रवींद्र माधव साठे
एकीकडे हिंदू समाजात अंतर्गत जातिभेद आहेत आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर जातिभेदांना वांशिक रूप देण्याचा प्रयत्न होत आहे. ही आव्हाने पेलण्यासाठी सावरकरांच्या सामाजिक विचारांचे पुन्हा जागरण करणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या राष्ट्रवादाचा विचार करताना, त्यांनी जे सामाजिक चिंतन प्रस्तुत केले, ते भारताच्या राष्ट्रवादासाठी एक मौलिक पाथेय आहे. अंदमान येथील दुहेरी जन्मठेपेच्या शिक्षेतून स्वा. सावरकर १९२४ मध्ये मुक्त झाले. १९२४ ते १९३७ या काळात सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते. स्वातंत्र्य मिळविणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच समाजसुधारणेचे कार्यही महत्त्वाचे आहे, ही त्यांची धारणा होती. याच भूमिकेतून त्यांनी पतितपावन मंदिराची स्थापना केली व सामाजिक क्रांतीचा वस्तूपाठ घालून दिला. ‘माझी अशी इच्छा आहे की, मी सागरात उडी घेतली होती, ही गोष्ट लोक विसरले तरी चालतील, पण मी जे सामाजिक विचार मांडले आहेत त्यांचे समाजाने स्मरण ठेवावे,’ असे सावरकर नेहमी म्हणत.
महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळय़ावर सत्याग्रह केला. पाठोपाठ पुण्याच्या पर्वतीवर व नाशिकच्या काळाराम मंदिरातही सत्याग्रह केला. या तिन्ही प्रसंगांत तत्कालीन पुढाऱ्यांपैकी केवळ सावरकरांनीच डॉ. आंबेडकरांना निर्भयपणे आणि मन:पूर्वक पाठिंबा दिला.
सावरकर लिहितात, ‘अस्पृश्यतेची रूढी ही अत्यंत अन्यायी व आत्मघातकी आहे. स्वधर्मबंधूंना निष्कारण पशूहूनही अस्पृश्य लेखणे हा मनुष्य जातीचाच नव्हे तर स्वत:च्या आत्म्याचाही घोर अपमान करणे होय. केवळ आपद्धर्म म्हणूनच नव्हे तर धर्म म्हणून, लाभधारक म्हणूनच नव्हे तर न्याय्य म्हणून, उपकाराकरिता नव्हे तर माणुसकी म्हणून अस्पृश्यतेचे उच्चाटन केले पाहिजे.’ (सावरकर चरित्र-धनंजय कीर, पृष्ठ १९४). काळाराम मंदिराच्या सत्याग्रहप्रसंगी नाशिकच्या सवर्णाना पाठविलेल्या पत्रात सावरकर म्हणतात, ‘प्रभू रामचंद्रांनी तर बिभीषणाला आपल्या घरातील अंर्तगृहात प्रवेश दिला होता. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी आपल्याच कुळाचें ना, मग त्यांना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनापासून वंचित का ठेवता?’
समाजसुधारक सावरकर या भूमिकेचा आपण जेव्हा तपशिलात जाऊन विचार करतो तेव्हा त्यांचे पाच पैलू ध्यानात येतात. पहिला पैलू असा की, समाजकारण आणि राजकारण हातात हात घालून पुढे गेले पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका होती.
१९५५ साली पतितपावन मंदिराच्या रौप्य महोत्सवासाठी सावरकर रत्नागिरीला गेले होते. त्याप्रसंगी भाषण करताना ते म्हणतात, ‘राजकारण तलवारीसारखे असेल तर समाजकारण ढालीसारखे असते. तलवारीच्या आधाराने नवीन भूमी पादाक्रांत करायची आणि समाजकारणाच्या आधारे पायाखाली प्राप्त झालेली भूमी पायाखालीच राहील याची दक्षता घ्यायची.’ आजच्या राज्यकर्त्यांना सावरकरांचे हे विचार दिग्दर्शक आहेत. वयाच्या २० व्या वर्षी सावरकरांनी विधवेच्या दु:खावर कविता लिहिली. केशवपन, बालविवाह, हुंडा इ. प्रथांना त्यांनी विरोध केला. महिलांना न्यायाची व सन्मानाची वागणूक देण्याचे आवाहन ते ‘जरठांनो नववधू खुशाल वरा’ या कवितेतून करतात. अंदमानच्या कारावासातही त्यांनी बंद्यांमध्ये शुद्धिकरणाची व साक्षरतेची मोहीम हाती घेतली, ते लक्षणीय म्हणावे लागेल.
