेगची साथ होती त्यात लोकमान्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य मृत्युमुखी पडले. त्यांत त्यांचा थोरला पुत्र विश्वनाथचाही समावेश होता. सांत्वनार्थ जे लोक गेले त्यांना टिळकांनी सांगितले, ‘‘अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोवऱ्या जाव्या लागतात, त्याप्रमाणे झाले.’’ सांत्वन करणाऱ्यांचेच सांत्वन लोकमान्यांनी एका अर्थाने केले. सावरकरांच्या बाबतीतही अशी घटना घडली. रत्नागिरीच्या वास्तव्यात शालिनी नावाची त्यांची कन्या जन्मानंतर केवळ तीन-चार महिन्यांत मरण पावली. एकीकडे सावरकरांची पत्नी व अन्य कुटुंबीय मृतदेहाजवळ बसून शोक व्यक्त करत होते. तर सावरकर चक्क माडीवर लेखनात मग्न होते. सांत्वनासाठी जे लोक आले त्यांना सावरकर म्हणाले, ‘‘अपत्याचा मृत्यू झाला आहे हे खरे आहे, उपाय केले, पण यश आले नाही. भर उन्हाचे कशाला आलात. घरी जा, भोजन करा, विश्रांती घ्या, सायंकाळी चार वाजता आपण पुढील विधी करू.’’ (स्वा. सावरकर: एक रहस्य, द. न. गोखले)

विचार, कृती आणि व्यक्तित्व याची सुसंगती टिळकांमध्ये ज्याप्रमाणे आढळते तशीच सावरकरांमध्येही होती. ‘सावरकरांचे राजकारण हे सर्वार्थाने टिळकांच्या कित्त्यावर ‘ट्रेसिंग पेपर’ ठेवून काढलेल्या पुस्तीसारखे आहे’ असा अभिप्राय न. चिं. केळकर यांनी व्यक्त केला होता. लोकमान्य टिळक आणि स्वा. सावरकर हे दोघेही राष्ट्रवादाचे खंदे समर्थक होते. या दोघांनी भारतास प्रादेशिक राष्ट्रवादाकडून सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे नेले. हिंदू धर्म जेवढा सर्वसमावेशक आहे तेवढाच व्यावर्तकही आहे असे दोघांचे प्रतिपादन होते.

भारत हे मूलत: हिंदू राष्ट्र आहे हे सावरकरांप्रमाणे टिळकांनीही स्पष्टपणे सांगितले होते. ‘‘भारतवर्षांतील निरनिराळय़ा प्रांतांत निरनिराळे राजे राज्य करीत असत, परंतु धार्मिकदृष्टय़ा ते सर्व एक होते आणि तशा दृष्टीने पाहिले तर भारतवर्ष म्हणजे त्या वेळचे हिंदू राष्ट्र होते.’’ (टिळक विचार- लेखक भा. कृ. केळकर, पृष्ठ १६)

‘केसरी’च्या १३ जानेवारी १९०४ च्या अंकात टिळकांनी हिंदूत्व, हिंदू राष्ट्र या संकल्पनांचा गौरव केला आहे. या अग्रलेखाचे शीर्षक आहे ‘हिंदूत्व आणि सुधारणा’. ते म्हणतात, ‘‘कोणत्याही सुधारणेचा मुख्य उद्देश म्हटला म्हणजे विशिष्ट राष्ट्रीयत्वाचा अभिमान जागृत करणे हा होय. तो अभिमान आम्ही कोणता धरावयाचा? अर्थात हिंदूत्वाचा होय. आपल्याला पुढे जी ऊर्जितावस्था प्राप्त व्हावयाची आहे ती हिंदू राष्ट्र या नात्याने झाली पाहिजे.’’ अग्रलेखात टिळक, पुढे म्हणतात, ‘‘आम्हीही स्त्री शिक्षण, बालविवाह, पोटशाखेतील आंतर्विवाह, समुद्रयात्रा या विषयांवर सामाजिक परिषदा योजणाऱ्या सुधारकांशी पूर्ण सहमत आहोत, परंतु हिंदूत्व कायम ठेवून या सर्व सुधारणा अमलात आणणे शक्य आहे, अशी आमची धारणा आहे.’’ ३ जानेवारी १९०६ रोजी बनारसला ‘भारत धर्म महामंडळ’ या मथळय़ाचे टिळकांनी भाषण दिले. त्यात त्यांनी वैदिक काळात भारत हे स्वयंपूर्ण राष्ट्र असल्याचे म्हटले असून त्यानंतरच्या काळात या सत्याचा आम्हांस विसर पडला व आमची अधोगती सुरू झाल्याचा उल्लेख केला आहे. हिंदूंच्या धार्मिक ऐक्याचा पाया हे या राष्ट्राचे अधिष्ठान आहे आणि अहिंदूंनाही या राष्ट्रप्रवाहात सामावून घ्यावयाचे आहे, ही लोकमान्यांची भूमिका होती. स्वा. सावरकरांनी ही भूमिका पुढे अधिक समृद्ध केली.  

संमती वयाचा प्रस्ताव, हुंडाबंदी, विधवा केशवपन बंदी अशा स्त्री-विषयक प्रश्नांची चर्चा करताना लोकमान्यांनी समाजसुधारकाची भूमिका घेतली होती. ते शेतकऱ्यांचे, कोळय़ांचे, गिरणी कामगारांचे नेते होते. ‘तेल्या-तांबोळय़ांचे पुढारी’ ही पदवी त्यांनी आपल्या कार्याने मिळविली. ‘अस्पृश्यता देवास मान्य असेल तर असल्या देवास मी देवच मानणार नाही’ असा क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला. थोडक्यात काय तर हिंदूत्वाविषयी त्यांना स्पष्टता होती. सावरकरांनी तर ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी‘‘हिंदूत्व’ हा ग्रंथ लिहिला. तसेच सावरकरांनी रत्नागिरी पर्वात सामाजिक सुधारणांची क्रांती केली.

या थोर नेत्यांनी आरामखुर्चीतल्या राजकारणाला रामराम ठोकला व रस्त्यावर उतरून लोकसहभागास महत्त्व दिले. बहुजन समाजास सक्रिय केले.

लोकमान्य टिळक आणि स्वा. सावरकर या दोघांच्या भूमिका व दृष्टिकोन हे एकरूप झाले होते. सावरकरांनी लोकमान्यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या विचारांचा वारसा त्यांनी पुढे नेला. जो गुरूला मागे टाकतो- गुरूच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जातो, त्याचे मनोगत प्रत्यक्ष व्यवहारात उतरवतो तो श्रेष्ठ व आदर्श शिष्य होय. सावरकरांना असे भाग्य लाभले.

या दोन महापुरुषांचा आपल्या ध्येयवादावर अढळ विश्वास होता. ते दुर्दम्य आशावादी होते. संकट व पराभवास न खचून जाता कृतिशीलपणा त्यांच्या रक्तात भिनला होता म्हणून ते सफल व अर्थपूर्ण आयुष्य जगले.

लेखक सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आहेत. 

ravisathe64@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about vinayak damodar savarkar and lokmanya tilak ideology zws