काहींच्या मते सावरकर हे मन:स्थितीने नव्हे तर परिस्थितीने समाजसुधारक झाले. तसे असते तर स्थानबद्धतेच्या आधी व सुटकेनंतरही त्यांनी समाजसुधारणेसाठी प्रयत्न केला नसता, हे वरील उदाहरणे दर्शवितात. त्यांच्या सामाजिक विचारांचा दुसरा पैलू हा की, आपल्या समकालीन आणि आपल्या आधी होऊन गेलेल्या समाजसुधारकांविषयी त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना होती. महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धुळय़ाचे काकासाहेब बर्वे, राजभोज, कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन या सर्वाविषयी सावरकर नेहमी कृतज्ञतेची भावना बाळगत. पुण्यात १९५२ मध्ये अभिनव भारतचा सांगता समारंभ झाला. त्यावेळी क्रांतिकारकांचे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याच्या अग्रभागी सावरकरांनी महात्मा फुले यांचे चित्र लावले होते. त्यांच्या दृष्टीने महात्मा फुले जेवढे समाजसुधारक होते तेवढेच क्रांतिकारकही! हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचे ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले, त्यांच्याबद्दल सावरकर आदर बाळगीत. अशा समाजसुधारकांची चरित्रे सावरकरांच्या लेखणीतून व वाणीतून आढळतात.
हिंदू संघटनेचे कार्य करणाऱ्यांची दृष्टी विशाल व व्यापक व्हावी यासाठीच स्वातंत्र्यवीरांनी यज्ञ मांडला होता. सावरकरांच्या समाजसुधारक भूमिकेचा तिसरा पैलू हा की, या समाजसुधारणा हिंदू समाज बलशाली व्हावा म्हणून शीघ्रातिशीघ्र साकार केल्या पाहिजेत, ही त्यांची भूमिका होती. रत्नागिरीच्या आपल्या वास्तव्यात त्यांनी फार मोठी समाजक्रांती केली. रत्नागिरीत त्याकाळी स्पृश्य-अस्पृश्य भेद पराकोटीला गेला होता. पूर्वाश्रमीच्या महार व्यक्तीकडून कोणतीही वस्तू सवर्णानी घेतली तर ती गोमूत्र शिंपडून घरात घेतली जाई. मात्र त्याच व्यक्तीने दिलेले पैसे मात्र सवर्ण लगेचच खिशात टाके. ही सामाजिक विषमता मोडून काढण्यासाठी सावरकरांनी जोरदार प्रयत्न केले. हिंदू समाजातील जातिभेदास तिलांजली देऊन अखिल हिंदू समाज एका व्यासपीठावर आणण्यासाठी त्यांनी नानाविध उपक्रम योजले. पूर्वास्पृश्य मंडळीच्या वस्त्यांना भेट देणे, त्यांची दु:खे जाणून घेणे, त्यांच्यातील न्यूनगंड दूर करणे, सहभोजनाचे कार्यक्रम घडवून आणणे, शाळेत एकत्र बसविणे, अखिल हिंदू गणेशोत्सव, हळदीकुंकू अशा नानाविध उपक्रमांची शृंखला त्यांनी योजली. सावरकरांच्या या प्रचंड समाज सुधारणेच्या कार्याने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्तिमित झाले. त्यांनी सावरकरांपुढे नतमस्तक होऊन आपले उर्वरित आयुष्य सावरकरांना मिळावे अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली.
देशाला जगात मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी अंतर्गत भेदांनी पोखरलेल्या समाजास जागृत केले पाहिजे, या विचाराने सावरकरांनी हिंदू संघटना बांधण्याचा संकल्प सोडला. एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा हे त्यांचे सूत्र होते. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ हाती घेतली. पतितपावन मंदिराची उभारणी हा त्याच चळवळीचा एक भाग होता.
चौथा पैलू हा की, लढा लढायचा असला तर एकाच वेळेला समाजातील सातही शृंखला तुटून व गळून पडल्या पाहिजेत. वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्श बंदी, रोटी बंदी, सिंधू बंदी, शुद्धी बंदी, बेटी बंदी या बेडय़ांत हिंदू समाजाने स्वत:ला अडकविले होते. हिंदू समाजाने या सात बेडय़ा ग्रहण करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला, असे सावरकर म्हणत. या सप्तशृंखलांचे दुष्परिणाम समाजाच्या एकात्मतेत व देशाच्या प्रगतीत खीळ घालत आहेत, त्यामुळे या सातही बेडय़ा एकाच वेळी तोडून टाकण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीरांनी केले होते. यातून त्यांचे द्रष्टेपण सिद्ध होते.
स्वा. सावरकर ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात लिहितात की, ‘९ व्या शतकानंतर नव्या स्मृती निर्माण झाल्या नाहीत. परिणामत: हिंदू समाजातील उच्च-नीचता, विषमता, अस्पृश्यता दुर्दैवाने कायम राहिली.’ वास्तविक पाहता हिंदू समाजामध्ये खऱ्या अर्थाने समता आहे हे धर्मशास्त्रज्ञांनी सांगण्याची आवश्यकता होती. ती विजयनगरच्या साम्राज्यात विद्यारण्य स्वामींनी केवळ पूर्ण केली परंतु या विकृतीवर सातत्याने घाव घालण्याची व समाजात न्याय व माणुसकी निर्माण करण्याची अती आवश्यकता होती. अर्थात १९ व्या शतकात स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती व अन्य समाजसुधारकांनी हे कार्य केले. परंतु या विकृती अधिक गतीने संपविण्याची जी गरज होती ती गरज भारताच्या संविधानाने पूर्ण केली, त्यावेळी सावरकरांनी त्याचे स्वागत केले होते.
यूएनडीपीने मनुष्याचा विकास म्हणजे स्वातंत्र्याचा विस्तार अशी व्याख्या केली आहे. परंतु सावरकरांनी ही व्याख्या सुमारे १०० वर्षांपूर्वीच डोळय़ांसमोर ठेवली. मनुष्याच्या अंगभूत मूल्यास साद घालत स्वातंत्र्याचा रचनात्मक आनंद काय असू शकतो, याची दलितांना अनुभूती देण्याचे प्रामाणिक प्रयास केले, हा त्यांचा सामाजिक चिंतनाचा पाचवा पैलू.
कालबाह्य़ रूढींवर प्रहार, विज्ञाननिष्ठा वा विवेकवादाचा पुरस्कार आणि प्रयत्नवादाचा प्रचार ही सावरकरांच्या सामाजिक भूमिकेची कार्यत्रयी होती. वक्तृत्व, लेखणी, वृत्तपत्रे, परीक्षाकेंद्रे, नाटय़गृहे, उत्सव, जत्रा या सर्व साधनांचा उपयोग त्यांनी हिंदूंच्या कर्मठपणावर व अंधश्रद्धांवर हल्ला चढविण्यासाठी केला. सावरकरांचे सामाजिक विचार विद्यमान स्थितीतही चिरस्थायी आहेत. आजच्या कालखंडातही सामाजिक विषमता व जातिभेद संपुष्टात आले आहेत, असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. एकीकडे हिंदू समाजात अंतर्गत जातिभेद आहेत आणि दुसरीकडे याचा गैरफायदा घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर या जातिभेदांना वांशिक रूप देण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत. ही आव्हाने पेलण्यासाठी सावरकरांच्या सामाजिक विचारांचे पुन्हा एकदा जागरण करणे आवश्यक आहे. हिंदू समाज या देशाचा कणा आहे. त्यामुळे जो-जो हिंदू संघटनेचे काम करू इच्छितो त्यास सावरकरांच्या सामाजिक विचारांना उल्लंघून पुढे जाता येणार नाही. हिंदू समाजातील सामाजिक सुधारणांचा इतिहास समजून घ्यायचा असेल आणि येथील राष्ट्रवादाला अधिक बळकटी द्यायची असेल, तर स्वातंत्र्यवीरांच्या विचारांच्या अध्ययनाला पर्याय नाही.
लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आहेत.
ravisathe64@gmail. com